September 11, 2024

A cup of smile : स्वागत नववर्षाचे!

नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी संपूर्ण मुंबई तयारीत होती. पण त्यांच्या या आनंदाला कुठेही गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून मुंबई पोलीस मात्र मुंबईच्या रस्त्यांवर आपली ड्युटी बजावत होते. अशा वेळी त्यांच्या डोक्यावरील कामाचा हा ताण कसा कमी करता येईल, हा प्रश्न काही मुंबईकर तरुणांना पडला आणि त्यांना एक वेगळीच युक्ती सुचली – ‘A cup of smile’ ची!

संपूर्ण मुंबई वर्षाच्या स्वागतात रमलेली असताना ज्ञानेश्वरी आणि तिच्या मित्रांनी मात्र नवीन वर्षाची सुरुवात एका वेगळ्याच उपक्रमाने केली. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबई आणि परिसरातले तरुण गेटवे आणि मरीन ड्राईव्हला जमतात. अशा वेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेत काही अपप्रकार होऊ नयेत, आनंदाला कोणतेही गालबोट लागू नये, कायदा आणि सुव्यवस्था राखता यावी, यासाठी मुंबई पोलीस मात्र आपली ड्युटी प्रामाणिकपणे बजावित असतात. अशा वेळी त्यांना त्यांच्या कामातून थोडा आराम मिळावा, कामाचा ताण कमी व्हावा म्हणून या तरुणांनी ‘अ कप ऑफ स्माईल’ म्हणत मुंबई पोलिसांच्या हाती चहा आणि बिस्किटे दिली.

 अ कप ऑफ स्माईलची तयारी  

मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येत ‘अ कप ऑफ स्माईल’ नावाचा एक ग्रुप तयार केला. वेगवेगळ्या माध्यमांपर्यंत पोचत त्यांनी या उपक्रमासाठी लागणाऱ्या निधीसाठी आवाहन केलं. चाळीस जणांचा हा ग्रुप ३१ डिसेंबरच्या आधी साधारण दोन आठवडे कार्यरत होता. जमलेल्या निधीतून मुंबई पोलिसांसाठी चहा, बिस्किटे आणि  चॉकलेटची सोय केली. प्रत्यक्ष ३१ डिसेंबरच्या रात्री सहा वेगवेगळे ग्रुप करत त्यांनी मरीन ड्राईव्हच्या वेगवेगळ्या भागांतील पोलिसांपर्यंत पोहोचण्याचं ठरवलं. मरीन ड्राईव्हवरची वाढत जाणारी गर्दी, रस्त्यावरील ट्रॅफिक, तरुणाईचा उत्साह या सगळ्याच गोष्टींना आवर घालण्यात मुंबई पोलिसांचं नवीन वर्ष सुरू होणार होतं. अशा वेळी मरीन ड्राईव्ह परिसरात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सातशेहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना ‘A cup of smile’ अंतर्गत चहा देण्यात आला. त्यांच्या कामातून २ मिनिटांचा का होईना त्यांना दिलासा देण्यात या तरुणांना यश मिळालं.

आम्ही दरवर्षी तुमची वाट पाहतो!

‘अ कप ऑफ स्माईल’मध्ये असलेले तरुण जेव्हा पोलिसांना चहा द्यायला गेले, तेव्हा अनेकांना गहिवरून आलं. ‘दर वर्षी न चुकता आम्हाला मरीन ड्राईव्हला ड्युटी लागते. अशा वेळी शुभेच्छा तर खूप दूरची गोष्ट. पण, नवीन वर्षाचं स्वागत घरच्यांसोबत करणं सुद्धा शक्य नसतं. तुम्ही गेली काही वर्ष न चुकता चहा घेऊन येतात. तुमची वाट मात्र मी बघत असतो.’ असं एका पोलिसाने सांगितलं. तर ‘पोलीस म्हणजे तो केवळ आपण नेहमी कठोर भूमिकेतच पहिला. आपल्यासाठी तो झटत असतो. पण, चार चौघांसारखं त्याला साधं नवीन वर्षाचं स्वागत सुद्धा करता येत नाही. त्यामुळे चहा पिताना पोलिसांच्या चेहऱ्यावर क्षणभर पाहायला मिळालेला आनंद हीच आमच्यासाठी खरी पोचपावती आहे.’ असं ‘अ कप ऑफ स्माईल’च्या एका स्वयंसेवकाने सांगितलं.

आभार : A cup of smile टीम 

तुमच्या आजूबाजूला समाजाला नवी प्रेरणा देईल अशी एखादी गोष्ट घडतेय का? असल्यास आम्हाला social@kalnirnay.com या इमेलवरती नक्की कळवा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.