गणपती | Ganesh Chaturthi | Ganeshotsav

श्रीगणेश चतुर्थी | Ganesh Chaturthi

 

सुखकर्ता दु:खकर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची ।।

सर्वांगि सुंदर उटि शेंदूराची ।। कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।।

जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रें मन कामना पुरती ।।

ही आरती आज महाराष्ट्रातल्या लाखो घरांतून प्रेमादराने आणि भक्तिभावाने म्हटली जाईल. आज होत असलेले मंगलमूर्तींचे आगमन विशेषच आनंदकारी आहे. ही आरती श्रीसमर्थ रामदासस्वामींनी लिहिली. रामदासस्वामी परम रामभक्त होते. ते पंढरपूरला गेले. तेथे त्यांना विठोबाच्या जागी रामच दिसला. समर्थ कोणत्याही देवळात गेले तरी त्यांना त्यांना त्या देवाच्या जागी प्रभू रामचंद्राचेच दर्शन होई.

गणपतीचे आद्यस्थान असलेल्या मोरगावात श्रीसमर्थ गेले आणि तेथे मात्र त्यांना गणपतीच्या जागी गणपतीच दिसला. राम काही दिसला नाही म्हणून समर्थांनी ही गणपतीची आरती मोरगावात लिहिली, अशी आख्यायिका आहे.

समर्थांनी गणपतीची ही केवळ आरतीच लिहिली आहे असे नव्हे तर आणखीही विविध प्रकारे गणपतीचे स्तवन केले आहे. दासबोधात तर अनेक ठिकाणी समर्थांनी अगदी मनापासून गणपतीचे गुणवर्णन करून त्याला भक्तिभावनेने नमस्कार केला आहे.

ऐसा सर्वांगे सुंदरु । सकाळ विद्यांचा आगरु । त्यासी माझा नमस्कारु । साष्टांग भावे ।

श्रीराम आणि हनुमान यानंतर समर्थांचे आवडीचे दैवत म्हणजे गजानन असे ठामपणे वाटावे इतपत गणपतीवर समर्थांनी रचना केल्या आहेत.

समर्थांच्या या आरतीचे वैशिष्ट म्हणजे निरंतर शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या पाशांकुशधारी म्हणून गौरविला जाणारा गणपती समर्थांना दिसला आहे तो शस्त्रास्त्रे धारण न केलेला आणि दागदागिन्यांनी नटलेला.

चंदनाची आणि शेंदुराची अशा दोन दोन उट्या लावलेला. त्याच्या गळ्यात मोत्याची माळ आहे, मस्तकावर हिरेजडित मुकुट शोभतो आहे, त्याच्या पायात रुणझुणणारी नुपुरे आहेत, तो चांगले पितांबर नेसला आहे, पोटावर नागराजाला बांधले आहे. असा मोठा देखणा केवळ दर्शनानेच मनोकामना पुरविणारा, भक्तांना त्रिविध तापातून सोडविणारा असा मंगलमूर्ती समर्थांनी आपल्या समर्थ शब्दशैलीत उभा केला आहे. समर्थांच्या या आरतीचे आणखी एक  वैशिष्ट आहे.

गणपती हा ‘हाथ लिये गुडलड्डू’ असाच अनेक भक्तांना दिसतो. तो मोदकप्रिय आहे, पण समर्थांनी जसे शस्त्रास्त्र त्याच्यापाशी दिलेली नाहीत, तसेच त्याच्या हातात लाडू-मोदकहीदिलेले नाहीत. गणपतीला दुर्वा वा शमीपत्रेही वाहिलेली नाहीत. समर्थांसारख्या अत्यंत विरक्त प्रवृत्तीच्या साधुपुरुषाने गणपतीला हिऱ्यामोत्यांच्या वैभवात नटलेले पाहावे, ह्या महाराष्ट्रात लहान-थोरांना मुखोद्गत असलेल्या अमर आरतीत इतर ठिकाणी रूढ असलेल्या चित्राहून अतिशय वेगळे असे चित्र रंगवावे आणि हे चित्र वेगळे आहे ही साधीसरळ बाब ही आरती वर्षानुवर्षे म्हणत असूनसुद्धा चटकन आपल्या ध्यानी येऊ नये, ही किती आश्चर्याची गोष्ट!

समर्थांनी ‘संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे’ अशी गणरायाची प्रार्थना केली आहे. श्रीगणेश हे महाराष्ट्राचे लाडके आणि आवडते दैवत. सार्वजनिक स्वरुपात महाराष्ट्राच्या गावोगावी, गल्लोगल्लीत गणपती प्रतिवर्षी पूजला जातो. समर्थांचे शब्द प्रत्यक्षात अनुभवायला यावेत. श्री गजाननाने विघ्नाची वार्ताही कुठे उरु देऊ नये. त्याच्या कृपेने सगळे भेदाभेद दूर होऊन सर्वत्र प्रेमभाव आनंदाने नांदावा आणि गणनायक सिद्धिविनायकाने आपले ‘सुखकर्ता दुखहर्ता’ हे बीद्र यथार्थपणे सार्थ करावे, एवढीच प्रार्थना!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.

 ।। गणपती बाप्पा मोरया ।।

One comment

  1. Sachin Kachure

    उपयुक्त माहिती

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.