व्हेन्स | black veins on legs | veins | swollen veins | veins in feet | spider veins on legs | varicose veins in foot | deep leg veins

पायांना सांभाळा!| डॉ. भावेश पोपट | Taking care of our feet | Dr. Bhavesh Popat

पायांना सांभाळा(व्हेन्स)

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होत असतो. लहान पण दुर्लक्ष होणा‍ऱ्या काही गोष्टींमुळे अनेक लाइफस्टाइल आजार बळावत आहेत. त्यापैकी एक म्हणजे व्हेरिकोज व्हेन्स. व्हेरिकोज व्हेन्सची ही व्याधी खूपच त्रासदायक असते.

जगभरातील सुमारे ३० टक्के व्यक्ती या आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील मधुमेहींच्या संख्येपेक्षा हा आजार असलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. व्हेरिकोज व्हेन्समुळे सुरुवातीच्या टप्प्यापासूनच जीवनमानावर परिणाम होऊ लागतो आणि कदाचित भविष्यात हा आजार बळावत जाऊन त्याचे रूपांतर घातक आजारातही होऊ शकते. या आजारावर वेळीच निदान आणि लवकर उपचार केले तर किमान औषधे आणि खर्चात हा आजार बरा करता येऊ शकतो.

व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय?

रक्ताभिसरणासाठी शरीरातील विविध अवयवांमधून हृदयाकडे रक्त घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्या (शिरा) असतात. या आजारात सामान्य शिरांनी जसे कार्य करणे अपेक्षित आहे, तसे कार्य त्या करत नाहीत. रक्तवाहिन्या ऑक्सिजनयुक्त रक्त, पंप होणाऱ्या हृदयाकडून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत (उदा. पाय) दाबासह (प्रेशर) पोहोचवत असतात. रक्त परत हृदयाकडे वाहून नेत असताना हृदयाकडून पंप करताना निर्माण होणारा दाब नाहीसा होतो आणि हृदयापर्यंत रक्तपुरवठा करण्यासाठी शिरांना दाबाची मदत मिळत नाही.

कमी झालेल्या दाबावर मात करण्यासाठी तुमच्या शिरांमध्ये लहान आकाराच्या झडपा असतात ज्या रक्त एकाच दिशेने प्रवाहित होण्यासाठी म्हणजे हृदयापर्यंत पोहोचण्यासाठी उघडबंद होत असतात. काही वेळा या लहानशा झडपा अकार्यक्षम होतात, त्यामुळे या झडपांच्या मागे रक्त साचू लागते.कालांतराने या शिरांची पटले कमकुवत होतात आणि शिरा फुगू लागतात. त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स म्हणजेच सुजलेल्या शिरा दिसू लागतात. व्हेरिकोज व्हेन्स या सामान्यपणे सुजलेल्या आणि फुगलेल्या असतात. त्या बहुधा गाठीसारख्या, फुगलेल्या किंवा वक्र असू शकतात आणि काही वेळा लाल, निळ्या/जांभळ्या असतात. स्पायडर व्हेन्सही अशाच असतात, पण आकाराने थोड्या लहान असतात.

थोडक्यात, जेव्हा शिरांमधील झडपा व्यवस्थित काम करत नाहीत तेव्हा रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे बरेचदा व्हेरिकोज व्हेन्स नावाचा आजार होतो. गरोदरपणात हा त्रास स्त्रियांना होऊ शकतो.

कारणीभूत घटक॒ः

स्थूलपणा, वय, कामाच्या ठिकाणची परिस्थिती, धूम्रपान, संतती नियमनाच्या गोळ्या, तसेच आनुवंशिकता इत्यादी घटक यासाठी कारणीभूत असू शकतात. पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते.

व्हेरिकोज व्हेन्स हा आजार होण्याची शक्यता अधिक असण्याची कारणे पुढीलप्रमाणे ः

 • भरपूर वेळ उभ्याने काम करणे जसे की प्राध्यापक, एअरहोस्टेस, डॉक्टर, नर्स, सुरक्षा रक्षक.

 • ३० पेक्षा अधिक बीएमआय असणाऱ्या स्थूल व्यक्तींना अशा प्रकारच्या शिरांची समस्या सतावू शकते.

 • गर्भावस्था, पौगंडावस्था आणि रजोनिवृत्तीमुळे संप्रेरकांमध्ये बदल होतात आणि त्यामुळे व्हेरिकोज व्हेन्सची सुरुवात होऊ शकते.

 • संतती नियमनाच्या गोळ्यांच्या सेवनामुळे संप्रेरकांमध्ये बदल होतात आणि हा आजार होण्याची शक्यता वाढते.

 • रक्तवाहिनीशी संबंधित विकार होण्यासाठी आनुवंशिकता हा घटक कारणीभूत असू शकतो.

 • रक्ताची गुठळी होण्याची पार्श्वभूमी असणे.

 • बद्धकोष्ठता, गाठ, कंबरपट्ट्या-सारख्या अॅक्सेसरीजमुळे पोटावर अतिरिक्त दाब येऊन होणारे आजार.

 • संशोधनातून इतरही काही समस्या दिसून आल्या आहेत. जसे॒- त्वचेला होणारी इजा/धक्का, शिरेची शस्त्रक्रिया झालेली असणे, अतिनील किरणांच्या संपर्कात येणे.

व्हेरिकोज व्हेन्स हा गंभीर आजार आहे का?

हा आजार गंभीर नसला, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने या आजाराची गंभीरता वाढून जीवन-मानाच्या दर्जावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या आजाराचे निदान लवकर झाले तर आजारापासून दिलासा मिळविण्याबरोबरच कोणत्याही स्वरूपाच्या गंभीर समस्या बळावण्याला प्रतिबंध होतो.

