मुले आणि स्क्रीन टाइम | डॉ. समीर दलवाई | Children and Screen Time | Dr. Samir Dalwai

Published by डॉ. समीर दलवाई on   August 2, 2021 in   2021Health Mantra

मुले आणि स्क्रीन टाइम

गेल्या दशकभरात स्क्रीन मीडिया-मध्ये (स्क्रीनवर पाहिले जाणारे साहित्य-कन्टेण्ट) प्रचंड वाढ झाली आहे.इंटरनेट आणि तंत्रज्ञानाने आपल्याला जगाशी जोडले असले, तरी आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींपासून मात्र तोडल्याचे चित्र आपण सध्या पाहत आहोत.अशा विकासाचा सर्वाधिक दुष्परिणाम विकसनशील वयातील मुलांवर होत आहे.

आपल्या आजूबाजूला मुले जे पाहत असतात, त्यावरून ती शिकत असतात.किंबहुना कोणत्या प्रकारच्या व्यक्तींशी ही मुले संवाद साधतात, ते महत्त्वाचे असते.वाढत्या वयाबरोबर आजूबाजूच्यांना पाहून आपले विचार व भावना कशा व्यक्त कराव्यात, कोणते सामाजिक संकेत आणि शिष्टाचार पाळावेत अशा अनेक गोष्टी आपण शिकत असतो.दुर्दैवाने, ही सगळी माणसे हल्ली आपापल्या स्क्रीन्समध्ये व्यग्र झाल्यामुळे मुले त्यांच्या सामाजिक परिसंस्थेतून काहीच शिकू शकत नाहीत.कमी वयात हातात आलेल्या मोबाइल, टॅब्लेट तसेच टीव्ही स्क्रीनवर दिसणाऱ्या गोष्टी कळत-‌नकळत या मुलांच्या मनावर ठसत जातात.या स्क्रीनमुळे त्यांच्या डोळ्यांवर एक प्रकारची झापडे लागतात आणि आजूबाजूच्या जगाशी ती संवाद साधत नाहीत.ही मुले मग गेम्स, अॅप्लिकेशन्स आणि कार्टून्स यांचे स्वतःचे असे जग तयार करतात.मोबाइलच्या या आजाराने सध्या हजारो कुटुंबांना ग्रासलेले दिसते.मोबाइलच्या या वाढलेल्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये पाच मुख्य बाबींवर दुष्परिणाम होत आहेत :

१. झोप : वाढीच्या वयातील प्रत्येक मुलाला १२ तासांची सलग झोप आवश्यक असते.मोबाइल स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे झोप लागण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मेलॅटोनिन या रसायनाच्या निर्मितीमध्ये अडथळा निर्माण होतो.मुलांचा मोबाइल वापर अर्थात स्क्रीन टाइम प्रमाणापेक्षा अधिक असल्यास झोप उशिरा लागते, उठण्याची वेळ पुढे जाते, झोप लागायला वेळ लागतो आणि झोपेचा कालावधी कमी होतो.त्यामुळे झोपेआधी मुलांनी स्क्रीन पाहणे टाळले पाहिजे.

२. दृष्टी : नवजात बाळाच्या डोळ्यासमोर स्क्रीन्स नसतील, तर त्याची दृष्टी विकसित होण्यास मदत होते.यामुळे विविध हालचालींकडे लक्ष जाण्याची आणि नजरेच्या माध्यमातून परिसराची जाणीव विकसित होण्याची बाळाची क्षमता वाढते.प्रमाणापेक्षा अधिक स्क्रीन टाइम असल्यास बाळाच्या डोळ्यांवर ताण येतो, डोके दुखते आणि रेटिनाचे आरोग्य खालावते.त्यामुळे मुलांना लघुदृष्टिदोष (मायोपिया) होतो आणि त्यांना चष्मा लावावा लागतो.

३. पचनक्रिया : स्क्रीन टाइमने मुलांच्या जेवणाच्या वेळेवर अतिक्रमण केले आहे.अनेक पालक हट्टी मुलाला जेवू घालताना त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी फोनवर व्हिडिओ लावून देतात.परिणामी, मुलाला स्क्रीनचे व्यसन लागते.त्याला सतत स्क्रीन पाहायची असते.या स्क्रीन्स शारीरिक खेळांची जागा घेतात.मुले मैदानावर मित्रांबरोबर खेळण्याऐवजी गेमिंग कन्सोल्सवर खेळणे अधिक पसंत करतात.खरे तर विकसनशील वयातील मुलांनी दररोज दोन तास मैदानी खेळ खेळायला हवे.यामुळे मुलांचा शारीरिक व्यायामही होतो, तसेच त्यांच्यातील ऊर्जा, आक्रमकतेला आरोग्यकारक वाट मिळते.अशा खेळांमुळे मुलांना कष्ट, सराव, सांघिक कामगिरी, अपयश हाताळणे, जिंकण्याचा आनंद अशा अनेक बाबी अनुभवता व शिकता येतात.त्याचबरोबर पचनक्रिया सुधारून स्थूलत्व, मधुमेह इत्यादी जीवघेणे आजार होण्याचा धोकाही कमी होतो.हा असा गुण आहे, जो स्क्रीन मीडियामधून मिळूच शकत नाही.

