September 12, 2024
अल्झायमर | early-onset alzheimer's | alzheimer's care | types of dementias | loss of memory disease | effects of alzheimer's disease

अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा? | डॉ. राहुल चकोर | Alzheimer’s: Illness or Forgetfulness | Dr. Rahul Chakor

अल्झायमर: आजार की विसरभोळेपणा

अल्झायमर डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंश हा साध्या विसरभोळेपणाचा प्रकार नक्कीच नाही. वयोमानानुसार येणारा हा आजार असून हा आजार सुरू झाल्यावर पुढील ५ ते १५ वर्षांमध्ये तो बळावत जातो. त्यामुळे अनेक मानसिक कार्यक्षमतांचा ऱ्हास होतो आणि त्याचा शेवट मृत्यूमध्ये होतो.

मेंदूच्या व्याधींमध्ये (डिमेन्शिया) हा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा आजार असून त्याचे प्रमाण ५० ते ७५ टक्के आहे. अल्झायमर डिमेन्शिया ही संज्ञा आकलनाशी संबंधित (कार्यक्षमता, अनुभूती) ऱ्हासाबद्दल वापरली जाते. या आजारामुळे आकलनक्षमतेचा ऱ्हास होऊन दैनंदिन कामे करण्यात अडचणी येतात, स्मरणशक्ती लोप पावत जाते. तसेच भाषा, स्थळ, काळ, भोवतालची परिस्थिती यांचे विस्मरण होत जाते.

अल्झायमर डिमेन्शिया (एडी) म्हणजे काय?

अल्झायमर आजाराचे नाव हे डॉ.॒अलॉइस अल्झायमर यांच्या नावावरून देण्यात आले आहे. १९०६ साली असाधारण मानसिक आजारामुळे मृत्यू झालेल्या महिलेच्या मेंदूतील प्लाक्स या ऊतींमध्ये आकुंचन आणि बदल झाल्याचे डॉ.॒अल्झायमर यांना दिसून आले. स्मृतिभ्रंश, भाषिक समस्या आणि असाधारण वर्तन अशी लक्षणे या स्त्रीमध्ये आढळून आली होती. सर्वांत पहिल्यांदा डॉ.॒अल्झायमर यांनी या आजाराबाबत सांगितले होते.

एडी हा रोखता न येऊ शकणारा (irrreversible), बळावत जाणारा असा मेंदूचा आजार आहे. यात हळूहळू स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमी होत जाते आणि शेवटी साध्यासोप्या क्रिया करणेही अशक्य होते. हा आजार असलेल्या बहुतेक रुग्णांमध्ये या आजाराची सुरुवात वयाच्या साधारण ६० वर्षांच्या सुमारास होते. ६५ वर्षांवरील १० टक्के तर ८५ वर्षे वयावरील ३० टक्के वृद्धांमध्ये हा आजार आढळतो. ६५ वर्षांखालील व्यक्तींमध्येही हा आजार आढळून आला असला, तरी याचे प्रमाण अत्यल्प आहे. हा आजार नसेल तर मानवी मेंदू वयाच्या ९० वर्षांनंतरही काम करू शकतो.

विसरभोळेपणा हे एडीचे सर्वाधिक प्रमाणात आढळणारे लक्षण आहे. त्याचप्रमाणे भाषिक समस्या, स्थितीभानरहितता, निर्णय घेणे, नियोजन कौशल्य आणि हायर मेंटल फंक्शन्ससारखी (उच्च मानसिक कार्ये) कार्ये करण्याची क्षमता कमी होते.

कारणे॒:

वाढते वय हा एडीसाठी सर्वात मोठा जोखीम घटक असतो. एडी हा वृद्धांना होणारा आजार असला तरी एडीचा आनुवांशिक प्रकार वयाच्या ३५ ते ५० वर्षाच्या टप्प्यावरही सुरू होऊ शकतो.

स्मरणशक्तीच्या कोणत्याही समस्या जाणवण्याआधी सुमारे १० ते २० वर्षे मेंदूचा ऱ्हास होण्यास सुरुवात झालेली असू शकते. अल्झायमर रोगाच्या अंतिम टप्प्यावर या नुकसानाची व्याप्ती वाढलेली असते आणि मेंदूतील ऊती मोठ्या प्रमाणावर आकुंचन पावलेल्या असतात.

एडीची लक्षणे आणि टप्पे॒:

वस्तू हरवणे, भेटीच्या वेळा/व्यक्ती विसरणे, फोनवरील संदेश न देणे, फोन कोणी केला होता ते विसरणे किंवा संपूर्ण संवादच विसरणे ही अल्झायमर आजाराची सुरुवात असू शकते. कार्यालयात कार्यक्षमता कमी झाल्याचे सहकाऱ्यांना आढळून येऊ शकते. गृहिणींना स्वयंपाक करता न येणे किंवा इतर काही काम करता न येणे, जे याआधी ती सहज करू शकत होती.

पुढील लक्षणे अल्झायमरचा इशारा देणारी असू शकतात :

  • नवीन गोष्टी शिकता न येणे.

