निद्रानाश

Published by डॉ. प्रकाश प्रधान on   March 15, 2019 in   2019मराठी लेखणी

झोप ही सर्व मनुष्यांना व सर्व प्राणिमात्रांना निसर्गाने दिलेली एक अमोल देणगी आहे व ती एक महत्त्वाची शारीरिक व मानसिक गरज आहे. भूक व तहान यांसारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी थोडी अधिक मेहनत किंवा कष्ट घ्यावे लागतात. परंतु झोप ही मात्र कशीही कुठल्याही जागी (बसल्या-बसल्यासुद्धा) सहज मिळणारी, पूर्ण विश्रांती देणारी व हुशारी आणि हुरूप देणारी सुखावस्था आहे. गरीब किंवा श्रीमंत, लहान अथवा थोर या सर्वांना समप्रमाणात झोपेची गरज भासते व ती मिळते. या महत्त्वाच्या गरजेसाठी निसर्गाने रात्रीसारखा खास वेळदेखील निर्माण करून ठेवली आहे.

परंतु काही लोक मात्र झोपेच्या बाबतीत तेवढे नशीबवान नसतात. निद्रानाश अथवा झोपेचे विकार त्यांना सारखे त्रास देतात व अस्वस्थ करून टाकतात. एरव्ही सहज शक्य असलेली आणि त्रास न घेता मिळणारी गोष्ट अशी दुर्लभ, अशक्य अथवा असमाधानकारक का होते हे माहीत असणे आवश्यक आहे.

योग्य झोपः जन्मलेले बालक काही दिवस बहुतेक वेळ झोपते व मधूनमधून अल्प वेळ जागे होते. लहान मुले बहुतेक दुपारी २ ते ३ तास व रात्री १० ते १२ तास झोपतात. मोठी मुले ८ ते १० तास झोपतात. तरुणांना ७ ते ८ तासांची झोप जरूर असते. प्रौढांना ६ ते ७ तासांची झोप पुरेशी असते. जसजसे वय वाढत जाते तसतशी झोपेची वेळ कमी होते व उतारवयात ४ ते ५ तास झोप पुरेशी वाटते.

झोपेची सर्वसाधारण पद्धतः रात्री जेवणानंतर अर्ध्याएक तासाने बहुतेकांना सुस्ती येते व सवयीप्रमाणे लगेच अथवा २ ते ३ तासांनी बरेच लोक झोपी जातात. कधीतरी मध्येच जागही येते (बहुधा स्वप्नामुळे किंवा बाहेर झालेल्या आवाजामुळे); पण या अल्पखंडानंतर लवकरच परत झोप लागते. सकाळी ६ ते ७ तासांनी सवयीच्या वेळेला जाग येते. अशा दीर्घ विश्रांतीनंतर समाधानाने व हुरूपाने सर्वजण नित्याचे व्यवहार सुरू करतात. अशा या दीर्घ विश्रांतीमध्ये जरी शरीर हालत नसले तरी त्यातले रासायनिक व्यवहार शरीराला व मेंदूला उपयुक्त अशा प्रोटिन्स, कार्बोहैड्रेटस्, स्निग्ध पदार्थ व इतर हार्मोन्स व एन्झाईमची निर्मिती करते व दिवसभरातील झीज भरून काढते. दुसऱ्या दिवसाचीही आगाऊ तयारी जेवढी शिस्तबद्धृ, कार्यक्षम व उपयुक्त आहे तेवढीच ती गूढ (समजण्यास), अद्भुत व शास्त्रज्ञांना अवकाशाइतकीच आव्हान देणारी एक आश्चर्यकारक शरीरवस्था आहे.