४. मानसिक आरोग्य : संशोधना-नुसार शारीरिक आरोग्यावर व एकाग्रतेवरही याचा वाईट परिणाम होतो.लक्ष विचलित होते, तसेच भावनिक स्थैर्य कमी होते.स्क्रीनटाइम कमी वयात सुरू होण्याचा आणि ऑटिझम (स्वमग्नता) यांचा परस्परसंबंध असल्याचेही एका संशोधनातून दिसून आले आहे.

५. वाणी :  कमी वयात मुलांना स्क्रीन दाखविण्यास सुरुवात केली, तर भाषा शिकण्यास विलंब होतो.स्क्रीन टाइममुळे मुलांची भाषा विकसित होते, हा गैरसमज आहे.मुलांना कदाचित बालगीतांमधील शब्द समजतील, पण वास्तविक जगातील भाषेशी त्यांना या शब्दसंपत्तीचा संबंध जोडता येणार नाही.

मुलांच्या आयुष्यातील स्क्रीन टाइम कमी करायचा असेल आणि सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर खालील पाच सोप्या उपाययोजनांचा अवलंब करावा :

१. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना स्क्रीन दाखवू नका : लहान मूल हे स्क्रीनशी नाही तर त्यांच्या जवळपासच्या व्यक्तींशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असते.‘द अमेरिकन अॅकेडमी ऑफ पीडियाट्रिशिअन्स’च्या शिफारसीनुसार मूल जन्मल्यानंतर पहिल्या दोन वर्षांपर्यंत त्याला स्क्रीन दाखविण्यात येऊ नये.याला फक्त व्हिडिओ कॉलिंगचा अपवाद आहे.त्याशिवाय इतरही काही मार्गदर्शक तत्त्वे त्यांनी दिली आहेत (https://www.facebook.com/newhorizonscdc/videos/912716815791651/). वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर मध्यम प्रमाणात मुलांना स्क्रीनवरील दर्जेदार कार्यक्रम दाखविण्यात यावेत.

२. स्क्रीन टाइमपेक्षा जास्त शारीरिक खेळ : मुलांना विविध खेळ, जिम्नॅस्टिक्स, मार्शल आर्ट्स, नृत्य आणि इतर शारीरिक उपक्रमासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.त्यामुळे मुलांमध्ये छंद निर्माण होतील, त्याचप्रमाणे मुले सर्वांशी संवाद साधू लागतील, त्यांना शिस्त लागेल आणि जबाबदारीही घेऊ लागतील.

३. स्क्रीन अॅक्टिव्हिटी एकट्याची नसावी, समूहाची असावी : जेव्हा तुमचे मूल स्क्रीन अॅक्टिव्हिटी करत असेल तेव्हा तुम्ही त्याच्या सोबत असा.उदा.चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहा किंवा एकत्रितपणे व्हिडिओ गेम खेळा.तुम्ही त्या चित्रपटाबद्दल मुलाशी संवाद साधा, जेणेकरून तुमचा संवाद कायम राहील.यामुळे तुमचे नाते अजून दृढ होईल.त्याचबरोबर मूल मोबाइलवर काय पाहत आहे, यावरही लक्ष ठेवता येईल.

४. स्क्रीन टाइमबद्दल नियम निश्चित करा : प्रत्येक घरात स्क्रीन टाइमबद्दल निश्चित नियम असावेत.तीन वर्षांच्या मुलासाठी केवळ १५ मिनिटांचा स्क्रीनटाइम ठेवा. याची अंमलबजावणी प्रत्येक वेळी व्हावी.झोपण्याआधी किंवा जेवताना स्क्रीन पाहणे टाळा.हे नियम निश्चित करताना स्क्रीन टाइम हा माणसांच्या परस्परसंवादाला पर्याय असू नये, याची खातरजमा करावी.

५. मुलाला खरा अनुभव आणि जबाबदाऱ्यांचा अनुभव द्या : ताटे-वाट्या सिंकपर्यंत नेणे, मटारसारख्या भाज्या धुणे यासारख्या सोप्या जबाबदाऱ्या मुलांना पार पाडण्यास सांगा (त्यामुळे मुलांची हालचाल कौशल्येही विकसित होतात).फळांची, भाज्यांची नावे समजावीत, यासाठी ती नावे केवळ एखाद्या उपकरणावर न शिकवता त्याला बाजारात घेऊन जावे.एकदा सवय लागली की, पैसे, जबाबदारी हाताळणे आणि परस्परसंवाद यासारखी कौशल्ये शिकणे मुलांसाठी सोपे जाते.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


 डॉ. समीर दलवाई

(लेखक डेव्हलपमेंटल पीडियाट्रिशिअन आहेत.)