September 15, 2024
गुगल | Self diagnosis | Dr Google | Google Dr | Dr Google Diagnosis | Beware of Doctor Google | Dr Anil Damle, Dr Mita Kurhekar

‘डॉक्टर गुगल’पासून सावधान | डॉ. अनिल दामले, डॉ. मीता कुऱ्हेकर | Beware of Doctor Google | Dr Anil Damle, Dr Mita Kurhekar

डॉक्टर गुगल पासून सावधान

सर्च इंजिन ‘गुगल’ने लोकांचे जीवन सोयीस्कर केले आहे, ह्यात वाद नाही. एका अर्थाने ‘गुगल’ उपयुक्त ठरत असले, तरी आजारांवरील उपचारांसाठी त्याचा वापर होतो, तेव्हा बऱ्याच वेळा ते त्रासदायक ठरू शकते. विविध आजारांची / रोगांची सर्व वैद्यकीय माहिती, लक्षणे, चाचण्या आणि उपयुक्त औषधे आदी सर्व माहिती ‘गुगल’वर उपलब्ध असली, तरी तिथे क्लिनिकल माहिती / मार्गदर्शन नसते, जे केवळ तज्ज्ञ डॉक्टरकडेच असू शकते.

पूर्वीच्या काळी, रुग्ण पूर्णपणे त्यांच्या डॉक्टरांवर अवलंबून होते आणि आपल्या आजारपणातील उपचारांवर रुग्णाचे नियंत्रण नसे. आजाराचे निदान करून डॉक्टर वेगवेगळी औषधे रुग्णाला लिहून देत असत आणि रुग्ण डॉक्टरांवर विश्वास ठेवून त्यांचा सल्ला मानत असत. ह्यात काही वेळेस रुग्णाचे नुकसानही होत असे. कालांतराने इंटरनेटचा प्रचार व प्रसार सुरू झाला आणि लोक ‘नेटसॅव्ही’ होऊ लागले. सर्च इंजिनवर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली तेव्हा हेच लोक ‘गुगल’च्या मदतीने स्वतःला शिक्षित करण्याचा प्रयत्न करू लागले. परंतु याचे काही फायदे झाले, तसेच तोटेही. ‘गुगल’वरील शोधाचे सगळे परिणाम विश्वासार्ह असतातच असे नाही. यातील काही माहिती रुग्णाला विनाकारण घाबरवून सोडू शकते. इतर अनेक प्रकरणांत इंटरनेटची तुम्हाला मदत होते, तशीच ती आजारपणातही होऊ शकते. पण व्यावसायिक डॉक्टरने केलेल्या निदानाची जागा इंटरनेट घेऊ शकत नाही.

आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की अगदी कोणीही माहिती किंवा डेटा ऑनलाइन प्रकाशित करू शकते. ‘गुगल सर्च’ केल्यावर समोर येणाऱ्या परिणामांपैकी काही स्रोत हे पूर्णपणे चुकीचे असू शकतात आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तज्ज्ञ / अनुभवी व्यावसायिकांद्वारे ते प्रकाशित केले गेलेले असतील याची शाश्वती नसते. ‘विकिपीडिया’सारख्या साइट आपला डेटा कोणालाही संपादित करण्याची परवानगी देतात. त्यामुळे हे विश्वसनीय स्रोत नाहीत, हे आधी समजून घ्या.

दुसरा मुद्दा असा, या परिणामांमध्ये काही वेळेस शस्त्रक्रिया सूचित केलेल्या असतात किंवा कर्करोगासारख्या एखाद्या गंभीर आजाराशी ही लक्षणे मिळतीजुळती असू शकतात. या टोकाच्या निष्कर्षामुळे रुग्णाच्या चिंतेत भर पडू शकते. ह्याला ‘सायबरकाँड्रिया’ असे म्हणतात. ब्रिटिश वृत्तसंस्था ‘डेलीमेल.कॉम’च्या म्हणण्यानुसार लाखो लोक यामुळे त्रस्त आहेत. हे सायबरकाँड्रिएक्स मग व्यावसायिक आरोग्यतज्ज्ञाऐवजी (हेल्थ प्रोफेशनल) त्यांच्या आरोग्याच्या समस्यांसाठी ‘गुगल’कडे वळतात. ते पूर्णपणे ‘गुगल’च्या अधीन होतात आणि व्यावसायिक तज्ज्ञ डॉक्टरकडून उपचार घेण्याच्या टप्प्यातील महत्त्वाचा व बराचसा वेळ स्वतःच स्वतःवर उपचार करण्यात फुकट घालवितात.

