बोलू | Pula Deshpande

बोलावे आणि बोलू द्यावे! | पु. ल. देशपांडे | Talk and let’s talk! | Pula Deshpande

बोलावे आणि बोलू द्यावे!

बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वांत आवडणारी व्याख्या आहे. आपला मनातला राग, लोभ, आशा, आकांक्षा, जगताना येणारे सुखदु:खाचे अनुभव, हे सारे बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवानं तो मुका असला तर खुणांनी बोलतो, रंगरेषाच्या साहाय्यानं बोलतो, नादातून बोलतो, हावभावांनी बोलतो. कधी कधी जेव्हा त्याला कुणालाही काहीही सांगू नये, कुणाशी बोलू नये असं वाटतं त्या वेळीसुद्धा ‘हल्ली मला कुणाकुणाशी बोलू नये असं वाटतं’ हे तो दहाजणांना बोलून दाखवतो.  जगण्यात अर्थ नाही हे बोलून दाखवतो. जगण्यातच अर्थ आहे हे बोलून दाखवतो. तो स्वतःविषयी बोलतो, दुसऱ्याविषयी बोलतो, खरं बोलतो, खोटं बोलतो, वर्तमान, भूत, भविष्य या तिन्ही काळांविषयी बोलतो. म्हणूनच कुणाला तरी काहीतरी सांगावंसं वाटणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मग ते तोंडानं बोलून सांगो, की लेखणीच्या साहाय्यानं कागदावर बोलून सांगो. जीवनात कुणापासून दुरावल्याचं दुःख “काय करणार? तिथं बोलणंच संपलं,” अशा उद्‌गारांनीच तो व्यक्त करतो. मरण म्हणजे तरी काय?बोलणं संपणं।

मला स्वतःला अबोल माणसांचं भारी भय वाटतं. निर्मळ मनाची माणसं भरपूर बोलतात. कमी बोलणं हे मुत्सद्दीपणाचं लक्षण मानलं जातं ते खरंही असेल. धूर्त माणसं कमी बोलतात आणि मूर्ख माणसं जरा अधिक बोलतात, हेही खोटं नाही. काही माणसं दिवसभर नळ गळल्यासारखी बोलतात, काही उगीचच तारसप्तकात बोलतात. ‘अति सर्वत्र वर्जते’, तेव्हा असल्या अतिचा विचार करायचं कारण नाही. पण गप्पांच्या अड्डयात मोकळेपणानं भाग घेणारा माणूस माझ्या दृष्टीनं तरी निरोगी असती. अड्डा म्हटला की तिथे थट्टा-मस्करी, गैरहजर असणाऱ्या माणसांची निंदा चालायचीच. फक्त त्या निंदेमागे त्या गैरहजर माणसाला माणसातून उठवण्याचा हेतू नसावा. टीकेत तसं काही वाईटच असतं असं मानायचं नाही. तसे आपण सर्वच थोड्याफार प्रमाणात टीकाकार असतोच. आपलं सबंध दिवसाचं बोलणं जर ध्वनिमुद्रित केलं तर त्यात आपण टीकाकाराचीच भूमिका अधिक वेळ बजावीत असल्याचं दिसेल. अगदी साध्यासुध्या जेवणाची तारीफ करतानासुद्धा! स्वतःच्या कुटुंबानं केलेल्या कांदेबटाट्याच्या रश्श्याची तारीफ करतानादेखील,… “नाहीतर त्या दिवशी त्या कुळकर्ण्याच्या बायकोनं केलेला रस्सा, तो काय रस्सा होता? कांदे-बटाट्याचा लगदा,” अशा टीकेची पुरवणी जोडल्याखेरीज त्या साध्या पावतीची स्टॅम्प्ड रिसीट होत नाही.

