क्षयरोग – एक गंभीर समस्या

गेली काही शतके संसर्गजन्य आजारांमध्ये रुग्णांची संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! आजमितीला जगात दरवर्षी ९० लाख लोकांमध्ये क्षयरोग होतो व दररोज ५००० लोक या रोगाने मृत्युमुखी पडतात. अशातच याशिवायही नेहमीच्या क्षयरोगाविरोधी औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोग जंतूंचे वाढते प्राबल्य आणि एचआयव्ही बाधित लोकातील क्षयरोगाचे प्रमाण पाहून जागतिक आरोग्य संघटनेने १९९३ साली क्षयरोगाची समस्या ही  जागतिक आणीबाणीअसल्याचे घोषित केले आहे. याच क्षयरोगाविषयी अधिक जाणून घेऊया.

क्षयरोगाचा प्रसार कसा होतो?

क्षयरोगाचे जंतू (मायक्रो बॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस) हे अतिसूक्ष्म जंतू असून ते सांसर्गिक (थुंकी बाधित) क्षयरुग्णाच्या श्वसनस्त्रावात असतात. अशा व्यक्तींच्या शिंकण्या-खोकण्या-थुंकण्यातून हे जंतू बाहेर हवेत मिसळतात व श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. आपल्याकडे उघड्यावर थुंकणे सार्वत्रिक व सर्वमान्य असल्यामुळे जंतूंचा फैलाव सुलभपणे होतो.

क्षयजंतूंचा संसर्ग झाल्यावर व्यक्तीला क्षयरोगाचा आजार होईल की नाही हे त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व पोषण यावर अवलंबून असते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असेल तर जंतुसंसर्गानंतर देखील आजार उद्‌भवत नाही. परंतु प्रतिकारकशक्ती कमी असल्यास त्वरित किंवा काही कालावधीनंतर रोग होऊ शकतो.

क्षयरोगाची लक्षणे व निदान

या आजाराची लक्षणे सुरुवातीला सौम्य व लक्षात न येणारी असतात. दोन ते तीन आठवड्यांचा चिवट खोकला व कफ पडणे, संध्याकाळच्या वेळी येणारा हलका ताप, भूक मंदावणे, रात्री येणारा घाम अशी लक्षणे दिसतात.

काही रुग्णांमध्ये छातीत दुखणे, दम लागणे, खोकल्यातून रक्त पडणे असेही होऊ शकते. फुप्फुसाव्यतिरिक्त शरीरातील इतर अवयवांच्या क्षयरोगामध्ये हलका ताप, भूक व वजन कमी होणे या लक्षणांबरोबरच, त्या त्या अवयवांशी सबंधित लक्षणेही आढळून येतात. जसे की मानेतील लसिकाग्रंथींची वाढ व सूज (गंडमाळा), मणक्याच्या/ हाडाच्या क्षयरोगामध्ये पाठदुखी वा सांधेदुखी होते तर पोटाच्या क्षयरोगामध्ये उलट्या, पोटदुखी दिसून येते. स्त्रियांतील गर्भाशय व बीजनलिकांच्या क्षयरोगात अनियमित मासिक पाळी, ओटीपोटात दुखणे किंवा संततीत बाधा(वैध्यत्व) ही लक्षणे दिसतात. मेंदूच्या क्षयरोगात आकडी येणे, उलट्या, ताप अशी लक्षणे आढळतात.

क्षयरोगाचे लवकर निदान करून उपचार सुरू करणे, आजाराचे गंभीर स्वरूप टाळण्यासाठी महत्त्वाचे असते. कफाच्या बेडक्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी करून कफात क्षयरोगात जंतू असण्याचे निदान करता येते. या साध्या व सहज सोप्या तपासणीने सांसर्गिक क्षयरोग्यांचे निदान होऊ शकते. याशिवाय छातीच्या क्ष – किरण (एक्स-रे) तपासणीतूनही फुप्फुसाच्या क्षयरोगाचे निदान करता येते.

