जिद्द

तसे जीवनात काहीतरी भव्यदिव्य करण्याचे, कुणीतरी बनण्याचे स्वप्न, जिद्द प्रत्येकजण आपापल्या प्रकृती आणि प्रवृत्ती धर्मानुसार रंगवीत असतोच! अर्थात, त्या प्रत्येकाचा तो संकल्प, ते स्वप्न वास्तवात साकार होतेच असे नाही. कारण संकल्प आणि सिद्धी यांमध्ये ईश्वरेच्छेचा फार मोठा सहभाग असतो. असे असते तरी एक मात्र खरे की, एखाद्याने जर आपण अमुक एक काम करून दाखवूच, मग काय वाटेल ते सहन करायला लागले तरी हरकत नाही असा दृढनिश्चय करून जिद्दीने न थांबता, न कंटाळता अथक परिश्रमाने त्या ईप्सिताचा पाठपुरावा केला, तर त्याचे ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही!

जीवनात यशस्वी व्हायचे असेल, नव्हे, नेत्रदीपक यश मिळवायचे असेल तर आपण करीत असलेल्या कामाप्रती निष्ठा, आवड, प्रेम, आत्मियता आणि अर्थात त्या कामाला आवश्यक असलेले गुणही आपल्यामध्ये हवेत, त्याबरोबरच स्वतःबद्दल, स्वतःच्या गुणांबद्दल, कर्तृत्वाबद्दल प्रखर आत्मविश्वास आणि जिद्दही हवी. प्रतिकूलतेच्या भट्टीत जेव्हा ही जिद्द तावूनसलाखून निघते आणि वास्तवतेच्या ऐरणीवर भल्याबुऱ्या अनुभवांचे घाव तिच्यावर बसतात, तेव्हाच तिला खरा आकार मिळतो! कारण केवळ स्वप्नरंजनात गुंगून जाऊन ध्येयपूर्ती होत नसते.  “ असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी ”असे म्हणून स्वस्थ बसून केवळ मनोरथांचे इमले बांधून काहीच साध्य होत नसते, त्याने झालेच तर शेख महंमदासारखे आपलेही हसूच होऊ शकते. जेव्हा तुम्हाला खरेच कुणीतरी मोठे बनण्याची इच्छा असते, नव्हे अशा एखाद्या दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने तुम्ही जेव्हा अंतर्बाह्य झपाटून जाता, त्यासाठी कोणतेही अग्निदिव्य करायलाही तुम्ही भीत नाही, तेव्हाच तुम्ही यशोमंदिराच्या पायऱ्या चढून ध्येयशिखर गाठण्यात यशस्वी होऊ शकता!

गाणं हेच आपलं जीवन आहे,  असे बालवयातच कधीतरी मनावर ठसले गेले. ‘गाणं शिकू, नाव मिळवू ’ असे एक स्वप्नही मी त्या बालवयातच बघितले होते. गाण्याने मला पार झपाटून टाकले होते. त्याच भरात मोठा गायक होण्यासाठी म्हणून मी अगदी लहान वयात दोन वेळा घरातून पळून गेलो. गुरूच्या शोधात उत्तर भारत वणवण फिरलो. उपासमार सहन केली. पडतील ती कामे निमूटपणे केली. अगदी एका गवयाच्या घरी तर बाजारातून मटण आणण्यापासून पुढचे सारे सोपस्कारही केले ते केवळ गाणे शिकायला मिळेल या आशेने!

