महाराष्ट्राची महारांगोळी ते वर्ल्ड रेकॉर्ड

केवळ रंगरेषांच्या माध्यमातून आपण काहीतरी भन्नाट करायचं ज्याने आपलंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचे नाव ही जगभरात अभिमानाने घेतले जाईल, या जिद्दीने काही मित्र एकत्र आले. आणि सुरु झाला प्रवास एका अनोख्या वर्ल्ड रेकॉर्डचा!

रंगरेषा या टीममधील अभिषेक साटम हा क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याचा आपल्या सर्वांप्रमाणेच ‘जबरा  फॅन ‘आहे. २०१७ साली सचिनच्या कारकिर्दीला सलाम करण्यासाठी त्याच्या वाढदिवसाला त्यांनी त्याला अनोखी भेट दिली. अभिषेक व संदिप बोबडे या दोघांनी ४४x२४ फुटांची भव्य रांगोळी काढली. सचिन तेंडुलकर ह्यांच्या रांगोळीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. विशेष म्हणजे जगभरातून आलेल्या २००० रेकॉर्ड मधून टॉप १०० रेकॉर्ड मध्ये या रेकॉर्डची निवड झाली. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड (USA) मध्ये सुद्धा या रांगोळीची नोंद झाली. सचिनच्या १०० MB APP वर  देखील रांगोळीचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यात आला.

मग २०१८ साली नवीन वर्षाचा नवा संकल्प मनी धरत प्रत्येक महिन्यात अशी ‘महारांगोळी’ रेखाटण्याचा रंगरेषा ग्रुपने निर्धार केला.परंतु आपण जे काही करु ते इतरांपेक्षा वेगळं असायला हवं, हे त्यांनी ठरवलं. त्यानुसार प्रत्येक महिन्यात प्रसिद्ध नामवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या वाढदिवसा दिवशी त्यांची ५०x ३० फुटांची रांगोळी साकारायची आणि आपल्या कलेच्या माध्यमातून ह्या व्यक्तीचं कार्य लोकांसमोर आणायचे असे ठरले. यातील प्रत्येक रांगोळीचं वैशिष्ट  म्हणजे रांगोळीतील कर्तृत्ववान व्यक्तीवर साकारलेली कविता. रंगरेषा ग्रुपमधील कवी विपुल शिवलकर हा रांगोळीसाठी आणि त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला अनुरूप अशी कविता लिहून देतो आणि तीच कविता रांगोळीत साकारली जाते.

जानेवारी महिन्यात व्यंगचित्रकार , कलाकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारी ला गणेश गल्लीच्या मैदानात ५०x ३० फुटांची रांगोळी साकारण्यात आली होती.

फेब्रुवारी महिन्यात २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि कुसुमाग्रज यांच्या जन्मदिन याचे औचित्य साधून कुसुमाग्रजांची रांगोळी साकारण्यात आली.

 

मार्च महिन्यात महिला दिन असतो. याच अनुषंगाने तरुण भारतीय महिला ग्रँड मास्टर कोणेरू हंपी ह्याची रांगोळी साकारण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत ही रांगोळी पोचली. कोणेरू हंपी यांना ही कलाकृती खूप आवडली. त्यांनी व्हिडिओ मॅसेज पटवून रंगरेषा रांगोळी ग्रुपच कौतुक केलं व आभार मानले.

 

#ThankYouMessage
#KoneruHumpy
#Youngest_Indian_Lady_GrandMaster
#BirthdayGift
#50×30 feet Rangoli
#RangResha #RangoliGroup
#12Month12Rangoli
Rang Resha

Posted by Abhishek Nandkishor Neelam Satam on Saturday, 31 March 2018

 

एप्रिल महिन्यात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांची रांगोळी साकारण्यात आली.

सचिन तेंडुलकर याच्या ४५ व्या वाढदिवशी देखील इकोफ्रेंडली कागदांपासून ५० x ३० फुटांचे चित्र रेखाटून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. ही रांगोळी ICC ने आपल्या फेसबुक पेजवर देखील शेअर केली होती.

महारांगोळीची तयारी कशी केली जाते?

रांगोळीसाठी विषय ठरला की त्या व्यक्तीचं कोणतं चित्र घ्यायचं? रांगोळीत त्या व्यक्तीबद्दल कोणत्या महत्त्वपूर्ण  गोष्टी रेखाटायच्या, रंग संगती कोणत्या वापरायच्या, कविता कुठे लिहायची, इत्यादी  ठरवलं जातं. एक महारांगोळी रेखाटण्यासाठी सुमारे २४ -२५ तास इतका अवधी लागतो. दिवसा आपली कामे सांभाळत रात्रीच्या वेळी सगळे रांगोळी काढण्यासाठी हजर असतात. रंगरेषा गृपमधील काहीजण आर एम भट्ट हायस्कूलचे माजी विद्यार्थी असल्याने शाळेने देखील मदतीचा हात म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना महारांगोळी काढण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे.

दर महिन्याला एक ५०x३० फुटांची अशा वर्षभरात १२ विविध महारांगोळ्या साकारण्याचा आणि त्या नंतर हा संग्रह गिनिज बुकमध्ये वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठविण्याचा रंगरेषा टीमचा मानस आहे. आपल्या कलाकृतीतून जगभरात आपल्या महाराष्ट्राचे नाव पोहचविण्याचे स्वप्न व त्यासाठी रंगरेषाचे मेहनत घेणारे कलाकार यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

रंगरेषा रांगोळी ग्रुपचे कलाकार:

  1. अभिषेक साटम
  2. संदिप बोबडे
  3. मिलिंद भुरावणे
  4. किरण सावंत
  5. रुपेश कलबाटे
  6. कल्पेशराज कुबल
  7. कवी : विपुल शिवलकर

आपल्या महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतो.

2 comments

  1. Abhishek Satam

    धन्यवाद कालनिर्णय

  2. रांगोळी | रांगोळी आणि शुभचिन्हे | डॉ. नयना तडवळकर | Rangoli | Diwali Rangoli

    […]   पणती : दिवाळी हा दिव्यांचा उत्सव आहे. रांगोळीमध्ये काढण्यात येणारे पणतीचे चिन्ह /आकृती म्हणजे अज्ञानाला दूर करण्याचे प्रतीक आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार करता पणतीची ज्योत ज्ञान व ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दर्शविते. या चिन्हांबरोबरच आणखी काही चिन्हे, आकृत्यांचाही वापर आपल्या रांगोळ्यांमधून केलेला पाहावयास मिळतो. अशीच एक आकृती म्हणजे गाय. वसुबारसच्या दिवशी गायींची पूजा केली जाते. गायींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ती एक कृती असते. आजपर्यंत केली, तशीच यापुढेही गायींनी सेवा करावी, अशी विनंती गायींना या निमित्ताने करण्यात येते. याच दिवशी गाय आणि वासरू यांचे चित्र असलेली किंवा गायीच्या खुरांचे ठसे किंवा गोपद्माची रांगोळी काढण्यात येते. अशी रांगोळी काढण्यामागेही कृतज्ञता व्यक्त करणे, हाच हेतू असतो. […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.