झोपेच्या बाबतीत असे आढळून येते की, प्रत्येकाची झोपण्याची एक विशिष्ट वेळ असते, एका विशिष्ट परिस्थितीची जरूर असते आणि एका ठराविक शारीरिक स्थितीतच ती येते. काळोखातच काहींना झोप लागते, तर झिरो पॉवरच्या प्रकाशातच काहींना झोप लागते. कोणी कुशीवर झोपी जाते, तर कोणी उताणे. कुणाला पोटाशी उशी अथवा चादर घेऊन व वरती पंखा चालू ठेवून झोपण्यात मनमुराद आनंद मिळतो. ठराविक जागा, ठराविक चादर, ठराविक बिछाना या सवयीने निर्माण झालेल्या गोष्टी झोपेस पूरक बनतात. या झोपण्याच्या पद्धतीत काही अडथळे निर्माण झाल्यास झोप उडू शकते. परंतु लगेच झोप येते. उदा. अचानक पडलेल्या दिव्याचा उजेड, घरात अथवा बाहेर आलेला आवाज, वेगवेगळ्या गल्ल्यांतल्या कुत्र्यांचे सामुदायिक भुंकणे, रस्त्यावर अवास्तव मोठ्याने तासनतास गप्पा मारणारे निशाचर नागरिक, अशाच अनेक कारणांमुळे झोप कमी मिळाल्यास सकाळी उठल्यानंतर डोळे चुरचुरतात, सुस्त व परत झोपावेसे वाटते. अंग व डोके जड वाटते. पाहिजे तेवढा जोम वाटत नाही. दुसऱ्या दिवशी रात्री माणूस लवकर झोपतो व ती उणीव भरून निघते.

निद्रानाशाचे प्रकार व उपायः काही शारीरिक आजारांमुळे झोप येणे अशक्य होते. उदा. सतत येणारा खोकला, दुखत राहिलेला दात, सतत दुखणारा कान. इतर अनेक कमी-अधीक गंभीर आजारांनीदेखील झोप येणे अशक्य होते. अशा कारणांसाठी योग्य तपास करून उपचार होणे आवश्यक आहे.

काही विशिष्ट शारीरिक आजार नसल्यास निद्रानाशाची बहुतेक कारणे मानसिक अस्वास्थातून सध्या निर्माण झालेली असतात.

झोप येण्यास वेळ लागणेः वैयत्किक, प्रापंचिक अथवा इतर समस्यांच्या काळजीमुळे बहुतेक सर्वांना झोपेचा त्रास कमी-अधिक प्रमाणात होतो. अशा अडचणी दूर झाल्यावर अथवा त्यांची सवय पडल्यावर परत झोप लागते. परंतु तसे काहींच्या बाबतीत न होता बराच वेळ झोप न लागल्यावर उशिराने केवळ थकल्यामुळे झोप लागण्याची एक सवय लागून जाते. यासाठीच रात्री जेवल्यावर मन मोकळे करणाऱ्या गप्पा मारणे, समाधान देणाऱ्या करमणुकीत वेळ काढणे, योग्य प्रकारे व माफक वाचन इत्यादी अनेक गोष्टींनी चटकन झोप येण्यास मदत होते. स्तोत्र-श्लोक म्हणणे, जप करणे, मंद संगीत चालू ठेवणे अशा पद्धतींनी प्रत्येक व्यक्तीला सुलभ तऱ्हेने झोप येणे शक्य होते. रिलॅक्सेशन (Relaxation) हा झोप पटकन आणणारा बिनऔषधाचा एक शारीरिक-मानसिक व्यायाम आहे. सर्व अंग, स्नायू सैल सोडून, सांधे सैल सोडून शांत व मनसोक्त श्र्वास घेत पडून राहिल्यास व मन केवळ याच सुस्थितीवर केंद्रित केल्यास आपोआप हळूहळू सुस्ती येते व झोप लागते. बाहेरून येणाऱ्या, मनात निर्माण होणाऱ्या संवेदना, विचार, काळज्या कमी केल्यास मेंदूतल्या जागृती ठेवणाऱ्या केंद्रावर एक प्रकारची शिथिलता येते व त्यामुळे झोप लागते. हा एक सर्वसामान्य शास्त्रीय सिद्धान्त आहे. चिंता रोगासाठी रिलॅक्सेशन व्यायामाचा अपेक्षित व योग्य फायदा मिळतो. पटकन झोप येण्यासाठी हा केव्हाही श्रेष्ठच उपाय आहे याची खात्री प्रत्यक्ष पेशंटबरोबर आम्हाला येते.

