September 15, 2024
आयुष्या | Trupti Khamkar | Stand Up Comedy | Blogger | Actress

खो दया बिनधास्त!| तृप्ती खामकर | Live Life without hesitation | Trupti Khamkar

खो दया बिनधास्त

कपाटात कित्येक पुस्तके त्यांच्यावर नजर पडण्याची वाट पाहत पडून होती. या टाळेबंदीच्या काळात त्यापैकी काही पुस्तकांचा फडशा पाडला.त्यापैकीच एक म्हणजे मार्क मॅन्सन यांनी लिहिलेले ‘द सटल आर्ट ऑफ नॉट गिव्हिंग अ ××××’. या पुस्तकाचे नाव थोडेसे वेगळे किंबहुना विचित्र वाटते, म्हणूनच कदाचित वाचकाला आपल्याकडे ओढून घेत असेल. आयुष्या कडे पाहताना प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा दृष्टिकोन या पुस्तकाचा लेखक बाळगून आहे.

बऱ्याचदा आपण आपल्या आयुष्या कडे काहीसे दुर्लक्ष करत राहतो. हे म्हणजे घरातल्या ज्या खोलीकडे तुमचे अजिबात लक्ष गेले नव्हते, अशी खोली उघडणे जणू. जेव्हा तुम्ही या खोलीतील अडगळीतल्या वस्तूंकडे वेगळ्या नजरेने पाहता, तेव्हा तुमच्या आयुष्याला एक वेगळेच वळण प्राप्त होते. या सगळ्यात आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकणे आणि आपल्याला काय हवे, त्याचा शोध घेणे गरजेचे आहे. एखाद्या स्पर्धेमध्ये अडकून राहण्यापेक्षा आणि स्वतः पीडित असल्याच्या भावनेने ग्रासून राहण्यापेक्षा यातून बाहेर पडण्यासाठी काय करावे लागेल, त्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे आहे.

आपल्या गरजा आणि इच्छा यातील फरक बहुतेकांना समजत नाही. गरजा या मूलभूत असतात, आपले जीवन जगण्यासाठी त्या अत्यावश्यक असतात. इच्छा म्हणजे आपले चोचले असतात. आपल्या बहुतेक दुःखांसाठी याच इच्छा बहुधा कारणीभूत असतात. सर्व गोष्टी सहज उपलब्ध असल्यामुळे आपण प्राधान्यक्रम ठरवत नाही. ९० टक्के वेळा अत्यंत क्षुल्लक गोष्टींबाबत आपण दुःख करत राहतो किंवा अपराधीपणा, द्वेष, भीती आणि इतर नकारात्मक अशा अनेक भावना मनात उत्पन्न होत असतात.

आपण अनेकदा भूतकाळात घडलेल्या घटनांमध्ये अडकून राहतो किंवा भविष्यासाठी खूप उत्साहात नियोजन करत असतो. आपल्यापैकी अनेक जण समस्या घोळवत बसतात, पण त्यावर उपाययोजना मात्र करत नाहीत, अनेकांना भविष्यात कदाचित उद्भवू शकणाऱ्या समस्यांची चिंता सतावते तर अनेकदा आपण दुसऱ्या बाजूला असलेल्या कथित आनंदांचा विचार करत राहतो. आपल्यापैकी अनेकांना आताच्या क्षणी आपल्या हातात नसणाऱ्या गोष्टींविषयी विचार करायची सवय असते. त्यामुळे वर्तमानाचा आनंद घेण्याविषयीही आपल्याला अपराधी वाटत असते.

दुसऱ्याला आयुष्याविषयी उपदेश करताना आपण जणू ‘जगद्गुरू’ असतो. पण आपण जे बोलतो ते आचरणात आणणे किती अवघड असते, याचा थोडा विचार करून पाहा. तुम्ही हळूहळू त्या दिशेने एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली आणि विचारपूर्वक निवड केली, त्याचप्रमाणे ज्या गोष्टींसाठी जास्त विचार करायची गरज नाही, अशा गोष्टी करत गेलात तर तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाचेल आणि ती ऊर्जा तुम्ही दीर्घकाळ वापरू शकाल.अशा प्रकारे प्रक्रिया केली तर तुम्हाला प्राधान्यक्रम ठरविणे सुलभ आणि स्पष्ट होईल. सोपे आहे ना? सोपे असू शकते!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


तृप्ती खामकर

(लेखिका अभिनेत्री-कलाकार म्हणून कार्यरत आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.