मी - एक नापास आजोबा - पु. ल. देशपांडे

मी – एक नापास आजोबा

” सध्या तुम्ही काय करता? ” या प्रश्नाचं ” दोन नातवांशी खेळत असतो ” याच्याइतकं सत्याच्या जवळ जाणारं दुसरं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा- आजीच जाणतात. नातवंडं हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधीवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलताना जरासुद्धा तक्रार करीत नाहीत. उत्तम बुद्धिमत्तेचा सगळ्यात चांगला प्रत्यय बाळबुद्धीतून कसा येतो हे दुसऱ्या बाळपणाची पहिल्या बाळपणाशी दोस्ती जमल्याशिवाय कळत नाही. माझ्या बुद्धिमत्तेविषयी बाळगोपाळांना शंका असण्याचा माझा अनुभव जुना आहे. कठीण प्रश्न हे भाईकाकांना न विचारता माईआत्तेला विचारायला हवेत हा निर्णय वीसेक वर्षांपूर्वी दिनेश, शुभा वगैरे त्या काळात के. जी. वयात असलेल्या माझ्या बालमित्रांनी घेतला होता. माझ्या व्यक्तिमत्त्वातच, फक्त बाळगोपाळांना दिसणारा अज्ञानप्रदर्शक गुण असावा, नाहीतर इतक्या वर्षांनंतर अडीच वर्षांच्या चिन्मयलाही आमच्या घरातलं सर्वात वरिष्ठ अपील कोर्ट शोधायला माझ्या लिहिण्याच्या खोलीत न येता स्वयंपाकघराच्या दिशेनं जाणं आवश्यक आहे, हे कसं उमगतं? सध्या, ‘ म्हंजे काय? ‘ या प्रश्नाच्या माऱ्याला तोंड द्यावं लागत आहे. बरं, नुसत्या उत्तरानं भागत नाही. “ मला दाखव ” असा हुकूम सुटतो. त्यातून आता कनिष्ठ बंधूंनाही कंठ फुटला आहे. त्यामुळे शब्दांची नवी पालवी फुटल्यासारखा वाक्यांचा बहर फुलत असतो. आणि वाक्यरचनेत पूर्णविरामांनी संपणाऱ्या वाक्यांपेक्षा प्रश्नचिन्हांनी संपणारी वाक्यं अधिक. ‘ आकाश म्हंजे काय? ‘ पासून ते ‘ आंगन म्हंजे काय? ‘ इथपर्यंत हा प्रश्न जमीन- अस्मान आणि त्यातल्या अनेक सजीव-निर्जीव वस्तूंना लटकून येत असतो.

‘ आंगन म्हणजे काय? ‘ या प्रश्नानं तर माझी विकेटच उडवली होती. सहकारी गृहनिर्माण संस्कृतीत ‘ आंगन ‘ केव्हाच गायब झालेलं आहे. घरापुढची म्युनिसिपालटीनं सक्तीनं रस्त्यापासून बारा-पंधरा फूट सोडायला लावलेली जमिनीची रिकामी पट्टी म्हणजे आंगन नव्हे. तिथे पारिजात असावा लागतो. जमीन शेणानं सारवलेली असावी लागते. कुंपणाच्या एका कोपऱ्यात डेरेदार आंब्याचा वृक्ष असावा लागतो. तुळशीवृंदावनही असावं लागतं. रात्रीची जेवणं झाल्यावर एखाद्या आरामखुर्चीवर आजोबा आणि सारवलेल्या जमिनीवर किंवा फारतर दोन चटया टाकून त्याच्यावर इतर कुटुंबीय मंडळींनी बसायचं असतं. अशा अनेक घटकांची पूर्तता होते तेव्हा त्या मोकळ्या जमिनीचं आंगण होतं. कुंपणावरच्या जाईजुईच्या सायंकालीन सुगंधांनी आमोद सुनास जाहल्याचा अमृतानुभव देणारं असं ते स्थान. चिनूच्या ‘ आंगन म्हंजे काय? ‘ या प्रश्नाचं उत्तर देताना तो अडीच वर्षांचा आहे हे विसरून मी माझ्या बालपणात शिरलो. माझ्या डोळ्यापुढे आमच्या जोगेश्वरीतल्या घरापुढलं आंगण उभं राहिलं. मी त्या आंगणाचीच गोष्ट चिनूला सांगायला लागलो. त्याला त्यातलं किती कळत होतं मला ठाऊक नाही. पण विलक्षण कुतूहलानं भरलेले दोन कमालीचे उत्सुक डोळे एकटक या आजोबाला असं काय झालं अशा भावानं माझ्याकडे पाहताहेत आणि माझी आंगणाची गोष्ट ऐकताहेत एवढंच मला आठवतं. चिमूचं ते ऐकणं पाहण्याच्या लोभानं मी मनाला येतील त्या गोष्टी त्याला सांगत असतो. मात्र त्यात असंख्य भानगडी असतात. एखाद्या पुस्तकातल्या हत्तीच्या चित्रावरून हत्तीची गोष्ट सांगून झाली की, ‘ ही आता वाघाची गोट्ट कल ‘ अशी फर्माईश होते. एके काळी पौराणिक पटकथेत झकास लावणीची ‘ स्युचेशन ‘ टाकण्याची सूचना ऐकण्याचा पूर्वानुभव असल्यामुळे मी त्या हत्तीच्या कथेत वाघाची एन्ट्री घडवून आणतो. हत्तीच्या गोष्टीत वाघ चपखल बसल्याच्या आनंदात असताना धाकट्या बंधूंचा शिट्टी फुंकल्यासारखा आवाज येतो, ” दाखव ”

