मानसिक | benefits of daily exercise | importance of exercise | benefits of exercise on mental health | exercise helps mental health | psychological benefits of sports and physical activities

व्यायामाचे मानसिक फायदे | उदय विश्वनाथ देशपांडे | The psychological benefits of exercise | Uday Vishwanath Deshpande

व्यायामाचे मानसिक फायदे

ऐरेगैरे काही म्हणोत,

माझ्या मनात शंका नाही।

देवाशप्पथ खरं सांगतो,

व्यायामाला पर्याय नाही।।

आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक व्याधींबरोबरच मानसिक समस्याही वाढीस लागल्याचे दिसून येत आहेत.जवळजवळ सर्वच वयोगटांमध्ये सातत्याने पाहायला मिळतो तो सततचा थकवा, चिडचिडेपणा, मंदावलेली भूक किंवा अति खादाडी, झोप न येणे किंवा अति झोपणे, विचलितपणा, हताशा, अगतिकता, काम वा अभ्यास करावासाच न वाटणे, नैराश्य आणि या सर्वांचे अतिआक्रमकतेत किंवा क्वचित टोकाला जाऊन आत्महत्येत झालेले पर्यवसान! प्रत्येकाने साधे सोपे व्यायाम नियमित करणे, हेच या सगळ्या समस्यांवरील रामबाण औषध आहे!

नियमित व्यायामामुळे बाह्य स्नायू बलवान होतात, तसेच अंतर्गत संस्थाही अधिक कार्यक्षम होतात.पचनक्रिया व रक्ताभिसरण क्रिया सुधारते.त्यामुळे भूक जास्त लागते, झोप पटकन व चांगली लागते, एकूणच शरीरातील चयापचयाच्या क्रिया सुलभतेने होतात, फुप्फुसातील प्राणवायू शोषून घेण्याची क्षमता वाढते, पेशी सुदृढ होतात.शरीरातील अनावश्यक घाण बाहेर टाकली जाते, अतिरिक्त मेद निघून जातो, लठ्ठपणा कमी होतो, शरीर हलके व प्रमाणबद्ध होते, उत्साही वाटते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास वाढतो.साहित्याच्या, जागेच्या, वेळेच्या मर्यादा लक्षात घेऊन पुढे दिलेले काही व्यायामप्रकार आपण नियमित केले, तर त्यांचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

१. चालणे : रोज किमान ४५ मिनिटे द्रुतगतीने चालल्यामुळे शरीराला व्यायाम तर होतोच शिवाय मनावरचा ताण कमी होऊन भावनांचे संतुलन राखण्यास मदत होते.कानाला ‘हेडफोन’ लावून प्रबोधनपर, प्रेरणादायी भाषणे, आवडीचे संगीतही तुम्ही ऐकू शकता.हिरवळीवर अनवाणी चालणे, समुद्रावर वाळूतून चालणे हे पर्याय अधिक फायदेशीर म्हणता येतील.

२. संधिचालन : आपल्या शरीरात मानेपासून ते पायाच्या बोटांपर्यंत जेवढे सांधे आहेत, त्यांचे चलनवलन करणे, त्यांना कार्यक्षम ठेवणे यासाठी हा सहा-सात मिनिटांचा व्यायाम आहे.साधारणपणे यातील प्रत्येक कृती, वय व वेळेनुसार दोन ते सोळा वेळा, कुठेही झटका न देता सावकाश करावी.सुरुवात मानेपासून करावी.   या व्यायामामुळे सांध्यांच्या हालचाली सुलभ होऊन मनावरचा ताण कमी होतो, संयम व उत्साह वाढतो.वयस्क लोकांमध्ये आत्मविश्वास व सुरक्षेची भावना वाढविण्यास या व्यायामप्रकाराची मदत होते.

३. सूर्यनमस्कार : रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सूर्याचे एक नाव घेऊन असे बारा नमस्कार नियमितपणे घातल्यास सर्व रोगांपासून मुक्ती मिळते, अकाली मृत्यू येत नाही, असे म्हटले जाते.याच्या नियमित सरावाने मानसिक शांतता, समाधान लाभते व संयम वाढतो.शरीरातील विविध ग्रंथी उद्दीपित झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक समतोल साधण्यासाठी सूर्यनमस्कार हा अगदी उत्तम व्यायाम प्रकार आहे.

