न्यायमूर्ती रानडे

लोकोत्तर महापुरुषांच्या असामान्य गुणांचे दर्शन त्यांच्या लहानपणीच घडू लागते. न्यायमूर्ती रानडे याची शांत, समंजस, न्यायी वृत्ती अशीच त्यांच्या लहानपणीच्या अनेक घटना-प्रसंगांमधून दिसून येते.

घरातील खांबाकडून पराभव

एकदा आईने माधवाच्या दोन हातांवर बर्फीचे दोन तुकडे ठेवले त्यातील मोठा तुकडा माधवासाठी आणि लहान तुकडा मोलकरणीच्या मुलासाठी होता, पण ते सांगावयास आई विसरली. परिणामी छोट्या माधवाने मोठा तुकडा मोलकरणीच्या मुलाला देऊन लहान तुकडा स्वत: खाल्ला. कोजागरीला रात्री जागरण करण्याचा परिपाठ रानडे कुटुंबीय आणि त्यांचे शेजारी या दोन्ही घरात होता. एका कोजागरीला शेजारी बाहेरगावी गेले होते. लहान बहीण झोपी गेली होती आणि जागरण तर करायचेच होते म्हणून मग माधवाने घराच्या एका खांबाला प्रतिपक्षी करून सोगट्यांचा डाव मांडला. उजव्या हाताने ते खांबासाठी खेळत, तर डाव्या हाताने स्वतःसाठी खेळत. विशेष म्हणजे या खेळात खांबाचा विजय झाला आणि अर्थातच माधव हरला. तो खेळ पाहत बसलेल्या चुलतीने माधवाला खांबाकडून हरल्याबद्दल चिडविले, पण माधवाने ती थट्टा शांतपणे सहन केली.

बाबासाहेब आंबेडकर व रानडे

डॉ. आंबेडकरांनी माधवरावांना पाहिले नव्हते. बाबासाहेब सातारच्या हायस्कूलमध्ये शिकत असताना माधवरावांच्या निधनाबद्दल शाळेला रजा दिली होती. पुढे प्रौढ वयात जुने कागद चाळताना बाबासाहेबांना हरिजनांपैकी एका जातीच्या वतीने हिंदुस्थान सरकारला केलेल्या अर्जाच्या नकलेचे कागद मिळाले. १८९२ मध्ये सरकारने त्या विशिष्ट हरिजन जातीला लष्करात भरती करू नये, असा हुकूम काढला होता. त्या हुकमाविरुद्ध माधवरावांनी अर्ज केला होता. त्यामुळे कुतूहलापोटी बाबासाहेबांनी रानडे यांचे चरित्र व लेखन यांचे मननचिंतन केले आणि १९४३ मध्ये पुण्याला माधवरावांच्या तिथीला भाषणही केले. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,

” हिंदुस्थानाच्या अर्वाचीन इतिहासात विद्वत्ता, व्यवहारचातुर्य आणि दूरदृष्टी या गुणात रानड्यांच्या जोडीला बसविण्याजोगी दुसरी व्यक्ती सापडणे कठीण आहे. ज्ञानाच्या विषयाला स्पर्श केला व त्या विषयात रानड्यांनी पारंगतता मिळविली नाही, असा खरोखर एकही विषय दाखविता येणार नाही. त्यांचा विद्याव्यासंग अवाढव्य होता. विद्वत्ता जणू काय त्यांच्या रोमारोमात भिनलेली होती. त्यांचा मोठेपणा त्यांच्या काळातील किंवा आजच्या काळाची कसोटी लावली तरी अबाधित राहणार आहे. रानड्यांच्या मोठेपणाचा खरा आधार त्यांनी पत्करलेली समाजसुधारकाची भूमिका हा आहे. समाजसुधारकांच्या ठिकाणी ध्येयदृष्टी व धैर्य हे गुण प्रामुख्याने असावे लागतात.  ध्येयदृष्टीला शोभणारे त्यांचे धैर्य होते. ते द्रष्टे होते.”

१८९३ च्या सुरुवातीला हायकोर्टात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याच्या योग्यतेचे कोण कोण आहेत याची जेव्हा सरकारकडून पाहणी केली गेली, तेव्हा त्या वेळी केलेल्या यादीत पहिले नाव माधवरावांचे होते. २३ नोव्हेंबर १८९३ या दिवशी माधवराव न्यायमूर्ती झाले. तत्पूर्वी ठाण्याच्या सेशन जज्जच्या जागी नेमणूक झाल्याबद्दल १८८० मध्ये पुणेकरांनी त्याचा अभूतपूर्व सत्कार केला. त्या सत्काराचे वर्णन ‘ महादेवोत्सव ‘ असे केले गेले. पुण्यातील एकूण एक संस्थांनी माधवरावांचा सत्कार केला. हिराबागेत दीपोत्सव आणि दारूकामही केले गेले. माधवराव घराहून समारंभस्थळी निघाले. तेव्हा दुतर्फा उभ्या असलेल्या त्यांच्या चाहत्यांनी पुष्पवृष्टी केली पुण्यातील बहुतेक संस्थांना माधवरावांनी देणग्या दिल्या होत्या. या सत्कारानंतर त्यानी पुन्हा २५००० रुपये काही प्रमुख सस्थांना देणगी म्हणून दिले.

‘सन्मार्गाकडे अश्रृंखल प्रवृत्ति असणे व असद्विचारांचा प्रवेश मनात कधीही न होणे हाच आम्ही मोक्ष समजतो. ‘

अशी मोक्षाची उदात्त व्याख्या न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये व्दारी – ज्ञानाचा उद्गार   

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.