September 18, 2024
श्वसनक्रिया | cipap | bipap | sleep apnea testing | sleep apnea diagnosis | loud snoring

झोपेत श्वसनक्रिया थांबते तेव्हा…| डॉ समीर गर्दे | When breathing stops during sleep…| Dr. Sameer Garde

झोपेत श्वसनक्रिया थांबते तेव्हा

जीवघेणे घोरणे

‘‘डॉक्टर हौसेने केलेले लव्ह मॅरेज वाचवावे म्हणून इतकी वर्षे मी यांचे घोरणे सहन केले. अगदी दोन खोल्या सोडून पलीकडे झोपले तरीसुद्धा यांचे घोरणे ऐकू येते. परवा तर हद्दच झाली, एक्सप्रेस वेवर गाडी चालवताना काही सेकंद ह्यांना अशी डुलकी लागली, की खूप मोठा अपघात होणार होता. पण नशीब बलवत्तर म्हणून आम्ही त्यातून वाचलो. केवळ घोरणे या प्रकारातून असे काही आजार उत्पन्न होतात का डॉक्टर, याबद्दल प्लीज आम्हाला नीट सांगा आणि याचा काय तो कायमचा बंदोबस्त करा…’’

अशा आणि या प्रकारच्या विविध तक्रारी घेऊन अनेक रुग्ण आमच्याकडे येत असतात. २५ वर्षांपूर्वी जेव्हा एम.डी.ला प्रवेश घेतला,  तेव्हा आमचे प्राध्यापक म्हणायचे, की भारत हा डायबिटीसची राजधानी बनणार आहे किंवा ‘स्लीप अ‍ॅप्निया’ (Sleep Apnea) म्हणजे निद्रेचे विकार ही भारतीयांसाठी एक मोठी समस्या होऊन बसणार आहे. तेव्हा हे खरे वाटायचे नाही, कारण अगदी ९० च्या दशकापर्यंत ‘लाइफस्टाइल डिसॉर्डर’ म्हणजेच मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड, स्थूलपणा, हृदयविकार किंवा ह्या सगळ्यामुळे होणारे किडनीच्या समस्या, स्लीप अ‍ॅप्निया आदी विकारांचे प्रमाण त्यामानाने कमी होते. कारण आपण अजूनही तिसऱ्या जगात गणले जात होतो. हे सगळे विकार मुख्यत्वे पाश्चा॔य संस्कृतीमध्ये – अमेरिकेसारख्या देशांमध्ये, जिथे प्रचंड सुबत्ता आहे. सगळ्या प्रकारच्या सुखसोयी हातापायाशी असल्यामुळे माणूस आळशी झालेला आहे. पुरेसा व्यायाम करत नसल्यामुळे हे विकार त्यांच्या मागे लागतात. भारतात असे काही होऊ शकत नाही, अशी खात्री वाटायची. पण गेल्या काही वर्षांत ही परिस्थिती प्रचंड बदललेली पाहायला मिळते. आपल्या आयुष्यामध्ये जितक्या सुखसोई वाढत गेल्या, बैठेपणा वाढत गेला तितके हे विकार (जीवनशैलीचे विकार) वाढत गेले. लॉकडाउनच्या दोन वर्षांत बहुतांश जण एकाच जागी बसून सतत आठ-दहा तास काम करत होते, तिथेच बसून खातपित होते. यामुळे येणारा कामाचा ताण, कमी पडणारा व्यायाम, शरीराची कमी झालेली हालचाल आणि चहाकॉफी, धूम्रपान अशी व्यसने, अवेळी झोपणे-उठणे, अपुरी झोप हा जसा जीवनशैलीचा विकार तसाच निद्रेचाही. झोपेत श्वास बंद होण्याची ही क्रिया एखाद्याचा जीव घेण्याइतपत गंभीर अशी समस्या आहे. गायक-संगीतकार भप्पी लहिरी याच आजाराचे (झोपेत श्वसनक्रिया थांबून मृत्यू) बळी ठरले होते.

निद्राविकाराचे वास्तव

अनेकदा घोरणे आणि अतिनिद्रा ही सौख्याची लक्षणे वाटतात. पण हा एक गैरसमज आहे. वास्तविक,  घोरण्यामुळे झोपेची प्रत खालावते. त्याचा परिणाम दिवसभरात थकवा किंवा पेंग येणे असा होतो.

घोरण्याबरोबर येणारा ‘स्लीप अ‍ॅप्निया’ हा विकार तर अधिक धोकादायक ठरतो. एक तर हा विकार गाढ झोपेत होत असल्याने ज्या माणसाला तो होतो, त्याला त्याचा पत्ताच नसतो. मात्र या विकाराचे दुष्परिणाम भयंकर होतात. जसे की  थकवा, वजन वाढणे, मधुमेह, रक्तदाब वाढणे, हृदयविकार, पक्षाघात आणि झोपेत मृत्यू. आपल्या देशात ही समस्या असणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण जनजागृती नसल्याने लोकांना याबाबत माहितीच नाही.

