कोरोना | Stay Home | Stay Safe | Quarantine | Social Distancing | Health is Wealth

शिकवणी कोरोनाची | दत्तप्रसाद दाभोळकर | Teaching by Corona | Dattaprasad Dabholkar

शिकवणी कोरोना ची

‘शिकवणी कोरोनाची’ हे शीर्षक वाचूनच तुम्ही चिडला असणार किंवा उपहासाने हसला असणार! तुमचेही बरोबर आहे. बकासुर आणि भस्मासुर परवडले असे आपल्याला वाटावे, अशा थाटात आणि रुबाबात कोरोना आपल्यासमोर आला. त्याने आपण आखलेल्या आणि मनोमन जपलेल्या देशांच्या सीमारेषा झुगारून दिल्या. आपल्या मनात पक्के बसलेले राष्ट्र, धर्म, जात, वय, लिंग हे मापदंड त्याने नाकारले. माणसे निवडताना आणि सोडताना ‘मानवाचे अंति गोत्र एक’ एवढेच तो आपल्या लक्षात आणून देत होता.

मानवाने यापूर्वी काही कमी आघात सोसलेले नाहीत. विवेकानंदांनी सांगितले आहे त्याप्रमाणे ‘सर्व प्राचीन धर्मात आणि ग्रंथात प्रलयाची कथा आहे.म्हणजे प्रलय नक्कीच झाले असणार, मानवाने प्रलय झेललेत आणि पचवलेत.’ प्रलयाची कल्पना पुराणातली वानगी म्हणून नाकारायचा अधिकार अर्थात अनेकांना आहेच. पण आपण त्सुनामी पाहिल्यात, शहरे पोटात घेणारे महाभयंकर भूकंप पाहिलेत. लाखो माणसे जेथे आनंदाने राहत होती अशा दोन शहरांची एका क्षणात सर्व माणसांसकट वाफ करणारे अणुबॉम्ब पाहिलेत. या सर्व गोष्टी खरे तर प्रलयंकारीच, महाभयानकच. पण या सर्व गोष्टी आपल्या कोष्टकात बसणाऱ्या होत्या. पण कोरोना आला तो सारी गणिते आणि सारी कोष्टके उद्ध्वस्त करत. यापूर्वी प्लेग, हिवताप, देवी अशा साथींत मोठ्या प्रमाणात माणसे मरण पावली होती. या सर्व साथींना माणसांनी आटोक्यात आणले, तसे कोरोनालाही आटोक्यात आणणार हे नक्की होते. पण तरीही यावेळी राष्ट्र, धर्म, जात, वय, लिंग या साऱ्या गोष्टी विसरून जगभरची सारी माणसे प्रथमच एकत्रितपणे घाबरली, गांगरली, भेदरली. कारण कोरोनाने एक गुगली टाकली होती.

आजवर कोणतेही संकट आले, की माणसे जवळ येत. एकमेकांना आधार देत. कोरोना सांगत होता, तुम्हाला एकमेकांशी फटकून वागले पाहिजे.समोरचा नव्हे, जवळचा प्रत्येक माणूस तुझा शत्रू आहे  - तुझ्यावर प्राणघातक हल्ला करू शकणारा. मुलाला कुशीत घ्यायला आई घाबरत होती आणि आईच्या कुशीत जायला मूल घाबरत होते.

कोरोनाने दोन गोष्टी केल्या होत्या. पहिली भयंकर गोष्ट म्हणजे माणसांनी माणसांपासून दूर राहावयाचे म्हणजे सारे उद्योग बंद पडणार होते. उत्पादन, वितरण, सेवाक्षेत्र सर्वांच्यासमोर पूर्णविराम. त्यामुळे जगाच्या सर्व आर्थिक घडामोडी थांबणार होत्या. त्यामुळे आज-उद्या मंदीची लाट जगभर येणार होती. कोरोनाने केलेली दुसरी गोष्ट महाभयानक होती. माणसे एकमेकांपासून दुरावली होती. एकाच घरात अनेक काळ, अनिश्चित काळ एकमेकांसमोर सर्वांना कोंडून घ्यायचे होते. मोकळा श्वास, भटकणे, मिसळणे, स्वतःसाठी अवकाश शोधणे हे सर्व कोरोनाने थांबवले होते.

कोरोनामुळे माणसे मनातून मोडून पडत होती. मोडलेली अर्थव्यवस्था दुरुस्त करता येते, पण मनातून मोडलेली माणसे… त्यांची मने दुरुस्त कशी करायची? किंवा खरे तर माणसाने मनातून मोडू नये म्हणजे सैरभैर होऊ नये, म्हणून काय करावे आणि लक्षात आले, मानसोपचारतज्ज्ञांच्या शोधात बाहेर पडले पाहिजे. नाहीतर आपल्या सनातन संस्कृतीने जे संचित आपल्याला दिले आहे, ते नीट समजावून घेतले पाहिजे.