“ काय दाखव? ” मी

“ व्हाग! ” चि. आश्विन

हत्तीच्या चित्रात मी केवळ या बाबालोकाग्रहास्तव वाघाला घुसवलेला असतो. प्रत्यक्ष चित्रात तो नसतो. पण हत्तीला पाहून डोंगरामागे वाघ कसा पळाला याची गोष्ट रचावी लागते. सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या निर्मितीक्षम प्रतिभेची सकाळ- संध्याकाळ अशी तोंडी परीक्षा चालू असते. पहिली गोष्ट चालू असताना ‘ दुशली शांग ‘ अशी फर्माईश झाली की पहिल्या गोष्टीत आपण नापास झालो हे शहाण्या आजोबानं ओळखावं आणि निमूटपणानं दुसऱ्या गोष्टीकडे वळावं. या सगळ्या गोष्टींना कसलंही कुंपण नसल्यामुळे इकडल्या गोष्टीतला राजा तिकडल्या गोष्टीतल्या भोपळ्यातून टुणूक टुणूक जाणाऱ्या म्हातारीला जाम लावून पाव देतो. वाघाचा ‘ हॅपी बड्डे ‘ होतो आणि ‘ इंजिनदादा इंजिनदादा काय करता? ‘ या गाण्यातल्या इंजिनाला रुळावरून उचलून आकाशात नेणारी स्वकृत कडवीही तयार होतात.

लहान मुलांसाठी लिहिलेलं प्रत्येक गाणं आपण नव्यानं रचलं पाहिजे असा चिनूचा आग्रह असतो. त्यामुळे ‘ इंजिनदादा इंजिनदादा काय करता? ‘ या गाण्याचं ‘ चिनूदादा चिनूदादा काय करता ‘ होतं. मग ‘ कोळसा मी खातो, पाणी मी पितो, गावाला जातो नव्या नव्या ‘ ऐवजी ‘ इदली मी खातो, शांबाड मी पितो, हातेलात ज्यातो नव्या नव्या ‘ होतं. त्याच्या अशा रचना पाहिल्या की मला धडकी भरते. भविष्यकालीन साहित्य संमेलनात दीडदोनशे कवींच्या लायनीत आपली कविता गाण्यासाठी नंबर धरून उभा असलेला चिन्मय हे काही माझ्या मनाला भुरळ घालणारं चित्र नाही.

पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापाशी मोठं सुंदर कारंजं आहे. ‘ इनरशिटीपुढलं काडंजं ‘ बघायला जाणं हा या नातवंडांबरोबरचा दिवसाआडचा कार्यक्रम असतो. ते कारंजं कसं पाहायचं हे मात्र या आजोबाला या नातवांनी शिकवलं. ते कारंजं कधीकधी बंद असतं. पण ते बंद नसून त्याला ‘ झोप आली ‘ हे मला चिनूमुळे समजलं. ‘ शांग शांग भोलानाथ आज काडंजं उडेल काय? ‘ असं म्हणत म्हणत त्या रस्त्याला लागायचं असतं आणि तेधून परतताना त्या नाचत्या फवाऱ्यांना ‘ गुड नाइट श्लीप टाइट ‘ करावं लागतं. कारंजाला गुड नाइट केलं नाही तर ते ‘ ललतं ‘ हे गुपित मला चिनूकडून कळलं. सध्या मला जीवनातल्या अनेक गुह्यतम गोष्टी सांगणारे हे दोन गुरू लाभले आहेत. थकत चाललेल्या डोळ्यांना नव्या ताकदीनं जगाकडे पाहायला शिकवणाऱ्या गुरुजनांची आवश्यकता होती. पाषाणच्या तलावात ट्रक्स धुतात असं मी मानत होतो, पण तिथे ट्रकला ‘ आंघोल घालतात पन त्लक ललत नाही ‘ ही बातमी चिनूने दिली. आशूचे हात ‘ शच्छ ‘ धुतल्यावर ‘ कमलाशाडके दिशतात ‘ हेही मला कळलेलं नव्हतं. पण स्वारी गद्यात असते तोपर्यंत ठीक असतं, पण ‘ भुश कडणाड्या त्लकचं गाणं शांगना ‘ असली ऑर्डर आली की मी हैराण होतो. आज या वयातही सहजपणानं जुळलेलं एखाद्या कवितेचं यमक पाहून एखाद्या शाळकरी मुलासारखा मला अचंबा वाटतो. शब्दांच्या नादानं कविता नाचायला लागली की आनंद कसा दुथडी भरून वाहतो याचं दर्शन शब्दांच्या खुळखुळ्यांशी खेळणाऱ्या पोरांच्या चेहऱ्यावर होतं. पण नातवंडांबरोबर आजोबांनाही तो खेळ साधला तर हरवलेलं बालपण पुन्हा गवसतं. हल्ली हा खेळ मला रोज खेळावा लागतो. एकदा या चिमू- आशूला घेऊन ‘ चक्कड माडायला ‘ निघालो होतो. ‘ बाबा ब्लॅकशीप पासून ‘ शपनात दिशला लानीचा बाग ‘ पर्यंत गाण्याचा हलकल्लोळ चालला होता. शेवटी हा तारसप्तकातला कार्यक्रम आवरायला मी म्हणालो, “ आता गाणी पुरे, गोष्टी सांगा. ” गोष्टीत किंचाळायला कमी वाव असतो.

