September 18, 2024

अॅन्टिबायोटिक्स आणि सुपरबग्ज

आपल्याला आजार रोगजंतूंच्या संसर्गाने होतात. रोगजंतू दोन प्रकारचे असतात, जीवाणू व विषाणू. विषाणूमुळे होणाऱ्या रोगांवर प्रतिजैविकांची (Antibotics) गरज नसते, पण जिवाणूमुळे होणाऱ्या रोगांसाठी प्रतिजैविके जीव वाचविणारी ठरतात. पुरातन काळापासून माणसाचे शरीर वातावरणातील (म्हणजे हवा, पाणी, माती, वनस्पती इ.) जंतूंच्या हल्ल्याला तोंड देत आले आहे. प्रतिजैविकांचा शोध लागण्यापूर्वी या जंतूंच्या संसर्गाने होणारे इन्फेक्शन व त्यामुळे ओढावणारे मृत्यू व शारीरिक दुर्बलता यांचे प्रमाण अगदी प्रचंड होते. त्यामुळे संपूर्ण जग हे प्लेग, कॉलरा, देवी यासारख्या साथींना बळी पडत होते. एखाद्या वणव्यासारख्या या साथी पसरत असत. परंतु १९४३ साली ‘पेनिसिलिन’ या अद्भुत प्रतिजैविकाचा शोध लागला आणि मानवासाठी प्रतिजैविकांचे दालन उघडले गेले.

प्रतिजैविकांचे युग

मग पुढच्या तीन दशकांमध्ये विविध प्रतिजैविकांचे शोध लागले. नवनवीन प्रतिजैविके निर्माण होत गेली. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांना हायसे वाटले. जीवाणूमुळे होणारे आजार व मृत्यू आटोक्यात येऊ लागले. आता हे प्रतिजैविकांचे युग म्हणून ओळखले जाते व सर्व डॉक्टर्स जंतुसंसर्गाचे योग्य ते निदान करून, योग्य मुदत ठरवून, योग्य त्या प्रतिजैविकांचा औषधोपचार करून रुग्णांवर इलाज करत आहेत. डोळे, कान, त्वचा यांना होणाऱ्या जंतुसंसर्गाबद्दल सर्वांना माहीतच असते, कारण ते दिसून येते. परंतु आपल्या इतर अवयवांना होणारा जंतुसंसर्ग उदा. फुप्फुसांचे इन्फेक्शन, मेंदू, पोट, मूत्रसंस्था इ.चे इन्फेक्शन हे डॉक्टर शोधून काढतात व त्या त्या आजाराप्रमाणे योग्य ते प्रतिजैविक देऊन जंतुसंसर्ग कमी करत असतात.

प्रतिजैविक हे खरोखरच आपल्या मानवी आरोग्यासाठी एक वरदान ठरले आहे. परंतु प्रतिजैविकांचा अतिवापर करणे चुकीचे आहे. अनेकदा गरज नसताना विषाणूमुळे (Viral) होणाऱ्या आजारासाठी रुग्णांवर प्रतिजैविकांचा मारा केला जातो. हे थांबवले पाहिजे, नाहीतर ही प्रतिजैविके निकामी होत जातील. प्रतिजैविकांचा अमर्याद किंवा अपुरा वापर हा प्रतिजैविकांना न जुमानणारे नवीन जंतू निर्माण करत आहे हे आपण विसरतोय. त्यामुळे रुग्णाला झालेला जंतुसंसर्ग इलाजाने आटोक्यात आणता येत नाही, कारण हे प्रतिरोधक जीवाणू त्या प्रतिजैविकांना जुमानत नाहीत. त्यामुळे जंतुसंसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू ओढावतो किंवा रुग्णाला शारीरिक दुर्बलता तरी देऊन जातो. प्रतिजैविकांच्या या रेझिस्टन्समुळे रुग्णावरील उपचार खूप कठीण, खर्चिक व कधी कधी अशक्य ठरतो.