कोरोना सांगत होता, तुमच्या कोष्टकात न बसणारी अशी संकटे आता येत राहतील आणि त्यावेळी आठवला तुकारामांनी दिलेला एक मंत्र, ‘तरी बरे’.तुकाराम सांगतात संकट कितीही कठीण असो. क्षणभर आपले डोळे मिटा आणि संकट याहूनही फार भयंकर असू शकले असते. तरी बरे एवढ्यावरच थांबलेय! म्हणजे असे - कोरोना विषाणू माणसाच्या अंगाला चिकटून दुसऱ्या माणसापर्यंत जात होता, हवेतूनही प्रवास करत होता. तरी बरे हा कोरोना विद्युत लहरींवर बसून प्रवास करत नव्हता. नाहीतर संगणक, स्मार्टफोन म्हणजे व्हॉट्सअॅपची चावडी, दूरदर्शन सर्व काही बंद झाले असते. फोनवरही बाहेरच्या कुणाशी बोलायचे नाही. घराबाहेरच्या जगाचा संबंध पूर्णपणे तुटला असता आणि तो जर कागदावर बसून येथेच खूप काळ मुक्काम करणार असता किंवा तेथेच आपली वसाहत करणार असता, तर घरातील जपून ठेवलेली पुस्तके आगीच्या भक्ष्यस्थानी देऊन मोकळे व्हावे लागले असते. हे असले काही कोरोना करत नाही. माझे आयुष्य खूप सुसह्य आहे आणि समजा हे सारे जरी कोरोनाने केले असते, तर मला आठवले असते, ‘अरे यातील एकही गोष्ट बरोबर नसताना अगदी अलीकडे म्हणजे तीनशे-चारशे वर्षांपूर्वी माझे पूर्वज अगदी मजेत राहत होते.- या गोष्टी म्हणजे मी नको असलेल्या किंवा हानीकारक व्यसनांची स्वतःला सवय केली आहे!’

आणखी एक गोष्ट आठवली, ‘गुरूस झाले आजारपण, जग सर्वत्र गुरू दिसे’ म्हणून सांगणारे श्री दत्तगुरू. हे आपणही करू शकतो, हे आपल्या अभय बंगांनी सांगितलेय. त्यांचे पुस्तक आहे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’. लक्षात आले, कोरोनाही साक्षात्कारी आहे. त्यांनी सहजपणे जगभर सर्वांना दोन गोष्टी शिकविल्या. पहिली गोष्ट ही, की सवय म्हणून अंगवळणी पडलेल्या अनेक गोष्टी मला गरजेच्या किंवा महत्त्वाच्या वाटतात. पण त्या गोष्टींशिवाय माझे अगदी सहज चालते म्हणजे घरातील अनेक गोष्टी मी अगदी सहजपणे करू शकतो. थोडा प्रयत्न केला तर कोणत्याही वयात स्वावलंबी बनता येते!

कितीही वाईट गोष्ट अगदी नकळत एखादी चांगली गोष्ट करत असते. कोरोना येण्यापूर्वीपर्यंत आपण घर, घरातील माणसे यांच्याकडे फारसे किंवा खरेतर अजिबात लक्ष देत नव्हतो. आपले हे वागणे मंगेश पाडगांवकरांनी नेमके सांगितले आहे. ‘या माझ्या पंखांनी उडण्याचे वेड दिले.’ हे वेड बरोबर घेऊन मी उडत-बागडत असलो तरी ‘या माझ्या हातांनी घरटे मी निर्मीयले’ हे आपण विसरून जात होतो. घरातल्या माणसांशीच नव्हे, तर घरातील पंख्याशी आणि घरातल्या भिंतींशीही बोलायची सवय आपल्याला कोरोनाने लावली.

या संकटकाळातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण मनाने स्थिर हवे, हे लक्षात आले. संतवचने मनाला स्थिरता देतात. मात्र, त्यासाठी संतवचने नुसती वाचायची नाहीत, तर अनुभवयाची. ती अनुभविण्याची संधी आपणाला कोरोनाच्या कालखंडाने दिली. आयुष्यात पुढची वाटचाल करताना या गोष्टी बरोबर हव्यात.

पहिली गोष्ट कोणत्याही कोष्टकात न बसणारी संकटे येणार. ‘ज्याने हिंमत हरली नाही, तो कधीच हरत नाही’ हे लक्षात घेऊन ठामपणे उभे राहायचे.‘तरी बरे’ हे नीटपणे ध्यानात ठेवायचे. माणसांना खरी गरज असते माणसांची. मात्र, ‘इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन’ असेही होऊ शकते. ‘राखावी बहुतांची अंतरे’ हे दोन्ही अर्थाने अगदी खरे आहे आणि हा मंत्र व्यवहारात आणला पाहिजे. कितीही वाईट परिस्थितीत, आपल्या परिस्थितीपेक्षा अनेक पटींनी वाईट परिस्थितीत आनंदात, मजेत जीवन जगणाऱ्या व्यक्ती नजरेसमोर आणायच्या. हेलन केलर आंधळी, बहिरी आणि मुकी होती. आपल्या सुदैवाने आपण तिच्यासारखे नाही, नाहीतर मनाने कोलमडून पडलो असतो. मात्र, हेलन केलर म्हणाल्या होत्या, ‘हे आयुष्य किती सुंदर आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या ओठावरून माझी बोटे फिरवून मी त्यांच्या कवितांचा आस्वाद घेऊ शकते.’- आधार देणाऱ्या अनेक गोष्टी आपल्या भोवती आहेत. ‘तुझे आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ असे आपण आपले केले होते. तसे करू नका, हे कोरोनाने आपल्या लक्षात आणून दिले.कोरोना तर काही दिवसांचा पाहुणा. येणार आणि जाणार. ‘हेही दिवस जातील.’ हे कायम लक्षात हवे. दुःखाच्या आणि आनंदाच्याही प्रसंगी!

  • थँक यू कोरोना! तू मला संधी दिलीस, माझे घर, माझी माणसे आणि मी स्वतः यांची नव्याने खूप जवळून ओळख करून घेण्याची. लक्षात ठेव आम्ही माणसे थोडीफार मांजरासारखी आहोत - कसेही फेका. आम्ही क्षणभर गांगरतो. मग छानपणे आपल्या चार पायांवर उभे राहतो! निवांतपणे बागडायला बाहेर पडतो.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


दत्तप्रसाद दाभोळकर

(लेखक दिल्लीमधील श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्चचे माजी संचालक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.