September 19, 2024

जलसंधारणाचे महत्त्व

आपल्याला वर्षभरात लागणाऱ्या पाण्याचा निसर्गचक्रात दरवर्षी नव्याने पुरवठा होण्याचे दिवस म्हणजे मुख्यत: पावसाळ्याचे. कोकणपट्टी वगळली तर महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात सामान्यत: १५ ते २० मोजके दिवसच पाऊस पडतो. पावसाच्या या मर्यादित दिवसांमध्ये पृथ्वीतलावर पडणारे पाणी वेळीच नीट साठवून घेतले नाही, तर हातचे निघून जाते.

पावसाच्या दिवशी पडणारा पाऊसही सातत्याने संथपणे पडत नाही. दिवसातील थोडाच वेळ, पुष्कळदा तर केवळ काही मिनिटेच सरी कोसळतात. ज्या गतीने पाऊस जमिनीवर पडतो, त्या गतीने जर आपण त्याचे पाणी साठवून ठेऊ शकलो नाही, तर साठवता न आलेले पाणी वाहून जाते.

निसर्गातही जलसंधारणाची प्रक्रिया स्वतंत्रपणे चालू असते. आकाशातून पडणारे पाणी जमिनीवर पोहोचण्यापूर्वी झाडांच्या पानांवरच पावसाचे थेंब रेंगाळतात. गवताळ कुरणांच्या सच्छिद्र गवती आवरणात पाण्याचा थर जमतो. मोकळ्या कणांच्या भुसभुशीत जमिनीवर पडलेले पाणी चटकन जमिनीत झिरपते, पण अशी जमीनही कोसळणारा सर्व पाऊस त्या गतीने रिचवू शकत नाही. त्यामुळे न जिरलेले पाणी जमिनीवरून वाहू लागते. चिकण मातीच्या जमिनीचा वरचा पापुद्रा एकदा ओला झाला व माती फुगून एकसंध झाली की, अशा जमिनीत पाण्याचा पुढील शिरकाव फारच मंदगतीने होतो. गवतांच्या व झाडांच्या मुळांच्या आधाराने मात्र मातीत पाणी झिरपणे बरेच सोपे होते.

निसर्गव्यवस्थेत अशा प्रकारे होणाऱ्या स्थानिक साठवणीतून उरणारे व नदी-नाल्यांतून वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून घेण्यासाठी कृत्रिम पाणवठे निर्माण करावे लागतात, नदी-नाल्यांमध्ये बंधारे उभारून किंवा साठवणीचे छोटेमोठे तलाव व जलाशय बांधून हे साधता येते.

आपल्याकडील कोरड्या उष्ण हवामानामुळे भूपृष्ठावर किंवा भूपृष्ठाजवळ साठलेले अथवा साठवलेले पाणी लगेच वाफारून उडून जाऊ लागते. पानावरून, गवतांमधून, मातीमधूनही बाष्पीभवनाने पाणी निघून जाते. खुद्द पावसाळ्यातही उघडीप पडली की, लगेच बाष्पीभवन तीव्र होते. महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण प्रदेशात वर्षभरात मिळून अडीच ते तीन मीटर पाणी वाकून जाते. कडक उन्हाळ्यात दर दिवशी २० मिमी पाणी उडून जाते.

म्हणून पाण्याला वाऱ्यापासून व सूर्यकिरणांपासून झाकून ठेवायला हवे. त्यासाठी पाण्याच्या साठ्यावर आवरण घालायला हवे. प्लॅस्टिकची चादर, तरंगत्या वस्तूंचे आच्छादन, रासायनिक तवंग किंवा घनदाट पर्णराजीची छाया यांचा यासाठी उपयोग होतो. या व्यवस्था बऱ्याच खर्चिक असतात; जोरदार वाऱ्यापुढे त्याचा नीटसा टिकावही लागत नाही, पण जेव्हा केवळ पिण्याच्या पाण्याचीही भ्रांत असते, तेव्हा निदान उन्हाळ्यापुरते असे उपाय योजणे आवश्यक ठरते.

