fbpx
प्रोस्टेट | psma therapy | prostate procedures | prostatitis cure | male prostate cancer | prostate screening | prostate problems age | prostate problems

प्रोस्टेटची व्यथा | डॉ. मंगेश पाटील | Prostate Pain | Dr. Mangesh Patil

प्रोस्टेट ची व्यथा

वाढत्या वयात प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होत असते. हा आजार नसला, तरी तो वाढत्या वयातील बदलाचा परिणाम आहे, हे आधी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे. या बदलाला स्वीकारून वेळेत त्यावर इलाज केले तर यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांना वेळेत रोखता येणे नक्कीच शक्य आहे. पण आपल्याकडे एकतर इलाज करण्यापेक्षा लाज वाटून निदान विलंबावर टाकण्यावर भर दिला जातो किंवा दुसरीकडे कर्करोग समजून धास्ती घेतली जाते. याचा परिणाम वृद्धापकाळातील पुरुषांच्या एकंदर जीवनमानावर होतो. मात्र असे न करता योग्य वेळेत निदान आणि उपचार घेऊन ही समस्या दूर करण्यात शहाणपण आहे. म्हणूनच आधी प्रोस्टेट ग्रंथी म्हणजे काय आणि त्याचा होणारा आजार नेमका काय आहे, हे समजून घ्यायला हवे.

प्रोस्टेट म्हणजे काय?

पुरुषांच्या प्रजनन यंत्रणेमधील प्रोस्टेट ही लहान, पण महत्त्वाची अशी ग्रंथी (अवयव) असते. शुक्राणूंचे संरक्षण करणे आणि त्यांना पोषक तत्त्वे पुरविणे हे प्रोस्टेटचे मुख्य कार्य असते. मैथुनोत्कर्षाच्या वेळी जननेंद्रियातून बाहेर पडणाऱ्या द्रवापैकी एक तृतीयांश द्रव प्रोस्टेटमध्ये तयार झालेला असतो.

प्रोस्टेट ग्रंथी कुठे असते आणि तिचे कार्य काय?

प्रोस्टेट ग्रंथी पुरुषांच्या मूत्राशयाच्या खालील बाजूस आणि गुदाशयाच्या पुढील बाजूस असते. पुरुषांचा मूत्रमार्ग प्रोस्टेटच्या मध्यातून जातो. प्रोस्टेट हा प्रजनन अवयव आहे. प्रोस्टेटतर्फे तयार करण्यात येणाऱ्या स्रावाने शुक्राणूचे पोषण होते आणि स्खलनानंतर पुरुषांचे वीर्य प्रवाही होते. प्रोस्टेट ग्रंथी जगण्यासाठी महत्त्वाची नसते पण प्रजननासाठी महत्त्वाची असते कारण या ग्रंथीमधून वीर्याचा एक भाग पुरवला जातो, जो शुक्राणूला जिवंत ठेवतो आणि स्त्रीच्या प्रजनन मार्गात जाण्यास मदत करतो. टेस्टोस्टेरॉन आणि त्याचे बाय-प्रोडक्ट असलेल्या डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन (डीएचटी) यांच्या नियंत्रणांतर्गत पौगंडावस्थेत प्रोस्टेटची वाढ होते.

बीपीएच म्हणजे काय?

बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया (बीपीएच) हा एक आजार आहे. या आजारात प्रोस्टेट ग्रंथींची कर्करोग नसलेली प्रमाणाबाहेर वाढ होते, ज्यामुळे मूत्रविसर्जनामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. वयाची ५० वर्षे उलटलेल्या पुरुषांमध्ये बीपीएच हा आजार सर्वसामान्यपणे आढळून येतो. हा कर्करोग नसतो आणि तो प्राणघातकही नसतो. पण काही प्रकारांमुळे जीवनमानावर गंभीर परिणाम होऊ बीपीएच म्हणजेच बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया हा प्रमाणाबाहेर वाढलेल्या प्रोस्टेटचा आजार आहे. बीपीएचमध्ये प्रोस्टेट ऊतींची प्रमाणाबाहेर वाढ होते, ज्यामुळे तिचा मूत्रमार्ग आणि मूत्राशयावर दाब पडतो. बीपीएच हा प्रोस्टेटचा अत्यंत सामान्यपणे आढळणारा आजार आहे.