लक्षणे॒ः

 • पायाच्या शिरा निळ्या-जांभळ्या होणे.

 • पाय जड होणे व खाज येणे.

 • हलकी किंवा जास्त सूज येणे.

 • पायात गोळे येणे.

 • शिरांवर कोरडेपणा जाणवणे किंवा खाज येणे.

 • फोड बरे होण्यास विलंब लागणे आणि काळे पट्टे उमटणे.

 • पोटरी आणि घोट्यादरम्यानची त्वचा जाड होणे.

उपचारांची आवश्यकता॒ः

या आजाराकडे दुर्लक्ष केले तर खालील परिस्थिती उद्भवू शकते॒-

 • अत्यंत वेदनादायी अल्सर

 • रक्ताच्या गुठळ्या होणे. त्यामुळे डीप व्हेन थ्रोम्बोसिस (डीव्हीटी) आणि फुप्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन अधिक गंभीर स्वरूपाचे आणि घातक आजार उद्भवू शकतात.

 • शिरांमध्ये रक्तस्राव होणे, ज्यासाठी वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते.

त्याचप्रमाणे हेही लक्षात घ्यायला हवे, की वर नमूद केलेले गंभीर स्वरूपाचे आजार विकसित होईपर्यंत वेदना/अस्वस्थता यामुळे रुग्णाच्या जीवनमानावर विपरीत परिणाम झालेला असतो. त्याचप्रमाणे हा आजार जसजसा बळावत जातो, तसतसे उपचाराचे पर्याय कमी आणि महाग होत जातात. त्यामुळे वर नमूद केल्याप्रमाणे गंभीर स्वरूपाचे आजार भविष्यात उद्भवू नयेत यासाठी तुम्ही वेळीच डॉक्टरांची भेट घेणे आवश्यक आहे.

निदान आणि उपचार॒ः

तुम्हाला वरीलप्रमाणे लक्षणे जाणवत असतील तर या आजाराचे निदान करण्यासाठी आणि उपचारांसाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टसारख्या तज्ज्ञाकडून वैद्यकीय सल्ला घेणे हितावह राहील. व्हेरिकोज व्हेन्सवर सर्व प्रकारचे उपचार करण्यासाठी इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टनी प्रशिक्षण घेतलेले असते. त्यांनी केलेल्या उपचारांनी रुग्णांना तात्काळ दिलासा मिळतो आणि किमान विश्रांतीनंतर त्यांना सामान्य आयुष्य जगता येते.

या आजाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाले तर तुलनेने कमी खर्चात उपचार केले जातात. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमध्ये व्हेरिकोज व्हेन्सची तपासणी करून घेणेही आवश्यक आहे.

आजार बळावला असेल तर उपचारांचे दोन पर्याय आहेत॒-

एंडो-व्हेन्स लेझर अॅब्लेशन ट्रीटमेंट (EVLA/EVLT) या उपचारांमध्ये किमान छेद देऊन इजा पोहोचलेल्या शिरांना बंद करण्यात येते. त्यामुळे लक्षणे निघून जातात. अत्यंत सूक्ष्म सुईचा वापर करून इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्टकडून संबंधित शिरेमध्ये पातळ लेझर फायबर सरकविण्यासाठी इमेजिंग गायडन्स (एक्स-रे इमेजच्या मार्गदर्शनाने) वापरण्यात येतो. त्यानंतर हिटिंग प्रक्रियेदरम्यान येणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट शीर बधीर करतात. विकारयुक्त शीर बंद झाल्यावर इतर निरोगी शिरांमधून रक्त सुरळीत वाहू लागते. ईव्हीएलटी प्रक्रियेदरम्यान रुग्ण विश्रांती घेऊ शकतो आणि सामान्य जीवन लगेच सुरू करू शकतो.

व्हेनासील॒ः व्हेरिकोज व्हेन्स व्याधीवर उपलब्ध असलेले हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. पाच वर्षांच्या अत्यंत कमी कालावधीमध्ये हा उपचाराचा पर्याय डॉक्टर आणि रुग्णांमध्ये सारख्याच प्रमाणात लोकप्रिय होत आहे. या तंत्रामध्ये खास तयार करण्यात आलेला वैद्यकीय गोंद संबंधित शिरेमध्ये सोडण्यात येतो. असे करताना किंचित दाब देऊन ती शीर बंद करण्यात येते. हे तंत्र सुलभ असल्यामुळे उपचारांसाठी व्हेनासीलला प्राधान्य देण्यात येते.

या सर्व पद्धतींचा फायदा म्हणजे भूल देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे अनेक सुया टोचण्याची गरज पडत नाही. त्याचप्रमाणे उष्णतेमुळे शिरांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.

व्हेरिकोज व्हेन्सवरील उपचारांसाठी कोणता पर्याय निवडावा, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. योग्य पर्याय निवडण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला मदत करू शकतील.

प्रतिबंधात्मक काळजी॒ः

 • जीवनशैलीत बदल करणे.

 • वजन कमी करणे.

 • आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे.

 • पायाची हालचाल व व्यायाम करणे.

 • एका जागी फार वेळ उभे राहण्याचे टाळणे.

 • धूम्रपान, मद्यपान टाळणे.

 • उंच टाचेच्या चपलांचा फार वापर न करणे.

 • टाइट जिन्सचा वापर टाळणे.

 • अधिक फायबरयुक्त पदार्थ खाणे.

 • नियमित व्यायाम व योग करा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. भावेश पोपट

(लेखक नामांकित इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.