शब्द | study of language | linguistic learning | the study of language

शब्द बापुडे खरेच वारा… | श्रीकांत बोजेवार | Shabd Bapude Kharech Vara | Shrikant Bojewar

शब्द बापुडे खरेच वारा

‘आपण सध्या एका फार कठीण कालखंडातून जात आहोत,’ असे आपण गेली पाच-सातशे वर्षे नियमितपणे सांगत आलो आहोत. याच धर्तीवर, सध्या आपण एका मोठ्या भाषिक क्रांतीमधून जात आहोत. ‘शब्द बापुडे केवळ वारा’ चा कधी नव्हे एवढा अनुभव रोज येतो आहे. उदाहरणार्थ, वृत्तवाहिन्यांनी मराठीतल्या ‘पंतप्रधानां’ ना कायमची रजा देऊन हिंदीतले ‘प्रधानमंत्री’ धरून ठेवले आहेत. मराठी पंतप्रधान आजवर झाला नाही याच्या दुःखाहूनही, ‘पंतप्रधान’ हा मराठी शब्दच शब्दकोशात बंदिस्त व्हावा, हे दुःख अधिक मोठे आहे. ‘त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला’ असे म्हणण्याऐवजी ‘त्यांनी मोठा खुलासा केला’ असे हल्ली म्हणतात आणि ‘यातून तुम्हाला पाहिजे तो अर्थ व्यक्त होत नाही,’ असे कितीही सांगितले तरी कोणी साधा खुलासा करण्याच्या भानगडीतही पडत नाहीत. अभिमानाचे तर कधीच गर्वात रूपांतर झाले आहे. आता मराठीतली जुनी म्हण बदलून ‘अभिमानाचे घर खाली’ अशी केली तरच ‘अभिमान’ हा शब्द टिकून राहील, अन्यथा गर्वाने अभिमान कधीच ‘खाली’ करून टाकला आहे.

आतापर्यंत मराठीत केवळ प्रादेशिकतेचेच अडथळे येत. उदा. लिहिण्यासाठीचे ‘पेन’ बघा. विदर्भात ‘मी पेन आणली’ म्हणतात आणि मुंबई-पुण्याकडे सरकले की ‘पेन आणला’ किंवा ‘पेन आणले’ होते. म्हणजे लिंगबदल होऊन ते पुल्लिंगी तरी होते किंवा नपुंसकलिंगी तरी. सीमेवर मध्यप्रदेशाची गळाभेट घेणाऱ्या विदर्भात ‘बीमार पडलो होतो’ असे म्हटले तर एकही भुवई वक्र होत नाही, पुण्या-मुंबईत मात्र ‘आजारी पडलो होतो’ असा खुलासा करावा लागतो. पुण्या-मुंबईचीही याबाबत फार एकी आहे असे नव्हे, कारण मुंबईतला ‘उपमा’ पुण्यात जाऊन ‘उप्पीट’ होतो. ‘साडी नेसली की साडी घातली?’ हा तिढा तर आपण पॅरिसमधील ‘द थिंकर’ च्या ‘पोज’मध्ये युगानुयुगे बसलो तरीही सुटणार नाही.

याशिवाय, इंग्रजीतून विचार करून मराठीत बोलणारे हा आणखी एक ‘भाषिक’ ताप असतो. ‘तू घाटकोपरला ट्रेन घे आणि मग सीएसटीला उतरून टॅक्सी घे’ असे सांगतात चक्क. ट्रेन घेण्याएवढा पैसा माझ्याकडे असता तर मी महागडी कारच विकत घेतली असती की नाही? ‘तू जे लिहिले आहेस ना त्यातून मी जाते एकदा, मग बोलू आपण’ हे वाक्य एका मराठी मुलीच्या तोंडून मी पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्याचा अर्थ मला दोन दिवसांनी लागला होता.

आधीच असलेल्या भाषेच्या या बहुपदरी घोळात आता नव्या तंत्रज्ञानाने आणखी भर घातली आहे. नवे शब्द, नव्या संज्ञा आणि नव्या कल्पनांनी ‘भाषा’ की ‘दुभाषा’ असा पेच टाकला आहे. सर्वात मोठा घोळ तर ‘मेल’ या शब्दाचाच आहे. ‘तुमची मेल मला मिळाली’ की ‘तुमचा मेल मला मिळाला?’ या लैंगिक प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी बराच प्रयत्न करतो आहे. तंत्रज्ञानाने आपले बरेचसे प्रश्न सोडवले असे म्हणतात, परंतु असे अनेक प्रश्न वाढवूनही ठेवले आहेत, त्याचे काय? बरे, पुरुषांची बाजू घेतली की जगात त्या व्यक्तीला प्रतिगामी ठरवले जाते, त्यामुळे ‘मेल’ ला कोणी काहीही म्हटले तरी फार सिरियसली घेतले जात नाही. मेलच्या ऐवजी फीमेल शब्द वापरात असता आणि ‘तुमची फीमेल मला मिळाली’ असे कोणी कोणाला म्हटले असते तर जगात केवढी उलथापालथ झाली असती? ‘मेल’ काय कोणीही कोणाला पाठवला किंवा ली, कोणाला काहीच फरक पडत नाही, प्रश्न ‘फीमेल’ संबंधी असता तर तमाम भाषातज्ज्ञ त्यावर तोडगा काढायला बसले असते.