बीपीएच हा सर्वसामान्य आजार आहे का?

बीपीएच हा आजार वयोवृद्ध पुरुषांमध्ये आढळतो. याची सुरुवात वयाच्या ४० व्या वर्षापासून होऊ शकते. प्रत्येक पुरुषाला आयुष्यात एकदा तरी या आजाराला सामोरे जावे लागते. काही पुरुषांच्या प्रोस्टेट ग्रंथींचा आकार वाढला तरी त्यांना लक्षणे दिसून येत नाहीत. बीपीएचच्या लक्षणांवर वेळीच उपचार केले नाही, तर या लक्षणांचे गांभीर्य वाढत जाऊन ती समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. वयाच्या ४०व्या वर्षानंतर प्रत्येक वर्षागणिक बीपीएचची जोखीम वाढत जाते. वयाच्या पन्नाशीतील २० टक्के, साठीतील ६० टक्के पुरुषांमध्ये तर सत्तरीतील ७० टक्के पुरुषांमध्ये बीपीएच असतो.

रुग्णाच्या लैंगिक जीवनावर होणारा परिणाम॒:

बीपीएचमुळे लैंगिक जीवनावर परिणाम होण्याचे काही कारण नाही, पण अशी काही समस्या जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वैद्यकीय सल्ला केव्हा घ्यावा?

प्रोस्टेट ग्रंथी वाढल्याची लक्षणे दिसत असतील तर जनरल फिजिशि-अनचा सल्ला घ्यावा. लक्षणे सौम्य असली तरी ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. मूत्रविसर्जनातून रक्त जात असेल तर जनरल फिजिशियन-कडून तपासणी करून घेणे आवश्यक ठरते, जेणेकरून इतर गंभीर आजाराला वेळीच प्रतिबंध करता येईल.

बीपीएचमध्ये होणारी गुंतागुंत॒:

सौम्य स्वरूपाच्या प्रोस्टेट ग्रंथींच्या वाढीमुळे काही वेळा गुंतागुंत निर्माण होऊ शकते जसे की॒-

  • मूत्रमार्गिकेला संसर्ग (यूटीआय).

  • मूत्रमार्गात गंभीर स्वरूपाचा साचलेपणा होणे (एयूआर) : मूत्रविसर्जन न होणे.

  • प्रोस्टेटची वाढ झाली तर मूत्रा-शयावर आणि मूत्रनलिकेवर दाब येऊ शकतो.

  • काही पुरुषांमध्ये लक्षणे सौम्य असतात आणि त्यासाठी उपचारांची आवश्यकता नसते. इतरांना याचा त्रास होऊ शकतो.

वाढलेल्या प्रोस्टेटची लक्षणे:

  • अचानक आणि तात्काळ लघवीला जावेसे वाटणे.

  • वारंवार मूत्रविसर्जनाला जावे लागणे.

  • चुकून मूत्रगळती होणे. काही वेळा रात्री अशी परिस्थिती ओढावते.

  • मूत्रविसर्जन सुरू होताना ताण येणे.

  • थांबत थांबत मूत्रविसर्जन होणे.

  • मूत्रविसर्जन अपूर्ण झाल्यासारखे वाटणे.

  • मूत्राशय पूर्ण रिकामे करताना त्रास होणे.

  • मूत्रविसर्जनाची धार दिशाहीन आणि कमकुवत असणे.

  • मूत्राचा प्रवाह कमी असणे आणि मूत्राशय रिकामा होण्यास विलंब लागणे.

  • मूत्रविसर्जन सुरू होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागणे.

  • मूत्रविसर्जनाच्या शेवटी प्रवाह थेंबाथेंबांनी पडणे.