चिंता रोगः या विकारामध्ये बारीक व अनेक गोष्टींची अनाठायी चिंता करण्यामुळे झोप लागणे कठीण होते. झोप न आल्याच्या काळजीमुळे परत झोप येत नाही. शेवटी आपोआप थकून आलेली झोप अपुरी वाटते. अशा व्यक्तींनी आपल्या फॅमिली डॉक्टरकडून योग्य अशा झोप येण्यास उपयुक्त गोळ्या घेणे फायद्याचे ठरते. या गोळ्यांचा वापर मर्यादित (१० ते १५) दिवस ठेवल्यास नंतर आपोआप झोप (विनागोळ्या) येऊ शकते.

नैराश्य रोगः  अशा व्यक्तींना आयुष्य जगणे हे संकट वाटते. ते अशक्य वाटू लागते. आत्मविश्वास गेल्याची एक विलक्षण ठाम समजूत निर्माण होते. पुढे होणाऱ्या गंभीर परिस्थितीचे अति भीतिदायक दृश्य यांच्या डोळ्यांसमोर नाचत राहते. यास मीच जबाबदार, असे वाटून डोळे तारवटून, धडधडत्या छातीने, गारठलेल्या हातापायाने, घामाने डबडबलेल्या स्थितीत या व्यक्तींना झोप लागणे कठीण होते व लागलीच तर केवळ १ ते २ तास व नंतर नवीन दिवसाची असह्य काळजी व नैराश्य.

अपशकुनी विचार रोगः परीक्षेत नापास होणार, जवळच्या नातेवाइकांचा आजार घातक ठरणार, धंद्यात नुकसान होणार, नोकरीत प्रगती होणार नाही, रात्री घरात चोर येणार इत्यादी अनेक तऱ्हेचे वाईट व अपशकुनी विचार जरी खरे होणारे नसतील (१०० टक्के) व तरीही तसे झाले तर? अशा या कधीही न संपणाऱ्या शंका यात झोप येण्यास ३ ते ४ तास वेळ लागतो.

भित्रेपणाचा विकारः मला झोपेतच हद्यविकारचा झटका येणार किंवा मेंदूत रक्तस्त्राव होणार, मला कॅन्सर झाला असेल तर? मी नक्कीच मरणार व तेसुद्धा झोपेतच, अशा काळज्या या व्यक्तींना वाटत राहतात त्यामुळे त्यांना झोप येण्यास ३-४ तासांचा अवधी लागतो.

भ्रमिष्टपणाः या मनोविकारात इतर बहुतेक माणसांबद्दल संशय व अविश्र्वास वाटतो. आपल्याला मारायला खोलीत कोणीतरी भूत, जादूटोणा, करणीकर्तुज करणारा अथवा शत्रू बसलेला आहे याची या व्यक्तींना ठाम खात्री असते. त्यामुळे गुपचूप पण भेदरलेल्या नजरेने सर्व घर निरखून पाहण्यात यांची रात्र जाते. एकाच जागी तिष्ठून बसणे व अशा अनेक रात्री जागून घालविणे हे या आजारात (स्क्रिझोफ्रेनिया) होते.

झोपेत मध्येच जाग येणेः पहिले २ ते ३ तास झोप लागल्यावर काही कारणाने जाग येते व परत झोप येण्यास पहाट होते व केवळ १ ते २ तास झोप येते. असा त्रास चिंता रोग व नैराश्य रोगात हमखास आढळतो. मद्यपान करणाऱ्या व्यक्तींना अशीच जाग येते व परत झोपण्यासाठी त्यांना पिणे ‘भाग’ पडते.

नैराश्य रोगात पहाटे चारलाच उठून कण्हत किंवा पुटपुटत बसणे अशा व्यक्तींना भाग पडते. दिवस कसा जाणार याची त्यांना अतोनात काळजी व नैराश्य वाटते. याउलट अति उत्साह (mauia) रोगात व्यक्ती अति उत्साहाने आपला दिनक्रम पहाटे ३ वाजता श्लोक, भजन किंवा गाणी यांनी सुरू करतात. साफसफाई, स्वयंपाक, आंघोळ करणे व इतरांनाही तसे करण्यासा भाग पाडणे या व्यक्ती करत असतात. या सर्वांचा घरातल्या लोकांना खूप त्रास होत आहे याची अशा व्यक्तींना काहीच जाणीव नसते.