  • वस्तू (चावी, मोबाइल फोन इ.) वारंवार हरवणे, वस्तू चुकीच्या ठिकाणी ठेवणे.

  • घटना, संवाद किंवा टीव्हीवरील मालिकां-मधील प्रसंग लक्षात न राहणे.

  • एकच प्रश्न वारंवार विचारणे.

  • एकच गोष्ट वारंवार सांगणे.

  • स्वयंपाक, दुरुस्ती, पत्ते खेळणे, रिमोट कंट्रोल वापरणे, मोबाइल फोनचा वापर, बँक एटीएमचा वापर इत्यादी नियमित केली जाणारी कामे करण्याची क्षमता गमावून बसणे.

  • बिले भरणे, धनादेशातील तपशील भरणे किंवा बँक खाते हाताळण्याची क्षमता गमावणे.

  • परिसर ओळखीचा असूनही हरविणे

  • आंघोळीकडे दुर्लक्ष करणे किंवा स्नान वा जेवण केल्याचे विस्मरण होणे. तेच तेच कपडे परिधान करणे.

  • साध्या निर्णयांसाठी किंवा उत्तरे देण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे, जे ते या आधी सहज करू शकत असत.

सौम्य एडी: नव्या गोष्टी शिकण्यास, नवीन स्मृती साठविण्यास कठीण होणे. संवाद साधताना शब्द न सापडणे. कोणतेही काम करताना फार उत्सुकता नसणे आणि लक्ष नसणे. वारंवार एखाद्या ठिकाणी हरविणे, कशातही स्वारस्य नसणे, फार चिडचिड होणे, वस्तू हरविणे किंवा गहाळ होणे किंवा त्या चुकीच्या जागी ठेवणे आणि ती जागा नंतर विसरणे. गीझर किंवा गॅस सुरू ठेवून विसरून जाणे. दरवाजाला कुलूप लावण्यास विसरणे ही लक्षणे तुम्हाला सौम्य स्वरूपातील अल्झायमर असल्याचे दर्शवतात.

मध्यम स्वरूपाचा एडी: ओळखीच्या व्यक्तींना न ओळखणे, व्यक्तींशी असलेले नाते विसरणे, एकच गोष्ट/विधान वारंवार करणे, सुरू असलेला संवाद न समजणे, लिखित किंवा बोलून दिलेल्या सूचनांचे आकलन न होणे, हात किंवा पायांची किंवा चालण्याची वारंवार हालचाल, अयोग्य वर्तन (उदा.किंचाळणे, लोकांना मारणे किंवा एकदम शांत बसणे व अबोल होणे, स्वच्छतागृह वापरता न येणे, कपडे घालता न येणे किंवा खुर्चीत नीट बसता न येणे, पत्नीवर व्यभिचार केल्याचा किंवा कुटुंबातील सदस्यांवर चोरी केल्याचा आरोप करणे) ही लक्षणे तुम्हाला मध्यम स्वरूपातील अल्झायमर असल्याचे दर्शवितात.

गंभीर स्वरूपाचा एडी: जोडीदाराला किंवा स्वतःला आरशात पाहून न ओळखणे, अजिबात बोलता किंवा रडता न येणे, अन्नपदार्थ/पेय चावता किंवा गिळता न येणे, मूत्रविसर्जनावर नियंत्रण नसणे, व्यवस्थित चालता, उभे राहता किंवा बसता न येणे, दैनंदिन कामांसाठी पूर्णपणे दुसऱ्यावर अवलंबून असणे ही लक्षणे म्हणजे रुग्णाला गंभीर स्वरूपातील अल्झायमर असल्याचे निदर्शक आहे.

निदान आणि उपचार॒:

एडीचे निदान ही टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. जेव्हा कुटुंबातील वृद्ध व्यक्ती विसरभोळी झाल्याची, तिचा गोंधळ होत असल्याचे, दैनंदिन कामे करण्यात अडचण येत असल्याची किंवा आकलन क्षमतेचा ऱ्हास झाल्याची तक्रार कुटुंबीय करतात तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीला ‘डिमेन्शिया’ हा आजार झालेला असण्याची  शक्यता असते. अल्झायमर डिमेन्शिया व्यतिरिक्त इतरही काही आजार आहेत ज्यात अशी लक्षणे दिसू शकतात. अशा वेळी रक्तशर्करा, मूत्रपिंड कार्य, इलेक्ट्रोलाइट्स आणि मूत्रसंसर्ग या चाचण्या करून इतर आजारांची शक्यता पडताळली जाते. स्ट्रोक किंवा मेंदूशी संबंधित इतर आजारांमध्येही अशाच प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. इतर आजारांच्या शक्यता फेटाळल्या की अल्झायमरचे निदान करण्याची प्रक्रिया पुढे सरकते.