बोलण्याच्या पद्धतीचा स्वभावाशी आणि एकूण वागण्याशीही फार जवळचा संबंध असतो. बेतास बात  किंवा टापटिपीनं बोलणारी माणसं पोशाखातसुद्धा टापटीप असतात. अघळपघळ बोलणारी माणसं कडक इस्त्रीबाज नसतात.  रँ रँ बोलणारी माणसं कामातही रँ रँ असतात. तर तुटक बोलणारी स्वभावानंच तुटक असतात. काही माणसं ठरावीक मंडळीतच खुलतात. जरा कोणी अपरिचित माणूस आला की गप्प. असल्या माणसाच्या जेवण्याखाण्यापासून ते कपड्यापर्यंतच्या आवडीनिवडी ठरलेल्या आहेत हे ओळखावं. त्यांना वांगं आवडत नसलं तर ते उपाशी उठतील, पण कुठल्याही कंपूत रमणारा माणूस कुठल्याही पद्धतीच्या भोजनाचा मस्त आस्वाद घेणारा असतो. असल्या माणसांना बोलायला कुणीही चालतं बोलायला चालतं म्हणण्यापेक्षा ऐकायला कुणीही असलं तरी चालतं.

काही माणसं मात्र फक्त आपल्यालाच बोलायचा हक्क आहे असं समजून बोलत असतात. विशेषतः राजकारणातील आणि साहित्यातील-त्यातून त्यांच्या तोंडापुढे मायक्रोफोन असला तर हा व्यवहार दुतर्फी करायची सोयच नसते. संघटित प्रयत्नांनीच ते बोलणं थांबवता आलं तरच त्यातून सुटका असते. परिसंवाद नावाच्या प्रकारात तर असले वक्ते काव आणतात. अशाच एका परिसंवादात एक साहित्यिक विदुषीबाई बोलायला उभ्या राहिल्या. (त्यांनी पुस्तकं वगैरे लिहिलेली नाहीत, पण साहित्य संमेलनांना नियमितपणे वर्षानुवर्षं उपस्थित राहिल्यामुळे साहित्यिक.) प्रत्येक वक्त्याला फक्त दहा मिनिटांचाच अवधी देण्यात आल्याचा मंत्र अध्यक्षांनी दिला होता. बाईंनी सुरुवात केली आणि त्या आवरेचनात. पंधरा मिनिटांनंतर अध्यक्षांनी घंटी वाजवली. बाईंनी ढीम लागू दिली नाही. कारण तोपर्यंत त्या ‘इतक्या थोड्या वेळात हा विषय मांडणे शक्य नाही तरी मी आता मुख्य विषयाकडे वळते’इथपर्यंतच आल्या होत्या. पंचवीस मिनिटांनंतर अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवली. बाईनी अध्यक्षांना, हा उगीचच घंटी वाजवण्याचा कसला भलता नाद लागलाय, अशा चेहऱ्यानं त्यांच्याकडे पाहून ‘आजच्या समाजात स्त्रियांची कशी मुस्कटदाबी होते आहे’ हा मुद्दा खुलवायला घेतला. काही वेळानं अध्यक्षांनी पुन्हा घंटी वाजवल्यानंतर बाईंनी त्यांच्यापुढील घंटी स्वतः उचलून हातात घेतली आणि आपलं भाषणं चालू ठेवलं.

पुरुषांपेक्षा बायका अधिक बोलतात हा बायकांवर अकारण केलेला आरोप आहे, वास्तविक बायका अधिक बोलत नसून कमी ऐकतात एवढंच. त्यातून असलीच जर एखादी फार बोलणारी बायको तर तिला गप्प करण्याचा एक रामबाण इलाज आमच्या एका अनुभवी मित्रानं शोधून काढला आहे. “शेजारच्या सरलाबाईंनी एक मेलं वाटीभर डाळीचं पीठ द्यायला किती खळखळ केली,” अशासारख्या प्रापंचिक विषयावर भाष्य सुरू झालं की आमचा मित्र एकदम आंतरराष्ट्रीय राजकारणात शिरून, “दक्षिण ऱ्होडेशियातलं कळलं का तुला?” असा प्रश्न टाकून वंशद्वेष किंवा इजिप्त-इस्राएल संबंध यात शिरतो. त्यामुळे वाटीभर डाळीच्या पिठाचा इश्शू क्षुद्र होऊन जातो. गरजूंनी हा उपाय करून पाहण्यासारखा आहे, त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारण कळायला हवं असं नाही. ब्रह्ममायेसारखं ते अगम्य कोडं आहे. म्हणूनच ब्रह्ममायेवर कुठलेही अखंडत्रिखंडानंद जसे मनाला येईल ते बोलतात; तसे आपण आंतरराष्ट्रीय राजकारणावर बोलावं. आंतरराष्ट्रीय राजकारण, ब्रह्मज्ञान आणि भुताटकी या विषयांवर काहीही बोललं तरी खपतं.