पुढे सवाई गंधर्वांकडे गाणे शिकायला म्हणून गेलो, तेव्हा पहिले दीड वर्ष मी केवळ पडतील ती घरकामे निमूटपणे करीत असे. या घरकामांत रोज घरापासून अर्धा किलोमीटर दूर असलेल्या ३०० फूट खोल विहिरीतून रहाटाने पाणी काढावे लागे. अशा किमान १० ते १२ भल्या मोठ्या घागरी आणाव्या लागत. असे रोज पाणी भरताना पाहून गावकऱ्यांचा तर असा समज झाला होता की, सवाई गंधर्वांनी पाणी भरण्यासाठी एका पहिलवानाला आपल्याकडे नोकरीला ठेवलंय! माझ्याकडून गुरुजींचे कपडे धुणे, भांडी घासणे, पाणी भरणे अशी सारी कामे करवून घेण्यामागे माझ्या गुरूचा हेतू मला पारखून घेणे हाच असावा! अन् गाणे शिकून मी माझ्या बळावर इकडची दुनिया तिकडे करू शकेन ही माझी जिद्द होती. त्यासाठी तशी मेहनतही मी घेत असे.

पुढे जेव्हा गाणे शिकू लागलो तेव्हा मी गाणे सोडून दुसरे काहीही करीत नसे. अर्जुनाला धनुर्विद्या शिकताना पक्ष्याचा केवळ डोळाच दिसत होता तीच गत माझीही होती. मला फक्त गाणे आणि गाणेच ऐकू येत होते. असेच एकदा मल्हार रागाचा रियाझ गुरूसमोर करीत होतो. कुठेतरी स्वर नीट लागले नाहीत. स्वर जरा हलला. ते लक्षात येताच गुरूंनी शेजारच्या तबकातील आडकित्ता उचलून माझ्या दिशेने फेकला. तो नेमका माझ्या डाव्या डोळ्याखाली लागला. त्या वेळीच निश्चय केला की, “ प्राण गेला तरी चुकायचं नाही, सतत सजग राहायचं! ” आज चार हजारांहून अधिक मैफली होऊनही प्रत्येक मैफल ही माझी पहिलीच मैफल आहे आणि ती मी यशस्वी करीनच, या भावनेने मी जिद्दीने गायला सुरुवात करतो.

कशी कोण जाणे पण पहिल्यापासूनच माझी जिद्द अशी की जे काम हजारो, लाखो करू शकणार नाहीत ते मी काय वाटेल ते झाले तरी करीनच! मी ज्याला जिद्द म्हणतो त्याला कोणी हट्टही म्हणत असतील. अर्थात ही जिद्द, हा हट्ट मी चांगल्या गोष्टीसाठीच वापरत आलो आहे. एकदा १९५८ साली दसऱ्याच्या निमित्ताने सरला माझे गाणे होते. तिथे जाताना ड्रायव्हरला डुलकी लागल्याने आमची गाडी १०१२ कोलांट्या खात साताऱ्याच्या खिंडीत ४०४५ फूट खोल कोसळली. तेव्हाच मी ठरवून टाकले की, यापुढे ड्रायव्हिंग आपण स्वतःच करायचे. मरण यायचेच असेल तर ते आपल्याच हातून यावे! मग मी तो ध्यासच घेतला. तासन्‌तास खर्चून ड्रायव्हिंग, रिपेअरिंग शिकलो. भारतभ्रमण निदान १०१२ वेळ स्वत: ड्रायव्हिंग करीत केले.

बडे गुलामअली खाँ साहेब काही झाले तरी रियाझात खंड पडू देत नसत. ती त्यांची एक प्रकारची जिद्दच होती. रियाझ करायला बसले की वेळेचे भान त्यांना राहत नसे. एका प्रवासात मुंबई ते कलकत्ता मी त्यांच्याबरोबर होतो. मुंबईला गाडीत बसल्यावर तंबोऱ्याची गवसणी जी निघाली ती कलकत्त्यापर्यंत प्रवास संपला तेव्हाच रियाझ संपला. मीही गुरुगृही असताना रात्री चिमणीत रॉकेल भरून चिमणी पेटवायचो आणि मेहनतीला प्रारंभ करायचो. चिमणीतले रॉकेल संपून ती विझली की माझी स्वरसाधना थांबायची. म्हणजे एकदा रात्री बैठक मारून रियाझ सुरू करायचो ते सकाळी थांबायचो. एक तान घेतली की तीच पुनःपुन्हा तासन्‌तास म्हणत राहायची. एकेक जागा पक्की करून मगच पुढे जायचे. डोके अगदी दुखू लागायचे. पण एका जिद्दीच्या जोरावर मी ते अग्निदिव्यही पार केले. प्रत्येक गाणे जमले पाहिजे, प्रत्येक मैफल रंगली पाहिजे, रसिक श्रोत्यांना माझ्या गाण्याने आनंद अनुभवता आला पाहिजे, ही माझी जिद्द! कधीकधी गळा साथ देत नाही. अशा वेळी जिद्दीला पेटून माझे गाणे जास्तीत जास्त चांगले व्हावे म्हणून प्रयत्नांची शिकस्त करतो.

