गौरीपूजन | Gauri Pooja | Gauri Poojan Vidhi | gouri pujan | gauri poojan | gouri pooja | jyeshtha gauri puja

ज्येष्ठागौरी आवाहन | Jyeshtha Gouri Avahana

गौरीपूजन


एखादी उपासना किंवा एखादे व्रताचरण करताना त्यात देशपरत्वे किती विविधता येऊ शकते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गौरीपूजन हे होय. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीच समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो.

आता गणपती घरात असतानाच गौरी येत असतात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन ज्येष्ठा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीपूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन असे हे तीन दिवसांचे व्रत आहे. गणपती पक्का शाकाहारी त्यामुळे मातोश्रींना जरी मांसाहार चालत असला तरी तो मुलाच्या म्हणजे गणपतीच्या दृष्टीस पडू नये म्हणून गौरीला मांसाहाराचा नैवेद्य दाखविताना मध्ये पडदा धरण्याची प्रथा आहे. आपण देवावर आपल्या भावभावना लादतो, देवही आपल्यासारखाच आहे अशी समजूत बाळगतो. गणपतीसारखा त्रिखंडमान्य महान् ब्रह्मदेवता पुत्र असला तरी मातेला ‘तिखट’ खाण्याची इच्छा होते. ती इच्छा भक्तमंडळी पुरवितात आणि तरी पुरवीत असताना मातेचा आहार मुलाच्या नजरेला पडू नये म्हणून सावधगिरी बाळगतात.

हे गौरीपूजन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. त्यात विविधता किती ॽ गौरीचा चांदीचा वा पितळेचा मुखवटा असतो तो मुखवटा घालून गौरी सजवितात. नंतर ह्या गौरीला दागदागिने घालून नटविले जाते. काही ठिकाणी कागदावर गौरीचे चित्र काढून ते पूजतात. तर काही गावात नदीकाठचे पाच खडे आणून ते गौरी म्हणून पूजले जातात. तर कुठे मातीची लहान पाच मडकी आणून त्या मडक्यात हळद लावलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालून त्या मडक्यांची उतरंड गौरी म्हणून पूजतात. काही लोकांत कुमारिका वासाची फुले येणाऱ्या लहान झाडाची मूठभर रोपे काढून आणतात, त्याच गौरी. घरातील प्रत्येक खोलीत ती कुमारिका ह्या गौरी घेऊन जाते.

घरातील पोक्त मालकीण तिला प्रत्येक खोलीत विचारते, गौरी गौरी कुठे आलात ॽ तुम्हाला इथे काय दिसते ॽ मग ती कुमारिका ऐश्र्वर्यसूचक असे बोलते, अशी प्रथा आहे. कोकणात काही ठिकाणी तेरडयाची रोपे गौरी म्हणून गौरवितात. गौरी विसर्जनाचा दिवस म्हणजे ज्या दिवशी मूळनक्षत्र असेल त्या दिवशी गौरीचे विसर्जन केले जाते. बहुधा गणपती बाप्पा गौरीबरोबरच जातात. सार्वजनिक उत्सवाचा गणपती हा अनंत चतुर्दशीपर्यंत राहतो. घरोघरचे गणपती हे त्या त्या घरी चालणाऱ्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस असे असतात. काही उत्साही लोक तर गणपती एकवीस दिवस वा बेचाळीस दिवसही ठेवतात. पण मग तो रोजचा पाहुणा झाला की नाही म्हटले तरी त्याच्याकडे थोडेफार दुर्लक्ष होतेच.

गौरी आणि गणपती जेव्हा एकाच वेळी घरात असतात तेंव्हा तो आनंद आगळावेगळाच आणि गौरीच्या आगमनाचे, पूजेचे, विसर्जनाचे असे तीनही दिवस धर्मशास्त्राने निश्चित करुन दिलेले असल्यामुळे गौरी मात्र ठरलेल्या दिवशी येतात आणि ठरलेल्याच दिवशी जातात. आज येते, उद्याचा दिवस राहते आणि तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी निघते. गणपती हा गोडाचा भोक्ता. त्याच्यासाठी गोडाचा नैवेद्य रोज करावा लागतो ; पण रोज रोज गोड खाऊन मध्येच तिखट खाण्याची इच्छा झाली तर तीही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गौरीच्या निमित्ताने भक्तमंडळींनी जशी काही आपलीच सोय करुन घेतली आहे. बाबा पद्मजींनी हिंदूचे सण आणि उत्सव याबद्दल लिहिताना गौरीचा उल्लेख ‘गणोबाची आई’ म्हणून केला आहे. ही गणोबाची आई महाराष्ट्राच्या सर्व सामाजिक स्तरात चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे आपल्या मुलावर आणि मुलाच्या भक्तांवरही विशेष प्रेम आहे.

संदर्भ टीप –

गणोबाची आई – सण व उत्सव – संपा. सरोजिनी बाबर, प्रकाशक – महाराष्ट्र शासन, मुंबई, आ. १ ली १९८८, या पुस्तकातील बाबा पद्मजी यांच्या ‘हिंदु लोकांच्या सणांविषयी निबंध’ या निबंधवजा लेखात गणपतीच्या सणाबद्दल माहिती देतांना पद्मजी म्हणतात, ‘‘ ह्याच सणात गौरीचा सण येतो ही बाई गणोबाची आई होय.’’ पृ. ३०.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर

4 comments

 1. Aditya Mukund Basole

  जसे गणेश पूजन चा अँप आहे तसे गौरी पूजन चा मिळु शकेल का?

 2. विजय देशमुख

  गौरी पूजनात 3वर्ष खंड पडल्यानंतर गौरी पूजन कधी करावे दसरा किंवा दिवाळीला चालते का कि मुलाचे लग्न झाल्यावर करावे मार्गदर्शन करा 🙇🙇

 3. विजय देशमुख

  जेष्ठ गौरी पूजनात 3वर्ष खंड पडल्यानंतर पुन्हा कधी मांडता येतील मुलाचे लग्न झाल्यावर कि दसरा किंवा दिवाळी कृपया मार्गदर्शन करा

  1. Kalnirnay Shop Manager

   कृपया आपल्या शंका किंवा प्रश्न service@kalnirnay.com या ईमेलवर पाठवा.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.