महाशिवरात्री व शिवलीलामृत

आज महाशिवरात्री. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात.

ही महाशिवरात्री म्हणजे महादेव शिवशंकराच्या भक्तांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला दिवस होय. आपल्याकडे शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये चालते अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे.  शिव किंवा रूद्र हा सृष्टीचा संहारकर्ता आहे, अशी जशी आपली श्रद्धा आहे तसाच तो औषधांचा जाणकार आहे, असेही आपण मानतो. वैद्यनाथ असे त्याचे मुळी एक नावच आहे. ऋग्वेदातही या वैद्यनाथाची त्याने आपणास प्राकृतिक स्वास्थ द्यावे म्हणून प्रार्थना केलेली आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहे. त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरतात. महाराष्ट्रात श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिलेला ‘ श्रीशिवलीलामृत ‘ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. पंढरपूरपासून जवळ असलेल्या नाझरे या गावात ब्रह्मानंद आणि सावित्री या दाम्पत्याच्या पोटी श्रीधरचा जन्म झाला. श्रीशिवलीलामृताच्या चौदाव्या अध्यायाच्या अखेरीस त्यांनी हा तपशील दिला आहे. शिवलीलामृतातील अकरावा अध्याय विशेष प्रभावी असल्याचा जनमनाचा अनुभव आहे. शैव मताच्या अनुयायी भाविकांमध्ये शिवलीलामृताला बरेच महत्त्व आहे. हा ग्रंथ परंपरागत श्रद्धाधिष्ठित आहे हे खरेच. ग्रंथाची भाषा सुबोध आहे. त्यात दिलेल्या कथा मनोरंजक आहेत आणि या कथा आपल्याकडे बऱ्याच काळापासून रूढ आहेत. महाशिवरात्रीचे माहात्म्य सांगताना शिवलीलामृताच्या दुसऱ्या अध्यायात

कपिलाषष्ठी अर्धोदय संक्रमण । महोदय गजच्छाया ग्रहण । इतुकेही पर्वकाळ ओंवाळून । शिवरात्रीवरूनि टाकावे ।। शिवरात्री आधींच पुण्य दिवस । त्याहीवरी पूजन जागरण विशेष । त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष । त्याच्या पुण्यासी पार नाहीं।। वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर । सुरगण गंधर्व किन्नर । सिद्ध चारण विद्याधर । शिवरात्रिव्रत करिताति ।।

सर्व प्रकारचे मोठमोठे पर्वणीकाळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. या दिवशी त्रिकाल पूजा, मंत्र- स्तोत्रपठण तसेच शिवनामाचा जप केला असता तो अपार पुण्यकारक ठरतो. गंधर्व, ऋषिमुनी हे सर्व शिवरात्रीव्रत करतात, असा निर्वाळा दिला आहे. शंकर ही देवता सर्व प्रकारच्या लोकांना आकर्षित करणारी आहे. या देवतेकडे अधिकाधिक भक्तांचे लक्ष जावे, शंकराची उपासना सर्वत्र वाढावी, अशा सद्‌हेतूने हे महिमान सांगितले जाते. त्याचा अर्थ शब्दश: घेण्याची आवश्यकता नाही.

शंकर हा महायोगी, पण नाचगाण्यात रमणारा. अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. पार्वतीसारख्या लोकोत्तर विश्वसुंदरीबरोबर जगावेगळा संसार करतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे.

 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (अमृताची खाणी, देवाचिये व्दारी- भाग ३ रा मधून) 

जाणून घ्या : गणेश जयंती आणि महोत्कट विनायक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.