September 19, 2024
सेवन | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant | Drug Rehab | Substance Rehab

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती? | डॉ.नीना सावंत | Drug Intake: Addiction or Rest? | Dr. Nina Sawant

अमली पदार्थांचे सेवन: व्यसन की विश्रांती?

कोरोनाकाळात एका सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या शोकांतिकेच्या बातम्या झळकू लागल्या आणि त्यानंतर सिनेसृष्टीला पडलेला अमली पदार्थांचा विळखा उघड झाला.जेव्हा भारतात अमली पदार्थांच्या वापराबाबत चर्चा होते, तेव्हा आपल्यासमोर बॉलिवूड- हॉलिवूडमधील कलाकार, संगीतकार, गायक-वादक, मॉडेल्स, मोठमोठे खेळाडू यांचे चित्र उभे राहते.कारण अशा सेलिब्रेटींच्या संदर्भातच या बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात.प्रसारमाध्यमातून अमली पदार्थांच्या स्कँडल्सना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली जाते; त्यामुळेच ही समस्या मुख्यत्वे श्रीमंतांशी संबंधित आहे, असा सर्वसाधारण जनप्रवाह बनला आहे.मात्र ही गोष्ट खरी नाही.तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या आजच्या पिढीमधील अनेक जण अगदी लहान वयापासून अशा प्रकारच्या मादक पदार्थांच्या आहारी गेल्याचे आढळून येते.यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीच्या आदर्शांचा अनुनय.या युवकांपैकी बरेचसे जण अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या कलावंतांचे निस्सीम चाहते असतात.आपण अशा मादक पदार्थांचे सेवन करत होतो आणि त्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी उपचार घेतले आहेत, अशी कबुलीही अनेक बॉलिवूड कलावंतांनी दिलेली आहे.

वैद्यकीय देखरेखीशिवाय एखाद्या वैध अथवा अवैध द्रव्याचे सेवन करणे यासाठी ‘रिक्रिएशनल ड्रग्ज’  ही संज्ञा साधारणपणे वापरली जाते.अशा द्रव्यांत हेरॉईन, मॉर्फिन, कोडीन (बहुतेक वेळी कफ सिरपमध्ये वापरण्यात येणाऱ्या) अशा ‘नार्कोटिक ड्रग्ज’, कोकेन, मेथ, एक्स्टसी, म्याउ-म्याउ यासारखे ‘स्टिम्युलन्ट ड्रग्ज’, एलएसडी, मॅजिक मशरुम्स, कॅनबिस (चरस, गांजा) यांसारखे ‘हॅल्यूसिनोजेन्स’ आणि अल्कोहोल, निकोटिन, झोपेच्या गोळ्या यांसारखे ‘डिप्रेसन्टस्’ यांचा समावेश होतो.ही सर्वच द्रव्ये घातक असून ती कोणत्याही प्रकारे ‘रिक्रिएशनल’ नाहीत.ज्या व्यक्ती अशा मादक पदार्थांचे सेवन करतात त्यांना असेच वाटते, की या द्रव्यांचे सेवन केल्यामुळे आपल्याला तणावातून मुक्ती मिळत असून छान आनंदी वाटते आहे.मात्र अशा प्रकारच्या मादक द्रव्यांच्या सेवनामुळे त्यावर मानसिक व शारीरिक दृष्ट्या अवलंबून राहण्याच्या प्रकारात वाढ होते; कारण या व्यक्ती अशा द्रव्यांच्या अगदी आहारी जातात व त्यांचे सेवन करण्यापासून स्वतःला रोखू शकत नाहीत.‘रेव्ह’ पार्ट्यांमध्ये अशा मादक / अमली पदार्थांचे सेवन करताना अनेकांनाअटक झाल्याचे आपण बातम्यांमधून वाचले-पाहिले आहे.कलावंतांप्रमाणे खेळाडूसुद्धा आपल्या कामगिरीत भरीव सुधारणा व्हावी, यासाठी डोपिंग व अशा द्रव्यांचा वापर करताना आढळतात.केवळ धावपटू आणि वेटलिफ्टर्स या खेळाडूंपुरते हे व्यसन मर्यादित राहिले नसून क्रिकेटपटूसुद्धा आता याच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहेत.आपली कामगिरी सुधारावी, मनावरील ताण हलका व्हावा, नैराश्य दूर व्हावे या हेतूने कॅनबिस (चरस, गांजा), अफू, स्टिम्युलन्टस् आणि अल्कोहोल अशा द्रव्यांचा सर्रास वापर केला जातो.शारीरिक यातना आणि दुखापत यांचा विसर पडावा यासाठी अशा द्रव्यांची एक प्रकारे मदत होत असते.शरीरसौष्ठवपटू आपले स्नायू फुगवून दाखविण्यासाठी ‘अॅनाबॉलिक स्टेरॉइडस्’च्या आहारी जातात.डॉक्टरी सल्ल्यावाचून अशा स्टेरॉइडस्चा वापर करणे, हे बेकायदेशीर आहे.ही द्रव्ये मोठ्या प्रमाणात हार्मोनल व भावनिक असंतुलन, आक्रमक वर्तन यासाठी कारणीभूत होतात.हे अमली पदार्थ हृदय आणि यकृत यांच्यासाठी हानिकारक असून त्यांच्या चलनवलनातही यामुळे अडथळे निर्माण होतात.