मारामारीची भाषा करणे मुळातच मध्यमवर्गीय मराठी माणसाला आवडत नाही. परंतु हल्ली लोक थापा मारावेत तसे सतत रिचार्ज ‘मारत’ असतात. ‘मी कालच दीडशेचा मारला’, ‘मी आज पन्नासचा मारतो’ अशी हिंसक भाषा सतत कानावर पडत असते. याचा परिणाम सगळीकडेच दिसू लागला आहे.काही वर्षांपूर्वी ‘येथे रिचार्ज करून मिळेल’ अशा पाट्या दिसत, तिथेही आता चक्क ‘येथे रिचार्ज मारून मिळेल’ असे लिहिलेले दिसू लागले आहे. अखेर दुकानदाराने ग्राहकाची भाषा स्वीकारल्याशिवाय त्याच्या व्यवसायाला बरकत तरी कशी येणार?

एकदा ट्रेनमध्ये दोन मुली एकमेकींशी बोलत होत्या – ‘अगं, सर काय म्हणाले ते आधी कळलेच नाही मला. मग मी गुगलले तेव्हा माझ्या लक्षात आले ते…’ हे ऐकून आधी मी भांबावलो होतो, परंतु तेव्हापासून मीही गरज पडली की ‘गुगलतो’. ‘आपला बॉस उगा कोकलतो’ पासून ते ‘आपला बॉस सारखा गुगलतो’ इथवर हा प्रवास झालेला आहे. ‘पोस्ट’ म्हटल्यावर आजवर फक्त दोनच गोष्टी आठवत होत्या, एक तर पाकिटांचे ढीग लागलेले पोस्ट ऑफिस किंवा खाकी कपडे घातलेला पोस्टमन. पण त्यांना आता कुरिअरने ‘नोव्हेअर’ केले आहे आणि ‘पोस्ट’ म्हणजे फेसबुकवर आपण काहीही टाकत असतो ते. तिथे एकदा ‘पोस्ट’ टाकली की अधूनमधून लाइक्सची संख्या पाहत राहण्याचा नाद लागतो आणि वेळ चांगला जातो.

एकदा मी एका सहकाऱ्याशी गंभीर चर्चा करत बसलो होतो, तेव्हा त्याला मोबाइलवर कॉल आला. काही वेळ तो फोनवर बोलला आणि मग म्हणाला, ‘मी जरा कामात आहे, उलटा फोन करतो’. मी बराच वेळ वाट पाहिली आणि विचारले, ‘तू फोन उलटा करणार होतास ना?’ त्याला माझा प्रश्नच कळेना. मग मी अधिक स्पष्ट विचारले, ‘अरे तू आत्ताच फोनवर बोललास ना की फोन उलटा करतो.’ तेव्हा कुठे मला त्याच्याकडून कळले की ‘मी कॉल बॅक करतो’ हे आजच्या तंत्रकुशल मराठीत ‘मी उलटा फोन करतो,’ असे होते.

थापा मारण्यासाठी काका, मामा, आत्या अशा कुणाकुणाला आपण वर्षानुवर्षे ‘मारत’ आलो आहोत, पण आता ‘अरे माझा फोन मेला होता’ असे चक्क सांगतात आणि लोकांना त्याचा अर्थ कळतोही. ‘डेड पोएट्स सोसायटी’ च्या धर्तीवर आता ‘डेड फोन्स सोसायटी’ नावाची फिल्म काढायची वेळ आलेली आहे. ‘तब्येत बरी नव्हती’, ‘झोपलो होतो’, ‘लक्षातच राहिले नाही’, ‘विसरून गेलो’ अशा अनेक सबबींमध्ये आता ‘फोन मेला होता’ च्या सोबतीलाच, ‘फोन सायलेंटवर होता’, ‘नेटवर्क नव्हते’, ‘तुझा मिस्ड् कॉल दिसलाच नाही’, ‘रिंग वाजलीच नाही’ या नव्या सबबींची भर पडली आहे. आपला समाज हा सतत ‘सबबी सांगणारा समाज’ असल्याने या नव्या सबबी आपल्या देशात चटकन रुळल्या. भारतात मोबाइलच्या सवयीचा फैलाव एखाद्या विषाणूपेक्षाही अधिक वेगाने झाला त्याचे कारणही बहुधा हेच असावे. चालढकल करणे किंवा आपले काम दुसऱ्यावर ढकलणे हे आपल्याला खूपच प्रिय आहे, त्यामुळेच ‘फॉरवर्ड’ करण्याचे व्यसनही आपल्याला चटकन लागले.

आता आपण पत्र लिहिण्याऐवजी ‘मेल टाकतो,’ फोन करण्याऐवजीही ‘कॉल टाकतो’, एवढेच काय आठवण करून देण्याऐवजीही ‘रिमाइंडर मारतो’! ‘तव नयनांचे दल हलले गं’ इतपत लक्ष ठेवण्याची गरज काय? व्हॉट्सअॅपवर ‘हृदय’ पाठवून प्रेम व्यक्त करता येते, ‘अश्रू’ पाठवून रडता येते आणि ‘जोडलेले हात’ पाठवून आदर व्यक्त करता येतो. भाषेत भेसळ करण्यापासून आपला प्रवास हळूहळू चिन्हांकित भाषेकडे होत असल्याचेच हे चिन्ह आहे.चित्रलिपीवाला चीन याही बाबतीत दूरदृष्टीचा ठरला बघा!  मुद्दा आला ना लक्षात? मग मी आता ‘कलटी मारतो’!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


श्रीकांत बोजेवार

(लेखक ज्येष्ठ पत्रकार-लेखक आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.