जंतूंचा प्रतिकार करणे संपूर्ण जगाची भीषण समस्या बनली आहे. आरोग्य व्यवस्थेसाठी हे एक आव्हानच आहे. प्रतिजैविके देऊनही नष्ट न होणारे जंतू म्हणजेच सुपरबग्ज प्रतिजैविकांना न जुमानणाऱ्या या जंतूंना सुपरबग्ज म्हणून ओळखले जाते. यांच्याजवळ सुपरमॅनसारखी ताकद (प्रतिरोधकशक्ती) असते. त्यामुळे या सुपरबग्जना नेस्तनाबूत करणे अत्यंत कठीण असते. सुरुवातीला हे सुपरबग्ज फक्त हॉस्पिटलमधील वातावरणात आढळून येत असत. उच्च प्रतीच्या प्रतिजैविकांचा सततचा किंवा अतिवापर यामुळे हे घडत असते. आता ह्या सुपरबग्जनी (प्रतिजैविकांना न जुमानणारे जीवाणू) संपूर्ण समाजाला व्यापले आहे. उदाहरण द्यायचे झाले तर टीबी या आजाराचे देता येईल.

टीबी – प्रतिजैविके आणि शक्तिशाली सुपरबग्ज 

टीबी या रोगासाठी बराच काळ उपचारांची गरज असते. म्हणजे कमीत कमी सहा महिने ते दीड वर्ष. या रोगाची विशेषता अशी की काही आठवड्यांतच रुग्णाला बरे वाटल्याने ते उपचार थांबवतात. ह्यामुळे रोग तर बरा होत नाहीच पण शरीरातील टीबीचे जंतू जास्त बलवान होतात. हे जंतू रुग्णाच्या शरीरात पुन्हा वाढू लागतात, मात्र ते आधी दिलेल्या उपचारांना जुमानत नाहीत. शिवाय या रुग्णाच्या खोकल्यातील जंतू समाजातील इतर व्यक्तींवर हल्ला करतात तेव्हा औषधांना न जुमानणाऱ्या टीबी रोगाची लागण होत राहते. इथे आणखी एक सांगणे महत्त्वाचे ठरेल. ७० टक्के टीबी रुग्ण छोट्या दवाखान्यात इलाज करतात. लवकर गुण यावा म्हणून नवनवी औषधे, प्रतिजैविके अगदी मुक्तहस्ते वापरतात. उपचार जास्त महाग होणे व त्यामुळे ते अर्धवट राहण्याचे प्रमाण वाढते. अशा तऱ्हेने सुपरबग्ज जास्त सुपर बनत जातात. त्यामुळे MDR (मल्टी ड्रग रेसिस्टंट), XDR (मल्टी ड्रग अति रेसिस्टंट) हे टीबीमध्ये दिसून येतात. यामुळेच टीबीचे मृत्यू कमी करणे कठीण झाले आहे.

बऱ्याचदा साध्या आजारांसाठी प्रतिजैविकांची गरज नसताना ती दिली गेलेली असतात. साधा फ्लू असेल, सर्दी-खोकला असेल तर प्रतिजैविक घ्यायची काही गरज नसते. साध्या अशा जंतुसंसर्गापासून झालेल्या इन्फेक्शनसाठी अति प्रभावी अशी प्रतिजैविके दिली गेली तर रुग्णांना काही फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त होऊ शकते. अनेकदा औषधविक्रेता डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय स्वतःच लोकांना प्रतिजैविक देतात; त्यामुळे सुपरबग्जना वाव मिळतो.

आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शरीराच्या विशिष्ट भागांसाठी विशिष्ट प्रतिजैविके दिली गेली पाहिजेत. जसे की, त्वचेसाठी Azithromycin , Erythromycin, पित्ताशयाच्या इन्फेक्शनसाठी Cephalosporin ग्रुप वगैरे वगैरे. सब घोडे बारा टक्के नसतात.

प्रतिजैविकांचा वापर कसा असायला हवा?