कॅनबिस सहजपणे उपलब्ध होणारा अमली पदार्थ असून भारतात पारंपरिक पद्धतीने त्याची लागवड केली जाते.काही उत्सवांमध्ये त्याचे सेवनही केले जाते.त्यामुळे त्याला एक सांस्कृतिक मान्यताही मिळाली आहे.हेरॉईन, कोकेन यांसारखे अमली पदार्थ अत्यंत महाग आहेत.त्या मानाने गांजा, भांग किंवा चरस या स्वरूपातील कॅनबिस स्थानिक पानवाल्यांकडेही उपलब्ध होते, असे म्हणतात.

गंमत म्हणून किंवा दुःख विसरण्यासाठी किंवा श्रम, कष्ट, दुर्बलता विसरायला लावून शांत झोप देणारे तसेच ताणतणाव यावरील उत्तम उपाय म्हणून अशा पदार्थांचे सेवन करायला सुरुवात होते आणि मग हळूहळू माणूस व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत जातो.अमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढले, की त्याच्यात भावनिक, शारीरिक व वर्तनविषयक तसेच चिडचिडेपणा, नैराश्य, निद्रानाश, चंचलता, थरथर, डोकेदुखी, पोटदुखी, ताण-तणाव अशा कितीतरी समस्या अशा व्यक्तीमध्ये दिसून येऊ लागतात.

अमली पदार्थांचे सेवन करण्यास एकदा का सुरुवात झाली, की हळूहळू हे प्रमाण वाढत जाते आणि मग त्याशिवाय कोणतेच काम होऊ शकत नाही असे वाटून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत जाते.जसजसे अमली द्रव्यांच्या सेवनाचे प्रमाण वाढत जाते तसतसे त्यातून बाहेर येणे अधिकच अवघड होऊन बसते.प्रचंड चिडचिडेपणा, हिंसक मनोवृत्ती, विचार करण्याची अक्षमता अशी लक्षणे स्पष्ट दिसू लागतात.नैराश्य व चिंता यांनी ग्रासून गेल्यामुळे शेवटी-शेवटी आत्महत्येचे विचारही प्रकर्षाने मनात येऊ लागतात.

यासाठीच हे टाळले पाहिजे:

शारीरिक तंदुरुस्ती, ऊर्जावृद्धी करण्यासाठी अमली पदार्थांचे सेवन करण्याकडे तरुणाई आकर्षित होत चालल्याचे हल्ली पाहायला मिळते. शरीराला प्रसन्न राहण्यासाठी अशा अमली पदार्थांची गरज नसते.यामुळे क्षणिक आनंदाच्या अनुभूतीकरिता शारीरिक तसेच मानसिकरीत्या अनिष्ट परिणामांना सामोरे जावे लागते.

अमली पदार्थांच्या सेवनामुळे आपली कार्यक्षमता कित्येक पटींनी वाढते तसेच आपल्यातल्या कलागुणांचा उत्तम प्रकारे आविष्कार सादर करता येतो, असा आणखी एक गैरसमज समाजात दृढ होत चालला आहे.खरे तर प्रत्यक्षात याचे नेमके उलटे परिणाम पाहायला मिळतात.अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांमध्ये शारीरिक व मानसिक नियंत्रण पूर्णतः त्यांच्या व्यसनामध्ये असते.परिणामी, त्यांच्यातील व्यसनाधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते.

