September 11, 2024
सातू | barley is good for weight loss | barley for weight loss | barley rice | pearl barley | jau barley | use of barley | barley grass weight loss

एक दुर्लक्षित तृणधान्य: सातू | डॉ.वर्षा जोशी | A neglected cereal: barley | Dr Varsha Joshi

एक दुर्लक्षित तृणधान्य: सातू

पूर्वीच्या काळी वापरले जाणारे एक अत्यंत गुणी तृणधान्य म्हणजे सातू.हल्लीच्या काळात मात्र याचा फारसा वापर होताना दिसत नाही.बाजारात जाऊन सातूचे पीठ मागितले तर सत्तूचे पीठ देतात, ज्याचा सातूशी काहीही संबंध नाही.सत्तू म्हणजे काय ते आपण पुढच्या लेखात पाहू.या लेखात सातू आणि त्याचे गुणधर्म याबद्दल जाणून घेऊया.

मराठी विश्वकोशातील संदर्भा-प्रमाणे सातू म्हणजे बार्ली.हे तृणधान्य जगातील जवळजवळ सर्व देशांमध्ये पिकविले जाते.ह्यालाच जव किंवा यव असेही म्हटले जाते.पूर्वी सातूच्या पिठापासून खाद्यपदार्थ बनवले जायचे.आजही उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये बहुसंख्य गरीब लोक सातूचा आपल्या आहारात उपयोग करतात.कधीकधी गव्हामध्ये सातू मिसळून दळून पिठाचा उपयोग करतात.पाश्चात्त्य देशांमध्ये बीअर, ब्रँडी आणि व्हिस्की ही मद्ये सातू म्हणजे बार्लीपासून बनविली जातात.बाजारात विकत घ्यायला गेलो असता आपल्याला सातू हा जव किंवा बार्ली म्हणून विकत मिळतो.म्हणून यानंतर आपण बार्ली असाच त्याचा उल्लेख करणार आहोत.

बार्लीचे तीन प्रकार आहेत.पहिला म्हणजे सालासकट, तर साल काढलेली हा दुसरा प्रकार.साल आणि जवळजवळ सर्व कोंडा काढून पॉलिश केलेली म्हणजे पर्ल बार्ली हा तिसरा प्रकार.बार्लीत चांगल्या प्रमाणात प्रथिने, चोथा, ‘ब’ जीवनसत्त्वाचे अनेक प्रकार, भरपूर प्रमाणात मँगेनीज व सेलेनियम आणि मध्यम प्रमाणात लोह, मॅग्नेशियम व इतर काही खनिजे असतात.पर्ल बार्लीमध्ये चोथ्याचे प्रमाण खूपच कमी असते व बाकीचे घटकही काही प्रमाणात कमीच असतात.बार्ली मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.यामुळे रक्तातील साखरेची पातळी लवकर वाढत नाही, खरे तर ती कमी होऊ शकते व इन्सुलिनची पातळी योग्य राखण्यास मदत होते.आहारात बार्लीचा समावेश केल्याने पचनाला व आतड्याचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.याशिवाय, बार्लीच्या सेवनामुळे मोठ्या आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो, कोलेस्ट्रॉल कमी होते.आयुर्वेदाच्या मते, बार्ली तुरट, मधुर, अतिशय थंड, मूत्ररोगावर उत्तम, पित्त व कफ दूर करणारी आहे.बार्ली आहारात असल्यास पोट भरल्यासारखे वाटते, भूक लवकर लागत नाही.त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी ती फायदेशीर आहे.बार्लीपासून ‘जवखार’ नावाचे औषध तयार करतात, जे यकृताच्या, मूत्रपिंडाच्या आणि इतर आजारांवर उपयुक्त ठरते.

परदेशात पर्ल बार्लीचा उपयोग लहान मुलांच्या अन्नपदार्थांमध्ये आणि औषधांमध्ये केला जातो.

