काढा | self help | motivation | positive attitude in life | thoughts attitude | power of positive mindset | positive thinking

‘नन्ना’चा पाढा, त्यावर ‘हो ना’चा काढा! | डॉ. आनंद नाडकर्णी | Positive Attitude Paradigm | Dr. Anand Nadkarni

‘नन्ना’चा पाढा, त्यावर ‘हो ना’चा काढा!

सळसळत्या मेंदूमध्ये नवी कल्पना आली, की ती पटकन कुणालातरी सांगितल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला राहवत नाही. अशा वेळी ह्या आधी कुणालाही न सुचलेली, अद्वितीय कल्पना (आभार : भाडिपा) आपण मांडावी आणि समोरच्याने त्याच क्षणी त्यातली हवा काढून टाकावी. मग हवा गेलेल्या फुग्यासारखे आपले मन मटकन खाली बसते. निराशेच्या गर्तेमध्ये स्वतःबरोबर दुसऱ्यालाही कसे घेऊन जावे, ह्या विषयावर कृतिशील संशोधन करण्यात काही जणांची हयात जाते. बरे ह्यांच्यापासून दूर राहता येत नाही. कारण त्यातले काही आपल्या घरात आणि काही जण आपल्या मनातही राहत असतात. म्हणून नकारात्मक विचारांना (आणि ते वारंवार करणाऱ्यांनाही) समजून घेणे, ही सकारात्मकतेची पहिली पायरी ठरते.

आपण नकारात्मक, निराशावादी विचारांचे वर्गीकरण दोन गटात करू. पहिला आहे, ‘उपयुक्त नकारात्मक विचार’ काय बरे असतात ते? कोणतीही कृती करण्यापूर्वी किंवा तिची आखणी करताना आपण ‘तारतम्या’ने विचार करायचा असतो. ‘तर-तम’ भाव म्हणजे मनाप्रमाणे घडेल किंवा न घडेल अशा दोन्ही शक्यतांचा विचार! ‘नकारात्मक शक्यता’ म्हणजेच येऊ शकणाऱ्या अडचणींची यादी.  ती तयार करणे आवश्यक असते. त्यातल्या काही टाळता येण्यासारख्या असतील तर विचारात घ्यायच्या. ज्या घडतील असे प्रकर्षाने वाटते त्यांचा प्रभाव, ठसा, परिणाम कमी करण्यासाठी काय करावे हे नियोजन करताना लक्षात घ्यावे लागेल. संपूर्ण अपयश, अंशतः यश, बऱ्यापैकी यश, उत्तम यश अशा चार शक्यता डोळ्यांसमोर ठेवायच्या असतात.अडचणीच्या प्रत्येक क्षणी स्वतःला सांगायचे- ‘तुझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते ते शोधत राहा. तुझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेल्या घटकांची नोंद घे आणि स्वीकार कर. तुझ्या कक्षेत असलेल्या प्रत्येक साधनाचा पुरेपूर वापर करता येईल असे पाहा.’

परंतु कधीकधी आपल्या सर्वांचे मन अपयशाच्या शक्यतेचे रूपांतर ‘खात्री’मध्ये आधीच करून टाकते. घटना घडण्याआधीच भावनिक कर्जाचा बोजा डोक्यावर चढवून त्यावर चक्रवाढ दराने, मासिक व्याज भरणेही सुरू होते. उदा. ‘‘आताच्या मुली कशा स्वार्थी असतात. लग्नानंतर तुझ्याशी बरी वागू दे, झालं… आमच्याशी चांगली वागेल, अशी आशाच नाही.’’ आपल्या एकुलत्या एका लेकाशी बोलणाऱ्या आईचा असा उपदेश अनेकांनी ऐकला असणार. अशा प्रतिक्रियांचा दैनंदिन वर्षाव होत असताना सकारात्मक जगणे कठीण असणार.

कठीण पण अशक्य नक्कीच नव्हे. नकारात्मक खात्रीत मन अडकले, की तेच आणि तेवढेच गिरवले जाते. त्याचा ‘पाढा’ बनतो म्हणजे, तो होतो Belief  अर्थात ‘विचारसूत्र’. अशा व्यक्तीला विचारून पाहा, की तुमची मते इतकी ‘नकारात्मक’ (निगेटिव्ह) कशी झाली? तत्काळ उत्तर येईल, ‘‘अनुभव…सततचे अनुभव.’’ पण वारंवार वाईट अनुभव येऊनही काही जण कडवटपणा कसा टाळतात आणि काही जण त्याचे लोणचे का घालतात?