आता उपलब्ध इतर चाचण्या जसे की, स्पुटम कल्चर तपासणी, जीन एक्सपर्ट यामुळेही कफात क्षयरोग जंतू असण्याची व ते जंतू प्रतिजैविक विरोधी नसल्याची खात्री करून घेता येते. फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवातील क्षयरोगाचे सोनोग्राफी, उच्च प्रतीचे सीटीस्कॅन यासारख्या अद्ययावत उपकरणांनी अचूक निदान करता येते. मानेतील गाठीतील द्रावाचा सुईने तपास करून क्षयरोगाचे निदान केले जाते. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी त्यावरील औषधोपचार सहा ते आठ महिने नियमितपणे घ्यावा लागतो. प्राथमिक दर्जाची ही चार – पाच औषधे अत्यंत परिणामकारक असून सुरुवातीला दोन तीन महिने ही औषधे रोज एक दिवसाआड घ्यावी लागतात. त्यानंतर वरील दोन ते तीन प्रकारची औषधे चार ते पाच महिने नियमितपणे घ्यायची असतात

क्षयरोगाविरोधी औषधे सुरू केल्यानंतर महिन्याभरातच आजाराची लक्षणे हळूहळू नाहीशी होतात, भूक वाढू लागते व रुग्णांना आपला आजार बरा झाला असे वाटून औषधे थांबविली जातात किंवा औषधे वेळच्या वेळी घेण्यात हयगय केली जाते. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की लक्षणे नाहीशी झाली तरी शरीरातील रोगजंतू पूर्णपणे नष्ट झालेले नसतात व त्यासाठी कमीतकमी सहा ते आठ महिने औषधे घेणे जरुरी असते, अन्यथा शरीरातील आजार बळावू शकतो, गंभीर होऊ शकतो वा नेहमीच्या प्राथमिक औषधांना दाद न देणाऱ्या रोगजंतूंमध्ये परिवर्तित होऊ शकतो.

आपल्याकडे सरकारने ‘ सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण ‘ कार्यक्रमाअंतर्गत सर्व सरकारी, महानगरपालिका दवाखाने, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे यातून क्षयरोगाच्या निदानासाठी मोफत कफाची बेडका तपासणी सुविधा व सहा ते आठ महिन्यांच्या ‘ डॉट्‌स ‘ औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या डॉट्‌सप्रणाली अंतर्गत सूक्ष्मदर्शक प्रयोगशाळा, चांगल्या प्रतीच्या क्षयरोगविरोधी औषधांचा मुबलक साठा व प्रत्येक रुग्णाचा पूर्ण उपचारादरम्यान पाठपुरावा करून त्यास रोगापासून बरे करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या प्राथमिक क्षयरोग औषधविरोधी जंतूंचा प्रादुर्भाव वाढल्याने अशा आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक कफाच्या बेडक्याची कल्चर  तपासणी व असा क्षयजंतू आढळल्यास त्यासाठीची दुसऱ्या प्रतीची क्षयरोगविरोधी औषधे दोन वर्षांपर्यंत मोफत उपलब्ध करून दिली जातात.

क्षयरोगास प्रतिबंध 

क्षयरोगाचा आजार टाळण्यासाठी लहान बाळांमध्ये जन्मानंतर लगेच बीसीजी लस दिली जाते. यामुळे लहान मुलांमधील गंभीर प्रकारचा क्षयरोग टाळता येतो. कुटुंबातील इतरांना आजार होऊ नये यासाठी रोग्याने शिंकताना/खोकताना मोठा हातरुमाल वापरावा. इतस्तत: भुंकू नये, खोकला येत असल्यास कफाचा बेडका मोठ्या झाकणाऱ्या बंद डब्यात गोळा करून उकळते पाणी,ब्लिचिंग पावडर,फिनॉल टाकून निर्जंतुक करावे. नियमित औषधोपचाराबरोबर संतुलित ताजा आहार व श्वसनाचे व्यायाम केल्याने क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो.

क्षयरोगाच्या निदानाच्या व उपचाराच्या मोफत सोयी असूनही आपल्याकडे क्षयरोगाचे प्रमाण अजूनही गंभीर का? असा प्रश्न पडतो. यासाठी निदानातील दिरंगाई व अपुरा/अप्रमाणित औषधोपचार हेच क्षयरोग झाल्यास बरा न होण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे, तर सार्वजनिक अस्वच्छता, इतस्ततः भुंकणे, दाटीवाटीच्या वस्ती यामुळे होणारा वाढता प्रसार या सामाजिक समस्येस कारणीभूत आहे. क्षयरोग हा वैद्यकीय आजार असला तरी राष्ट्राच्या सामाजिक आरोग्याचा व राहणीमानाचा तो एक ‘ बॅरोमीटर ‘ आहे त्यामुळे गरिबी, कुपोषण, आर्थिक विषमता, गचाळ औद्योगिकीकरण व शहरीकरण यांच्यावरील दूरगामी उपाययोजनेतूनच क्षयरोगाचे आपल्या देशातून समूळ उच्चाटन करणे शक्य होणार आहे!

 – डॉ. श्रीकला आचार्य (रोगप्रतिबंधक व सामाजिक वैद्यक विभाग,के.ई.एम. रुग्णालय, परळ) | कालनिर्णय आरोग्य ऑक्टोबर २०१४

 

 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.