तुकाराम

तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)

तुकाराम [तुका झालासे कळस! (श्री तुकाराम बीज)]


थोर आणि अभिमानास्पद संतपरंपरा हे आपले सांस्कृतिक वैभव आहे . मर्‍हाटाचि बोलु अमृतातेही पैजा जिंकण्यापर्यंत, उच्चतम स्तरापर्यंत नेऊन ठेवण्याची जिद्द बाळगणारे आणि त्याबरोबरच मर्‍हाठियेचां नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू हवा अशी श्रेष्ठतम आकांक्षा बाळगणारे श्रीज्ञानेश्वर, सर्वांभूती परमात्मा पाहणारे आणि समाजकल्याणाची अविरत कळकळ बाळगणारे संत एकनाथ, महाराष्ट्रधर्म वाढवावा अशी तळमळ बाळगणारे समर्थ रामदास आणि प्रापंचिक हलाहल पचवून पुढील पिढ्यांसाठी सद्‌विचारांचे अभंगामृत ठेवणारे तुकोबा! ही आणि अशीच संतपरंपरा हे आपले अमोल धन आहे. ते कोणीही आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आपले संत हे केवळ विविध जातीधर्मातूनच आले असे नव्हे तर ते समाजाच्या विविध स्तरांमधूनही आले आहेत आणि त्यांनी आपापल्या व्यवहारात, आपापल्या कामकाजात परमेश्वराचे स्वरूप पाहिले आहे. त्यांनी देवाला बरोबर ओळखले आहे. आपले संत हे तसे अंधश्रद्ध नाहीत. उलट आपल्या सर्व संतांनी जागोजागी अंधश्रद्धेविरुद्ध आपले मत नोंदविले आहे.

विष्णूदास म्हणून मेणाहून मऊ परी प्रसंगी वज्राहून कठीण!

लोकशिक्षणाची आणि जनजागृतीची त्यांची तळमळ शब्दाशब्दांतून ओसंडत असते. आपण स्वत: भगवंतप्राप्तीचा मार्ग यशस्वीपणे अनुसरला ह्यातच केवळ संतोष न मानता इतरांनाही हा आनंद लुटू द्यावा, अशी ह्या सर्व संतांची धारणा आहे. ” नको सेवू वन, नको सांडू अन्न चिंती नारायण सर्वांठायी । । ” असा संदेश प्रत्येक संताने आपल्या लिहिण्याबोलण्यातून दिलेला आहे. प्रपंचात आणि परमार्थात श्रेष्ठपदी पोहोचलेल्या वेगवेगळ्या संतांनी महाराष्ट्रातील पिढ्यापिढ्यांच्या हिताची काळजी वाहिली, तुमच्या- आमच्या सर्वांच्या कल्याणाची इच्छा व्यक्त केली, हे खरोखरच ह्या मातीत जन्मणाऱ्या प्रत्येकाचे थोर भाग्यच नव्हे काय?’ तुकोबांची गाथा हा मराठी साहित्यशारदेचा अनमोल अलंकार आहे. तुकाराम महाराज आकाशाएवढे मोठे झाले होते. म्हणून ते पुढील पिढ्यांच्या उपकारापुरते उरले. विष्णूदास म्हणून ते मऊ मेणाहून असले तरी प्रसंगी वज्राहून कठीण होण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती.

सोने आणि मृत्तिका एकाच दृष्टीने पाहणारे तुकोबा शब्दांच्या सामर्थ्याला मात्र पुरेपूर ओळखतात आणि आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने असे अभिमानाने सांगतात. जे जे भेटे भूत । ते जाणावे भगवंत । । एवढे सांगून तुकोबा थांबत नाहीत, तर वृक्षवल्लीसुद्धा आमची सोयरी आहेत, असे म्हणून विश्वबंधुत्वाची मर्यादा सर्व चराचरापर्यंत नेऊन पोहोचवतात. आपल्याला पाहून शेतात दाणे टिपणारे पक्षी उडून गेले म्हणून तुकोबा बेचैन होतात. तुकोबांना आस एकच, श्रीविठ्ठलकृपेची! म्हणून मायाजाळात न गुंतता परमार्थ साधनेचा मार्ग अनुसरला पाहिजे ह्या गोष्टीवर ते अधिक भर देतात – तुका म्हणे हेचि, माझे सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने । । अशी त्यांची तळमळ आहे.

सदा माझे डोळा, जडो तुझी मूर्ती हीच त्यांची प्रार्थना आहे. तुकोबा त्या काळच्या रूढ अर्थाने शिकलेले पंडित नव्हते, पण संसाराच्या पाठशाळेत त्यांना जे धडे मिळाले त्यापासून जमा केलेले अनुभवाचे नवनीत त्यांनी आपल्या अभंगांच्या रूपाने शब्दबद्ध करून ठेवले. म्हणून तर ” तुका झालासे कळस” असे सार्थपणे म्हणावयाचे!

अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (देवाचिये व्दारी पुस्तकामधून)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.