अपयश, मनोभंग, नुकसान, अनारोग्य, विश्वासघात अशा विविध अनुभवांतून जाताना जे मन ‘लेबलांच्या सापळ्यात’ अडकते ते मन वास्तव आणि सकारात्मकता ह्या दोन्ही गोष्टी विसरते. लेबलांच्या शोरूममध्ये तीन व्हरायटीज मिळतात. ‘प्रीमियम’ लेबल म्हणजे स्वतःवर नकारात्मक शिक्का मारणे.स्वतःमधल्या गुणांना कःपदार्थ मानून, अवगुणांचा शिक्का स्वतःवरच मारणे. ‘सुपरप्रीमियम’ लेबल आहे, दोषारोपाची ऊर्जा दुसऱ्यांवर पाखडणे. त्या’Blame Game’ मध्ये स्वतःला अडकवणे. एकदा अडकलो, की मन त्या ‘अडकले’पणाचीच वकिली करायला लागते. त्यासाठी बुद्धी पणाला लावते. तर ‘एक्सेल’ साइजचे लेबल परिस्थिती आणि नशिबावर लावायचे. ह्या लेबलमध्ये स्वयंप्रयत्नांशिवायचे अनेक उतारे, कर्मकांडे आणि निरर्थक क्रिया नुसत्या घुसतच नाहीत, तर त्यांच्यावर मौल्यवान खड्यांपासून ते चमत्कारी बुवांपर्यंतची एक बाजारपेठ जन्म घेते.

स्वतःच्या सर्व गुणधर्मांचे आणि प्राप्त परिणामांचे वास्तवाला धरून मूल्यमापन करणे म्हणजे, उपयुक्त सकारात्मकता. मात्र, त्याच वेळी व्यक्ती म्हणून आपल्या संपूर्ण अस्तित्वाचे मूल्यमापन नकारात्मक झाले, तर तो एक सापळा ठरतो. संपूर्ण अस्तित्वावर ‘मीच ग्रेट’ असे सुपरएक्सेल लेबल लावले तरी तोही पुढे सापळाच ठरणार! मग आशावादाचे औषध, प्रयत्नवादाचा काढा कसा तयार करायचा? आणि चवीचवीने स्वतःलाच कसा पाजायचा?

मनाच्या डोळ्यांना वास्तवाच्या लेन्स बसवणे, ही यावरची पहिली पायरी. वास्तवाची जाण आली तरच शक्यता, दाट शक्यता, जवळजवळ खात्री आणि निश्चित खात्री ह्या चौघांमधला फरक कळणार. वास्तवाची लेन्स नसेल, तर माणूस अपयश किंवा यश ह्याच्याकडे खात्री म्हणून पाहणार. यशाची खात्री असेल तर बेफिकीर, बिनधास्त राहणार आणि अपयशाची खात्री असेल, तर आरंभाइतकेसुद्धा शौर्य दाखवणार नाही. वास्तवाची जाण आली, तर माणूस नेहमी आता ह्या क्षणी करता येण्यासारख्या कृतीची कास धरतो, स्वतःच्या क्षमता वापरतो आणि वाढवतो.

दुसरा मुद्दा आहे, त्या त्या वेळच्या वर्तनावरून तसेच त्यातून जन्म घेणाऱ्या परिणामांवरून माणूस म्हणून स्वतःच्या ‘लायकी’ची परीक्षा न करणे. आपण ‘ना-लायक’ असल्याचा निकाल म्हणजे ‘जजमेंट’ स्वतःच्याच मनोन्यायालयात देतो आणि स्वतःलाच शिक्षा ठोठावतो. ‘मी अपयशी माणूस आहे’ असे न म्हणता ‘मी अपयशाचा सामना करत आहे,’ असे म्हणायला हवे. तिसरा नियम आहे, रोजच्या विचारजपाचा! त्या जपाचे नाव आहे, ”Difficulties Don’t Discriminate!”  (कठीण परिस्थिती कधी भेदभाव करीत नाही)

‘होना’च्या काढ्यामधली शेवटची मात्रा आहे, जे शक्य साध्य आहे ते मनःपूर्वक आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणे. डोळे नीट उघडून वास्तवाची लेन्स लावून सभोवार पाहिले, तर नन्नाचा पाढा पुसून वागणारी आणि तरीही जगाच्या दृष्टीने अजिबात सेलेब्रिटी नसलेली अनेक आयुष्ये दिसतील आणि त्याच दृष्टीने आत पाहिले, तर उर्जाप्रवाहामध्ये हळूहळू पुसट होत जाणारा नन्नाचा पाढासुद्धा जाणवेल.

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 डॉ. आनंद नाडकर्णी

(लेखक अनुभवी मनोविकारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.