“ कुनाची गोट्ट? ”

“ राजाची गोष्ट सांग… आशू चिनूदादा गोष्ट सांगतोय, गप्प बसून ऐकायची. हं, सांग चिनोबा… ”

“ काय? ”

“ गोष्ट! ”

“ कशली? ”

“ राजाची. ” मग चिमूनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.

“ एक होता लाजा. ” त्यानंतर डोळे तिरके करून गहन विचारात पडल्याचा अभिनय. आणि मग दुसरं वाक्य आलं, ” तो शकाली उठला आनि फुलाकले गेला. ”

“ कोणाकडे? ” शिकारीबिकारीला जाणाऱ्या राजांच्या गोष्टी मी त्याला सांगितल्या होत्या. पण हा फुलाकडे जाणारा राजा बहुधा शांतिनिकेतनातला जुना छात्र असावा.

“ फु… ला… क… ले… ” चिनू मला हे आवाज चढवून समजावून सांगताना माझ्या प्राचीन शाळामास्तरांच्या आवाजातली ‘ ब्रह्मदेवानं अक्कल वाटताना चाळण घेऊन गेला होतास काय पुर्ष्याऽऽ ‘ ही ऋचा पार्श्वसंगीतासारखी ऐकू आली.

“ बरं, फुलाकडे.. .मग? ”

“ मग फुलाला म्हनाला फुला ले फुला, तुला वाश कोनी दिला? ” क्षणभर माझ्या डोळ्यांवर आणि कानांवर माझा विश्वास बसेना. हे एवढंसं गोरंपान ध्यान उकाराचे उच्चार करताना लालचुटूक ओठांचे मजेदार चंबू करीत म्हणत होतं, “ लाजा फुलाकडे गेला आनि म्हनाला फुला ले फुला तुला वाश कोनी दिला? ”

एका निरागस मनाच्या वेलीवर कवितेची पहिली कळी उमलताना मी पाहतोय असं मला वाटलं. “ मग फूल काय म्हणालं? ” एवढे चार शब्द माझ्या दाटलेल्या गळ्यातून बाहेर पडताना माझी मुश्कील अवस्था झाली होती.

“ कोनाला? ”

“ अरे राजाला. राजानी फुलाला विचारलं ना. फुला रे फुला तुला वास कोणी दिला? मग फुल काय म्हणालं? ”

“ तू शांग…”

मी काय सांगणार कपाळ! फुला रे फुला तुला वास कुणी दिला या प्रश्नाचं उत्तर द्यायला लावणारी बालकवी, आरती प्रभू किंवा पोरांच्या मनात नांदणारी गाणी लिहिणाऱ्या विंदा करंदीकर, पाडगावकरांना लाभलेल्या प्रतिभेची वाटणी चालू असताना देवापुढे चाळण नेण्याची दुर्बुद्धी मला नक्की झालेली असावी. ‘ फुला रे फुला तुला वास कोणी दिला? ‘ या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला सापडलेलं नाही. सुदैवानं परीक्षक हा प्रश्न विचारल्याचे विसरून गेले असले तरी त्या परीक्षेत मी नापास झाल्याची माझी भावना मला विसरता येत नाही. नुसती गोळ्या-जर्दाळूची लाच देऊन आजोबा होता येत नाही. त्याला फुलाला वास कोणी दिला या प्रश्नाचं उत्तरही ठाऊक असावं लागतं आणि तेही यमकाशी नातं जुळवून आलेलं.


 – पु. ल. देशपांडे । कालनिर्णय जानेवारी १९८५

3 comments

  1. Beautiful! took me back to the lovely times I spent troubling my grandfather 🙂

  2. अप्रतिम, शब्द अपुरे पडणे हे कधी होतं ते हा लेख वाचून त्यावर टिप्पणी लिहायचा हा प्रयत्न करतांना कळलं…

  3. Sunil Sawant

    सद्या मी त्याच फेजमधून जातोय. फारच सुंदर.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.