‘गुगल डॉक्टर’ची आणखी एक समस्या म्हणजे, ‘गुगल’वरील औषधांबद्दल सगळी माहिती वाचून रुग्ण नकारात्मक विचारांनी ग्रस्त होतात. त्यांच्या उपचारांना उशीर होतो, कारण अनेक वेळा औषधांच्या दुष्परिणामांबद्दल वाचल्यानंतर रुग्ण औषधे घेणेच बंद करतात. अनावश्यक चाचणीसाठी खर्च करतात आणि वेळ वाया घालवितात. समजावूनही रुग्ण समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात. अशीच एक शंका लोकांना ‘स्टॅटिन्स’ या औषधाबद्दल असते. हे औषध हृदरोगाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
दिले जाते. अनेक रुग्ण गुगलवर ‘स्टॅटिन्स’ या औषधाच्या दुष्परिणामांबद्दल पाहून आणि वाचून ते घेण्यास घाबरतात. पण त्यांना हे समजत नाही, की ‘स्टॅटिन्स’चा फायदा त्याच्या दुष्परिणामांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. खरे तर, सर्व प्रतिक्रिया औषधांच्या कागदपत्रांमध्ये लिहिल्या जातात. परंतु या सर्व प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीस लागू होत नाहीत. मात्र लोक भीतीमुळे औषधे घेणे थांबवतात.

गमतीचा भाग असा, की जशी अॅलोपॅथी तशी, ‘गुगलोपॅथी’ म्हणजे, अशी वैद्यकीय शाखा जिथे रुग्ण डॉक्टरांना औषधे सुचवतात. असेच अनेकदा इंटरनेटवर कोणत्यातरी तज्ज्ञाच्या नावाने खोटे लेख येतात, ज्यात काहीही दावे केलेले असतात. उदाहरणार्थ, एक अद्भुत औषध अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मिळते जे घेतल्यास रुग्णाला अँजिओग्राफी करण्याची गरज राहत नाही व त्याच्या हृदयाच्या नसांतील अडथळे पूर्ण विरघळून जातात. कोमट नारळ पाणी प्यायल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होतो असे सांगणारा डॉ. राजन बडवे ह्यांच्या नावाने असाच एक खोटा लेख इंटरनेटवर पाहायला मिळतो किंवा नवीन संशोधनानुसार कोलेस्ट्रॉल आता ‘हाय रिस्क फॅक्टर’ नाही. हे सर्व लेख खोटे असून दिशाभूल करणारे आहेत. पण लोक ‘गुगल’वर उपलब्ध आहे म्हणजे ते खरे असे समजून आंधळेपणाने त्यावर विश्वास ठेवतात. ‘गुगलिंग’चा आणखी एक तोटा असा, की यामुळे रुग्णाचे अधिक पैसे खर्च होऊ शकतात. रोगाची लक्षणे गुगल केल्यावर मिळालेल्या माहितीमुळे बऱ्याचदा ते अनावश्यक चाचण्या करतात, वेगळ्या वेगळ्या स्पेशालिस्टना दाखवतात, हॉस्पिटलच्या सतत चकरा मारणे आणि अनावश्यक उपचारांमध्ये दरवर्षी रुग्णांचे हजारो रुपये खर्च होता.

आपल्याला आरोग्याची चिंता असल्यास इंटरनेटवर अवलंबून न राहता डॉक्टरांशी बोला. आपल्या स्थितीबद्दल अतिशयोक्तीपूर्ण माहिती इंटरनेटवर आढळल्यास आपण अनावश्यक काळजीत पडतो. त्याउलट कमी त्रासदायक दर्शविणारी माहिती आढळल्यास आवश्यक असलेले लक्ष वेळेवर देण्यात आपण अयशस्वी होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती बिघडू शकते.

एक साधी गोष्ट आपल्या सर्वांनाच समजायला हवी, की आरोग्य, मनुष्य शरीरशास्त्र हे विषय शिकायला डॉक्टरांना इतकी वर्षे अभ्यास करायला लागली, तर काही तास ‘गुगल’वर सर्च करून रोग आणि त्याचे उपचार सर्वसामान्य व्यक्तीला समजेल का? आरोग्यासंदर्भात आपण स्वतःला शिक्षित करायला हवे. आपल्या डॉक्टरांच्या दवाखान्यासह आणि त्यांनी पुरविलेल्या कोणत्याही हँडआउट्स किंवा पत्रिकेसह प्रतिष्ठित स्रोतांचा सल्ला घेऊन तसे करता येईल.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. अनिल दामले, डॉ. मीता कुऱ्हेकर

(लेखक प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.