ते काही का असेना, पण माणसानं बोलावं. गाडकऱ्यांची शिवांगी तिच्या रायाजीला म्हणते, “राया, मनात असेल ते बोल, मनात नसेल ते बोल.” वरपांगी मोठं भाबडं पण जरा अधिक न्याहाळून पाहिलं तर तसं फार खोल वाक्य आहे. मनात असेल ते बोलण्याचं धैर्य नसतं म्हणून तर मनात नसेल ते बोलावं लागतं. व्यवहारात मनात असेल ते न बोलण्याच्या चातुर्यालाच अधिक महत्त्व असतं. मुक्काम हलवण्याची चिन्हं न दाखवणाऱ्या पाहुण्याला ” आता तुम्ही इथून तळ उठवावा” म्हणायचं धैर्य असलेले नरकेसरी या जगात किती सापडतील ? मनात नसेल तेच बोलायची माणसावर संस्कृती किंवा सभ्यतेनं सक्ती केलेली असते.

आपण कितीही स्वतंत्र असल्याचा आव आणला तरी जीवनाच्या एका विराट नाटकातील आपण पात्रं आहोत, इथे सगळेच संवाद पदरचे घालून चालत नाही. कुठल्या अज्ञात नाटककारानं या रंगभूमीवर आपल्याला ढकललेलं आहे याचा अजूनही कुणाला थांगपत्ता लागलेला नाही. आणि एकदा एंट्री घेतल्यावर बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, न बोलून सांगता कुणाला, अशी अवस्था आहे.

राजेशाही काळात ‘राजा बोले दळ हाले,’ अशी अवस्था होती. लोकशाहीच्या काळात तर लोकांनीच बोलले पाहिजे. आता तलवारीच्या पट्ट्याची जागा जिभेच्या पट्ट्यानं घेतली आहे. इथे न बोलून राहण्यापेक्षा बोलून बाजी मारणारा मोठा. मात्र या आपल्या बोलण्याच्या कलेच्या अभ्यासात न बोलण्याची कलासुद्धा आत्मसात करावी लागते. नाहीतर न बोलून मिळालेली सत्ता बोलून घालवली असंही होतं. ‘कला’ म्हटल्यावर बोलण्याच्या कलेलाही इतर कलांचे नियम आले. कला ही प्रत्यक्ष प्रकट करण्याइतकीच दडवण्यातून प्रकट होत असते. कधी कधी भानगडीच्या राजकीय परिस्थितीत नेत्याच्या वक्तृत्वापेक्षा नेत्यांचं मौन अधिक बोलकं असतं. उत्तम गायकाला गाणं किती गावं याबरोबरच कधी संपवावं हे कळणं आवश्यक असतं आणि बोलणाऱ्याप्रमाणे लिहिणाऱ्यालाही लिहिणं संपवावं कधी तेही कळायला हवं. म्हणून हे बोलण्याबद्दलचं लिहिणं विन्दा करंदीकरांच्या कवितेतल्या ओळीत थोडा फेरफार करून संपवताना मी एवढंच म्हणेन की –

बोलणाऱ्याने बोलत जावे

ऐकणाऱ्याने ऐकत जावे

कधी कधी बोलणाऱ्याने

ऐकणाऱ्याचे कान घ्यावे.”

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


पु. ल. देशपांडे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.