आजची तरुणाई अमली पदार्थांकडे ओढली जाण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या अपायकारक परिणामांचे भान न ठेवता, मित्रमंडळींचा दबाव, प्रसारमाध्यमांचा प्रभाव, चुकीचे आदर्श यामुळे या पदार्थांच्या सेवनाविषयीचे अनेक सोयीचे गैरसमज झपाट्याने समाजात पसरत आहेत.अनेक निर्बंध घालूनही सहजपणे हे पदार्थ उपलब्ध होतात.पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण, बदलते सामाजिक-सांस्कृतिक प्रवाह, बाल्यावस्थेतील जडणघडण या कारणांमुळे आजची तरुण पिढी एका अवघड वळणावर येऊन ठेपली आहे.नवव्या-दहाव्या इयत्तेपासून समवयीन मित्रमंडळींचा दबाव वाढतो आणि तो योग्य नसला, तरी ही मुले व्यसनाधीनतेच्या विळख्यात सापडतात.

आजकाल ‘क्रिस्टल मेथ’ किंवा ‘आइस’ या नावाचे अमली पदार्थ विशेष लोकप्रिय आहेत.ते अत्यंत स्वस्त दरात व सहज उपलब्ध असतात.विशिष्ट रासायनिक घटकांपासून ते तयार केले जातात.त्यांच्या सेवनामुळे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते.याच्या अधीन झाल्यामुळे स्वतःवरचे नियंत्रण सुटू लागते व या अमली पदार्थांच्या व्यसनात पूर्णतः अडकायला होते.

अमली पदार्थांवर अनेक निर्बंध असले, तरी त्यांचे सेवन सर्रास होताना दिसते.कायद्यातील पळवाटा, सहज उपलब्धता व प्रचंड मागणी यामुळे भारताला अमली पदार्थांचा घातक विळखा पडत चालला आहे.

मूल व पालक यांच्यातील सुसंवाद, उत्तम आदर्श मूल्ये, चांगले संस्कार, समाजातील अनेक समस्यांसह अमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामांविषयी चर्चा करून त्याविषयी जागृती करणे, तरुण पिढीची मते विचारात घेऊन त्यांचे साधकबाधक परिणाम यावर मुक्त चर्चा करणे, समज-गैरसमज यांची जाणीव करून देणे, अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावामुळे होणाऱ्या अनिष्ट परिणामांची प्रकर्षाने जाणीव करून देणे यामुळे लहान वयापासूनच मुलांची सकारात्मक मानसिकता तयार होऊ शकते आणि भविष्यात अमली पदार्थांच्या व्यसनापासून लांब राहण्यास मदत होईल.

अमली पदार्थांमुळे होणारे शारीरिक आणि मानसिक आजार आणि व्यसनाधीन व्यक्तींच्या कुटुंबाला सोसावा लागणारा मानसिक त्रास यामुळे पूर्ण कुटुंब कोलमडून जाऊ शकते.अशा व्यक्तीला अमली पदार्थ सेवनातून मुक्त करणे आणि त्यांना मुख्य सामाजिक प्रवाहात आणणे व त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.अमली पदार्थांच्या नशेत, जीवाची दशा करून घेतलेल्यांना, योग्य दिशा दिल्यास व्यसनाधीनतेपासून समाज नक्कीच मुक्त होऊ शकतो! व्यसनमुक्ती केंद्र, रुग्णालये, समुपदेशन केंद्र आदी ठिकाणी अशा व्यसनाधीन रुग्णांवर उपचार केले जातात.औषधोपचारांमुळे अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होता येते.तथापि, फॅशन, अनुकरण, गैरसमज आदी कारणांमुळे जगभरातील आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर या जाळ्यात ओढली जात आहे.याचा प्रतिबंध करण्यासाठी कायदा, नियम, निर्बंध असले तरी घराघरांतून त्याविषयीची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे.

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


डॉ. नीना सावंत

(लेखिका मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.