कोजागरी पौर्णिमा – जागणाऱ्याचे भाग्यही जागते

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   October 4, 2017 in   Festivalsमराठी लेखणी

 

कोजागरी पौर्णिमा


ब्रह्मदत्त नावाचा गरीब तरुण होता. लग्नकार्य झाले होते, पण बिचाऱ्याला बायको मिळाली ती अतिशय कजाग स्वभावाची. सदानकदा नवऱ्यावर वैतागलेली, घरात प्रसन्नता कसली ती नाहीच. ब्रह्मदत्ताकडे चरितार्थाचे कसलेही साधन नव्हते. घरातील परिस्थिती ओढघस्तीची असल्यामुळे बायको नेहमी कावलेली असे. घरात नोकरचाकर तर सोडाच, पुरेसे अन्नधान्य नाही, मग त्या बायकोने तरी काय करायचे ॽ एक दिवस सकाळीच बायको नवऱ्यावर जोरात खेकसली. दोघांचाही आवाज चढला आणि बायको म्हणाली, ‘‘घरात नुसता बसून राहतोस, दोन पैसे मिळवत नाहीस, आत्ताच्या आत्ता चालता हो आणि पैसे मिळवशील तेंव्हाच परत ये.’’

आज ब्रह्मदत्तही वैतागला. त्याने मनाशी निश्चय केला आणि घर सोडले. उपाशीतापाशी तो चालतच राहिला. चालता चालता समुद्राकाठच्या एका अरण्यात आला तोपर्यंत रात्र झाली होती. त्याला स्त्रियांच्या हसण्या-खिदळण्याचा आवाज ऐकू आला. इतक्या निबिड अरण्यात रात्रीच्या अवेळी या कोण बायका हसत-खिदळत आहेत, हे पाहण्यासाठी तो पुढे झाला. पाहतो तर तीन सुंदर तरुणी सोंगटयांचा डाव मांडून बसल्या होत्या. त्यांना चौथा भिडू हवा होता. एकीने ब्रह्मदत्ताला पाहिले आणि उरलेल्या दोघींशी सल्लामसलत करुन त्यांनी त्याला खेळायला बोलावले. ब्रह्मदत्त सोंगटयांचा खेळ आयुष्यात खेळला नव्हता. त्याला नीट खेळता न आल्यामुळे तो हरला. हरल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू तर हरलास, आता आम्हाला काही तरी दिले पाहिजेस.’’ ब्रह्मदत्ताने अंगावर पांघरलेला पंचा दिला. दुसरा डाव सुरु करताना त्या म्हणाल्या, ‘‘आता तू मन लावून खेळ. तुला खेळाची माहिती झाली आहे. तू जिंकलास तर आम्ही तुला वाट्टेल तेवढे द्रव्य हिरेमाणिके देऊ.’’ ब्रह्मदत्त म्हणाला, ‘‘मला हिरेमाणके नकोत. मी जर जिंकलो तर तुम्ही तिघीही माझ्या दासी व्हाल, तुमच्याकडचे हिरेमाणके आणि सारी संपत्ती माझ्या मालकीची होईल आणि मी हरलो तर तुमचा नोकर होईन.’’ त्या तिघींना आपल्या खेळाचा मोठा अभिमान होता. ही अट त्यांनी मान्य केली.

ब्रह्मदत्त मन लावून खेळू लागला. तेवढयात स्वतः महालक्ष्मी भूतलावर अवतीर्ण होऊन या शरद पौर्णिमेच्या रात्री कोण जागे आहेत, ‘को जागर्ति’ हे पाहत फिरत होती. तिचे लक्ष सोंगटयांचा खेळ खेळणाऱ्या त्या चौघांकडे गेले. केवळ नेसूच्या एका पंचानिशी थंडीत कुडकुडत त्या तिघींबरोबर सोंगटया खेळणारा ब्रह्मदत्त लक्ष्मीच्या दृष्टीस पडला. तिला त्याच्याविषयी ममता वाटली. प्रत्यक्ष लक्ष्मीची कृपादृष्टी ती ! ब्रह्मदत्ताचे दैव पालटले. तो दुसरा डाव जिंकला आणि त्या तिघीही संपत्तीसह त्याच्या दासी झाल्या. घरात नोकरचाकर नाहीत, अन्नधान्य नाही म्हणून अहोरात्र वैतागणाऱ्या ब्रह्मदत्ताच्या पत्नीला इतक्या धनसंपन्न, स्वरुपसुंदर दासी मिळाल्यावर आनंद झाला नसता तरच नवल !

जुनी परंपरागत कथा व चांदण्यात न्हालेली रात्र:

कोजागरी पौर्णिमेची ही अशी कथा आहे. ही जुनी परंपरागत कथा. शरदाच्या चांदण्यात, आश्विन पौर्णिमेच्या रात्री जागे राहावे, असा नियम ज्या आपल्या पूर्वसुरींनी घालून दिला त्यांच्या रसिकतेची आणि सौंदर्यदृष्टीचीही प्रशंसा केलीच पाहिजे. कारण कोजागरी ची रात्र वर्षातील सर्वांत सुंदर चांदणी रात्र होय. ती रात्र जागवून वर्षाऋतूनंतरच्या पहिल्याच पौर्णिमेच्या रात्री हिरवीगार तृप्त सृष्टिसुंदरी दुधासारख्या पांढऱ्याशुभ्र चांदण्यात न्हालेली न्याहाळणे हा आनंद अलौकिकच नाही कायॽ

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी भाग ३ रा

टीप – प्रस्तुत लेख पूर्वापार प्रचलित कथेवर आधारित आहे.