व्यावसायिक यशाचा मंत्र
व्यावसायिक जगात सतत होणाऱ्या बदलांमध्ये टिकून राहण्याच्या आणि प्रगती करण्याच्या क्षमतेला आज महत्त्व आले आहे. प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच काम करण्याच्या पद्धती बदलत असताना विश्लेषणात्मक विचार, संवाद, सहकार्य आणि कल्पकता या चार कौशल्यांमुळे व्यक्तींना त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी मदत होते. तसेच नावीन्यपूर्ण, कार्यक्षम आणि प्रगतीशील कार्यालयीन वातावरण निर्माण होण्यासही हातभार लागतो. या कौशल्यांमुळे वैयक्तिक कामगिरीमध्ये सुधारणा होते, परिणामी संस्थेच्या यशात तुम्हालाही योगदान देता येते. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरची सुरुवात करताना तसेच व्यावसायिक जीवनात कार्यरत असणाऱ्यांना अधिक यशस्वी होण्यासाठी या चार कौशल्यांची मदत होऊ शकते.
१. विश्लेषणात्मक विचार (Critical Thinking):
विश्लेषणात्मक विचार म्हणजे माहितीचे वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची क्षमता होय. यात संसाधनांचे (Sources)मूल्यमापन करणे, पक्षपात/पूर्वग्रह ओळखणे आणि कल्पनांमधील तर्कशुद्ध जोडणी समजून घेणे आदी बाबींचा समावेश होतो. माहितीच्या विस्फोटाच्या या युगात प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या डेटामधून योग्य गोष्टी ओळखण्याची आणि तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. विश्लेषणात्मक विचार करणाऱ्या व्यक्ती मांडल्या गेलेल्या गृहितकांवर/तर्कांवर प्रश्न उपस्थित करतात, अनेक बाजूने विचार करतात आणि आपल्या निर्णयांना समर्थन देण्यासाठी सबळ पुरावे मिळवतात.
विद्यार्थी जीवनात विश्लेषणात्मक विचार करण्याचे कौशल्य अंगी बाणवण्यासाठी चर्चांमध्ये सहभाग, प्रश्न विचारणे आणि अभ्यासक्रमातील समाविष्ट त॔वे समजून घेण्याचा प्रयत्न करणे आदी प्रकारे सक्रिय सहभाग शिक्षणात घ्यायला हवा. त्याचबरोबर केसस्टडी, शद्ब्रदकोडी, सुडोकू आणि प्रत्यक्ष आयुष्यात येणाऱ्या गुंतागुंतीच्या परिस्थितीच्या माध्यमातून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. महत्त्वाचे म्हणजे आपल्या विचारप्रक्रियेबद्दल व आपण योजिलेल्या उपायांबद्दल नियमितपणे अभिप्राय मिळवायला हवेत.
तर व्यावसायिक जीवनात विश्लेषणात्मक विचारांचे महत्त्व नवीन व्यावसायिक धोरण आखताना, तांत्रिक समस्या सोडवताना तसेच एखाद्या निर्णयाच्या संभाव्य परिणामांचे मूल्यमापन करताना महत्त्वाचे ठरते. या कौशल्यामुळे समोर येऊ शकणाऱ्या आव्हानांचा अंदाज घेऊन त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जाता येते. या कौशल्यामुळे सतत शिकत राहण्यास आणि सुधारणा करण्यास चालना मिळते. असा विचार करणाऱ्या व्यक्ती नवी माहिती जाणून घेण्यास व दृष्टिकोनात बदल करण्यास उत्सुक असतात. यासाठी विविध अभ्यासक्रम, कार्यशाळांना हजर राहून, ताज्या घडामोडींबद्दलचे वाचन करून नवीन टे्रंड्स आणि पद्धती याबद्दल अद्ययावत राहायला हवे. तसेच आपण घेतलेल्या निर्णयांचा नियमितपणे आढावा घेणे फायद्याचे ठरेल.
२. संवाद (Communication):
संवाद म्हणजे माहिती प्रभावीपणे आणि कार्यक्षमतेने पोहचवण्याची क्षमता. प्रभावी संवादात मौखिक, अमौखिक आणि लेखी संवाद कौशल्यांचा समावेश होतो. यात केवळ स्पष्टपणे माहिती पोहचवणेच नाही तर सक्रिय ऐकणे, वेगवेगळ्या दृष्टिकोनांना समजून घेणे आणि खुल्या संवादाला प्रोत्साहन देणे यांचाही समावेश होतो.
वादविवाद स्पर्धांमध्ये सहभागी होणे, भाषण देणे किंवा चारचौघात पुढे येऊन बोलणे आदी मार्गांनी विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्तरावरील आपले वक्तृत्व कौशल्य सुधारता येते. तर ब्लॉग, निबंध लिहिणे किंवा विद्यार्थी वृत्तपत्रात योगदान देणे यांसारख्या मार्गांनी लेखन कौशल्य सुधारता येईल. महत्त्वाचे म्हणजे इतरांचे म्हणणे समजून घेण्यासाठी, त्यांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्यासाठी आपला रोजचा संवाद लक्षपूर्वक ऐकायला हवा.
जे व्यावसायिक/कर्मचारी उत्तम प्रकारे संवाद साधू शकतात ते आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि तशी सेवा पुरवून त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात. जागतिकीकरण झालेल्या आजच्या जगात एखाद्या प्रकल्पावर काम करणारी टीम विविध देशांमधील/संस्कृतीची असू शकते. भिन्न संस्कृती असलेल्या व्यक्तींशी आदराने आणि संवेदनशीलतेने संवाद साधल्याने सांघिक कामगिरीत सुधारणा होते. तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य व वाढीच्या नवीन संधी खुल्या होतात. हे कौशल्य आत्मसात करायचे तर समोरची व्यक्ती आपली सहकारी आहे, वरिष्ठ आहेत की ग्राहक ते समजून त्याप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधावा. त्याचबरोबर आपल्या संवाद कौशल्याबद्दल सहकाऱ्यांकडून अभिप्राय मिळवा. तसेच एआय, चॅट जीपीटी यांसारख्या कम्युनिकेशन टूल्सचा वापर करून संवाद कौशल्य विकसित करता येईल.
