Your Cart
October 7, 2022
They mysteries of modern life.

आधुनिक जीवनातील गूढवाद

आजच्या जगाचा व्यवहार सुरू आहे, तो विवेकवाद, विज्ञान आणि भांडवलशाही या तीन घटकांवर आधारित. या तीन घटकांमुळे अभूतपूर्व अशी समृद्धी निर्माण करण्यास मदत झाली आहे. किंबहुना, मानवाच्या इतिहासात प्रथमच आपल्याला गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची संधी मिळाली आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या राजेरजवाड्यांनी जो ऐषोआराम भोगला नसेल, तो ऐषोआराम आणि ती जीवनशैली आजचा मध्यमवर्ग उपभोगत आहे. पण तरीही भूक नव्हे, कुपोषण ही आजच्या जगापुढील मोठी समस्या बनली आहे. ही सुधारणाच म्हणायला हवी. आयुर्मानात प्रचंड वाढ झालेली आहे. इंटरनेटमुळे ज्ञान हे बोटांच्या अग्रांपर्यंत येऊन ठेपले आहे, अगदी वंचितांनाही ते सहज उपलब्ध होऊ लागले आहे. आतापर्यंतच्या इतिहासाचा विचार करता दरडोई हिंसेचे प्रमाणही अत्यंत कमी झाले असल्याचे आकडेवारी दर्शविते. असे असले तरी या आधुनिक जगात अजूनही अनेक समस्या घर करून आहेत. उदा. असमानता. पण सारासार विचार करता शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आजच्या जगातला माणूस हा त्या मानाने खूपच सुसह्य आयुष्य जगत आहे.
भौतिक सुखांच्या बाबतीत एवढी सुधारणा होऊनही एकटेपणा ही आज एक गंभीर समस्या बनली आहे. किंबहुना, श्रीमंत जगात एकटेपणा हा मृत्यूसाठी कारणीभूत ठरणारा प्रमुख घटक ठरत आहे, असे वैज्ञानिक संशोधनाअंती आढळून आले आहे. इंग्लंडमध्ये तर एकटेपणाची समस्या सोडविण्यासाठी एक स्वतंत्र मंत्रालयच सुरू करण्यात आले आहे! संशोधन आणि अनेक पुरावे पाहता असे दिसून येत आहे, की मानवाच्या जीवनशैलीत भौतिक सुधारणा होऊनही आनंदात मात्र वाढ झालेली नाही. उलट राग, दुःख आणि द्वेष यात वाढ होत असल्याचे वास्तव आपल्या नजरेस पडते आहे.
हा एक प्रकारचा विरोधाभासच आहे. अशा वेळी हे सर्व असे का, हा प्रश्न आपल्याला सतावल्याशिवाय राहत नाही. समाजाने आपल्याला भौतिक जीवनशैलीतील सुखे देऊ केली आणि त्यात सुधारणा केली, तर आनंदाची पातळी वाढेल असे मानले जात होते. पण तसे घडताना दिसत नाही. उलट, अध्यात्माचा अभाव ही समस्या आहे. आपल्या पूर्वजांच्या तुलनेत आपण भौतिक सुखांच्या बाबतीत भलेही वरचढ असू, पण या सुखाचे काय करायचे, हे आपल्याला माहीत नाही. आपल्या जीवनातील भौतिक सुखांचे ‘हार्डवेअर’ आपल्याला लाभले आहे, पण आपल्याला मनःशांती देऊ शकणारे ‘सॉफ्टवेअर’ जणू आपण गमावून बसलो आहोत.
इथेच तर खरी गोम आहे, असे मला वाटते. आपल्या शैक्षणिक यंत्रणेतून आध्यात्मिक शिक्षण काढून टाकल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक आधुनिक शिक्षणतज्ज्ञ मानतात, की आध्यात्मिक / धार्मिक शिक्षणामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाला अडथळा निर्माण होतो. कारण आध्यात्मिक / धार्मिक शिक्षणाचा पाया हा श्रद्धा, किंबहुना अंधश्रद्धा हाच असतो आणि अर्थातच, अंधश्रद्धा ही वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्न विचारण्याच्या वृत्तीच्या विपरीत असते.
एकीकडे गेल्या दोन हजार वर्षांत उगम पावलेल्या धर्मांच्या बाबतीत ही अंधश्रद्धेची गरज खरी असली, तरी प्राचीन धर्मांसाठी ही गरज असायलाच हवी, हे पूर्णपणे सत्य नाही. प्राचीन धर्मांना काही वेळा कुत्सितपणे क्कड्डद्दड्डठ्ठ स्नड्डद्बह्लद्ध म्हणजे खोटे मूर्तिपूजक म्हटले जाते. या धर्मांमध्ये खरे तर प्रश्न विचारण्याची अनुमती आहे. देवावर श्रद्धा ठेवणे आणि प्रश्न विचारणे या दोन्ही वृत्ती एकमेकांच्या विरोधात नाहीत.
प्राचीन मार्गांचा विचार करता श्रद्धा आणि अध्यात्माचा (या मार्गाने मिळणारी मनःशांती अनुभविण्यासाठी) मार्ग अनुसरण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाला (या मार्गाने मिळणारी भौतिक सुखे) फाटा देण्याची आवश्यकता नाही. हिंदू (भारतात उगम पावलेले बौद्ध, जैन आणि शीख) हा शेवटचा प्राचीन धर्म असून या असंतुलित जगाला संतुलित करण्यात या धर्माची महत्त्वाची भूमिका असेल, असा माझा विश्वास आहे.
आपल्याकडील वैज्ञानिक शक्तीचा वापर करत आपण माणसे निसर्गाला छिन्नविच्छिन्न करत आहोत आणि आपल्या भौतिक सुखांसाठी पर्यावरणाचा ऱ्हास करत आहोत. त्याच वेळी आपण स्वतःला दुःखी करत आहोत. आपल्या पूर्वजांचे अध्यात्म आपल्याला मदत करू शकते, आपल्याला मनःशांती मिळवून देण्यासाठी, भौतिक संपत्ती राखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निसर्गासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी अध्यात्म प्रेरणा देऊ शकते आणि धकाधकीच्या निरर्थक दैनंदिन जीवनात गूढवादाने अर्थ भरता येऊ शकतो.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Hi there! Welcome to the all-new Kalnirnay website. We have worked on enhancing your experience here, and we hope you enjoy the new look and feel of our website.

We’re still working on adding the last few polishing touches, so if you find a few things missing or broken, please don’t be alarmed. Our team is hard at work on fixing them.

 

Thank you for your support & patience!