जमिनीत ओल केशाकर्षणाने जमिनीच्या पृष्ठभागाकडे ओढली जाते व तिथून वाफ निघून जाते. जमिनीतील ओल दीर्घकाळ टिकवून ठेवायची म्हणजे जमिनीवरही आच्छादन हवे. म्हणून शेतजमिनीवर पालापाचोळ्याचे, गवताचे, कडब्याचे, तुसाचे किंवा चक्क प्लॅप्स्टिकचे आवरण घालण्याचा प्रघात आहे. प्रगत शेती पद्धतीत पाण्याच्या काटकसरीसाठी उभ्या पिकांमधील शेतजमिनीवर असे आवरण पसरवणे हा एक महत्त्वाचा भाग आहे.

पावसाचे जे पाणी जमिनीत झिरपून भूजलात रूपांतरित होते, ते मात्र बाष्पीभवनापासून सुरक्षित राहते. म्हणून अधिकाधिक पाण्याचे भूजलात रूपांतर होईल अशी व्यवस्था करावयास हवी. यासाठी पाणी चटकन वाहून जाऊ नये म्हणून जमीन सपाट करणे, उतरणीच्या जमिनीमध्ये वाळूच्या किंवा मुरुमाच्या थरापर्यंत चर खणणे, नाल्यांमध्ये भेगाभेगांच्या व सच्छिद्र खडकांच्या जागी आडोसे घालणे, किंवा पाझर तलावांची उभारणी करणे – अशी कामे करावी लागतात.

मंदगतीने का होईना, जमिनीखालील पाणी जमिनीखालून नदीपात्राकडे अखंडपणे वाहत राहते व कालांतराने पुन्हा नदीप्रवाहात अवतीर्ण होते. म्हणून भूजल साठ्याच्या पुनर्भरणाची व्यवस्था अबाधितपणे दरवर्षी होत राहिली, तरच भूजलाची पुरेशी साठवण हाती येते. भूपृष्ठाजवळील मातीचे थर व त्याखालील खडकाची प्रत यांवर पाणी झिरपण्याचे प्रमाण व जमिनीच्या पोटातील पाणी साठविण्याची क्षमता अवलंबून असते. त्यामुळे जमिनीत पाणी मुरवण्याची कामे सगळीकडे सारख्याच प्रमाणात सफल होत नाहीत. स्थानिक भूस्तरांच्या अनुकूलतेनुसार जलसंधारणाची क्षमता कमी- जास्त होते. स्थानिक भूस्तरांचे शास्त्रीय सर्वेक्षण करून त्या आधारे ठरवलेले जलसंधारपणाचे तपशील अधिक लाभदायी ठरतात.

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या ज्या प्रदेशात जांभा दगड आहे, तेथे त्या दगडाच्या सलग सच्छिद्रेमुळे जमिनीत पाणी जिरले, तरी ते पुरेसा वेळ टिकून ठेवणे शक्य होत नाही. झिरपलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होऊन जातो. अशा जमिनीमधील छिद्रांमध्ये वाळू माती, सिमेंट यासारखी सामग्री ठासून पाण्याच्या वाहून जाण्याला काही प्रमाणात अवरोध निर्माण करता येतो. पण याबाबतीत अजून हुकमी उपाययोजना अस्तित्वात येऊ शकली नाही. जांभा दगडावर भूशास्त्रीय आणि अभियांत्रिकी दृष्टीने अजून पुष्कळ काम व्हायला हवे आहे. त्या त्या पाणवहळ क्षेत्रांमध्ये पाणीसाठवणीच्या या नैसर्गिक व मानवनिर्मित्त अशा विविध उपायांचा परस्परपूरक समन्वित उपयोग करून दाखवणे हे जलसंधारणातील कौशल्य आहे. वेगवेगळ्या पाणवहळ क्षेत्रांमध्ये जमिनीचा उतार, मातीचा मगदूर, जमिनीच्या व पाण्याच्या वापराची पद्धत याला अनुसरून वेगवेगळ्या प्रमाणात विविध उपायांचा अवलंब करावा लागतो.

