साग दिलवाला | ज्योती व्होरा | Saag Dilwala | Jyoti Vohra

Published by ज्योती व्होरा on   December 24, 2020 in   2020Recipes

साग दिलवाला

साहित्य : दीड किलो मोहरीची पाने, २०० ग्रॅम बठुआ साग, लसणीच्या २० पाकळ्या, १०० ग्रॅम आले, १ कप पाणी, ३०० ग्रॅम पालक, ४ हिरव्या मिरच्या, ३ मध्यम आकाराचे कांदे, १ छोटा चमचा  हळद, २०० ग्रॅम काबुली चणे (रात्रभर भिजवलेले आणि हळद व चिमूटभर हिंग घालून उकडलेले), ४ मोठे चमचे तूप, ५० ग्रॅम कॉर्न फ्लोअर.

कृती : मोहरीची पाने, पालक आणि बठुआ साग धुवून घ्या. या भाज्यांची देठे कापून मग भाज्या बारीक चिरून घ्या. या सर्व भाज्या प्रेशर कुकरमध्ये साधारण तासभर शिजवून घ्या. त्यात आले, १० लसूण पाकळ्या घाला आणि हे मिश्रण थंड झाल्यावर ब्लेंडरमध्ये घाला. यात कॉर्न फ्लोअर घालून ३० सेकंद आणखी फिरवून घ्या. कढईमध्ये २ मोठे चमचे तूप तापत ठेवा. ते वितळल्यावर त्यात लसूण, बारीक चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून परता. मग त्यात साग मिश्रण, मीठ, हळद व तिखट घाला. त्यात काबुली चणे घाला. हे मिश्रण तीस मिनिटे शिजू द्या. खाण्यायोग्य दाटसर होऊ दे. साग तयार झाले की त्यावर वितळवलेले तूप घाला आणि मक्याच्या रोटीसोबत खायला द्या. वरून लोणी घातले, तर हा पदार्थ अधिक रुचकर लागतो.

पालेभाज्यांमधील अँटिऑक्सिडंट्स, क्षार, फोलेट, जीवनसत्त्वे आणि भरपूर प्रमाणात फायबर शरीरासाठी हितकारक आहेत.


ज्योती व्होरा