घरीच बनवा डिप्स
घरी पार्टी असेल किंवा नाश्त्याला करायला सोपे आणि चवीला भारी असे काही बनवायचे असेल तर निरनिराळे डिप्स उपयोगी पडतात. हे डिप्स एक-दोन दिवस आधी करून ठेवता येतात आणि वेगवेगळ्या पदार्थांसोबत सहज सर्व्ह करता येतात. आपल्या घरी पार्टी असेल किंवा अचानक पाहुणे आले तर आयत्या वेळी बनवल्या जाणाऱ्या कटलेट, कबाब, नगेट्स किंवा गार्लिक ब्रेड अशा पदार्थांसोबतही हे डिप्स सहज सर्व्ह केले जाऊ शकतात. हे डिप्स तुमच्या डिशची चव वाढवू शकतात. असेच काही सोपे पण तेवढेच चविष्ट डिप्स घरच्या घरी तुम्हाला बनवता येतील :
१. मिंट डिप: आपण नेहमी घरी करतो त्याप्रमाणे कोथिंबीर, पुदिना आणि हिरव्या मिरचीची तिखट चटणी करून घ्या. ही चटणी आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त तिखट करता येईल. या चटणीमध्ये थोडेसे मेयोनीज घालून चांगले फेटून घ्या, मिंट डिप तयार आहे.
२. हुमस: एक वाटी छोले (काबुली चणे) उकडून घेऊन त्यातील सर्व पाणी काढून घ्या. आता चण्यामध्ये सात ते आठ मोठ्या लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घाला. नंतर त्यात ऑलिव्ह ऑइल घालून सर्व जिन्नस एकजीव वाटून घ्या. हवे असल्यास त्यात ताहिनी पेस्ट (बाजारात सहज उपलब्ध होते) म्हणजेच पांढऱ्या तिळांची पेस्ट घालू शकता. याच हुमसमध्ये उकडलेला बीट वाटून घालून पिंक हुमस बनवता येईल. हुमस हे ब्रेड, कापलेल्या भाज्या जसे की गाजर, काकडी आणि भोपळी मिरची किंवा क्रॅकर्ससह सर्व्ह केले जाते.
३. गार्लिक-योगर्ट डिप: एक वाटी घरी लावलेले घट्ट दही घ्या. त्यात दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घाला. या मिश्रणात एक चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा शेपूची पाने घाला. आता यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून सर्व जिन्नस चांगले फेटून एकजीव करून घ्या. गार्लिक-योगर्ट तयार आहे.
४. सालसा: दोन मोठे ताजे टोमॅटो, एक मध्यम आकाराचा कांदा एक हिरवी मिरची, चार ते पाच लसूण पाकळ्या एकत्र करून बारीक चिरून घ्या. या मिश्रणात मीठ आणि जिरेपूड घालून चांगले मिञ्चस करून घ्या. या डिपमध्ये कॅलरीजचे प्रमाण फारच कमी असते. हे डिप खाकरा किंवा चिप्सबरोबर अप्रतिम चवीचे लागते.
५. चीजी डिप: दोन ते तीन मोठे चमचे चीज स्पे्रड, घट्ट गोड दही घ्या. दह्याच्या जागी चक्का वापरला तरी चालेल. या दह्यात तीन ते चार चमचे फेटलेली साय, दोन ते तीन किसलेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काळीमिरीपूड घालून चांगले फेटून घ्या. हे डिप चपाती किंवा ब्रेडवर लावून खाल्ले तरी चविष्ट लागते.
६. साझिकी: एक मोठ्या आकाराची काकडी किसून घ्या. त्यातले सर्व पाणी चांगले पिळून काढून टाका. आता काकडीच्या किसामध्ये एक वाटी घट्ट गोडसर दही किंवा चक्का घाला. या दह्यात दोन ते तीन किसलेल्या लसूण पाकळ्या, थोडा लिंबूरस, मीठ आणि एक चमचा शेपूची पाने घालून चांगले फेटून घ्या. हे डिप चिल्ड करून सर्व्ह करावे. बिर्याणी किंवा वेगवेगळ्या पुलावसोबत ते उत्तम लागते. याशिवाय, ग्रिल्ड मीट किंवा सीफूड, ताज्या भाज्या किंवा पिटा चिप्स या डिपमध्ये बुडवून खाता येतील.
डिप बनवण्यासाठी काही मह॔वाच्या टिप्स :
– कोणते डिप गुळगुळीत आणि मलईदार बनण्यासाठी ते चांगले फेटून घेणे फार महत्वाचे आहे.
– कोणतेही डिप वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवू शकतो. या डिपमध्ये सॉसेस आणि हद्ब्रर्स यांचा वापर करून वेगवेगळे फ्लेवर्स तयार करता येतील.
– बहुतेक डिप्स थंडगार सर्व्ह केल्यास त्याची चव उत्तम लागते. डिपची चव आणि ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी ते बनवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवावे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
गुगल गृहिणी