जलसंधारणा व  भूसंधारणा

जलसंधारणाइतकेच महत्त्व भूसंधारणाचेही आहे. पाणी आणि जमीन यांचा परस्परावलंबी संबंध आहे. जमिनीची अती पावसाने धूप होऊन नासाडी होऊ नये, जमिनीचा कस उतरू नये, उलट जमिनीची उत्पादकता वाढती राहावी, म्हणून जमिनीचीही शास्त्रशुद्ध बांधणी करून ती उन्हापावसात टिकवून धरावी लागते.

पाणवहळ क्षेत्रांतील पाण्याचा मुख्य वापर हा झाडेझुडपे, गवत, पिके अशा वनस्पतींच्या वाढीसाठी होतो. यांतील छाया देणाऱ्या वनस्पती केवळ पाणी वापरत नाहीत, तर बाष्पीभवनाला पुष्कळसा अटकाव करून पाणी वाचवत ही असतात. म्हणून छाया निर्माण करणारी झाडे हा जलसंधारणाच्या प्रक्रियेतील मोठा उपकारक दुवा आहे. वाळ्याच्या गवतासारखी माती आक्रसून धरून ठेवणारी गवते हा भूसंधारणातील महत्त्वाचा दुवा आहे.

जलसंधारणाची व्यवस्था केल्यानंतर गावाला अमर्याद पाणी मिळत राहील असे मात्र नव्हे. स्थानिक पावसाचे मान व भूस्तरांची जडणघडण यानुसार मोजकेच पाणी उपलब्ध होणार. वर्षावर्षाला बदलणाऱ्या पावसाच्या स्वरूपाप्रमाणे पाणीही कमीजास्त होत राहणार. म्हणून पाणी मिळवण्याच्या उपायांबरोबरच ते पाणी वर्षभर शिस्तशीरपणे वापरण्याची तयारीही ठेवायला हवी. विशेषत : उन्हाळ्यात पाण्याची हाकाटी होऊ नये व निदान माणसांना व जनावरांना पिण्यासाठी तरी पुरेसे पाणी उपलब्ध राहावे. म्हणून पाणवहळांतील पाणी वापरावरचे सामुदायिक नियंत्रणही सर्वांनी पाळायला हवे.

एकाच पाणवहळ क्षेत्रात अनेकांची शेते असतात; गावठाणच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी असतात; गायराने व वनजमिनी असतात; रस्ते -पूलही असतात. या सर्व घटकांच्या परस्परानुकूल सहभागानेच जलसंधारणाची सुसंवादी एकत्रित योजना अंमलात येऊ शकते. यासाठी संबंधित सर्व गावकऱ्यांमध्ये सामूहिक सहकार्याची भावना दृढ असणे आवश्यक आहे. विशेषत: वनराजीची राखण, जमिनीवरचे गवताळ आच्छादन टिकवून ठेवण्यासाठी करावी लागणारी चराई- बंदी, पाणी संग्रहणाच्या चरांची निगा, नाल्यांमधून, विहिरींमधून होणाऱ्या पाण्याच्या उपशाचे नियमन यांबाबत गावांतील सर्वांचा एकत्रित विचार पक्का हवा, त्याप्रमाणे सामूहिक आचाराची तयारीही हवी. यासाठी सर्व गावकऱ्यांना एकविचाराने एकत्रित गुंफू शकेल असे लोकहितदक्ष वजनदार प्रेरणादायी नेतृत्वही गावात हवे. ‘ सहवीर्य करवावहै ‘ या मंत्राचा अनुसर हवा. तरच जलसंधारणाचे सर्वंकष लाभ पदरी पडू शकतात.

 – माधवराव चितळे ( कालनिर्णय, सप्टेंबर १९९४ )

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.