झोपेची प्रक्रिया आणि घोरणे

झोपेमध्ये आपण श्वास घेताना आपल्या नाकापासून ते स्वरयंत्रापर्यंतचा जो श्वसन मार्गाचा भाग आहे, त्यातला वरचा काही भाग हा अरुंद होतो. याच मार्गाने श्वास आत येतो आणि बाहेर पडतो. ही एक फिजिओलॉजिकल प्रक्रिया आहे. श्वास आत बाहेर येत असताना श्वसनमार्गाचे हे स्नायू शिथिल होतात तेव्हा (तसेच स्थूल व्यक्तींमध्ये ज्यांची मान अतिशय जाड असते अशा लोकांमध्ये श्वसनमार्गाची रुंदी इतकी कमी होते, की) श्वसनमार्गाच्या भिंती एकमेकांवर आपटतात आणि जो आवाज निर्माण होतो, त्यालाच आपण घोरणे असे म्हणतो. या घोरण्याचा पुढचा टप्पा म्हणजे जेव्हा तो श्वसनमार्ग काही मिली सेकंदांसाठी चक्क बंद होतो. त्यामुळे त्यात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण होत नाही. त्या वेळी श्वसनमार्गाच्या स्नायूंकडून मेंदूला आपण गुदमरत असल्याचा इशारा जातो. तेव्हा मेंदूकडून उठा आणि तुमचे काम करा असे उलटे सिग्नल्स तिथल्या यंत्रणेला जातात. या सगळ्या गोंधळात मेंदूला नीट विश्रांती मिळत नाही. मेंदूला रात्रभराच्या या सहा-आठ तासांच्या झोपेच्या विश्रांतीची गरज असते. पण जर असा सततचा अडथळा मेंदूला येत राहिला तर मेंदूला विश्रांती मिळत नाही. परिणामी, मधुमेह, थायरॉइड, किडनीच्या आजारांना तोंड द्यावे लागते. मेंदूला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे सकाळी ताजेतवाने वाटत नाही, कामावर जायचा उत्साह राहत नाही. अशी व्यक्ती कायम निरुत्साही राहते. परिणामी, आणखी स्थूलता वाढते, आणखी घोरणे वाढते आणि यातून स्लीप अ‍ॅप्नियाची तीव्रता वाढत जाते.

निदान आणि उपचार

या रोगाचे निदान करण्यासाठी एक स्लिप टेस्ट केली जाते. ज्याच्यामध्ये रुग्णाच्या रात्रीच्या झोपेचा अभ्यास केला जातो. तो रुग्ण किती वेळा घोरला? त्या वेळेला त्याच्या नाडीची गती किती होती? ऑक्सिजनची लेवल किती होती? आदी सगळ्या गोष्टी मोजल्या जातात. साधारण तासाला शून्य ते पाच वेळेला श्वासनलिका रुंद होणे किंवा ऑक्सिजन – कार्बन डायऑक्साइडच्या पुरवठ्यावर थोडासा परिणाम होणे, हे सामान्य समजले जाते. पण अशा रुग्णांमध्ये हा आकडा खूपच वर असतो. पाच ते दहा म्हणजे सौम्य, दहा ते पंधरा म्हणजे मध्यम आणि पंधराच्या पुढे गंभीर मानले जाते.

दुसऱ्या रात्री एक CPAP किंवा BiPAP या नावाचे उपकरण / मशीन रुग्णाच्या झोपेचा पुन्हा अभ्यास केला जातो. ह्या मशीनद्वारे एका ठरावीक प्रेशरने रुग्णाच्या श्वासनलिकेमध्ये हवा सोडली जाते. या मशीनचा आकार एखाद्या छोट्याशा टेलिफोनसारखा असतो. त्याला एक पाइप आणि एक मास्क जोडलेला असतो. तो मास्क चेहऱ्यावर बांधून, यंत्र सुरू करून रुग्ण झोपतो. हे यंत्र फक्त आणि फक्त हवेचा दाब नियंत्रित करण्याचे काम करते, ज्यायोगे आपली श्वासनलिका अरुंद होणार नाही. थोडक्यात, श्वासनलिकेला रुंद ठेवण्याचे काम हे यंत्र करते, ज्यामुळे ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइडची देवाणघेवाण नीट होऊन रुग्णाच्या झोपेची पत सुधारते, मेंदूला चांगली विश्रांती मिळते व इतर जीवघेण्या समस्यांपासून सुटका व्हायला सुरुवात होते.

स्थूल व्यक्तींमध्ये जेव्हा ऑबस्ट्रक्टिव्ह स्लीप अ‍ॅप्निया असतो, तेव्हा वजन कमी करणे हाच त्यावरील एकमेव उपचार असतो. पण वजन कमी करा म्हटले, तर यासाठी थोडाफार अवधी लागतोच. अशा रुग्णांचा बॉडीमास इंडेक्स (रुग्णाच्या वजन-उंचीचे गुणोत्तर) बघितले जाते. सामान्यतः हा बीएमआय २२ ते २६ यादरम्यान असायला हवा. पण अशा रुग्णांचा तो खचितच ३०, ३२, ३६ असा कितीही असतो. अशा रुग्णांना वजन कमी व्हायला वेळ द्यावा लागतो. तोपर्यंत या रुग्णांनी त्रास सहन न करता CPAP किंवा BiPAP यंत्र रोज रात्री वापरल्यास त्यांची झोप चांगली पूर्ण होऊ शकते.

वजन अपेक्षित उंचीच्या प्रमाणात आले, की स्लीप अ‍ॅप्नियाचा त्रासही नष्ट होतो. असा हा आपल्या आधुनिक जीवनशैलीचा अजून एक आजार, ज्याला आपण टाळू शकतो. पण जर चुकून जडला, तर त्याच्यामागे जिद्दीने लागून योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन योग्य ती तपासणी व उपचाराचे टप्पे पार पाडून आपण त्याच्यावर नक्कीच मात करू शकतो!

अजून काही महत्त्वाच्या रेसीपी जाणून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ समीर गर्दे

( लेखक तज्ज्ञ पल्मोनोलॉजिस्ट आहेत .)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.