४. प्राणायाम : आपल्याला थोडा जरी राग आला, भीती वाटली, तर  त्याचा परिणाम आधी आपल्या श्वसन यंत्रणेवर होतो.ऊर धपापू लागतो, हाता-पायांना कंप सुटतो.यासाठी स्वतःच्या श्वासोच्छ्वासावर नियंत्रण वाढविणे आवश्यक आहे.हे काम आपण प्राणायामाद्वारे करू शकतो.

अ) दीर्घ श्वसन

ब) ओंकार प्राणायाम

क) अनुलोम-विलोम

ड) कपालभाती

इ) भ्रामरी प्राणायाम

या साध्या सोप्या प्राणायामाच्या प्रकारांमुळे मनाची एकाग्रता चांगली वाढते, ताणतणावांपासून मुक्ती मिळते, संतुलित निर्णयक्षमता वाढते, चिंताग्रस्तता कमी होते.

५. आसने : शरीराची लवचिकता, स्नायूंवरील ताबा, तोलाचे कसब, अंतर्गत संस्थांची कार्यक्षमता, मनाची एकाग्रता, स्वनियंत्रण, स्वप्रतिमा, स्वप्रतिष्ठा, शिस्त, सातत्य, समतोलपणा हे सगळे वाढविण्याची गुरुकिल्ली म्हणजे आसने.आसनांच्या नियमित सरावामुळे मेंदूतील संप्रेरक द्रव्यांमध्ये झालेले सकारात्मक बदल हेच याला कारणीभूत असतात.यामुळे उत्साह, ऊर्जा, चैतन्य यात आपोआप वाढ होते.नियमित व्यायामाने ‘भावनिक बुद्धिमत्ता’ वाढते, तसेच नैराश्य, एकटेपणा, आत्महत्येकडे कल आदी समस्या कमी होतात व एकूणच जीवनाचा दर्जा उंचावतो.मात्र आसनांचा व प्राणायामाचा सराव सुरुवातीस एखाद्या योगवर्गात जाऊन अथवा एखाद्या तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करणे केव्हाही अधिक श्रेयस्कर.

अनेक शारीरिक फायद्यांबरोबरच व्यायामाचे मानसिक फायदेही आहेत.व्यायामामुळे नैराश्य दूर होते, ताणतणावांचा निचरा होतो, नकारात्मक घटकांना सामोरे जाण्याची शक्ती वाढते, भावना व तर्क यांचा योग्य समन्वय साधला जातो, अशी खूप मोठी यादी देता येईल.आपल्याला जर व्यायामाचे महत्त्व पटले असेल, तर आपण स्वतःहूनच त्यासाठी वेळ काढला पाहिजे.अगदी रोज जमत नसेल, तरी सुरुवातीला एक दिवसाआड, आठवड्यातून दोनदा असे बंधन घालून घेतले पाहिजे.व्यायाम अनेक प्रकारचा असू शकतो.एखाद्या जवळच्या व्यायामशाळेत जाणे शक्य असेल तर उत्तम, नाहीतर आसपासच्या परिसरात किमान ४५ मिनिटे द्रुतगतीने चालणे, तेही शक्य नसेल तर घरच्या घरी किमान बारा सूर्यनमस्कार, २५ बैठका, काही साधीसोपी योगासने, दीर्घ श्वसन, प्राणायाम आणि शवासन हा सगळ्यात उत्तम व्यायाम.अर्थात यासाठी आधी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे श्रेयस्कर, हे वेगळे सांगायला नको.प्रत्येकाच्या कुवतीनुसार, गरजेनुसार, वयानुसार प्रत्येकाचा व्यायाम वेगळा असू शकतो.

मंडळी, बाहेर खूप पाऊस पडत असेल आणि आपल्याला बाहेर जायचे असेल, तर आपण पाऊस थांबवू शकत नाही.अशा वेळी आपण छत्री किंवा रेनकोट घेतो, तसेच आजूबाजूला कोणतीही नकारात्मक, आव्हानात्मक परिस्थिती जाणवत असताना आपण स्वतःला नियमित व्यायामाने अधिक कणखर बनवणे, हेच आपल्या हातात आहे.चला तर करूया सुरुवात, लगेच.आजपासूनच.आताच..!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


उदय विश्वनाथ देशपांडे

 (लेखक नामांकित मल्लखांब प्रशिक्षक आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.