मकरसंक्रात

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   January 13, 2018 in   Festivals

मकरसंक्रात

 

मकरसंक्रात हा सण मूळ तीन दिवसांचा असून भोगी, संक्रांत आणि किक्रांत अशी या तीन दिवसांची नावे आहेत. दक्षिणेकडे याचवेळी ‘ पोंगल ‘ म्हणून जो सण साजरा होतो, तोदेखील तीन दिवसांचा असतो पहिल्या दिवशी ‘ भोगी पोंगल ‘ अथवा इंद्रपोंगल म्हणून तो इंद्रासाठी साजरा करतात तर तिसऱ्या दिवशी ‘ मट्ट पोंगल ‘ हा गाईगुरांची पूजा करून साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्य मकरराशीत भ्रमण करू लागतो. तोपर्यंत जे दिवस थंडीने लहान झालेले असतात, ते संक्रांतीपासून तिळातिळाने वाढू लागतात. हा सण माघ शुद्ध सप्तमीपर्यंत साजरा केला जातो.

इतर राज्यांतील संक्रांत


गुजरातमध्ये संक्रातीच्या दिवशी आबालवृद्ध, स्त्री-पुरुष सारी मंडळी पहाटेपासून रात्रीपर्यंत पतंग उडविण्यात दंग असतात. संक्रातीच्या दिवशी तळलेले पदार्थ पक्वान्न म्हणून केले जात नाहीत. उत्तर भारतात तर चुलीवर तवा ठेवत नाहीत. दक्षिणेत खीर केली जाते, तर कोकणात घावन घाटल्यासारखे पक्वान्न केले जाते. देशावर गुळाच्या पोळ्या केल्या जातात. वांग्याचे भरीत, तीळ घातलेली बाजरीची भाकरी असा बेतही हौसेने केला जातो. तामिळनाडूत भोगीला ‘भोगी पोंगल’ म्हणतात. त्या दिवशी तिथे इंद्रपूजा आणि आप्तेष्टांना गोडाचे जेवण हे प्रमुख सोपस्कार असतात. अंगणात सूर्याच्या साक्षीने चुलीवर दुधाची खीर करुन ती ऊतू जाऊ देतात.

या दिवशी गंगास्नानाला विशेष महत्त्व असल्याने प्रयागक्षेत्री यात्रा भरते. भारताच्या पूर्व भागात बंगालमध्ये या दिवशी वास्तुदेवता म्हणून बांबूची पूजा केली जाते तसेच काकवीत तीळ घालून ‘ तिळुवा ‘ नावाचा पदार्थ करून तो एकमेकांना दिला जातो. उत्तरेत भावजय नणंदेला घरच्या आर्थिक परिस्थितीनुरूप वस्त्र, फळफळावळ, मिठाई, तीळ, डाळ, तांदूळ असे पदार्थ भेट म्हणून पाठविते. या प्रथेला संकरांत देना असे म्हणतात या दिवशी घरच्या आणि गावच्या देवांना तीळ-तांदूळ वाहण्याचीही प्रथा आहे. भारतभर हा सण वेगवेगळ्या तऱ्हेने पण सारख्याच उत्साहाने साजरा केला जातो. त्याच्या तऱ्हा भिन्न असल्या तरीही उद्देश सुर्याब्द्द्ल कृतज्ञता भाव व्यक्त करणे; तसेच आपापसातील स्नेहभाव वृद्धींगत करणे हाच असतो.

महाराष्ट्र व मकरसंक्रात


आपल्या महाराष्ट्रात सवाष्णी सुघड पुजून वेगवेगळी वाणे एकमेकींना देतात. घरी, देवळात हळदीकुंकू समारंभही केले जातात. आपल्याकडे तीळगूळ, तिळाचा हलवा, तिळाच्या वड्या एकमेकांना देऊन ‘ तीळगूळ घ्या गोड बोला ‘ असा स्नेहाचा संदेश दिला जातो. ह्यातही तिळगूळ हा मोठ्यांनी लहानांना द्यावयाचा असा संकेत आहे. जुना वैरभाव, अबोला, दुरावा, राग विसरुन नातेसंबंध पुन्हा एकदा नव्याने दृढ करण्याची गोड संधी तिळगुळाच्या निमित्ताने सर्वांनाच मिळते. या दिवशी संक्रांतीने संकरासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केले. तर दुसऱ्या दिवशी देवीने किंकरासुराचा वध केला.  म्हणून या दोन दिवसांना संक्रांत आणि किक्रांत अशी नावे पडली. अक्षय्य तृतीयेप्रमाणेच या दिवशीही दान देण्याला फार महत्त्व आहे. या दिवशी श्राद्ध करण्याचीदेखील प्रथा आहे.

कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात. ग्रामस्थ मंडळी देवीला तीळगूळ द्यायला येतात. देवीच्या ओटीच्या साहित्यात गहू किंवा तांदळांबरोबर उसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, गाजराचे तुकडे, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेगा असे पदार्थही असतात. काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याचीही पद्धत आहे. कोकणात काही कुटुंबांत दुसऱ्याच्या घरातील आधणात आपल्या घरचे तांदूळ नेऊन वैरण्याची प्रथा होती तसेच शेजारच्या घरी उंबरठ्याच्या आत खेळणा-रांगणा म्हणून असोला नारळ सोडला जातो.

पुढील सहा गोष्टी मकरसंक्रात दिवशी करण्यास विशेष महत्त्व दिले गेले आहे-

  1. तीळ वाटून अंगाला लावणे.
  2. तीळ घातलेल्या पाण्याने स्नान करणे.
  3. तीळ होम करणे.
  4. पितरांना तिलोदक देणे.
  5. तीळ खाणे.
  6. तीळ दान देणे.

तिळाचे पीक इतर धान्यांपेक्षा कितीतरी अधिक येते. त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचे प्रतीकही मानले गेले. आपल्या मराठीत ‘ एक तीळ सातजणांनी वाटून खावा ‘ अशी एक म्हण आहे ही म्हण आपल्याला समानतेचा, समतेचा संदेश देते. आजकाल मात्र दुसऱ्याच्या मालकीचे सगळे काही आपल्या एकट्याच्या मालकीचे कसे होईल, हे बघण्याकडे माणसाचा कल झुकू लागला आहे.

या सणाचे विशेष म्हणजे मकरसंक्रांती हा सण एकदोन दिवसांचा नसून तो पुढे माघ शुद्ध सप्तमीपर्यंत(म्हणजेच रथसप्तमीपर्यंत) दीर्घकाळ चालणारा सण आहे.

“तीळगूळ घ्या, गोड गोड बोला !”


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर | देवाचिये द्वारी- ज्ञानाचा उद्गार