यादी | daily to do list | weekly to do list | things to do list | best to do list

सामानाची यादी बनविताना…| कोमल दामुद्रे | To Do list | Komal Damudre

सामानाची यादी बनविताना

आपले स्वयंपाकघर हे प्रत्येक स्त्रीसाठी खास असते. पण हल्ली बऱ्याच स्त्रिया नोकरी-व्यवसाय करत असतात. ऑफिस आणि घर अशा दोन्ही आघाड्या सांभाळताना या स्त्रियांची दमछाक होते आणि मग अनेकदा स्वयंपाकघर सांभाळताना त्यांची गडबड उडते. त्यात जर नव्याने स्वयंपाकघर हातात आलेल्या तरुणी असतील, तर मग हा गोंधळ आणखीनच वाढतो. स्वयंपाकघर नेमके सांभाळायचे कसे? कोणती वस्तू ठेवायची कुठे? महिन्याला किती किराणा माल भरायचा? तो योग्य दरात आणायचा कुठून? असे एक ना अनेक प्रश्न या स्त्रियांना सतावू लागतात. या सगळ्या गोष्टींची आधीच दक्षता घेतली, तर स्वयंपाकघर सांभाळणेही सोपे जाईल आणि अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळून स्मार्ट खरेदी करणेही शक्य होईल. यासाठी पुढे दिलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.

 • आपण किती रक्कम खर्च करू शकतो, याचा अंदाज घ्या. आपल्याकडे असणाऱ्या रकमेतून आपण घरखर्चासाठी किती पैसे खर्च करणार आहोत, याचा हिशोब मांडावा. त्याचबरोबर थोडी रक्कम शिल्लक ठेवण्याचाही प्रयत्न करा. जेणेकरून गरजेच्या वेळी ही रक्कम हाताशी येते.

 • सामानाची खरेदी करायला जाण्यापूर्वी सामानाची यादी तयार करा. ही यादी करताना सर्वप्रथम संपलेले सामान आणि मग घरात असलेल्या (कोणत्या वस्तू किती प्रमाणात आहेत ते) वस्तूंची नोंद करा.

 • सामानाची यादी बहुतेक वेळा आपण कुठल्या तरी कागदावर लिहितो. पण, ऐनवेळी यादी मिळत नाही आणि मग पुन्हा यादी बनविण्याचे कष्ट घ्यावे लागतात. त्यापेक्षा एखादी डायरी बनवून त्यात किंवा मोबाईलच्या नोट्स /  मेमोमध्ये ही यादी बनवून ठेवता येईल. ऑनलाइन सामान मागवणार असाल, तर सोशल साईट्स किंवा वेगवेगळ्या ग्रॉसरी अॅप्लिकेशनमधील कार्ट / विशलिस्टमध्येही तुम्हाला सामानाची नोंद करून ठेवता येईल.

 • सुट्टीच्या दिवशी किंवा आपल्याकडे निवांत वेळ असेल तेव्हा सामानाची यादी तयार करा. यादी बनविताना त्यात आपल्या गरजेच्या वस्तूंची नावे आधी लिहावी.

 • आठवड्यातून एकदाच खरेदीला बाहेर पडा, सामानाव्यतिरिक्त इतर वस्तूंची उगाचच खरेदी करणे टाळा.

 • शक्य असल्यास बाजारात जाऊन स्वतः खरेदी करा. वेळ नसल्यास सामान ऑनलाइन मागविण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे.

 • सामानाची दीर्घकाल टिकणाऱ्या वस्तू आणि नाशवंत वस्तू अशी विभागणी करा. टिकणारे पदार्थ महिन्यातून एकदा भरावे, तर फार काळ न टिकणाऱ्या पदार्थांची खरेदी आठवड्यातून एकदा करावी.

 • बाजारात काही गोष्टी उपलब्ध नसल्यास अशा वस्तूंसाठी आधीच पर्याय शोधून ठेवा.

 • डाळ, गहू आणि तांदूळ यांसारखे दीर्घकाळ टिकणारे जिन्नस वर्षातून एकदा किंवा सहा-सहा महिन्यांच्या हिशोबाने साठवून ठेवू शकतो. हे धान्य अधिक काळ टिकण्यासाठी त्यात कडुनिंबाचा पाला, दालचिनी ठेवू शकता किंवा एरंडेल तेल लावता येईल.

 • गरजेनुसार बाजरी, नाचणी, ज्वारी यांचाही साठा करता येईल.