रुग्ण सामोरे जात असलेल्या समस्यांची निश्चिती करण्यासाठी मिनी मेंटल स्टेट एक्झॅमिनेशन, फ्रंटल असेसमेंट बॅटरी, एडनब्रुक कॉग्निटिव्ह एक्झॅमिनेशन आणि क्लिनिकल डिमेन्शिया रेटिंग या न्यूरोसायको-लॉजिकल चाचण्या करण्यात येतात. या चाचण्या केल्यानंतर रुग्णाला सामान्य आकलनाची समस्या आहे, वाढत्या वयामुळे येणारा विसरभोळेपणा, सौम्य आकलन ऱ्हास आहे, सौम्य, मध्यम का गंभीर स्वरूपाचा डिमेन्शिया आहे किंवा नाही हे निर्धारित केले जाते. ज्या रुग्णांचे आकलन सामान्य नसते त्यांना डिमेन्शियाच्या संभाव्य टप्प्यांची चाचणी करण्यासाठी नियमितपणे तपासणी करण्यास सांगितले जाते.

एडीला प्रतिबंध: अल्झायमरसाठी कोणताही निश्चित उपचार नाही. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये या आजाराच्या वाढीचा वेग कमी असावा, यासाठी औषधे उपलब्ध आहेत. या आजाराचे एकदा निदान झाल्यावर पुढील १० ते १५ वर्षे हा आजार बळावत जातो आणि अखेरीस रुग्णाचा मृत्यू होतो.

नियमित व्यायाम, सक्रिय सामाजिक आयुष्य आणि मानसिकदृष्ट्या आव्हान देणाऱ्या अॅक्टिव्हिटी या आकलन क्षमतेचा ऱ्हास होण्याला प्रतिबंध करण्यासाठी लाभदायी असतात. हा आजार वाढू नये यासाठी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हायपर लिपिडेमिया या आजारांवर योग्य उपचार घेणे आवश्यक असते. तसेच हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा,

ओमेगा फॅटी अॅसिड्स हे घटक असलेला आहार उपयुक्त ठरतो. परंतु कोणत्याही औषधाने अल्झायमर डिमेन्शियाला प्रतिबंध करता येत नाही, हे समजून घ्या.

रुग्णाची काळजी कशी घ्यावी?

अल्झायमरचे निदान झाल्यावर फक्त त्या व्यक्तीवर परिणाम होत नसून त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्र यांचे आयुष्यही बदलते. निश्चित उपचार नसल्यामुळे जोडीदार, मुले किंवा नातवंडे हे रुग्णाच्या उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात. हा आजार असलेल्या व्यक्तींना जुन्या गोष्टींना उजाळा द्यायला आवडतो, तसेच या व्यक्ती घरातील कामांमध्ये स्वतःला व्यग्र ठेवू पाहतात. कुटुंबातील सदस्य यात त्यांना मदत करू शकतात.

अल्झायमरचे रुग्ण असहाय्य असतात. त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, हे रुग्णाच्या कुटुंबीयांनी समजून घेणे आवश्यक असते. या आजाराचे निदान लवकर होणे आणि त्यांची देखभाल करणे महत्त्वाचे असते.

अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना  आणि काळजी वाहकांना रुग्णाची काळजी घेण्याबाबत, रुग्णाला आधार देण्याबाबत प्रशिक्षण द्यायला हवे. यासाठी प्रथम रुग्णाच्या कुटुंबीयांना अल्झायमर या आजाराविषयी माहिती द्यायला हवी. या आजारासाठी मदत गट अस्तित्वात आहेत. कुटुंबातील सदस्य किंवा काळजीवाहक या ठिकाणी जाऊन आपल्या समस्या आणि अशा रुग्णांना हाताळण्याचा अनुभव सांगू शकतात. एकाच परिस्थितीतून जाणाऱ्या इतर व्यक्तींना भेटणे हा व्यावहारिक मदतीचा स्रोत असू शकतो. कारण यातून कुटुंबाला नवीन कल्पना आणि मार्ग उपलब्ध होतात.

रुग्णाला हा आजार असल्याचे निदान झाले, की आर्थिक नियोजन करण्यासाठी कुटुंबीय आणि मित्र यांनी त्या व्यक्तीची मदत करावी. बिले भरणे, मृत्युपत्र/इच्छापत्र तयार करणे, आगाऊ वैद्यकीय निर्देश देणे, बँक खाते व्यवस्थापन यासाठी नियोजन आदी गोष्टी करणे आवश्यक ठरते. या कामांसाठी आर्थिक आणि कायदेशीर सल्लागाराची गरज भासू शकते. याच टप्प्यावर आयुष्याच्या शेवटच्या टप्प्याचे नियोजन करावे लागते. भविष्यात जेव्हा तो रुग्ण बोलू न शकणाच्या टप्प्यावर पोहोचेल किंवा मृत्यूच्या दारात उभा असेल तेव्हा त्याच्यावतीने कोणी निर्णय घ्यावेत, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे की घरी ठेवावे या संदर्भात लिखित स्वरूपात आधीच निर्देश देऊन ठेवलेले असावेत. भावनिकदृष्ट्या हे कठीण वाटत असले, तरी या गोष्टी करणे आवश्यक आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. राहुल चकोर

(लेखक नायर हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजी डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत.)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.