परसबाग | Home Gardening Ideas | Importance of Gardening | Home garden Plants | Benefits of Home Gardening

परसबाग फुलविताना – डॉ. राजेंद्र देशमुख (उद्यानतज्ज्ञ)

परसबाग फुलविताना


कडाक्याचे ऊन आणि सिमेंट- काँक्रीटची जंगले, प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा, कारण पाऊस, हिरवळ सर्वांनाच हवी आहेत. आज मोठ्या शहरांमध्ये जनसंख्या वाढल्यामुळे घरांची तसेच वाहनांची संख्यासुद्धा वाढतच आहे आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. वृक्षतोड, जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तापमानवाढ, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ हे आपण रोजच अनुभवतो, कारण जागतिक तापमानवाढ. मानो या ना मानो, मनुष्यच याला बऱ्याच अंशी कारणीभूत आहे. जर आपण एखादी चूक केली तर ती चूकही आपणच दुरुस्त करू शकतो, हो ना? ‘सोल्युशन टू पोल्युशन इज डायलुशन’ असे म्हणतात आणि हे डायलुशन वृक्षच करू शकतात. आपल्या घराभोवती, अंगणात, परसात, बाल्कनीमध्ये, टेरेसवर, जागा असेल तिथे वृक्षलागवड करून, बाग फुलवून आपण पर्यावरण संवर्धनामध्ये फूल ना फुलाची पाकळी आपले योगदान देऊ शकतो.

या धकाधकीच्या आयुष्यात शारीरिक व्यायाम, परस बागेत रोज थोडा वेळ काम करून आपण आपले आरोग्य उत्तम राखू शकतो. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत पावसाळी, हिवाळी व उन्हाळी हंगामात फुलणारी झाडे, भाजीपाला आपण सहज फुलवू शकतो, पण त्यासाठी थोडा वेळ काढणे आवश्यक आहे. आज मुंबईसारख्या शहरात येणारा भाजीपाला रेल्वे रूळाजवळ तयार केला जातो जो आरोग्यास योग्य नाही. पण आपल्या कुटुंबाला लागणारा जवळजवळ सर्वच भाजीपाला, फळे, फुले आपण आपल्या परसबागेत सहज फुलवू शकतो.

बागकामासाठी लागणारी अवजारे

  • खुरपे:असे म्हणतात की ‘तण खाई धन’, म्हणून तण काढण्यासाठी, माती खुरपण्यासाठी खुरपे आवश्यक आहे.
  • कुदळ / टिकाव:जमीन खोदण्यासाठी, फळांचे रोप लावण्यासाठी, खड्डा करण्यासाठी याचा उपयोग होतो.
  • फावडे :खड्ड्यातील माती काढण्यासाठी किंवा खड्डा भरण्यासाठी, आळे करण्यासाठी, सरी- वरंबे करण्यासाठी फावडे आवश्यक आहे. तसेच छाटणीसाठी कटर, पाण्यासाठी झारी, पाइप, कुंड्या, लटकणाऱ्या बास्केट्स, कोयता या सर्व बाबी आवश्यक आहेत.

विविध आकाराच्या व रंगाच्या कुंड्या आणून त्या माती व खतमिश्रणाने भरून आपण फुलझाडे, फळझाडे तसेच विविध प्रकारचा भाजीपाला पिकवू शकतो. कुंड्या भरण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग :

माती :

कोकणातील लाल माती ही अत्यंत उत्तम. कारण या मातीतून पाण्याचा योग्य निचरा होतो. काळी पोयट्याची मातीसुद्धा उत्तम.

खत :

परसबागेसाठी शेणखतासारखे किंवा गांडूळखतासारखे उत्तम खत दुसरे कोणतेही नाही.

कोकोपीट :

नारळाच्या काथ्यापासून तयार केलेला भुसा हाही आजकाल कुंड्या भरण्यासाठी वापरला जातो. पण नैसर्गिक मातीमध्ये असलेली अन्नद्रव्ये कोकोपीटमध्ये नसतात, त्यामुळे खत व पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करणे भाग पडते.

माध्यम कसे कराल? :

माती, खत व वाळू ३:२:१ या प्रमाणात मिश्रण करून कुंडी भरावी. मातीमध्ये कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत, व्यवस्थित वाळू मिसळून माध्यम तयार करावे.

कुंड्यांचे प्रकार व आकार :

आजकाल बाजारात विविध रंगांच्या तसेच आकाराच्या लहान, मध्यम तसेच मोठ्या कुंड्या उपलब्ध आहेत. आपल्याकडे असलेल्या जागेत त्यांची व्यवस्थित मांडणी करून तसेच सूर्यप्रकाशाचा विचार करून आपल्याला हव्या त्या वृक्षांची लागवड करावी.

फुलझाडे : परसबागेत मुख्यत्वे गुलाब, जास्वंद, मोगरा, जाई, जुई, अबोली, रातराणी, लिली सदाफुली,कन्हेर, शेवंती, झेंडू, निशीगंध, इ. लागवड आपण करू शकतो.

