September 11, 2024
तपासण्या | Medical examinations by age | Dr. Rekha Bhatkhande

वयपरत्वे वैद्यकीय तपासण्या | डॉ.रेखा भातखंडे | Medical examinations by age | Dr. Rekha Bhatkhande

वयपरत्वे वैद्यकीय तपासण्या

वैद्यकीय चाचण्या केवळ वय वाढल्यावरच कराव्या लागतात असे नाही, तर अगदी बाल्यावस्थेपासूनही कराव्या लागतात.शारीरिक, वैद्यकीय समस्या जाणून वेळेत त्यावर उपचार करता यावेत यासाठी या चाचण्या केल्या जातात.अशाच काही चाचण्यांबाबत…

१.नवजात बालकांना जन्मजात काही विकार नाहीत ना, हे तपासण्या साठी घोट्यातून रक्त (हील प्रिक) घेऊन चाचणी केली जाते.तसेच श्रवणक्षमतेची चाचणी आणि जन्मजात हृदरोगाची शक्यता तपासण्यासाठी पल्स ऑक्सिमेट्री (शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासणे) चाचणी करण्यात येते.

२.बाळाच्या वाढीवर लक्ष ठेवून आवश्यकता भासल्यास रक्तक्षय, थॅलेसेमिया आणि बाल मधुमेहाची चाचणी केली जाते.ऑटिझम स्पेक्ट्रम (स्वमग्नता) ही शक्यतासुद्धा काही बालकांमध्ये पडताळावी लागते.

३.मुलींमध्ये वयाच्या ७-८ व्या वर्षी आणि मुलांमध्ये ९ व्या वर्षी पौगंडावस्थेची लक्षणे दिसू लागल्यास मुदतपूर्व पौगंडावस्था म्हटले जाते.तर काही वेळेस स्थूलपणामुळे पौगंडावस्था सुरू होण्यास विलंब होऊ शकतो.अशा वेळी संप्रेरकांचा अभ्यास करण्यासाठी रक्ततपासणीची शिफारस करण्यात येते.

४.किशोरावस्थेत सिकल पेशी रक्तक्षय आणि मेटाबॉलिक सिण्ड्रोमची शक्यता तपासण्या साठी.

१८ ते ३९ या वयोगटातील व्यक्तींनी दर दोन वर्षांतून एकदा रक्तदाब तपासावा.कमाल पातळी १२० ते १३९ असेल किंवा किमान पातळी ८० ते ८९ एमएम एचजी असेल तर रक्ततपासणी दरवर्षी करून घ्यावी.कमाल पातळी १४० हून अधिक असेल किंवा किमान पातळी ९० हून अधिक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

  • २० ते ४५ या वयोगटातील व्यक्तींनी कोलेस्ट्रॉलची तपासणी करावी.ही पातळी जास्त असेल तरच ही तपासणी पुन्हा करावी.

* थायरॉइड : स्थूल किंवा पॉलिसायटिक ओव्हरिअन सिण्ड्रोम असलेल्या महिलांसाठी.

* मधुमेह : पुढील निरीक्षण असल्यास मधुमेहाची तपासणी करून घ्यावी.

१.रक्तदाब १४० / ८० एमएम एचजी किंवा अधिक असल्यास.

२.वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल आणि बॉडी मास इंडेक्स २५ हून अधिक असेल तर.

३.सख्ख्या नातेवाइकांना मधुमेह किंवा हृदयविकार असेल तर.

* यकृताच्या कार्यक्षमतेची चाचणी : नियमितपणे मद्यसेवन करणाऱ्यांनी यकृताच्या कार्यक्षमतेची चाचणी आणि फॅटी लिव्हरची सोनोग्राफी करून घ्यावी.

* दंतचिकित्सा : दरवर्षी किंवा दोन वर्षांतून एकदा.

* डोळ्यांची तपासणी : दर चार वर्षांतून एकदा व मधुमेह असेल तर दरवर्षी करून घ्यावी.

