स्वयंपाक | pure iron kadai | iron kadai for cooking | best stainless steel cookware set | safest stainless steel cookware | glass kitchen ware | kitchen glassware

स्वयंपाक घरातील हितशत्रू | मिताली तवसाळकर | Enemies of the kitchen | Mitali Tavasalkar

स्वयंपाक घरातील हितशत्रू

कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य जपण्यासाठी घरातील गृहिणी दिवसरात्र राबत असते. आपल्या स्वयंपाक घरात येणारी प्रत्येक गोष्ट, पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असेल, यासाठी ती धडपडत असते. प्रत्येकाच्या आहारविहाराची ती काळजी घेत असते. आरोग्याच्या दृष्टीने घरातील खाणेपिणे बनविताना प्रत्येक गोष्ट निवडून व पारखून घेत असते. मात्र, हे पदार्थ नेमके कोणत्या भांड्यात बनविले जातात, साठविले जातात हेदेखील आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असते. आजपर्यंत या गोष्टींचा फारसा विचार केला गेला नसला तरी आरोग्याच्या दृष्टीने ते खूप महत्त्वाचे आहे.

हल्ली आपल्या दैनंदिन जीवनात नॉन स्टिकच्या भांड्यांना विशेष स्थान प्राप्त झालेले दिसते. कमी तेल, इंधनाची बचत व स्वस्त दरात मिळत असल्याने नॉन स्टिकच्या भांड्यांना पसंती दिली जाते. पण रोज होणाऱ्या वेगवेगळ्या संशोधनातून असे दिसून आले आहे, की या भांड्यांमध्ये शिजविलेले अन्न शरीरासाठी/आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. नॉन स्टिकची भांडी तयार करताना परफ्लोरो ओक्टॅनॉइक अॅसिड (पीएफओए) या विशिष्ट केमिकलचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. वास्तविकदृष्ट्या नॉन स्टिक भांड्यांसाठी वापरण्यात आलेले हे रसायन स्थिर अवस्थेमध्ये असल्यास शरीराला घातक ठरत नाही. पण अशा भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजविण्यासाठी जेव्हा ही भांडी गॅसवर तापविली जातात, तेव्हा त्या भांड्याचे तापमान साधारणतः २६० अंश सेल्सिअस (५०० अंश फॅरनहाइट) एवढ्या उष्णतेपर्यंत पोहोचते व त्यातील रसायनाच्या विघटनास सुरुवात होते. हे रसायन विषारी वायू बाहेर फेकू लागते, जे भांड्यातील अन्नपदार्थांमध्ये मिसळू लागतात. याचा परिणाम म्हणजे कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना निमंत्रण. गर्भवती स्त्रियांनी अशा पदार्थांचे सेवन केल्यास गर्भाच्या वाढीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच मुलांच्या वाढीवरही याचा प्रतिकूल परिणाम होतो. थायरॉइड हार्मोनच्या स्रवणात व रक्तामधील चरबीची चयापचय क्रिया यामुळे बिघडू शकते. उच्च रक्तदाब, हृदरोग, मधुमेह आणि एवढेच नाही तर कर्करोगालाही यामुळे आपण आमंत्रण देत असतो.

आता साहजिक असा प्रश्न पडू शकतो, की खरेच इतक्या उष्णतेवर आपण  नॉन स्टिकची भांडी तापवतो का? तर याचे उत्तर देणे कठीण आहे. पण कडधान्य, मांस व काही अन्नपदार्थांना शिजण्यासाठी वेळही लागतो व तितकीच अधिक उष्णताही लागते. खाद्यतेल गरम व्हायलाही अधिक उष्णता लागते. साधारण २ ते ५ मिनिटे तापविलेले नॉन स्टिक भांडेसुद्धा विषारी वायू फेकायला सुरुवात करते. त्यामुळे अशी भांडी वापरण्यापेक्षा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या लोखंडाच्या कढया, मातीचे तवे, स्टेनलेस स्टीलची भांडी असे सुरक्षित पर्याय आहेत, ज्यांचा वापर करून आपण आपले आरोग्य निरोगी ठेवू शकतो.

हे लक्षात ठेवा:

१. नॉन स्टिक पॅन प्री-हिट करू नका. पॅन गरम करण्याआधी त्यात कोणताही द्रव पदार्थ घाला. तसेच जास्त तापमानावर पदार्थ बनवू नका.

२. नॉन स्टिक भांड्यामध्ये जेवण बनविताना नेहमी लाकडी चमच्याचा वापर करावा. धातूच्या चमच्यांचा वापर केल्याने टेफ्लॉन कोटिंगचे नुकसान होते.

३. नॉन स्टिक भांडी जुनी झाल्यास व त्याचे टेफ्लॉन कोटिंग निघू लागल्यास त्या भांड्याचा वापर करणे टाळा.