अन् मैफल जिंकली…

एकदा उन्हाळ्याच्या दिवसांत भयानक उष्म्यात जळगावला माझे गाणे होते. काही केल्या गाण्यात रंगच भरेना. साहजिकच रसिकांची दादही मिळेना. तेव्हा मग मीही जिद्दीला पेटलो. ‘ही मैफल काबीज करायचीय’ असे मनोमन ठरवून प्रचंड दमछाकची दीर्घ तान घेतली. ती तान इतकी दीर्घ होती की श्रोत्यांचेही श्वास कोंडले गेले. (हे मला मागाहून अनेकांनी सांगितले म्हणून कळले.) ती तान पूर्ण होण्यापूर्वीच रसिकांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आपल्या पसंतीची दाद दिली. त्या दीर्घ तानेमुळे आकाशात लखूकन वीज चमकून जावी तशी माझ्या छातीत आलेली मोठी कळ माझ्या सर्वांगाला स्पर्शून गेली होती – हे तेथे कोणालाच कळले नाही, पण मैफल जिंकली या आनंदात मला ती तशी छातीत आलेली कळ फारच गौण वाटली होती एवढे मात्र खरे!

साठ साली पुण्यातल्या नेवाड्यात झालेल्या मैफलीत असाच काही केल्या रंगच भरेना. माझ्या चाहत्यांची अस्वस्थता पुन्हा एकदा माझ्या जिद्दीला डिवचून गेली. कुंडलिनीसारखी एरव्ही सुप्तावस्थेत असलेली ही जिद्द जेव्हा का जागत होते, तेव्हा मग मी माझा उरतच नाही. त्या जिद्दीपुढे मग मला माझेही भान राहत नाही. या वेळीही असेच झाले. मध्यंतरानंतर मी साथीदारांना सांगितले,  “ आता बघाच मल्हार कसा फोडतो ते! ” अर्थात त्यानंतर रंगलेल्या मैफलीबद्दल सविस्तर सांगायला नकोच. एकंदर विचार करता बहुधा या जिद्दीमुळेच माझ्या अशा काही आरंभी न रंगणाऱ्या मैफली मध्यंतरानंतर मात्र अविस्मरणीय ठराव्यात इतक्या रंगत असाव्यात. काही का असेना एक खरे आहे, ते म्हणजे ही जिद्द माझ्यातील अहंला डिवचून वेळोवेळी जागत करते,जागरूक ठेवते, म्हणूनच मी रसिकांना आवडेल असे गाऊ शकतो.