 • डाळ-तांदूळ घेताना थोडे अधिक प्रमाणावर घेऊन ठेवावेत, जेणेकरून कधी अचानक घरी आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना तारांबळ उडायला नको.

 • भाज्या आणि फळे अधिक काळ टिकून राहण्यासाठी शक्यतो कच्च्या घ्याव्यात.

 • हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, केळी यांची खरेदी आठवड्यातून एकदा करावी. तसेच हे पदार्थ कमी प्रमाणात पिकलेले असतील असेच घ्यावेत म्हणजे अधिक काळ ताजे राहतील.

 • सामान खरेदी करताना तुम्हाला प्रामुख्याने हव्या असणाऱ्या वस्तू आधी खरेदी करा. त्यानंतर मुलांच्या सोयीनुसार सुका खाऊ घ्या.

 • इतर भाज्यांच्या तुलनेत बटाटे आणि कांदे जास्त प्रमाणात घ्यावेत. कधी घरात भाज्या नसतील, तर कांदे-बटाटे ह्यांचाच आधार घेता येतो.

 • किराणा माल खरेदी करताना त्याची किंमत, एक्सपायरी डेट आदी माहिती तपासून घ्या. सामान चांगले नसल्यास बदलून मिळेल का किंवा परत देता येते का याचीही माहिती आधी घ्या. ऑनलाइन खरेदी करतानाही योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच अनावश्यक खर्च होणार नाही, याची काळजी घ्या.

 • तुम्ही वर्किंग असाल किंवा शिफ्ट ड्यूटीजमध्ये काम करणारे असाल, तर रेडी टू कुक किंवा स्टोअर करता येऊ शकणारे पदार्थ अधिक प्रमाणात घेऊन ठेवा. डबाबंद पदार्थ, सॉसेस, हर्ब्स, अॅल्युमिनियम फॉइल किंवा क्लिंग फिल्मचे रोल्सही घरात असू द्या.

 • वेगवेगळ्या प्रकारचे ड्राय फूड्स, मांस / सीफूड्स, रेफ्रिजरेटर व फ्रीजरमध्ये स्टोअर करता येतील असे काही पदार्थ, मसाले आणि काही थंड पेयेसुद्धा घेता येतील.

 • स्वयंपाकघरात डाळ, तांदूळ, पीठ, कडधान्ये किंवा मसाले भरण्यासाठी काही विशिष्ट वा वेगळ्या आकाराच्या डब्यांचा वापर करता येईल. यामुळे कोणत्या डब्यात काय आहे, हे सहज कळेल. शिवाय, आपले स्वयंपाकघरही सुंदर दिसेल.

 • किराणा सामान, फळे, भाज्या याव्यतिरिक्त स्वयंपाकघरामध्ये भांडी धुण्यासाठी वापरला जाणारा स्पंज, स्क्रबर व साबण, फिनाइल यांचीही खरेदी करायला हवी. ही खरेदी दर महिन्याला करता येते किंवा तुमच्याकडे सामान ठेवायला जागा असेल, तर तीन-सहा महिन्यांनी एकदाच करून ठेवता येईल.

 • डायनिंग टेबलवर ठेवण्यासाठी लागणारे मॅट, टॉवेल तसेच गॅस-ओटा पुसण्यासाठी लागणारे मॉप्स / वाइप्स यांचीही आवश्यकतेनुसार खरेदी करण्याचा विचार करा.

 • बहुतेक स्त्रियांना आपल्या स्वयंपाकघरासाठी नवनवीन वस्तू आणि उपकरणे घेण्याची आवड असते. काहींना नवीन नॉनस्टिकची भांडी आवडतात, तर काहींना तांब्या-पितळेची. हा खर्च खिशाला परवडणारा असेल तर ठीक पण नसेल तर थोडे थोडे पैसे साठवून ही खरेदी करता येईल. अशी खरेदी करताना त्या त्या प्रकारची भांडी कमी दरात पण चांगल्या दर्जाची कुठे मिळतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर किंवा मॉल /  दुकानांमध्ये सेल लागल्यावर अशी खरेदी करता येते.

 • तुम्हाला बेकिंगची आवड असेल किंवा घरीच काही नवीन खास असे पदार्थ बनवायची हौस असेल तर त्यासाठी लागणारे सामान, उपकरणे ह्यांची खरेदी प्रत्येक महिन्याला थोडी थोडी अशा प्रकारे करता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कोमल दामुद्रे

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.