महती ज्ञानेश्वरीची

ज्ञानेश्वरी हा मराठी साहित्यातील एक अलौकिक असा ग्रंथ आहे. त्याची महती सांगताना ज्ञानकोशकार डॉ.श्री.व्यं.केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश (२१वा विभाग) यामध्ये असे लिहिले आहे की, ‘‘ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतील ‘काव्यारावो’  म्हणून प्रसिद्ध असलेला ग्रंथ श्री ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये श्रीक्षेत्र नेवासे येथे यादव कुलांतील राजे रामदेवराव हे देवगिरीस राज्य करीत असताना लिहिला.

मराठी भाषेतील श्रीमद् भगवद्-गीतेवरील पहिली टीका म्हणजे ज्ञानेश्वरीच.ज्ञानेश्वरीचा विशेष हा आहे की, ज्ञानेश्वर हे प्रत्येक शब्दास प्रतिशब्द देऊन टीका करीत नाहीत.गीतेतील श्लोकांचे अर्थ लक्षात आणून, किंबहुना अर्थरूप बनून, तो अर्थ जगाच्या कल्याणाकरिता ज्ञानेश्वरीच्याद्वारे ज्ञानेश्वर देत आहेत.ज्ञानेश्वरी व गीता हे इतके एकार्थावर आरूढ होऊन लिहिलेले ग्रंथ आहेत.भाषा या दृष्टीने तर हा ग्रंथ निरूपम आहे. ज्ञानेश्वरांच्या तात्त्विक मतांशी पटो वा न पटो, पण जो जो हा ग्रंथ वाचतो अथवा वाचील त्यास ज्ञानेश्वरांनीच पुन्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तरी अशी साधणार नाही असेच वाटेल.

ज्ञानेश्वरीचा विशेष हाच आहे की, तिचे सौंदर्य अष्टपैलू आहे. भगवद्गीतेवरील टीकाग्रंथ या दृष्टीने विचार केला, तर ज्ञानेश्वरीसारखी बिनमोल टीका भगवद्गीतेवर दुसरी झाली नाही हे जितके खरे आहे तितकेच अध्यात्मज्ञानाचे प्रतिपादन करणारा शास्त्रग्रंथ ज्ञानेश्वरीच्या पंक्तीत बसविण्याजोगा मराठी भाषेत दुसरा नाही हेसुद्धा खरे आहे. स्वतंत्र काव्यग्रंथ या दृष्टीने पाहिले तरीही ज्ञानेश्वरी हे मराठी काव्यग्रंथांचे शिरो-भूषणच आहे.

ज्ञानेश्वरांचे निसर्गावलोकन अत्यंत व्यापक व मार्मिक आहे. ज्ञानेश्वरीत शास्त्रीय कल्पनाही पुष्कळ आलेल्या आहेत. सूर्याची स्थिरता, त्याचे स्वयंप्रकाशित्व, त्याच्या प्रकाशाची तीव्र गती, त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, चंद्र-सूर्याची ग्रहणे, वनस्पतींचे सजीवत्व वगैरे अनेक शास्त्रीय गोष्टींचे उल्लेख ज्ञानेश्वरीत आढळतात. ज्ञानेश्वरीचा विशेष म्हणजे तींतील मार्दव हा होय. तींतील बोल डोळ्यालाही खुपणार नाहीत, इतके मृदु आहेत.’’

या ग्रंथावर गेल्या सात शतकांत अगणित टीका, भाष्ये, समीक्षा प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि मूलगामी व स्वतंत्र चिकित्सेमुळे मराठी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे प्रा. म. वा. धोंड ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांमध्ये ख्यातकीर्त आहेत.

प्रा. म. वा. धोंड यांनी ज्ञानेश्वरीवर तीन पुस्तके लिहिलेली आहेत – १. ‘ज्ञानेश्वरी : स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य’, २. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’, ३. ‘ऐसा विटेवरी देव कोठे’.

ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका आहे, हा समज ज्ञानदेवांच्या कालापासूनचा. ज्ञानेश्वरांची समकालीन जनाबाई व ज्ञानेश्वरीचे आद्य संशोधक संत एकनाथ यांनीही ज्ञानेश्वरीचा टीका या शब्दाने उल्लेख केलेला आहे. विसोबा खेचरांच्या अभंगातही ज्ञानेश्वरीच्या भावार्थदीपिका या नावाचा उल्लेख करून तिला टीका असेच संबोधले आहे. स्वतः श्री. म. वा. धोंड यांनी ‘ऐसा विटेवरी देव कोठे’ या पुस्तकात महाराष्ट्रातील भागवत धर्माचा आद्य ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी ही गीता-टीका आहे असा बहुधा अनवधानाने उल्लेख केला आहे.

वास्तविक टीका ही ग्रंथ सुबोध करण्याकरिता रचली जाते व तिची एक विशिष्ट रचना असते. श्लोकातील वा सूत्रातील पदांचा परस्परांशी व मागील, पुढील श्लोकांशी वा सूत्रांशी अन्वय लावायचा, अध्याहृत पदे पुरवायची, समास सोडवायचे, शब्दांचे अर्थ द्यायचे, श्लोकाचे वृत्त व त्यातील अलंकार स्पष्ट करायचे, असे टीकेचे स्वरूप असते. टीका ग्रंथाची वरील वैशिष्ट्ये अभावानेच असल्याने ज्ञानेश्वरी ही गीतेवरील टीका नव्हे, हे स्पष्ट होते.

लोकमान्यांसारख्या व्यासंगी अभ्यासकाने ज्ञानेश्वरी ही टीका नाही, हे लक्षात घेऊन तिला ‘भाष्य’ अशी संज्ञा दिली. भाष्याचे स्वरूप सांगताना लोकमान्य असे म्हणतात की, भाष्यकार एकंदर ग्रंथाचे न्याय्यरीत्या पर्यालोचन करून आपल्या मते त्यातील तात्पर्य काय व त्यानुसार ग्रंथाचा अर्थ कसा लावावा, हे सांगत असतात. गीतेवरील शांकर भाष्याचे स्वरूप याच प्रकारचे आहे.

ज्ञानेश्वरी हा ज्ञानदेवांनी घेतलेला गीतार्थाचा शोध आहे. ज्ञानेश्वरी हा गीतानुभव आहे याचा उत्कट प्रत्यय येतो तो ११व्या अध्यायात. या अध्यायातील विश्वरूप प्रत्ययकारी झाले आहे ते दर्शन घेणाऱ्ऌया अर्जुनाच्या चित्रणाने होय.

 

तळटीप : मराठी भाषेच्या उगम-स्थानीच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून माऊलींनी मराठीला श्रीमंत आणि समृद्ध करून ठेवले आहे. आपली मातृभाषा मराठी आणि तिची जन्मदात्री माऊली ही आपली मोठी बलस्थाने आहेत.

श्री. शरद काळे यांचा ‘म. वा. धोंड यांच्या नजरेतून ज्ञानेश्वरी’ हा विस्तृत लेख कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी २०१८ ह्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. शब्दमर्यादेमुळे त्यातील फक्त काही भाग  येथे प्रसिद्ध केला आहे. जिज्ञासूंनी पूर्ण लेख दिवाळी अंकात जरूर वाचावा.- संपादक

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.