श्रावणमास व शिवमुष्टी व्रत : श्रावणी सोमवार

१. शिवमुष्टी व्रत (शिवामूठ) :


लग्न झाल्यानंतर सलग पहिली पाच वर्षे महाराष्ट्रात स्त्रिया हे शिवास्त वाहण्याचे व्रत करतात. ह्या व्रतात श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमाने तांदूळ,तीळ,मूग,जवस ह्यापैकी एकेका धान्याची एक मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची एक मूठ, दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची एक मूठ असा हा क्रम असावा. ही मूठ वाहताना ‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने । शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। ‘ हा मंत्र म्हणावा. पाच वर्षांनंतर व्रताचे उद्यापन करावे. यथाविधी शिवलिंगाची पूजा करून ब्राह्मणांना तसेच आप्तेष्टांना यथाशक्ती भोजन, भेटवस्तू, दक्षिणा देऊन ह्या व्रताची समाप्ती करावी.

सद्यःस्थिती :

आपल्याकडे जे असेल तेच भक्तिर्षक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. आधीच भगवान शिवशंकर भोळे, त्यात ते आशुतोष म्हणजे लहान मुलाप्रमाणे लगेच प्रसन्न होणारे! त्यात पुन्हा पार्वतीमातेचे पतिराज । शिव-पार्वती ह्यांच्याकडे आपण सुखी दाम्पत्य जीवनाचा अतिमनोरम असा आदर्श म्हणून बघतो. विवाहप्रसंगीदेखील नववधू लग्नाला उभी राहाण्यापूर्वी ‘गौरीहर’ पूजते. त्यामुळे तो आदर्श नवविवाहितांसमोर सतत यावा, त्यांच्या मनावर सहजीवनाचे सुसंस्कार व्हावे ह्यासाठी ही शिवामुठीची कल्पना व्रतानुषगाने योजिली गेली असणार. त्यातच पूर्वी एरव्ही स्त्रियांना घराचा उंबरठा सहसा ओलांडण्याची संधी मिळत नसे. ती अशा व्रत-वैकल्याच्या निमित्ताने मिळे. आपल्या पतीसाठी, कुटुंबासाठी अशी व्रत-वैकल्ये स्त्रिया आनंदाने करीत. आजही करतात. त्यामुळे नेहमीचा तोचतोपणा आलेल्या आयुष्यात थोडा वेळ का होईना पण बदल होतो, तोदेखील त्यांना पुरेसा होतो. आधुनिक विचारांच्या मंडळांना शिवामुठीच्या ह्या व्रतामुळे किती अन्नधान्याची नासाडी झाली त्याचीच चिंता वाटण्याची शक्यता आहे. पूर्वी स्त्रियांनी वाहिलेले हे धान्य पर्यायाने शिवालयाच्या पुजाऱ्याला मिळत असे. त्यामुळे त्यांच्या संसाराला मदत होई. देण्याचा आनंद काय असतो ते अशा व्रतांमधून अनुभवता येते. ‘दिल्याने कमी होत नाही तर त्यात वाढ होते, मग ते ज्ञान असो वा अन्न । ‘ ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.’मूठभर असले तरीही ते देता आले’ ह्याचे गृहिणीना समाधान, तर मूठ-मूठ करून काही अन्नधान्य मिळाले ह्याचे घेणाऱ्याला समाधान असा दुहेरी लाभ अशा सुरेख व्रत-वैकल्यांमधून होताना दिसतो. त्यामुळे केवळ एका विशिष्ट समाजातील स्त्रियांनीच नव्हे, तर समाजातील सर्व जातीच्या स्त्रियांनी हे व्रत करावे. ज्यांना शिवालयात जाणे काही कारणाने शक्य नसेल त्यांनी घरीच अशी शिवामूठ ताम्हणात शंकराचे नामस्मरण करून काढावी, नंतर त्यात भर घालून ती गरजूंना द्यावी.

सोमवार व्रत पद्धत १ :  श्रावणातील सर्व सोमवारी पूर्ण दिवस उपवास करावा. तो दुसऱ्या दिवशी भोजन करून सोडावा. मात्र जे आजारी अथवा अशक्त असतील त्यांनी रात्री भोजन करावे.

सद्यःस्थिती : बहुतेक करून निरोगी मंडळीही श्रावणातील सोमवारचा उपवास संध्याकाळी किंवा रात्रीच भोजन करून सोडतात. आजच्या धकाधकीच्या काळात ते योग्यही आहे. दुपारी फलाहार आणि रात्रौ सात्त्विक भोजन हा शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने उचित नियम ठरावा.

सोमवार व्रत पद्धत २ : आणखी एका वेगळ्या प्रकारे सोमवार व्रत केले जाते. हे व्रत श्रावणाप्रमाणेच चैत्र, वैशाख, कार्तिक आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यांमध्येही केले जाते. मात्र श्रावणातील सोमवारी केल्यास ते विशेष मानले जाते. पूजेआधी व्रताचा संकल्प करावा. नंतर शिवशंकरांचे ध्यान करावे. तत्पश्र्चात’ओम नम: शिवाय’ ह्या मंत्रोच्चारासह शिवशंकरांची तर ‘ओम नम: शिवाय:’ या मंत्रोच्चारासह पार्वतीमातेची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी. ह्या दिवशी एकभुक्त राहावे. शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे. अशातऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्षे करून मग त्याचे यथासांग उद्यापन करावे.

सद्यःस्थिती : भांडणतंटा, वादविवाद, कोर्टकचेऱ्या करून एकमेकांचे वैरी बनण्यापेक्षा असे गोड व्रत करणे केव्हाही चांगलेच. मात्र ते आजच्या स्वार्थी आणि स्वकेंद्रित समाजातील नवदाम्पत्यांना तितकेसे रुचणार नाही. मात्र जी मंडळी सामंजस्याने आपले वैवाहिक जीवन सुखाचे करण्यासाठी धडपडत असतात, त्यांनी तो आनंद द्विगुणित करण्यासाठी हे व्रत करून बघण्यास हरकत नाही. एरव्हीही लग्नाचे वाढदिवस साजरे केले जातातच, हा दिवसही तसाच असे समजून एका श्रावणी सोमवारी हे व्रत करून बघावे.

2 comments

  1. श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा | Mangala Gowri Pooja

    […] श्रावणातील प्रत्येक मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो. […]

  2. श्रावणी मंगळवार व मंगळागौरीची कथा | Mangala Gowri Pooja

    […] श्रावणातील प्रत्येक श्रावणी मंगळवारी परिचितांपैकी कोणाकडे तरी मंगळागौर असतेच. नुकत्याच लग्न झालेल्या मुलीने हे व्रत करावयाचे असते. लग्नानंतरच्या पहिल्या वर्षी माहेरी आणि नंतरची चार किंवा सहा वर्षे सासरी मंगळागौर जागविली जाते. सोयीनुसार पाच किंवा सात वर्षे हे व्रत केले जाते. ह्या व्रतात सोळा प्रकारची पाने आणि सोळा दिवे पूजेसाठी लागतात. शिवाय पाटा-वरवंटा लागतो. […]

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.