३. सहकार्य (Collaboration):
इतरांसोबत समन्वयाने काम करणे आणि समान उद्दिष्ट साध्य करणे म्हणजे सहकार्य! यासाठी परस्परांना समजून घेण्याची सहानुभूती आणि संघर्ष हाताळण्याची क्षमता अंगी असायला हवी. सहकार्यामुळे एकत्रितपणाची आणि आपलेपणाची भावना निर्माण होते. कारण संघसदस्य (टीममेट्स) सामाईक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करतात आणि साध्य केलेल्या उद्दिष्टांचे यश साजरे करतात. हे सदस्य वाटाघाटी करण्यात, तडजोड करण्यात आणि एकमत बनवण्यात कुशल असतात. यामुळे कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण तयार होते.
विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सहकार्य म्हणजे भविष्यातील आपल्या करिअरसाठी आवश्यक ती कौशल्ये आत्मसात करणे होय. गटात काम केल्याने सहकाऱ्यांकडून इतरही गोष्टी शिकता येतात. परस्परांच्या बलस्थानांचा उपयोग करून सामायिक ध्येय साध्य करणे शक्य होते, जे कदाचित एकट्याने साध्य करणे कठीण असते.
मित्रांसोबत संपर्क वाढवणे, अभ्यासाव्यतिरिक्त वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे यातून परस्परांमधील सहकार्य वाढीस लागेल. तसेच आपले वर्तन सहानुभूतीपूर्ण असू दे. यासाठी टीममधील सदस्यांचे दृष्टिकोन समजून घ्या,
त्यांच्या मताचा आदर करा.
कामाच्या ठिकाणी कोणताही प्रकल्प यशस्वी होण्यासाठी विविध शाखांमधील व्यक्तींकडून इनपुट आवश्यक असते, प्रभावी सहकार्यामुळे वैविध्यपूर्ण कौशल्य, ज्ञान व अनुभवी व्यक्ती एकत्र येऊन अभिनव उपाययोजना यशस्वीरित्या राबविल्या जातात. यासाठी टीममधील सर्व सदस्यांना महत्त्व दिले जात असल्याची आणि ऐकले जात असल्याची भावना निर्माण होईल, असे वातावरण तयार करायला हवे. मतभेदाची परिस्थिती हाताळण्यासाठी संघर्ष निराकरणाचे धोरण अवलंबणे लाभदायक ठरेल. आपल्या संस्थेच्या विविध क्षेत्रांमधील बारकावे समजून घेण्यासाठी व सहकार्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी वेगवेगळ्या विभागातील टीम्सनी एकत्र काम करण्याचाही फायदा होतो.
४. कल्पकता (Creativity):
कल्पकता म्हणजे नावीन्यपूर्ण कल्पना आणि उपाययोजना शोधण्याची क्षमता. यात चौकटीबाहेरील विचार करणे, प्रयोग करणे आणि जोखीम पत्करणे यांचा समावेश होतो.
कल्पकतेमुळे विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाकडे उत्सुकतेने आणि खुल्या मनाने पाहणे शक्य होते. त्यामुळे शिकण्याची प्रक्रिया उत्कंठावर्धक आणि आनंददायी होते. कल्पक विचारप्रक्रियेला चालना देण्यासाठी विविध अध्ययन क्षेत्रांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या प्रकल्पांसाठी चाकोरीबाहेरील कल्पना किंवा उपाययोजनांचा विचार करायला कचरू नका. विचारमंथन करायला लावणारी सत्रे, कला व हस्तकला किंवा कोडिंग यांसारख्या आव्हानात्मक व कल्पक अभ्यास सरावात सहभागी होऊन कल्पकता वाढवता येईल. कल्पक व्यावसायिक परस्परांशी संबंध नसलेल्या दोन संकल्पनांमधील संबंध पाहू शकतात, नव्या शक्यतांचा विचार करू शकतात तसेच आपल्या कामाकडे वेगळ्या नजरेतून पाहू शकतात. उत्कृष्ट उत्पादन विकसित करायचे असो वा वैशिष्ट्यपूर्ण मार्केटिंग धोरण आखायचे असो वा एखाद्या किचकट समस्येसाठी अभिनव उपाययोजना आखायची असो; तुमच्याकडे असणाऱ्या कल्पकता या गुणामुळे प्रगती व वाढीस चालना मिळते. याचा परिणाम म्हणजे एखादा महत्त्वपूर्ण शोध लागू शकतो किंवा पुढचे पाऊल टाकले जाते. जेव्हा व्यावसायिक/कर्मचारी मोकळेपणाने आपल्या कल्पना मांडू शकतात, नवे दृष्किोन पडताळू शकतात, तेव्हा ते प्रोत्साहित राहतील आणि अधिक जोमाने काम करतील.
हे कौशल्य अंगी बाणवायचे तर आपल्या वेळापत्रकात कल्पक विचार आणि नावीन्यतेसाठी वेळ ठेवायला हवा, वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबरोबर काम करतानाच आलेल्या अपयशाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहता यायला हवे. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी प्रयोगांना प्रोत्साहन देणारे वातावरण निर्माण होईल, ह्याची काळजी घेतली पाहिजे.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
स्वाती साळुंखे
(लेखिका अनुभवी करिअर मार्गदर्शक आहेत.)