माझे गुरू सवाई गंधर्व यांच्या एकसष्ठीच्या प्रसंगी पुण्यात हिराबागेत खास जलसा होता. त्या दिवशी अनेक नामवंत माझ्याआधी गायले, पण मैफल रंगेचना. शेवटी मी गायला बसलो. ते माझे पुण्यातील पहिलेच गाणे होते. न रंगलेल्या मैफलीला रंग भरण्याचे ते आव्हान मी मनोमनी स्वीकारले. कारण त्या मैफलीतून माझा परिचय प्रथमच पुणेकरांना होणार होता. त्यातूनही महत्त्वाचे म्हणजे गुरूंना आपली कामगिरी, आपली तयारी दाखविण्याची ही सुवर्णसंधीच मला लाभली होती. काही झाले तरी मला या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक होते. माझ्या स्वरांवर आणि गुरूंच्या आशीर्वादावर माझा पूर्णपणे विश्वास होता. त्या विश्वासाच्या बळावरच न घाबरता, न अडखळता मी ‘मल्हार रागाने माझ्या गाण्याला प्रारंभ केला. तोपर्यंत न रंगलेली ती मैफल कधी आणि कशी कशी रंगत गेली ते मलाही समजले नाही! गुरूंच्या कृपाकटाक्षातून मिळालेली पसंतीच्या पावतीची आठवण आजही मला रोमांचित करते. त्याच दिवशी मला पुण्यातच आणखी काही ठिकाणची गाण्याची निमंत्रणे मिळाली! ’

खुद्द माझ्या गुरूंना म्हणजे सवाई गंधर्वांना अत्यंत उच्च दर्जाची सर्जनशील प्रतिभा लाभली होती. संगीताची त्यांची जाणही कौस्तुकास्पद होती. पुढे त्यांचा आवाज जड झाला. पण त्यांनी जिद्दीने परिश्रमपूर्वक पुन्हा आवाजावर काजू मिळविली आणि स्वतःची अशी स्वतंत्र, बहुरंगी गायकी निर्माण केली.

केशवराव भोसले व सवाई गंधर्व

एकदा केशवराव भोसल्यांनी त्यांना मिरजेला ललित कलादर्श कंपनीतर्फे गणेशोत्सवात गाण्याला बोलाविले. केशवरावांना स्वतःबद्दल आत्मविश्वास होता की, भर मैफलीत सवाई गंधर्वांवर आपण मात करू! प्रथम केशवराव गायले. मूळचा गोड आवाज आणि त्यात त्यांनी मुद्दाम उंच स्वर ठेवून तीन तास गाऊन वातावरण आपल्या गाण्याने भारून टाकले. सवाई गंधर्वांची पट्टी इतकी उंच नव्हती. म्हणून केशवरावांनी त्यांना विचारले, “ तानपुरे उतरवून खालचा स्वर लावू का? ” सवाई गंधर्वांनी ते नाकारत म्हटले,  “ नको, आज मी आपल्याच स्वरात गातो. ” साऱ्यांना आश्चर्य वाटले. पण मोठ्या जिद्दीने अन् अपार आत्मविश्वासाने गाऊन सवाई गंधर्वांनी केशवरावांचे गाणे पुसून टाकले. तेव्हा गाणे संपल्यावर भर मैफलीत सवाई गंधर्वांचा सत्कार करून, त्यांना नमस्कार करून केशवरावांनी कबूल केले की, “ रामभाऊंचा पाडाव करणे सोपे नाही! ” असा नमस्कार ते फक्त आपल्या गुरूंनाच करीत. असा प्रखर आत्मविश्वास आणि जिद्द असलेला गुरू मला लाभला हे मी माझे अहोभाग्य समजतो. अर्थात माझ्या या जिद्दीत माझ्या पत्नीची जिद्दही तितकीच साहाय्यभूत झाली.

तात्पर्य, एका विशिष्ट ध्येयाची दिशा निश्चित ठरवून महत्त्वाकांक्षेच्या होकायंत्राच्या आधारे जीवनाचे तारू अनुभवाच्या सागरातून, प्रसंगी प्रतिकूलतेच्या वादळवाऱ्यांशी झुंज देत, नैराश्येच्या लाटांवर मात करीत अथक परिश्रमाने वल्हवीत नेण्यासाठी जिद्दीचे सुकाणू आपल्या हाती हवेच मग यशाच्या क्षितिजाचे केवळ आपणच स्वामी होणार यात काय संशय!

 – ‘स्वरभास्कर’ भारतरत्न पं. भीमसेन जोशी (कालनिर्णय एप्रिल १९९४)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.