  • महिला दर महिन्याला स्तनांची स्वयंचाचणी करू शकतात.४० हून कमी वय असलेल्या महिलांनी मॅमोग्राम चाचणी करण्याची आवश्यकता नसते.

* ओटीपोटाची (पेल्व्हिक) तपासणी आणि पॅप स्मिअर : ३० वर्षांवरील महिलांची पॅप स्मिअर आणि एचपीव्ही चाचणी सामान्य असेल, तर पॅप स्मिअर चाचणी दर तीन-चार वर्षांतून एकदा करावी.

* इतर तपासण्याः आतड्यांचा किंवा पॉलिप्स (मांसवृद्धी) किंवा कोलायटिस याची कौटुंबिक पाश्र्वभूमी असेल, तर विष्ठेत रक्त आहे का याची खातरजमा करण्यासाठीची तपासणी (ऑकल्ट ब्लड टेस्ट) आणि कोलोनोस्कोपीने करावी.

४० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या महिलांनी ओस्टिओपोरोसिससाठी नियमित बोन डेन्सिटी चाचणी करणे  आवश्यक नसते, तर  या वयातील पुरुषांनी प्रोस्टेट चाचणी करायची आवश्यकता नसते.

६. ४० ते ६४ या वयोगटातील पुरुषांसाठी :

* रक्तदाब चाचणीः

१.रक्तदाबाची चाचणी वर्षातून एकदा करावी, रक्तदाब १४० / ९० असेल तर डॉक्टरांना दाखवा.

२.तुम्हाला मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार किंवा स्टेरॉइड्स घेत असाल तर दर तीन महिन्यांनी रक्तदाबाची तपासणी करावी.

* कोलेस्ट्रॉलची तपासणी आणि हृदयविकाराला प्रतिबंध :

१.रक्तातील कोलेस्ट्रॉलची तपासणी दर पाच वर्षांतून एकदा.

२.शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असेल, तसेच मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड किंवा मूत्रपिंडाची समस्या असेल तर नियमितपणे सेरम लिपिडची तपासणी करावी.

३.काही पुरुषांनी हृदयविकाराच्या झटक्यांचा धोका टाळण्यासाठी अॅस्पिरिन घेण्याचा विचार करावा.त्याआधी सीबीसी करून घ्यावी.

* मधुमेह तपासणी :

१.४५ हून अधिक वय असलेल्या पुरुषांनी तीन वर्षांतून एकदा.

२.वजन प्रमाणापेक्षा अधिक असेल किंवा रक्तदाब १४० / ८० एमएम एचजीपेक्षा जास्त असेल तर.

३.मधुमेह असेल तर सेरम क्रिएटिनीनची तपासणी करावी.

* आतड्यांच्या कर्करोगाची तपासणी :

१.५० हून कमी वय असेल आणि आतड्यांच्या कर्करोगाची किंवा पॉलिप्सची (मांसवृद्धी) कौटुंबिक पाश्र्वभूमी असेल तर ही चाचणी करून घ्यावी.

२.५० ते ७५ वयोगटातील व्यक्तींनी आतड्याच्या कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.

३.दरवर्षी स्टुल ऑकल्ट रक्ततपासणी करून घ्यावी.

४.दर दहा वर्षांनी कोलोनोस्कोपी करावी.

५.तुमच्या शरीरात अल्सरेटिव्ह कोलायटिस किंवा पॉलिप्ससारखे आतड्याच्या कर्करोगासाठीचे जोखीम

घटक असतील तर तुम्ही अधिक वेळा कोलोनोस्कोपी करून घेतली पाहिजे.

* दंतचिकित्सा : दरवर्षी एक किंवा दोन वेळा दंतचिकित्सा आणि दात साफ करून घ्यावे.

* डोळ्यांची तपासणी :

१.४० ते ५४ या वयोगटातील व्यक्तींनी दर चार वर्षांतून एकदा डोळ्यांची तपासणी आणि ५५ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींनी दर दोन वर्षांतून एकदा मोतीबिंदू, दृष्टीच्या समस्या आणि ग्लायकोमा (काचबिंदू) यांची शक्यता तपासून पाहायला हवी.

