सिंहासनाधिष्ठित हिंदुपदपातशहा छत्रपती शिवाजी महाराज

Published by ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर on   June 7, 2017 in   मराठी लेखणी

आज ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी!

३४४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुप्रभाती श्रीछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे राजसिंहासन भूषविले. शिवाजी महाराज केवळ राजसिंहासनावरच विराजमान झाले असे नव्हे, तर त्या महन्मंगल परमपावन भाग्यक्षणी ते मराठी माणसाच्या हृद्यसिंहासनावरही अनंत काळासाठी स्थानापन्न झाले आणि लोकमानसावर अखंड अविच्छिन्न अधिराज्य गाजविणाऱ्या या वीराग्रणी पुरुषश्रेष्ठाच्या नावाचे नुसते स्मरणही पुढील पिढ्यांपिढ्यांच्या मनात शौर्याची उत्तुंग कारंजी फुलवीत राहिले. हा राज्याभिषेक केवळ नद्यांच्या पाण्याने केलेला शिडकावा नव्हता, तो होता एक थोर पण प्रतिकूलतेच्या दबावाखाली दबलेल्या उज्ज्वल परंपरेचा गौरवशाली सन्मान!

देशाचा पालनवाला । तो शिवाजि राजा झाला । धर्माचा रक्षणवाला । तो शिवाजि राजा झाला ।।

असा प्रारंभ असलेली एक कविता कवी गोविंद यांनी लिहिली आहे. या कवितेत शिवाजी महाराज राजसिंहासनावर बसले, त्याचे सुपरिणाम किती विविध क्षेत्रांत घडले त्याचे भक्तिभावपूर्ण वर्णन कवी गोविंदांनी केले आहे. यात शिवाजी महाराजांना देवपदी तर बसविले आहेच, पण तुकाराम, रामदास असे संत शिवरायाच्या पाठीशी कसे उभे होते तेही सांगितले आहे.

कवी म्हणतात, गर्जते भवानी मेधा । चमकते भवानी खांडा । चाललाच भगवा झेंडा । रण-नाचाला ।।

भवानीच्या गर्जनेबरोबरच भवानी तलवार भगव्या झेंड्याच्या रक्षणासाठी रणांगणावर वीरोचित नृत्य करण्यासाठी चालली आहे.

तुक्याचा प्रेमळ वीणा । गहिंवरवी अंत:करणा । करुणेच्या घेऊनि ताना । उठवी हरिला ।।

तुकोबांची प्रेमळ वीणा सर्वांच्या अंत:करणाला हात घालून करुणरसपूर्ण अशा आवाजात शिवरायाच्या साहाय्यासाठी पांडुरंगाने यावे, अशी जागृती करीत आहे.

प्रभु रामदास तो आला । राष्ट्राचा जादूवाला । मावळा मंत्रिला सगळा । भालेवाला ।।

समर्थ रामदासही उपस्थित झाले आहेत. त्यांनी देशभक्तीच्या मंत्राने भाले धारण करणाऱ्या सगळ्या मावळ्यांना एके ठिकाणी आणले आहे.

रणयज्ञ विजय-हेरंबा । पूजाया रणजगदंबा । तोरणा रणप्रारंभा । नारळ फुटला ।।  

या रणयज्ञाच्या प्रारंभी गणेशाचे आणि आई जगदंबेचे पूजन करून तोरणा आपल्या अमलाखाली आणून स्वराज्याच्या महायज्ञाचा शुभारंभ झाला आहे.

पुण्यात राजवाड्यात । खड्गाचि रात्र कुजबुजत । ऐकूनि मस्त शाहिस्त । पळूनि गेला ।।

पुण्यातल्या लाल महालात अपरात्री केलेल्या हल्ल्यात शाहिस्तेखान आपली बोटे छाटून घेऊन पळून गेला.

तो पुरंदराचा झगडा । तो मुरारबाजी लढला । हाताच्या करूनि ढाला । रिपु रोधीला ।।

तसेच पुरंदराच्या लढाईत मुरारबाजी आपल्या हाताची ढाल करून लढला.

मग सिंहगडाचें युद्ध । गड चढला वैभवसूर्य । रक्ताचे देऊनि अर्घ्य । तान्हा गेला ।।

सिंहगडाच्या युद्धात मिळविलेल्या विजय म्हणजे वैभावाचा सूर्य जणू माध्यान्ही चढला.

किती असे वीर वर्णावे । कितीजणां पवाडे गावें । कवितेनें ओवाळावें । कुणा कुणाला ।।

किती वीरांचे कोणत्या शब्दांत कसे वर्णन करणार, किती जणांचे पोवाडे गाणार?

श्रीस्वातंत्र्याची माला । वीरांनी गुंफुनि निमला । अर्पिली देशदेवाला । हरहर बोला ।।

वैकुंठ रायगड केला । लोक तो देवगण बनला । शिवराजा विष्णू झाला । वंदन त्याला ।।

रायगड हा जणू श्रीविष्णूचे निवासस्थान असलेला वैकुंठच आहे. महाराष्ट्रातले नागरिक हे सगळे त्या वैकुंठातील देव आणि शिवराजा म्हणजेच विष्णू.

शिवरायाला विष्णूचा अकरावा अवतार म्हणून शिवभक्त भालजी पेंढारकरांनी गौरविलेले आहेच.

देशाचा पालनवाला । तो शिवाजि राजा झाला । धर्माचा रक्षणवाला । तो शिवाजि राजा झाला ।।

या घटनेला आज ३४३ वर्षे पूर्ण होत आहेत. उद्यापासून ३४४ वे वर्ष चालू होईल. शिवाजी महाराज चारही बाजूंनी शत्रूने वेढले गेले असतानाही सिंहासनाधिष्ठित झाले. या महाराष्ट्र भूमीला त्यांनी राजतिलकाने सन्मानित केले, तो दिवस बरोबर ३४३ वर्षांपूर्वीचा. केवळ आपल्या प्रदेशातच नव्हे, तर नात्यागोत्यातही क्रूर, जीवघेणी, दगाबाज फंदफितुरी माजलेली असताना, शिवप्रभूंनी स्वराज्याची स्थापनाच केली,असे नव्हे तर स्वत:ला धर्माने सांगितल्याप्रमाणे सशास्त्र विधीपूर्वक राज्याभिषेक करून घेतला, हा महाराष्ट्र भूमीचाच महान गौरव झाला.


 – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर । ज्ञानाचा उद्गार । देवाचिये व्दारी भाग ५ वा