नॉन स्टिकच्या भांड्यांबरोबरच प्लॅस्टिक वस्तूंचा सर्वाधिक वापर आपण करतो. काचेच्या भांड्यांच्या तुलनेत सोयीस्कर, हलके व टिकाऊ असल्यामुळे आपण प्लॅस्टिक पॅकेजिंग, कंटेनर्स, डिश आणि डबे यांचा सर्रास वापर करतो. कोणता आहार खावा यासोबतच कोणत्या भांड्यातून तो द्यावा, हेदेखील महत्त्वाचे आहे. स्वयंपाक घरातील मसाल्याचे डबे किंवा अन्नपदार्थ भरून ठेवले जाणारे हवाबंद डबे, शाळेचा डबा किंवा ऑफिसचा टिफिन हा बहुतांश प्लॅस्टिकचाच असतो. पण आपल्या आरोग्यासाठी प्लॅस्टिक किती हानिकारक आहे, याचा साधा अंदाजही आपल्याला नसतो.

प्लॅस्टिकच्या भांड्यांची निवड करताना ती बीपीए फ्री असणे गरजेचे आहे. प्लॅस्टिक जास्त काळ टिकून राहावे म्हणून त्यात बीपीए नावाचे तत्त्व मिसळले जाते. प्लॅस्टिकची भांडी जोरात घासल्याने किंवा गरम केल्याने त्याचे आवरण उतरत जाते. त्यामुळे प्लॅस्टिकची भांडी लवकर खराब होतात. प्लॅस्टिकच्या भांड्यातून आपण जेवतो किंवा त्यात इतर कोणतेही अन्नपदार्थ ठेवतो तेव्हा हा बीपीए घटक अन्नातून आपल्या शरीरात प्रवेश करतो. हा घटक आपल्या शरीराला अधिक घातक नसला तरीही आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. जर शरीरात बीपीएचे प्रमाण वाढले तर हार्मोन असंतुलन, वजन वाढणे व कधी कधी कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे व वंध्यत्व यांसारख्या समस्याही सतावतात. प्लॅस्टिकच्या भांड्यांना आपल्याकडे चांगले व हितकारक पर्याय उपलब्ध आहेत. आपण तांब्याच्या, चांदीच्या, स्टील किंवा पितळेच्या भांड्यांचा वापर करू शकतो. तांब्याच्या भांड्याचा वापर केल्यास अनेक आजारांवर मात करता येते. चांदीच्या भांड्यातून लहान बाळाला भरवल्यास कोणतेही आजार उद्भवत नाही. तांब्याच्या किंवा काचेच्या भांड्यातून पाणी पिण्यामुळे शरीराला कसलाही धोका संभवत नाही.

पदार्थ झटपट गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला जातो. चहापासून कोणताही अन्नपदार्थ यात एका मिनिटात गरम होत असल्याने मायक्रोवेव्ह घेणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र यात अन्न गरम करताना प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर करू नये. शास्त्रज्ञांच्या मते मायक्रोवेव्हसाठी प्लॅस्टिकची भांडी वापरल्यास वंध्यत्व, उच्च रक्तदाब, स्थूलत्व, मधुमेह व अगदी कर्करोग होण्याचा धोका संभवतो. प्लॅस्टिकची भांडी मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास त्यातील ९५ टक्के रसायने बाहेर पडतात, असा वैज्ञानिकांचा दावा आहे. त्यामुळे मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करण्याकरिता शक्यतो काचेची भांडी वापरा. मायक्रोवेव्हमध्ये वापरण्यासाठी खास प्रकारच्या प्लॅस्टिकच्या भांड्यांचा वापर करा. अशा भांड्यांवर ती ‘मायक्रोवेव्ह सेफ’ असल्याची सूचना असते. तसेच काचेची भांडी वापरत असाल तर त्यावर कोणत्याही प्रकारची सोनेरी, चंदेरी नक्षी नसेल, याची काळजी घ्या.

स्वयंपाक घरा मध्ये सर्रास वापरला जाणारी आणखी एक वस्तू म्हणजे फॉइल पेपर. अॅल्युमिनियम फॉइलमध्ये खाद्यपदार्थ गुंडाळून ठेवणे आणि नंतर त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. फॉइलमध्ये अशा प्रकारे अन्नपदार्थ ठेवण्यामुळे त्यात विषनिर्मिती होऊ शकते, तसेच हाडे आणि किडनीवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मानसिक आरोग्य बिघडण्याचाही यात धोका असतो. पुरुष जर अधिक प्रमाणावर फॉइलमध्ये गुंडाळलेल्या अन्नाचे सेवन करत असतील, तर त्यांच्यामध्ये वंधत्वाची समस्याही उद्भवू शकते.

आहाराद्वारे आरोग्याची काळजी घेतानाच आहाराचे हे पदार्थ कशात साठवायचे, कशात वाढायचे याचीही योग्य ती काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


मिताली तवसाळकर

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.