२.मधुमेह असल्यास दरवर्षी नेत्रचिकित्सा करून घ्यावी.

* श्रवणक्षमतेची चाचणी : वयोमानामुळे बहिरेपणा आला आहे का हे तपासणे.

* ओस्टिओपोरोसिस चाचणीः

१.तुमचे वय ५० ते ७० दरम्यान असेल तर ओस्टिओपोरोसिसची चाचणी करणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे सेरम व्हिटॅमिन डी ३ आणि व्हिटॅमिन बी १२ यांचीही तपासणी करून घ्यावी.

२.स्टेरॉइडचा दीर्घकालीन वापर, धूम्रपान, अति प्रमाणातील मद्यपान, ५० व्या वर्षी हाड फ्रॅक्चर होणे किंवा ओस्टिओपोरोसिसची कौटुंबिक पाश्र्वभूमी असल्यास.

* प्रोस्टेट कर्करोगाची तपासणीः ५० वर्षे वयावरील सर्व व्यक्तींनी प्रोस्टेट कर्करोगाची तपासणी करून घ्यावी.प्रोस्टेट ग्रंथींचा आकार वाढलेला असेल तर दरवर्षी पीएसए चाचणी करून घ्यावी.

* वृषणांची तपासणी : प्रोस्टेट ग्रंथींची तपासणी करताना डॉक्टर ही तपासणी करतात.

*  फुप्फुसांच्या कर्करोगाची तपासणी : भरपूर धूम्रपान करणाऱ्या

५५ ते ८० या वयोगटातील व्यक्तींनी सीटीस्कॅनसह ही तपासणी करून घ्यावी.

४० ते ६४ या वयोगटातील महिलांनी करायला हव्या अशा आरोग्य तपासण्या :

* रक्तदाबाची तपासणी : पुरुषांप्रमाणेच.

* कोलेस्ट्रॉलची तपासणी : हृदयाच्या रक्तवाहिनीशी संबंधित नसलेल्या कोणत्याही प्रकारच्या आजाराची पार्श्वभूमी नसलेल्या महिलांनी ४५व्या वर्षी कोलेस्ट्रॉलची चाचणी करून घ्यावी आणि त्यानंतर दर पाच वर्षांनी करावी.

* स्तनांच्या कर्करोगाची तपासणी : महिलांना दर महिन्याला ही स्वयंचाचणी करता येईल.

४० ते ४९ या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी तर ५० ते ७५ या वयोगटातील महिलांनी दर एक-दोन वर्षांनी मॅमोग्रॅम चाचणी करून स्तनांच्या कर्करोगाविषयी शहानिशा करून घ्यावी.

* गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी : वयाच्या २१व्या वर्षी करावी.पहिल्या चाचणीनंतर ३०व्या वर्षापासून ६५ व्या वर्षापर्यंत दर पाच वर्षांनी पॅपचाचणी किंवा एचपीव्ही चाचणी करावी.

६५ ते ७० वयोगटातील महिलांनी आधीच्या दहा वर्षांमध्ये पॅपच्या तीन चाचण्या केल्या असतील आणि त्या सामान्य असतील तर पॅप चाचण्या करण्याची आवश्यकता नाही.

ज्या महिलांनी कर्करोगपूर्व उपचार (सर्व्हायकल डिस्प्लेशिया) घेतले आहेत त्यांनी वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत पॅप चाचण्या कराव्या.

गर्भाशय आणि गर्भाशयमुख काढले असेल तर पॅप स्मिअर चाचण्या केल्या जात नाहीत.

* आतड्यांच्या कर्करोगाची तपासणी : पुरुषांप्रमाणेच.

* दंतचिकित्सा : वर्षातून एक किंवा दोन वेळा दंतचिकित्सकाकडून तपासणी आणि दात स्वच्छ करून घ्यावे.

