September 12, 2024

नवरात्र : अंबाबाईचा उदो उदो

आज नवरात्रीच्या नवव्या दिवशी आपण मनाच्या मनात म्हणजेच अंतर्मनात देवीचे स्मरण करणार आहोत. ते स्मरणही असे की जे आध्यात्मिक, पारमार्थिक मार्गावर महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल. आज नवरात्रौत्थापन आहे. आज नवरात्र संपणार. उद्या दसरा. आपण साजरा केलेला हा शारदीय नवरात्रीचा शब्दोत्सव एक प्रकारे मानसपूजेचा उत्सव.

आपण काही मंडप घातला नाही. देवीची मूर्ती स्थापन केली नाही. प्रत्यक्षात देवीची फळाफुलांनी पूजा मांडली नाही, तिची ओटी भरली नाही किंवा तिला अलंकारही अर्पण केले नाहीत. शब्दालंकारांनी आपण देवीची पूजा केली. म्हणूनच ही पूजा एक प्रकारची मानसपूजाच होय, असे म्हटले. देवीचे स्वरूप आपण या नऊ दिवसांत विविध प्रकारांनी पाहिले.

आज भक्तिभावनेच्या नजरेने देवीचे रूप न्याहाळावयाचे आहे. ती अध्यात्मक्षेत्राची अधिष्ठात्री कशी आहे त्याचा वेध घ्यावयाचा आहे.

नवमदिनीं उत्थापन झालें उत्सव झाला उन्मनिचा । भक्ता उठवुनि प्रसाद दिधला अक्षय सहजावस्थेचा ।

अंतर रंगी दंग होऊनी गुरुप्रसादें रमण्याचा । कृतज्ञ होऊनि शरण जाऊनि उदो म्हणूं या अंबेचा ।।

हा उन्मनावस्थेचा उत्सव परिपूर्ण झाला आहे. उन्मनावस्था म्हणजे मन आध्यात्मिक आणि भक्तिभावाच्या दृष्टीने अधिक उच्च स्तरावर नेणारी भावावस्था होय. हा आपला नवरात्रोत्सव अशा प्रकारे मनातील भक्तीला एक वेगळे सुख आणि समाधान देणारा झाला, असे म्हणण्यास हरकत नाही. देवीचे, ध्यान-स्मरण-मनन केल्यानंतर ती देवी आपल्याला एका सहजावस्थेच्या पारमार्थिक सुखाकडे नेणाऱ्या राजमार्गावरचा अनुभव आणून देईल, अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे.

आपण बाह्य रंगात रमणारे भक्त नव्हेत, आपण देवीची मानसपूजा मांडली आहे. ती भक्तिभावाच्या चौरंगावर मनाच्या घटात श्रद्धेचे अमृत-जल भरून आपण त्या घटावर सद्‌विचारांच्या सुमनांच्या माळा श्रद्धेने अर्पण करीत आलो आहोत. आता आपली अपेक्षा एवढीच की देवीने आपले अंतर्मन तिच्या वास्तव्याने पवित्र करावे, आपणास कष्टप्रद होणाऱ्या सर्व प्रकट-अप्रकट अशा शक्तीचा तिने नाश करावा तिने आपले कल्याण करावे, आपले म्हणजे कोणाचे?

आपले म्हणजे आपणा सर्वांचे, आपणा सर्वांचे म्हणजे या महाराष्ट्र राज्याचे, या भारत देशाचे या देवी सर्व भुतेषु मातृरुपेण संस्थिताः । जी देवी आईच्या रुपाने या सर्व चराचरात सामावली आहे, तिने आईच्या ममतेने आपणा सर्वांना सांभाळावे आणि योग्य तो मार्ग अजाण बालकांना दाखवावा, अशी प्रार्थना आपण करीत आहोत!

त्याबरोबरच आपले अंतर्मन तिच्या कृपाशीर्वादाच्या तेजोदीपाने झळाळून उठावे, अशी मंगलमय प्रार्थना आपण तिच्या चरणी करीत आहोत. या ठिकाणी अंतर रंगी दंग होऊनी गुरुप्रसादें रमण्याचा । अशी एक ओळ आहे. ज्या पूर्वसुरींनी विविध प्रकारे देवीची स्तवने रचली, तिची चरित्रे गायिली, तिच्या पराक्रमाची वर्णने लिहिली ते सगळे आपले गुरूच होत. त्या गुरूंच्या प्रसादामुळेच आपल्याला देवीसंबंधी इतके ज्ञान आणि देवीच्या स्वरूपाचा बोध होऊ शकला. हा बोध झाला, देवीचे चरित्र आपल्याला समजले म्हणून आपण तिचे विविध रूपांत अंतःकरणाच्या नेत्रांनी दर्शन घेऊ शकलो. तिने केवळ बाह्य आनंद किंवा बाह्य समाधान आपणास द्यावे, असे नाही. तर आमचे मन किंबहुना मनाचे मन स्वतःच्या चरणी लीन करून घ्यावे, अशी ही प्रार्थना आहे.

आज नवरात्र उठण्याचा दिवस. या दिवशी आम्ही आम्हांलाच आमच्या अंतर्दृष्टीने पाहावे, आमची मने किती उन्नत झाली आहेत, त्याचा आढावा आमचा आम्हीच घ्यावा, अशी देवीच्या चरणी आपण नम्रतेने प्रार्थना करीत आहोत आणि मुक्त कंठाने देवीचा जयघोष करीत आहोत.

जगदंबे उदयोस्तु । अंबाबाईचा उदो उदो ।।


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर  

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.