भाजीपाला :

सर्व प्रकारच्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, कोथिंबीर, लाल व हिरवा माठ, अंबाडी, चवळी इत्यादींची लागवड आपण बांबू बास्केटमध्ये करावी. वर सांगितल्याप्रमाणे माध्यम तयार करावे. बांबू बास्केटमध्ये तळाशी हिरव्या जाळीचा (जी नर्सरीवाले सावलीसाठी वापरतात) गोल तुकडा कापून खाली टाकावा, जेणेकरून पाण्यासोबत मातीची जास्त धूप होणार नाही.

सर्व पाले भाज्यांची बाजारात कृषी केंद्रांमध्ये मिळतात. ते बांबू बास्केटमधील माध्यमावर हळुवार पेरावे व नंतर लगेच पाणी द्यावे. पाणी देताना फक्त झारीचाच वापर करा. साधारण एका आठवड्यात भाजी उगवून येईल, पूर्ण वाढ झालेला भाजीपाला दोन-तीन वेळा कापता येतो. आपण परसबाग मध्ये उगवलेला भाजीपाला खाण्याचा आनंद काही औरच असतो.

खत व्यवस्थापन :

हिरव्या पालेभाज्यांना नत्र लागते म्हणून १२-१८ इंच व्यासाच्या गोल कुंड्यांमध्ये किंवा बांबू बास्केटमध्ये खुरपी करून चार-पाच छोटे चमचे यूरिया पसरवून टाका किंवा एक मग पाणी घेऊन त्यात या यूरियाचे द्रावण कुंडीत सोडा. सेंद्रिय पद्धतीने जर भाजीपाला उत्पादित करावयाचा असेल तर एक ओंजळ गांडूळखत व हाडांचा चुरा (बोनमील) घालावे. महिन्यातून परसबाग मध्ये एकदा हे खत द्यावे.

पाणी व्यवस्थापन :

पाणी देताना खूप संवेदनशीलपणे जपून द्यावे. कमी पाण्याने नव्हे तर जास्त पाणी दिल्याने फळझाडे, फुलझाडे तसेच भाजीपाल्यांना अपाय होऊ शकतो. तेव्हा उन्हाळ्यात दोनदा म्हणजे सकाळी व संध्याकाळी रोज पाणी द्यावे, तर हिवाळ्यात एकदाच पाणी द्यावे. पाणी झारीने अथवा परसबाग अंगणात असेल तर पाइपने द्यावे.

फळझाडांची कुंडीतील लागवड:

मोठ्या कुंड्यांमधून (१ मीटर व्यास) असलेल्या फायबरच्या कुंड्या (१ मीटर उंच) बाजारात मिळतात. ड्रेन होल असलेल्या विटांचे तुकडे टाकून माती, खत, वाळू, यांचे माध्यम भरावे. परसबागेत साधारण पेरू, चिकू, आंबा, लिंबू या फळपिकांची लागवड आपण करू शकतो. टेरेसवर या मोठ्या कुंड्यांतून ही लागवड अनेकांनी यशस्वी केली आहे. फक्त लागवड कुंड्यांमधून केली असल्यामुळे त्या फळझाडांची वाढ छाटणी करून नियंत्रित ठेवावी लागते. आपल्या आवडीचे फळपिकाचे रोप किंवा कलम रोपवाटीकेतून आणि रोपांची पिशवी ब्लेडने कापून मातीच्या हंडीसकट कुंडीत कलमाची लागवड करावी व लगेच पाणी द्यावे.

खत व्यवस्थापन :

फळपिकांना वर्षातून किमान दोनदा खत देणे गरजेचे आहे. जून-जुलै व जानेवारी-फेब्रुवारी. १ मीटर व्यासाच्या कुंडीत एक वर्षाच्या फळझाडास साधारण अर्धा किलो मिश्र अथवा संयुक्त खत द्यावे (सुफला १५:१५:१५) व वर्षातून दोनदा एक घमेले गांडूळखत द्यावे.

फुलझाडांनासुद्धा भाजीपाल्याप्रमाणे थोडा यूरिया, गांडूळखत द्यावे. संयुक्त खत वर्षातून एकदाच म्हणजे पावसाळ्यात द्यावे. आजकाल १०० टक्के पाण्यात विरघळणारी खते बाजारात उपलब्ध आहेत जी आपण फवारूनसुद्धा देऊ शकतो. ५ ग्रॅम प्रति लिटर १९:१९:१९ या संयुक्त प्रमाणात विरघळणाऱ्या खताची फवारणी संपूर्ण परसबागेतील पिकांवर आठवड्यातून एकदा करावी.

आंतरमशागत :

दररोज परसबागेत फेरी मारून निरीक्षण करावे, तण काढून मातीत खुरपणी करावी, कीडग्रस्त, रोगट फांद्यांची छाटणी करावी. वेलवर्गीय भाजीपाल्यालामांडव घालून आधार द्यावा. कीटकनाशक, बुरशीनाशकाची आठवड्यातून एकदा फवारणी करावी.

तर चला, आजपासून संकल्प करूया आणि परसबाग फुलवूया.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


-डॉ. राजेंद्र देशमुख- उद्यानतज्ज्ञ

One comment

  1. Sunil Bagade.

    छान,उपयोगी , सविस्तर माहिती बद्दल खूप खूप धन्यवाद.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.