वसुदेवाचे भाग्य

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   August 13, 2017 in   Festivalsश्रावणमास

श्रीएकनाथी भागवताच्या पाचव्या अध्यायात नारदांनी वसुदेवाकडे त्याच्या भाग्याचे वर्णन केले आहे. ती कथा शुक्राचार्य परिक्षित राजाला ऐकवीत आहेत. नारद वसुदेवाला म्हणाले,

सकाळ भाग्यांचिया पंक्ती । जेथें ठाकल्या येती विश्रांती ।

ते वसुदेवा भाग्यस्थिती । तुझ्या घराप्रती, क्रीडत ॥

वसुदेव तुझेनि नांवें । देवातें ‘वासुदेव’ म्हणावें ।

तेणें नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे, निरसती दोष ॥

येवढया भाग्याचा भाग्यनिधि । वसुदेवा तूंचि त्रिशुद्धि ॥

हे वसुदेवा, जगातील सर्व भाग्ये जिथे विश्रांतीला येतात, ती भाग्यस्थिती तुझ्या घरी खेळत आहे. तुझ्या वसुदेव या नावावरूनच तर देवाला ‘वासुदेव’ म्हणतात. त्याच्या नावानेच सर्व जनांच्या दोषांचे, पापांचे निर्दालन होते. वसुदेवा, तूच एवढया मोठया भाग्याचा भाग्यनिधी आहेस.

तुम्हां दांपत्याचिये कीर्ती । यशासी आली श्रीमंती ।

तुमचे यशें त्रिजगती । परमानंदें क्षिती, परिपूर्ण झाली ॥

ज्यालागीं कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान ।

ज्यालागीं कीजे तपाचरण । योगसाधन, ज्यालागीं ॥

जो न वर्णवें वेदां शेषा । जो दुर्लभ सनकादिकां ।

त्या पुत्रत्वें यदुनायका । उत्संगीं देखा, खेळविसी ॥

जो कळिकाळाचा निजशास्ता । जो ब्रह्मादिकांचा नियंता ।

जो संहारकाचा संहर्ता । जो प्रतिपाळिता, त्रिजगती ॥

जो सकळ भाग्याचें भूषण । जो सकळ मंडणां मंडण ।

षड्गुणांचें अधिष्ठान । तो पुत्रत्वें श्रीकृष्ण, सर्वांगी लोळे ॥

तुझ्या आणि देवकीच्या कीर्तीने यशाला श्रीमंती लाभली आहे. तुमच्या यशाने सारे त्रिभुवन भरुन गेले आहे. ज्याच्यासाठी यज्ञयाग, दानधर्म, तपाचरण, योगसाधना हे सारे करावयाचे, ज्याचे वर्णन वेदांना आणि शेषालाही करवत नाही, सनकादिकांनाही जो दुर्लभ आहे, त्या श्रीकृष्णाला तुम्ही पत्र म्हणून मांडीवर खेळविता. कळीकाळाचा जो शासनकर्ता, ब्रह्मादिकांचा जो नियंता, जो संहारकांचाही संहारक, जो त्रिभुवनपालक, जो सर्व भाग्यांचे भूषण, सर्व शोभेची शोभा, सर्व सद्गुणांचे अधिष्ठान आहे तो श्रीकृष्ण पुत्ररुपाने तुमच्या अंगाखांद्यावर लोळतो- बागडतो. त्या परब्रह्ममूर्ती श्रीकृष्णाला केवळ पाहिले तरी दृष्टी पवित्र होते. डोळे सुखावतात. त्याचे बोल ऐकले की, कान पवित्र होतात. त्याला हाका मारल्या, त्याच्याशी बोलले तरी वाणी शांत आणि पवित्र होते. त्याच्यासाठी अनेक यज्ञयाग केले जातात. पण तो तेथील यज्ञभागही घेत नाही. तो श्रीकृष्ण, तुम्ही नको म्हणून दोन्ही हातांनी त्याला दूर केले, तरी तुमच्याजवळ येऊन जेवावयास बसतो. जो योग्यांनाही सापडत नाही तो तुमच्या घरी जेवणाची वाट बघत बसतो आणि जेवत असतांना मध्येच आपल्या मुखातील घास तुमच्या मुखात घालतो.

त्रिविधतापाने ग्रासलेल्यांची दुःखे, संकटे दूर करणारा तो भगवान श्रीकृष्ण तुम्हाला स्वतः घास भरवितो, म्हणूनच तुमच्याएवढे भाग्यवान या त्रैलोक्यात दुसरे कोणीही नाही. योगीजन कल्पनेने आपली सारी कर्मे कृष्णार्पण करतात. पण ती कृष्णाने अंगिकारली की नाही हे कळत नाही. तोच श्रीकृष्ण तमची सारी कर्मे स्वतःहून स्वीकारतो. श्रीकृष्ण तुमचा मुलगा या भावनेने त्याचे पालन करुन सारा यदुवंशच तुम्ही पवित्रपावन केला.

नाम घेतां ‘वसुदेवसूनु’ । स्मरतां ‘देवकीनंदनु’ ।

होय भवबंधच्छेदनु । ऐसें पावनु, नाम तुमचें ॥

वसुदेवपुत्र आणि देवकीनंदन असे नामस्मरण केले तरी या संसाराची सारी बंधने तुटून जातात, इतकी तुमची नावे पवित्र झाली आहेत.

जन्मदाते वसुदेव-देवकी काय किंवा पालनकर्ते नंद-यशोदा काय, कृष्णसहवासात आलेले सारेच भाग्यवान ठरले. मग ते कृष्णप्रेमी-कृष्णभक्त असोत वा कृष्णव्देष्टे शिशुपाल, कंस आदी मंडळी असोत. अर्थात् जन्मदात्या वसुदेव-देवकीचे भाग्य इतर कोणाहीपेक्षा अधिक थोर होतेच यात काय शंका ?

संदर्भ टीपा –

  • सकळ भाग्यांचिया पंक्ती ।- संत एकनाथ महाराजकृत श्रीएकनाथी भागवत – अध्याय ५, ओवी ४९६ ते ४९८ पृ. २०७-२०८.
  • तुम्हां दांपत्याचिये कीर्ती ।- संत एकनाथ. उपरोक्त ग्रंथ, उपरोक्त अध्याय, ओवी ५०१ ते ५०५, पृ. २०८.
  • नाम घेतां ‘वसुदेवसूनु’ । संत एकनाथ. उपरोक्त ग्रंथ, उपरोक्त अध्याय, ओवी ५२२, पृ २०९.