साल काढलेली बार्ली आणि पर्ल बार्ली या दोन्हीपासून बार्लीचे पाणी (ड्ढड्डह्म्द्यद्ग४ २ड्डह्लद्गह्म्) बनविता येते.एक चतुर्थांश कप बार्लीमध्ये चार कप पाणी व थोडी लिंबाची साल घालून हे पाणी मंदाग्नीवर पातेल्यावर झाकण ठेवून अर्धा तास उकळून घेतात.मग ते गाळून त्यात थोडा लिंबाचा रस घालतात.हे पाणी खूप औषधी समजले जाते, विशेषतः युरिन इन्फेक्शन झाले असता हे पाणी पिण्यास सांगितले जाते. (पण डॉक्टर किंवा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय हा  उपाय करू नये.)

बार्लीमध्ये थोड्या प्रमाणात ग्लुटेन असते.त्यामुळे ज्यांना ग्लुटेनची अॅलर्जी असते अशांनी बार्ली खाऊ नये.शिवाय, बार्लीमध्ये अशी कर्बोदके असतात जो आंबू शकणारा चोथा असतो.त्यामुळे पोटात वायू होऊन मलोत्सर्जनास त्रास होऊ शकतो.त्यामुळे ती कमी प्रमाणातच खावी.बार्लीचे सत्त्वही कमी प्रमाणात खावे नाहीतर जुलाब होऊ शकतात.बार्लीत ग्लुटेन असले तरी त्याचे प्रमाण कमी असल्याने बार्लीच्या पिठापासून पोळी बनवता येत नाही.

एका संदर्भाप्रमाणे लोकमान्य टिळक यांना मधुमेह होता.त्यावेळी आजच्यासारखी मधुमेहावर प्रभावी औषधे नव्हती.आपले पथ्य काटेकोरपणे सांभाळणाऱ्या टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना आपल्या आहारात सातूचा समावेश केला होता, असे म्हणतात.

बार्लीपासून अनेक देशांमध्ये नानाविध खाद्यपदार्थ बनविले जातात.अरब देशांमध्ये बार्लीच्या पिठापासून लापशीसारखा पदार्थ केला जातो.रमझानच्या काळात सौदी अरेबियात बार्लीच्या सुपाचे सेवन केले जाते.ज्यू लोकांच्या सब्बाथ या सणासाठी बार्लीच्या रश्श्याचे महत्त्व असते.युरोपमध्येही बार्लीचे सूप व रस्सा प्रचलित आहे.बार्लीच्या विविध जाती आहेत.त्यापैकी एका जातीच्या पिठापासून पाव व बिस्किटे बनवली जातात.

असे करा बार्लीचे सेवन

  • आपल्याकडे तांदळाऐवजी बार्ली आणि मूगडाळीची खिचडी बनवली जाते.

  • एक कप उकडा तांदूळ, अर्धा कप बार्ली, अर्धा कप उडदाची डाळ व एक चतुर्थांश चमचा मेथी हे सर्व भिजवून नेहमीच्या पद्धतीने इडल्या बनवता येतात.डोसेही बनवता येतील.

  • बार्लीच्या पिठात थोडी कणीक, थोडे डाळीचे पीठ, आले-लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटण, कोथिंबीर घालून त्याची धिरडी बनवता येतात.

  • बार्ली शिजवून त्यात नारळाचे दूध घालून सूप बनवता येईल.

  • वेगवेगळ्या भाज्या घालून पुलावही करता येईल.

  • बार्ली शिजवून लाल, पिवळी भोंगी मिरची आणि बाळमेथी घालून सलाड बनवता येईल.

  • बार्लीच्या पिठापासून भाकरी-देखील बनवता येते.

  • बार्लीला मोड आणून शिजवून किंवा पीठ करून बार्लीचा वापर आपण अनेक पदार्थांत करू शकतो.उदा.सलाड, सूप, भाजी, भात, उसळ यात करता येईल.

कधीतरी बदल म्हणून बार्लीपासून बनविलेले पदार्थ करून नक्कीच खाता येतील.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ.वर्षा जोशी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.