डोळ्यांवर कॉम्प्युटरचे होणारे दुष्परिणाम

आजकाल बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे आणि लहान मुलांचे प्रमाण वाढत आहे. चष्म्याचा नंबर, तिरळेपणा हे बऱ्याचवेळा डोळ्यांची जडणघडण होताना निर्माण झालेल्या अडचणीमुळे होतात आणि त्यावर तितकेच चांगले उपायही उपलब्ध आहेत. परंतु हल्ली डोळ्यांची नीट काळजी आणि डोळ्यांवर निष्कारण वाढवलेला ताण यामुळे होणारे आजार वाढत आहेत. त्यातील एक म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिन्ड्रोम (Computer vision syndrome).

आज कामे संगणकावर अवलंबून असतात. संगणक, मोबाईल, टॅब, आयपॅड या सर्वांतून प्रकाश डोळ्यामध्ये पडतो. ही सर्व यंत्रे आपण डोळ्यांपासून एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवतो. यातून सततच्या पडणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांच्या बाहुल्या आकुंचन पावतात आणि कालांतराने डोळ्यातील स्नायू स्पासमच्या स्थितीत जातात. त्यामुळे नजर कमी होते. डोळे दुखणे सुरु होते आणि काही वेळ काम केल्यानंतर, लगेच डोळ्याचा थकवा जाणवायला सुरुवात होते. दिवसांतून ८-१० तासांपेक्षा अधिक वेळ संगणकावर काम करताना आपल्या डोळ्यांची उघडझाप बंद असते आणि दृष्टीपटलावरील अश्रू तरंग सुकून जातात. डोळे वारंवार थंड पडतात. त्यामुळे डोळ्यांचे इन्फेक्शन वारंवार होते.

यातील सर्वात गंभीर बाब ही वाटते ती अशी की सात – आठ वर्षांपूर्वी बँकांत काम करणारे कर्मचारी, आय. टी. क्षेत्र, इंजिनीअर असे सर्व २५ – ३५ वयोगटातील लोक आजाराने ग्रस्त होऊन यायचे. मागील दोन – तीन वर्षात ५-१८ या वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजाराचे वाढते प्रमाण दिसून येते.

अपत्य लहान असल्यापासून, अगदी वयाच्या पहिल्या वर्षापासून त्याच्या / तिच्या हातात खेळणी म्हणून टॅब, मोबाईल , आयपॅड अशा वस्तू दिल्या जातात. त्यातून येणाऱ्या प्रकाशामुळे डोळ्यांना लवकर चष्म्याचा नंबर लागतो. मुलांना अगदी लहान वयापासून कोरड्या डोळ्यांसाठी औषधे सुरु करावी लागतात.

कधी कधी आई आणि वडील या दोघांनाही स्वःताच्या कामातून आणि मोबाईल मधून मुलांसाठी वेळ मिळत नसल्यामुळे ते आपल्या मुलांनाही टॅब आणि आयपॅडमध्ये गुंतवून टाकतात. या सर्व गोष्टी प्रत्येक मध्यमवर्गीय घरात सहजासहजी उपलब्ध झाल्याने डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण वाढत आहे.

आजाराची लक्षणे

 • नजर धूसर होणे.
 • डोळे कोरडे पडणे.
 • डोळे सतत लाल असणे.
 • डोके आणि मन दुखणे.
 • थोडा वेळ काम केल्यानंतर डोळ्यांवर ताण जाणवणे.
 • सतत चष्म्याचे नंबर बदलणे आणि अचानक लांब पाहताना नजर स्थिर न होणे.

लहान मुलांमध्ये दिसणारी लक्षणे :

 • खूप जवळून टी.व्ही. पाहणे.
 • डोळ्यांची सारखी उघडझाप करणे आणि डोळे चोळणे.
 • लांबच्या गोष्टी पाहताना,डोळे छोटे करून पाहणे.

आजार कसा टाळावा ?

 • आपला संगणक डोळ्यांपासून ६ ते ७ इंचाने खाली असावा जेणेकरून डोळ्यांच्या पापण्या अर्धवट राहतात आणि डोळे कोरडे पडत नाहीत.
 • संगणकावर काम करताना नियमित चष्मा वापरावा .
 • प्रत्येक दोन तासाच्या सलग कामानंतर पाच मिनिटांसाठी डोळ्यांना विश्रांती द्यावी.
 • दोन मिनिटे डोळे बंद करून त्यावर दोन्ही तळहात ठेवणे जेणेकरून डोळ्यांचे स्नायू रिलॅक्स होतात.
 • लहान मुलांच्या हातात वय वर्ष १२ होईपर्यंत मोबाईल, टॅब अशा गोष्टी देऊ नयेत.

वरील सांगितलेल्या लक्षणांपैकी कुठलेही लक्षण दिसत असल्यास डोळ्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

१९७० – ८० च्या दशकात जेव्हा सर्वत्र टी.व्ही. चा प्रसार झाला तेव्हा काही लोकांनी त्याला ‘इडियट बॉक्स’ म्हटले होते. त्याचे कारण त्याच्या मते (टी. व्ही. मुळे) माणसाला इडियट बनवले होते किंवा आहे. तसेच आता मोबाईल, टॅब, लॅपटॉप यांना ब्लाईंड बॉक्स म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

 

 – डॉ. तात्याराव लहाने (कालनिर्णय, जानेवारी २०१६)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.