उंबरठ्यावर | monsoon indian food | healthy food in rainy season | monsoon season food | best food for rainy season | monsoon dishes

पावसाळ्याच्या उंबरठ्यावर | प्राची रेगे, आहारतज्ज्ञ | The onset of monsoon | Prachi Rege, Dietician

पावसाळ्याच्या उंबरठ्यावर

पावसाळा उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. ऋतूमधील या परिवर्तनामुळे वेगवेगळ्या प्रकारचे संसर्ग होण्याची शक्यता असते. पण तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर ऋतूबदलाचा तुमच्यावर फार परिणाम होणार नाही. आपल्या आहारामुळे आपली रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत होण्यास मदत होते का? तर या प्रश्नाचे उत्तर १०० टक्के ‘हो’ असे आहे.

रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात पुढील पदार्र्थांचा समावेश करा:

१. प्रोबायोटिक्स: दररोज एक कप दही खावे. मात्र यासाठी भरपूर साखर असलेली प्रोबायोटिक पेये (उदा. याकुल्ट), स्मूदीज, फ्रूट दही किंवा आइस्क्रीम खाण्याची गरज नाही. स्थानिक डेअरीमधून दही घेऊन त्याचे विरजण लावा. चांगले जिवाणू आपल्याला पोटातील यंत्रणेचा अपायकारक जिवाणूंपासून बचाव करतात आणि पचनक्रिया सुलभ करतात. प्रोबायोटिक्ससोबतच प्रिबायोटिकही (प्रोबायोटिक जिवाणूंसाठी अन्न) खाणेही तितकेच गरजेचे असते. भरड काढलेले धान्य, कच्चे केळे, लसूण, कांदा इत्यादींचा यात समावेश होतो.

२. ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थः हे एक आवश्यक जीवनसत्त्व असून प्रतिऑक्सिडीकारक आहे. ते संक्रमणापासून संरक्षण देते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्कर्व्ही रोग होतो. जखम भरून काढण्यासाठी, केशवाहिन्यांच्या एकसंधतेसाठी, रक्तवाहिन्यांच्या विकास आणि वाढीसाठी तसेच दात, हाडे यांच्या मजबुतीसाठी हे जीवनसत्त्व आवश्यक असते. काही संप्ररेकांच्या संश्लेषणांमध्ये याची मदत होते. लोहाच्या शोषणावरही त्याचा प्रभाव होतो. पेरू, बोरे, आवळा, हिरवी भोपळी मिरची, लिंबू वर्गातील फळे, प्लम आणि पीच या ‘क’ जीवनसत्त्वयुक्त फळांचा रोजच्या आहारात समावेश असावा.

३. गवती चहा व तुळस : तुम्ही इतर कोणत्याही लाभदायक वनस्पतींचा समावेश आहारात करू शकत नसलात, तरी गवती चहा व तुळस मात्र अजिबात टाळू नका. या दोहोंमध्ये उत्तम जिवाणूविरोधी गुणधर्म आहेत. सर्दी व खोकल्यास कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंशी लढा देण्यासाठी गवती चहाची मदत होते. त्यामुळे या ऋतूमध्ये बाजारात सहज उपलब्ध असलेली ही वनस्पती घरी आणा आणि वाफाळत्या चहाचा आस्वाद घ्या.

४. पावसाळ्यात मासे खाणे टाळा कारण, तो त्यांचा प्रजननाचा काळ असतो. या काळातील मासे सेवन केल्यास तुमचे पोट बिघडू शकते.

५. या दिवसांमध्ये पातळ हिरव्या पालेभाज्यासुद्धा टाळा. त्याऐवजी मायाळू, अळू, शेवगा (मोरिंगा) इत्यादी भाज्या खाऊ शकता.

६. रस्त्यावर मिळणारे पदार्थ पूर्णपणे टाळा. सलाड, चटण्या, चाट यांसारखे गरम न करता मिळणारे पदार्थ बाहेरून अजिबात ऑर्डर करू नका.

७. प्रथिनांचा समावेश असलेला आहार वाढवा. या कालावधीत पचनक्रिया शिथिल झालेली असते. त्यामुळे राजमा, छोले, हरभरे इत्यादी पचण्यास कठीण असलेले पदार्थ टाळा. मोड आलेले मूग आणि मटकी तुलनेने पचण्यास हलके असतात.

८. हळद घातलेले गरम दूध, गरम सूप आणि पेज या काळात घ्यायला हवी.

आणि हो, चहा व भजी…प्रमाणातच खा. पाऊस पडतोय म्हणून दररोज भजी खाणे चांगले नव्हे. भज्यांचा विषय निघालाच आहे, तर यंदाच्या पावसाळ्यात कांदा

भज्यांपलीकडेही विचार करा. ओव्याची पाने, मायाळूची पाने, शतावरी, मोरिंगा फुले यांची भजी तुम्हाला वेगळी चव, वेगळा स्वाद आणि वेगळी पोषकतत्त्वे देऊ शकतील.

लक्षात ठेवा: विविध प्रकारचे पदार्थ आपल्या आहारात असावेत. त्यामुळे आपल्या पोटातील सूक्ष्म जंतूंचे आरोग्य सुधारून आपली रोगप्रतिकार शक्ती बळकट होते. ऋतूमानानुसार आहारात फरक करणे, ही आपल्या चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


प्राची रेगे, आहारतज्ज्ञ

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.