प्रोस्टेटचा आकार वाढल्यामुळे मूत्राशयाला त्रास होऊ शकतो, ज्यामुळे अधिक वेळा मूत्रविसर्जन करावे लागते. वारंवार अशी स्थिती उद्भवत असल्याने चिडचिडेपणा वाढतो. ही लक्षणे दिसत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बीपीएचची कारणे॒:

प्रोस्टेटचा आकार वाढण्याचे कारण अज्ञात आहे, पण पुरुषाचे वय वाढल्यावर संप्रेरकांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे असे होत असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

बीपीएचवरील उपचार॒:

लक्षणे किती गंभीर आहेत आणि त्याचा रुग्णाच्या जीवनावर कितपत परिणाम झाला आहे, यावरून आकार वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींवरील उपचार निश्चित होत असतात. सौम्य लक्षणे असतील तर रुग्णाला तात्काळ उपचारांची आवश्यकता नसते. पण नियमितपणे प्रोस्टेटची तपासणी करणे हितकारक ठरते.

उपचारांचे पर्याय॒:

जीवनशैलीतील बदल: बुडबुडे येणारी पेये, अल्कोहोल, कॅफिन, कृत्रिम स्वीटनर्स यांचे सेवन टाळावे. नियमित व्यायाम करावा, वेळेवर मूत्राशय रिकामे करा, तंतुमय पदार्थ अधिक खावे, संध्याकाळी किमान द्रवपदार्थ पिणे.

औषधे॒: अल्फा ब्लॉकर्स, ५ अल्फा रिडक्टेस इनहिबिटर्स, अँटिकोलिनर्जिक्स इत्यादी. गंभीर प्रकरणांमध्ये कॅथेटरचा वापर केला जातो. (डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेत.)

ज्या पुरुषांना अधिक गंभीर लक्षणे जाणवत असतील किंवा ज्यांनी आजार बळावेपर्यंत उपचार घेतले नसतील त्यांच्यासाठी शस्त्रक्रिया हा पर्याय असतो. त्यामुळे रुग्णाने डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची दिशा ठरवावी.

निदानासाठी चाचण्या कराव्या लागतात का?

वर नमूद केलेल्या लक्षणांवरून बीपीएचचे निदान करता येते. निदान निश्चित करण्यासाठी चाचण्या करण्याची आवश्यकता नसते, पण गुंतागुंत झालेली नाही हे निश्चित करण्यासाठी चाचण्या आवश्यक असतात. तुमच्या लक्षणांसाठी इतर आजार कारणीभूत नाहीत ना, हे निश्चित करण्यासाठी, तसेच काही वेळा डॉक्टरांना प्रोस्टेटचा आकार जाणून घेण्यासाठी चाचणी केली जाऊ शकते. खालील चाचण्या करण्यात येतात.

बीपीएचला प्रतिबंध करता येतो का?

बीपीएचचे कारण अज्ञात असल्यामुळे त्याला प्रतिबंध करण्याचा मार्ग उपलब्ध नाही. पण बीपीएचने गंभीर स्वरूप धारण करू नये आणि लक्षणांमध्ये सुधारणा व्हावी यासाठी जीवनशैलीत बदल केल्यामुळे मदत होऊ शकते.

कॅफिन आणि अल्कोहोल सेवन कमी करणे (यामुळे मूत्राशयाला त्रास होऊ शकतो), बद्धकोष्ठता टाळणे (मलविसर्जन करण्यासाठी जोर लावावा लागत असेल तर श्रोणी भागातील स्नायूंवर परिणाम होतो, जे आतडे आणि मूत्राशयाचे नियंत्रण यासाठी महत्त्वाचे असतात). त्याचप्रमाणे मधुमेह आणि रक्तदाबावरील नियंत्रणाची मदत होऊ शकते. धूम्रपान सोडून आणि व्यायामाची पातळी वाढविल्यामुळेसुद्धा लक्षणांमध्ये सुधारणा होऊ शकते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. मंगेश पाटील

(लेखक प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.