त्वचा

Published by Kalnirnay on   May 16, 2019 in   Health Mantraमराठी लेखणी

कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा ही आपल्या शरीराची पंचेंद्रिय म्हणून ओळखली
जातात. त्यापैकी त्वचा हा सर्वात मोठा व महत्त्वाचा अवयव मानला जातो. ती चांगली
व तरुण ठेवण्यासाठी जीवनसत्त्व, व्हिटॅमिन व प्रोटिन्सची गरज असते. व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’
व ‘ई’ ही त्वचेला अत्यंत उपयुक्त असतात.
ती मुख्य दोन थरांची बनलेली आहे. बाह्यत्वचेचे पाच थर असतात.
आंतरत्वचेचे दोन भाग असतात. प्रत्येक थराचे वेगवेगळे कार्य आहे.

त्वचेची कार्येः

संवेदनाः या कार्यामुळे आपल्याला मज्जातंतूमार्फत स्पर्श, शीत, गरम इत्यादींचे ज्ञान
होते.
उत्सर्जनः आपली त्वचा तेल, घाम, सीबम हे पदार्थ बाहेर टाकत असते.

शोषणः आपली त्वचा आवश्यक तेल, मॉइश्र्चरायजर यांचे शोषण करते.
संरक्षणः त्वचेतील सीबम व घाम यापासून बनणारे ॲसिडमेंटल हे त्वचेचे संरक्षण
करते. सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते.
जीवनसत्त्व: आपल्या शरीरात सूर्याच्या कोवळ्या किरणांपासून जीवनसत्त्व ‘ड’ची
निर्मिती होत असते.
रक्तप्रवाह व तापमानः आपल्या शरीराचे तापमान योग्य ठेवणे व रक्तप्रवाह
व्यवस्थित चालू ठेवणे हे त्वचेचे मुख्य कार्य आहे.

 

त्वचेची योग्य ती काळजी घेण्यासाठी आहारात खालील व्हिटॅमिन्सची गरज
असते –

व्हिटॅमिन एः पपई, गाजर, पालक, दूध, अंडी – त्वचेवरील सुरकुत्या कमी
होण्यासाठी, त्वचा स्वच्छ व चमकदार ठेवण्यासाठी.
व्हिटॅमिन बीः शेंगदाणे, बदाम, पीच – त्वचेतील पेशींचे पुनरुज्जीवन होते.
ती नितळ व तेजस्वी होते.
व्हिटॅमिन सीः टोमॅटो, स्ट्रॉबेरीज, आवळा, संत्री, चेरी – त्वचा तेजस्वी व
मुलायम होते. त्वचेवरील मृतपेशी काढून टाकते.
प्रोटिनः दूध, पालेभाज्या, मासे, कडधान्य – स्नायू बळकट होण्यासाठी,
केसांच्या वाढीसाठी.

 

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


कालनिर्णय सौंदर्य २०१२