fbpx

विज्ञान: विकास की विध्वंस ?

 

मानव उत्क्रांतीत विज्ञानाचा वाटा निश्चितच फार मोठा आहे. मानवाने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर आपल्या आसपासचा निसर्ग समजून घेण्यात खूप प्रगती केली. आपले जीवन अधिक सुकर करण्यासाठी नवीन उपकरणांचा शोध लावला, तंत्रज्ञान विकसित केले. नवीन तंत्रज्ञानाच्या जोरावर अधिक सखोल संशोधन केले. विज्ञान व तंत्रज्ञान विकासाची गती दिवसेंदिवस वाढतच गेली. या सर्वांचा प्रभाव केवळ आपले जीवन सुकर करण्याच्या खूप पलीकडे गेलेला आज आपल्याला दिसते.

‘बळी तो कान पिळी’ ही म्हण आपण नेहमी ऐकतो. बळाच्या जोरावर राज्ये काबीज केली गेली. संपत्ती लुटली गेली. काही बलाढ्य देशांनी अमर्याद पद्धतीने नैसर्गिक साधनसामग्री वापरायला सुरुवात केली. आज एका बाजूला जगातील बहुसंख्य लोक आपल्यालासुद्धा बलाढ्य देशांनी साध्य केलेले जीवनमान उपभोगायला मिळावे, अशी आकांक्षा बाळगून आहेत तर दुसऱ्या बाजूला संसाधनांच्या शाश्वत उपलब्धतेबद्दल उभी असलेली प्रश्नचिन्हे व निसर्गाचा समतोल झपाट्याने ढळत असल्याची लक्षणे साऱ्या जगापुढे आ वासून उभी आहेत.

विज्ञानाचा वापर करून मानवाने अण्वस्त्रे बनविली. ज्यांनी बनविली त्यांनी इतरांवर मात्र ती निर्माण न करण्याची बंधने घातली आणि स्वतःची जागतिक आण्विक निःशस्त्रीकरणाची जबाबदारी मात्र सतत टाळली. हा असमतोल जगासाठी सततची डोकेदुखी होऊन बसला आहे. केव्हाही भडका होण्याची टांगती तलवार सतत जगाच्या डोक्यावर लटकलेली आहे.

या सर्वांचा विज्ञानाशी संबंध काय? संबंध नक्कीच आहे! एक तर बलाढ्य देश विज्ञान व तंत्रज्ञानाच्या जोरावरच बलाढ्य झाले आहेत. दुसरे म्हणजे उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्री वापरून नवीन नवीन सोयीसुविधा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच निर्माण केल्या गेल्या आहेत.Knowledge is power’ ही म्हण आपल्या परिचयाची आहे. विज्ञानाने नव्या सोयीसुविधा निर्माण केल्या, त्याचबरोबर सामर्थ्यही निर्माण केले. ज्यांनी विज्ञानाची कास धरली, ते पुढे गेले. जवळपास वसुंधरेचा ताबाच त्यांनी मिळवला. ज्यांना हे जमले नाही, ते मागे राहिले. हे होत असताना निसर्गाचा समतोल मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय, अशी चिंता निर्माण होण्याइतका बिघडला आहे हे मात्र निश्चित! काही जणांची मजल मानवाच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचे शेवटचे शतक सुरू झाले आहे, अशी भाकिते करण्यापर्यंत गेली. विज्ञानाने विकास केला, मानवाला सामर्थ्य दिले. पण कधी कधी यातून ‘माकडाच्या हाती कोलीत’ अशी परिस्थिती तर निर्माण झाली नाही ना किंवा भस्मासुर तर निर्माण केला नाही ना, अशी भीती मात्र नक्कीच वाटायला लागते.

