श्रावणी शनिवार

१) अश्र्वत्थ-मारुती पूजन:


श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. मारुतीचा वार शनिवार. त्यामुळे श्रावणात मारुतीरायाला न विसरता तेल, शेंदूर, रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पीडांचा परिहार होतो असा समज आहे. वेदकाळापूर्वीच्या सिंधुसंस्कृतीत अश्र्वत्थवृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. त्यामुळे तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय ठरला. पुढे ऋग्वेदकाळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तरारणी अश्र्वत्थापासून बनविली जाई. यज्ञ आणि पितर अश्र्वत्थामध्ये वास करतात अशी आपल्या संस्कृतीची पूर्वापार श्रद्धा आहे. उपनिषद काळात अश्र्वत्थ हे देवस्थान मानले गेले. त्याबद्दलची एक कथा पद्यपुराणात आढळते.

कथा:


एकदा भगवान विष्णूने धनंजय नामक विष्णूभक्त ब्राह्मणाची सत्त्वपरीक्षा घेण्याचे ठरविले. त्यानुसार त्याने धनंजयाला दरिद्री केले. परिणामी त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकाकी पाडले. ते थंडीचे दिवस होते. थंडीपासून स्वत:चे रक्षण व्हावे ह्या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. तत्क्षणी तिथे विष्णू प्रकटले. त्यांनी धनंजयाला ‘तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घातलेस त्यामुळे मी रक्तबंबाळ झालो आहे, मलाच जखमा झाल्या आहेत’ असे सांगितले. ते ऐकून दुःखी होऊन धनंजयाने त्याच कुऱ्हाडीने स्वत:ची मान तोडून प्रायश्चित्त घेण्याचे ठरविले. त्याची ही भक्ती पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. त्यांनी धनंजयांला रोज अश्र्वत्थाची पूजा करण्यास सांगितले. त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तिपूर्वक अश्र्वत्थाची पूजा करू लागला. पुढे कुबेराने त्याचे दारिद्र्य नष्ट करून त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंतांनी गीतेमध्ये अश्र्वत्थ सर्ववृक्षाणामू  (वृक्षांमध्ये जो अश्र्वत्थ तो मी होय.) असे म्हटले आहे. हरवलेली वस्तू वा व्यक्ती असल्याला प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशा श्रद्धेने आपल्याकडे नेमाने असल्याला प्रदक्षिणा घालणारी बरीच भाविक मंडळी आहेत.

ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या हे सर्वज्ञात आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच अश्र्वत्थ वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दृष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो. श्रावणातीलच नव्हे, तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्र्वत्थाची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली. ह्याबरोबरच श्रावणातील कृष्णपक्षात त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावास्या ह्या तीन दिवशी पितरांची तहान शमावी ह्या श्रद्धाभावनेने पिंपळाच्या बुंध्याजवळ पाणी घातले जाते.

सद्यःस्थिती : वृक्ष आपले मित्र आहेत. वड-पिंपळ ह्यांची काष्ठे आपल्या धार्मिक कार्यात आवश्यक मानली गेली आहेत. म्हणून अश्र्वत्थ पूजेचा अंतर्भाव आपल्या धार्मिक व्रत विधींमध्ये केला गेला. मात्र केवळ पूजा करून वा प्रदक्षिणा घालून तेवढ्यावरच थांबून चालणार नाही. हे ओळखून ह्या वृक्षांचे रोपण करून, त्यांना वाढवून त्यांचे संवर्धन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ह्या वृक्षांची जोपासना व्हावी म्हणून आपल्या पूर्वजांनी पिंपळाची मुंज आणि त्याचे तुळशीशी लग्न लावण्याचे दोन गोड विधीही ह्या धर्मकार्यामध्ये अंतर्भूत केले आहेत. ‘संसारवृक्ष’ म्हणून गौरविल्या गेलेल्या पिंपळाची झाडे कोणी मुद्दामहून लावत नाहीत. परंतु आता ते लावण्याची वेळ आली आहे. निर्जन जागेच्या वाटेत (आताच्या भाषेत जे राष्ट्रीय महामार्ग आहेत, त्यांच्या) दुतर्फा वडा-पिंपळाची झाडे लावण्याची मोहीम आषाढ-श्रावणात-श्रावणातील एखाद्या शनिवारी काही समविचारी मंडळींनी युवापिढीतील मंडळींची मदत घेऊन राबविली तर त्याने ‘ग्लोबल वॉर्मिंग’पासून ह्या वसुंधरेला वाचविण्याचे पुण्यकर्मदेखील घडेल.

 

२) नृसिंह पूजन :


श्रावणातील सर्व शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढावे. त्या चित्रावर तिळाच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे थेंब शिंपडून प्रोक्षण करावे. त्यानंतर साधी हळद, आंबेहळद, चंदन, लाल आणि निळी फुले (ती न मिळाल्यास पिवळी फुले) वाहून त्या चित्रातील नृसिंहाची पूजा करावी. कुंजरा नावाची पालेभाजी आणि तांदळाची खिचडी असा नैवेद्य दाखवावा.

सद्यःस्थिती : प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतला. त्यावेळी तो खांबातून प्रगटला. त्याचे प्रतीक म्हणून खांब अथवा भिंतीवर चित्र रेखाटून ही पूजा करतात. मात्र सरसकट सर्व मंडळी ही पूजा करताना दिसत नाहीत. आजच्या घराच्या जागेच्या अडचणींमुळे तसेच घर टापटीप ठेवण्याकडे कल असलेली मडळी एखाद्या खांबावर अथवा भिंतीवर असे चित्र रेखाटून वा चित्र लावून पूजा करणे तितकेसे शक्य नाही. ज्यांना ही आठवण जागती ठेवण्याची इच्छा असेल त्यांना एखाद्या विष्णूच्या देवळातील व्यवस्थापकांशी बोलून आधी ठरवून एकत्रितपणे अशी पूजा करता येईल. त्यामुळे पुढच्या पिढीतील मंडळींना नृसिंह अवताराची, प्रल्हादाची कथा कळेल हा त्याचा फायदा. दृष्टांच्या संहारासाठी देवाने घेतलेला हा आणखी एक अवतार! प्रल्हादाच्या जीवनाशी निगडित अशी ‘होळी’ आपण सामूहिक पद्धतीने साजरी करतो. तशीच ही पूजादेखील कोणत्याही एका शनिवारी सामुदायिक पद्धतीने करण्यास हरकत नाही. पूर्वीच्या काळी निवांतपणा होता. म्हणून दर श्रावणी शनिवारी ही पूजा करणे शक्य होत असावे. आताच्या काळात आपण दर शनिवारऐवजी एकाच शनिवारी पूजा करणे योग्य ठरेल. सुखसंपत्ती आणि संततीसाठी नव्हे, पण प्रल्हादासाठी घेतलेल्या एका अवताराची आठवण म्हणून ह्या व्रताकडे बघितले जावे.

One comment

  1. Patiraj Yadav

    Notify me of new posts by email.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.