* मधुमेहाची तपासणी : तुमचे वय ४४ वर्षांहून अधिक असेल तर तुम्ही दर तीन वर्षांनी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.मधुमेह असेल तर दर चार वर्षांनी मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

* डोळ्यांची तपासणी :

४० ते ५४ या वयोगटातील व्यक्तींनी दर चार वर्षांनी तर ५५ ते ६५ या वयोगटातील व्यक्तींनी दर दोन वर्षांनी नेत्रचिकित्सा करावी.मधुमेह असेल तर दरवर्षी नेत्रतपासणी करून घ्यावी.

* प्रादुर्भाव होण्यासारख्या रोगाची तपासणी :  हेपिटायटीस बी, आणि क्लॅमिडिया (एक प्रकारचा लैंगिक संक्रमित आजार).

फुप्फुसाच्या कर्करोगाची तपासणी : भरपूर प्रदूषण किंवा अप्रत्यक्ष धूम्रपानाशी संपर्क येत असेल तर ही तपासणी करून घ्यावी.

* ओस्टिओपोरोसिस तपासणीः वय ५० हून अधिक असलेल्या आणि फ्रॅक्चर असलेल्या महिलांनी हाडांच्या घनतेची चाचणी (डेक्सा स्कॅन) करून घ्यावी.

फंगल इन्फेक्शन तपासणी.

६५ वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याची तपासणी :

विमा कंपन्यांतर्फे ६५ वर्षांवरील व्यक्तींसाठी अनेक प्रकारच्या चाचण्यांची शिफारस करण्यात येते.एकूण आरोग्याचे मूल्यमापन करण्यासाठी या चाचण्या आवश्यक असतात.

या वार्षिक तपासणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असतो :

वजन आणि उंची : दरवर्षी या दोन्ही नोंदी घेण्यात येतात.उंची कमी होत असेल, तर ते ओस्टिओपोरोसिसचे लक्षण असते.

रक्तदाब : वार्षिक.

कोलेस्ट्रॉल तपासणी : जोखीम घटक असतील तर वर्षातून एकदा किंवा दर पाच वर्षांतून एकदा.

मधुमेहाची तपासणी : जोखीम घटक असल्यास वर्षातून एकदा.

नैराश्याची तपासणी : नैराश्य व अल्झायमर आजाराच्या निदानासाठी मानसिक आरोग्याची तपासणी.

रक्ततपासणी : वर्षातून एकदा संपूर्ण ब्लड काउंट, सेरम लिपिड, मूलभूत मेटाबॉलिक पॅनल, थायरॉइड पॅनल, यकृत एन्झाइम मार्कर्स.

पडण्याला प्रतिबंध करणारी चाचणी : स्नायूंची बळकटी आणि संतुलन मोजण्यात येते.

आतड्याच्या कर्करोगाची तपासणी : आधी केली नसेल तर.

महिलांमध्ये : गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी : गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता नसेल तर पॅप स्मिअर तपासणी केली नाही तरी चालेल.हिस्टरेक्टोमी झाली असेल तर ओटीपोटाची (पेल्व्हिस) चाचणी आवश्यक नाही.

ओस्टिओपोरोसिस तपासणीः महिलांना ओस्टिओपोरोसिस होण्याची

शक्यता अधिक असते.या वयातील महिलांनी नियमितपणे या आजाराची तपासणी करून घेतली पाहिजे.

पुरुषांमध्ये : प्रोस्टेट तपासणीः वर्षातून एकदा.

ओस्टिओपोरोसिस तपासणी : दर पाच वर्षांतून एकदा.

डॉक्टरांना दिलेल्या माहितीवर या आरोग्य तपासण्या अवलंबून असतात.लक्षात ठेवा, डॉक्टरांना दाखविण्यासाठी तुमची औषधे आणि सप्लिमेंट्स सोबत ठेवा.

वार्षिक आरोग्य तपासणीमुळे तुम्ही तुमच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू शकता, त्यामुळे या तपासण्या विचारपूर्वक करा.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. रेखा भातखंडे

(लेखिका अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरो-लॉजिस्ट आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.