मला वाटते, विज्ञानापेक्षा याचा खरा संबंध आपल्या जडणघडणीत आहे. कशा प्रकारची मूल्ये मानवजात जोपासते, यावर हे अवलंबून आहे. याबाबतीत भारतीय संस्कृतीतून जगाला बरेच काही शिकण्याजोगे आहे. आज तरुण मंडळी अधिक आत्मकेंद्रित होत असलेली दिसतात. आपल्यापेक्षा दुर्बल किंवा कमनशिबी लोकांच्याप्रती सहानुभूती व संवेदना सर्वांच्या मनात बिंबायला हवी. आपल्या शिक्षणपद्धतीत ज्ञान, विज्ञान, संस्कृती, समाज व उपक्रमशीलता या सर्व बाबी अंतर्भूत असणे व त्या विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे अत्यंत आवश्यक होय. आपल्याला संवेदनशील व सक्षम मानव निर्मिती अपेक्षित आहे. विकृत रोबो किंवा रोबोसदृश मानव नव्हे!

आपल्या दैनंदिन जीवनाच्या स्तरावरही तंत्रज्ञानाने जशा नवीन सुविधा उपलब्ध करून दिल्या, तसेच नवीन प्रश्नदेखील निर्माण केले आहेत. या संबंधीही थोडी चर्चा करणे येथे उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञानाने मानवी क्षमता खूप वाढते, हे जरी खरे असले तरी त्यामुळे आपले यंत्रावलंबन वाढून आपण पंगू तर होणार नाही ना, मानवाची कामे यंत्र करू लागले तर बेकारी वाढणार नाही ना, माहिती व दळणवळण तंत्रज्ञानाने सगळ्या गोष्टी जशा घडतात, जशा त्या आपल्याला उपलब्ध होत आहेत व लांबची परिचित-अपरिचित माणसे जवळ येत आहेत, पण जवळच्या माणसांतले सौहार्द विरळ तर होत नाही ना, अशा अनेक शंका सतत निर्माण होत आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला आपले स्वतंत्र मत बनवणे व व्यक्त करणे आवश्यक असले, तरी ‘सोशल मीडिया’मुळे अपप्रचार अधिक प्रभावी होऊन मुक्त लोकशाहीची जागा दिशाभूल केलेल्या लोकांची प्रबंधित अशी लोकशाही घेणार नाही ना, ही काळजी घेणेसुद्धा आवश्यक आहे.

कोवळ्या वयातील मुलांभोवती चांगले वातावरण असावे, असा आपला नेहमीच प्रयत्न असतो. तंत्रज्ञानाच्या सहज उपलब्धतेमुळे ते प्रदूषित होऊ नये, याची काळजी घ्यावयास हवी. जबाबदार नागरिक घडविण्याच्या कामात तंत्रयुगातील जबाबदाऱ्यांबद्दलची शिकवणही तरुण मंडळींच्या जडणघडणीत अंतर्भूत असायला हवी.

विज्ञान व तंत्रज्ञानाचा हा प्रवास दिवसेंदिवस अधिक गतिमान होत जाणार आहे. ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत जाणे, हे खरे तर सुसंस्कृत समाजाचे लक्षण होय. नवीन ज्ञान व तंत्रज्ञान झपाट्याने पुढे येत असताना त्याचा सदुपयोगच होईल, दुरुपयोग होणार नाही ही काळजी आपण व्यक्तिगत, सामाजिक व जागतिक स्तरावर घ्यायलाच हवी. दिवसेंदिवस नवीन तंत्रज्ञान पुढे येण्याचा वेग हा वाढतच जाणार असल्यामुळे, यासाठीची नियमन प्रक्रिया वेळेत स्थापित करणे कठीण होत जाणार आहे. व्यक्तिगत व सामाजिक स्तरावरील नीतिमत्ता व ज्ञान संस्थांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व म्हणूनच येणाऱ्या काळात खूप वाढणार आहे. स्वस्थ नीतिमत्ता व उच्च दर्जाच्या संस्थांची जपणूक व संवर्धन करणे म्हणूनच आपली जबाबदारी ठरते. ती आपण सांभाळली, तर विज्ञान नेहमीच वरदान ठरेल. मानवाच्या गरजा मानवाने निर्माण केलेल्या बुद्धिमान व शक्तिमान यंत्रे पूर्ण करतील व भविष्यातील मानव अधिक उच्च दर्जाच्या सृजनात्मक व रचनात्मक कामांत गुंतलेला असेल, अशी आशा करूया.


डॉ. अनिल काकोडकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.