नागपंचमी

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   July 26, 2017 in   श्रावणमास

गणपती हा शंकराचा पुत्र. शंकरापासून गणपतीने दोन गोष्टी उचलल्या. पहिला भालप्रदेशावरील चंद्र आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागांबद्दल प्रेम, आस्था. शंकराप्रमाणेच गणपतीला भालचंद्र असे म्हणतात. गणपतीच्या सुप्रसिद्ध बारा नावांत तिसरे नाव भालचंद्र असे आहे. गणपतीने नाग हा आभूषण म्हणून धरण केला आहे. तर शंकराने हलाहल प्राशन केल्यानंतर त्याच्या कंठाचा म्हणजे गळयाचा दाह होऊ लागला. त्या दाहाने त्याचा गळा काळा-निळा झाला, तो ‘नीळकंठ’ झाला. गळ्याची होणारी आग शांत करण्यासाठी त्याने थंडगार अशा नागाला आपल्या गळ्याभोवती गुंडाळले, अशी कथा आहे. गणपतीने मात्र नागाचे यज्ञोपवित करून गळयात घातले. आपले लंबोदर हे नाव सार्थ करणाऱ्या मोठ्या पोटावर असलेला पीतांबर खाली सरकू नये म्हणून कधी तो नागाला कमरेभोवती गुंडाळतो, तर कधी नागाला उपरण्यासारखे खांद्यावर घेतो, असे विविध उल्लेख सापडतात. त्यात सर्पहारकटीसूत्र, सर्पयज्ञोपवीतवान्, सर्पकोटीरकटक, सर्पकक्ष्योदराबन्धः, सर्पराजोत्तरीयकः सर्पाड्गुलीकः असे म्हटल्याचे उल्लेख आहेत. गणपतीला फणीपती असेही म्हटले आहे. फणी म्हणजे नाग. आता नागेश, नागेंद्र, नागनाथ ही नावे तर गणपतीच्या तीर्थरूपांची म्हणजे शंकराची आहेत. मुलाने वडिलांची परंपरा चालवून नागाला आभूषण बनवावे किंवा उपरणे म्हणून नागाचा उपयोग करावा, अगर जानवे म्हणून नाग गळ्यात बाळगावा हे आपल्या संस्कृतीने नागाला दिलेल्या वेगळ्याआगळ्या महत्त्वाचे निदर्शक आहे. पूर्वापार नागाला आपण शत्रू मानलेले नाही. तर त्याला शरण आणून त्याचे मर्दन करून सोडून दिले. नंतर कालिया यमुना नदीच्या डोहामधून सागराच्या दिशेने पळून गेला. आपल्याकडे प्रातःस्मरणीय स्तोत्रांत एक नवनागस्तोत्रही आहे. इतकेच नव्हे तर विष्णूची शय्या म्हणून शेषाला विशेष स्थानमाहात्म्य आहे. शंकराच्या कंठ-दहावर उपाययोजना म्हणून, तर गणपतीच्या अंगावरील आभूषण म्हणून विविध प्रकारांनी आपण नागजातीचा सांभाळ आणि गौरव करीत आलो आहोत. नागपंचमीला त्याची पूजा करीत आलो आहोत. भारतासारख्या शेतीप्रधान देशात शेतीचे रक्षण करणाऱ्या नागाचे महत्त्व आपल्या पूर्वजांनी नीटपणे ओळखले होते. शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पशूंपैकी गाईला तेहतीस कोटी देवांचे आश्रयस्थान आणि बैलाला शिवशंकराचे वाहन बनवून आपण गोवंशाचाही सन्मान केलेला आहे.

भारत हा कृषिप्रधान देश आहे. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र असल्यामुळे नागपंचमी हा सण व्रत आणि उत्सव अशा दोन्ही स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी. नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. ब्राह्मणाला भोजन घालून स्वतः एकभुक्त राहावे. हे व्रत केल्यामुळे घरात सापांचे भय राहात नाही, अशी परंपरागत श्रद्धा आहे.

या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. दिंड, पातोळया, मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत, असे अनेक संकेत आहेत. त्या संबंधीच्या विविध कथाही सर्वश्रुत आहेत.

शेतकरी व नागाची पिल्ले 


एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

दुसऱ्या एका कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते. त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता. एकदा तिने एका सापाला मरताना वाचविले. त्यावेळी त्या सापाने तिला तिने मागितले तेवढे धन दिले. त्यामुळे ती अधिक सुखी-समृद्ध जीवन जगू लागली. ह्या दिवशी कर्नाटकामध्ये भावासाठी म्हणून भाजक्या डाळ्या, दाणे, खोबरे ह्यांचे किंवा गूळपापडीचे लाडू करण्याची प्रथा आहे. त्यांना तंबिटाचे लाडू म्हणतात. (तंबीट म्हणजे भाजलेले.)

 सद्यःस्थिती :


आता विज्ञानाच्या आधारे संशोधनानंतर असे सत्य पुढे आले आहे की, नागाला दूध अपायकारक ठरते. म्हणून नागपंचमीला नागाला दूध पाजू नये. विज्ञानाप्रमाणेच धर्मदेखील सत्याची नेहमीच पाठराखण करीत आला आहे. पर्यावरणाचा तोल राखण्यासाठी सापांचे रक्षण करणे अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच समाजप्रबोधनासाठी नागपंचमी ह्या सणाचा एक प्रभावी माध्यम म्हणून उपयोग करून घेतला पाहिजे. ‘नागाची पूजा करणे’ ह्या विधीमागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे, समाजाने ‘सर्पमित्र’ बनावे, हा आपल्या पूर्वजांचा सद्हेतू निश्चितपणे जाणवतो. तो आपण ‘वसा’ म्हणून स्वीकारून जपला पाहिजे. नागपंचमीचे निमित्त साधून ‘सर्व साप विषारी नसतात, ते आपले मित्र आहेत’ – हे आणि असे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी खेड्यांमध्ये तसेच शहरांतही सर्पप्रदर्शने, शिबिरे भरवावीत. गावोगावी, शाळाशाळांमध्ये वर्षभर असे उपक्रम, व्याख्याने आयोजित करावीत.

सर्पविषापह पंचमी:


नागपंचमीच्या दिवशी हे आणखी एक व्रत केले जाते. ह्या व्रतानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही गोमयापासून बनविलेल्या दोन सर्प मूर्ती ठेवून त्यांची दही, दूध, दूर्वा, फुले, चणे, गहू ह्यांनी पूजा करावी. सर्पांपासून अभय एवढाच ह्या व्रत करण्यामागचा उद्देश असतो.

 सद्यःस्थिती :


सूर्यनारायण आणि सर्प हे दोघेही आपले अतिजिव्हाळ्याचे हितचिंतक आहेत. साहजिकच त्यांची पूजा नाही करावयाची तर मग कोणाची करायची ? अतिशय साधे, सोपे, कुठलेही अवडंबर नसलेले आणि आर्थिक दृष्टयाही परवडणारे असे हे व्रत शहरात कोणी करणे तसे कठीण आहे.  पण खेडोपाडी अजूनही नागपंचमी मोठ्या श्रद्धेने केली जाते. तसेच हे व्रतही त्याचवेळी करता येण्याजोगे आहे.