  1. शस्त्रक्रियेनंतर प्रतिजैविक फार तर तीन दिवसच घ्यावे, एखाद्याच वेळी जास्त दिवस घ्यायची गरज असल्यास तसे डॉक्टर सुचवतील.
  2. प्रतिबंधक प्रतिजैविकही २ ते ३ डोसांचे असावे, १०-१२ दिवसांचे असू नये. उदा. दात काढण्यापूर्वी, मोतीबिंदू काढण्यापूर्वी.
  3. सर्वसाधारण आजार (व्हायरल ताप) साध्या पॅरासिटेमॉल (उदा. क्रोसिन) सारख्या औषधाने बरे होऊ शकतात – तिथे प्रतिजैविक निरुपयोगी ठरते.
  4. कुठले प्रतिजैविक कशासाठी, कोणत्या आजारासाठी निवडायचे हे ठरवणेही महत्त्वाचे असते.
  5. किरकोळ आजारांना, इन्फेक्शनना, महागडी व अतिप्रभावी अशी प्रतिजैविके दिली गेली तर दुर्धर आजारांवर घ्यायला प्रतिजैविक उरणार नाहीत किंवा नंतर उपयोगी ठरणार नाही.
  6. प्रतिजैविक रोटेशनमध्ये द्यावीत. म्हणजे समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादे प्रतिजैविक खूप वापरले जात आहे तर – त्या प्रतिजैविकाचा वापर थांबवून दुसरे त्यासारखे प्रतिजैविक वापरायला लागावे. म्हणजे पहिल्या प्रतिजैविकाचा रेझिस्टन्स निघून जातो किंवा कमी होतो.
  7. कधी कधी अति प्रभावी (उच्च प्रतीची) प्रतिजैविक उपलब्ध नसतात (ज्याची रुग्णाला तीव्रतेने गरज असते) व त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
  8. रोग होऊ नयेत म्हणून लसीकरण करून घेतल्यास प्रतिजैविकाचा वापर कमी होईल. आज आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात सुपरबग्ज मोठ्या प्रमाणात पसरत आहेत. ते वातावरणात, पाणी, कुक्कुटपालन, भाजीपाला, जनावरे पालन या सर्वच ठिकाणी असतात. असे जंतू समाजात आढळल्यामुळे ते सर्वत्र पसरू नयेत यासाठी तातडीची उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वसाधारण नागरिकांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असते.

जंतूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खालील मूलभूत गोष्टी पाळा:

  1. मनाने प्रतिजैविके घेऊ नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या.
  2. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्णपणे घ्यावा.
  3. साबण आणि पाणी याने हात स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करा.
  4. वैयक्तिक स्वच्छता पाळा.
  5. शिजवलेले अन्न सेवन करावे. उघडे, शिळे अन्न खाऊ नये. त्याने जंतुसंसर्ग होईल.
  6. प्रतिजैविकाचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी निर्जंतुकीकरणाच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी तसेच रुग्णालयातील निर्जंतुकीकरण मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी व स्वीकृतीvकाटेकोरपणे करावी.
  7. भाजीपाला, फळे धुऊन खावीत.
  8. प्रत्येक रुग्णालयात ‘हॉस्पिटल इन्फेक्शन कंट्रोल कमिटी’ स्थापन करण्यात यावी व त्याचे कामकाज २४ तास चालू ठेवून त्यांनी रुग्णालयीन स्वच्छतेवर देखरेख ठेवावी.
  9. रोगाचा फैलाव एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णास होऊ नये यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सुद्धा सॅनिटायझरने हातांचे निर्जंतुकीकरण करणे हे अतिशय आवश्यक आहे.
  10. जलजन्य जंतूच्या प्रादुर्भावास आळा घालण्यासाठी पाणी स्वच्छ करा. त्यासाठी फिल्टरचा किंवा तुरटीचा वापर करा. जेव्हा रोगाचे अचूक निदान होईल तेव्हाच प्रतिजैविकाचा वापर योग्य प्रमाणात आणि आवश्यक तेवढ्याच काळासाठी वैद्यकीय उपचारामध्ये करावा, हे अतिशय महत्त्वाचे आहे. तरच आपण ह्या सुपरबग्जना आटोक्यात आणू शकू.

 –  डॉ. अविनाश सुपे | कालनिर्णय जानेवारी २०१८ 

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.