बाग | Kitchen Garden | Dr Shama Zaidi | kitchen garden at home | terrace kitchen garden | organic kitchen garden | rooftop kitchen garden

स्वयंपाकघरातील बागकाम | डॉ. क्षमा झैदी | Kitchen Garden | Dr Shama Zaidi

स्वयंपाकघरातील बाग काम

घराच्या परसात बाग फुलवणे, हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण सध्याच्या सिमेंट-क्राँकीटच्या जगात घराला परसदारच नसल्यामुळे बाग फुलविण्याची हौस भागवणे शक्य होत नाही. मात्र या समस्येवर तोडगा निघाला, तो ‘किचन गार्डन’ किंवा ‘टेरेस गार्डन’च्या रूपाने. घराच्या गॅलरीत किंवा गच्चीत फुले-फळझाडे लावून आपली ही हौस अनेक जण भागवताना दिसतात. घरगुती बाग फुलवतानाच हळूहळू अनेकांचा ओढा शेती करण्याकडे वळू लागला आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी घरातल्या घरातच फळे, भाज्या पिकविण्याचे प्रमाण आता वाढू लागले आहे. गच्चीवर, बाल्कनीमध्ये अशा प्रकारे शेती करणे म्हणजे वृक्षसंवर्धनाची हौस भागवतानाच घरच्या घरी दररोज ताज्या भाज्या मिळविणेही सहजशक्य होते. भाज्यांचे पीक येण्यासाठी कमी कालावधी लागतो, तसेच यासाठी लागणारे अनुकूल वातावरण गच्चीवर तयार करणे शक्य असल्यामुळे किचन गार्डनमध्ये भाज्या पिकवणे हा एक चांगला संभाव्य पर्याय आहे.

किचन गार्डनचा आणखी एक फायदा म्हणजे किमान खर्चामध्ये कीटकनाशकमुक्त आरोग्यदायी भाज्या आपल्याला घरच्या घरी मिळवता येतात. कोरोनामुळे सगळीकडे लादल्या गेलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना त्यांच्या किचन गार्डनमधूनच ताज्या आणि विषाणूविरहित स्वच्छ भाज्या मिळाल्या. घरातील या बागेमुळे आपली सौंदर्यदृष्टी सुधारते, मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते आणि मुख्य म्हणजे आपल्या भोवतालच्या वातावरणातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होते, हे किचन गार्डनचे अतिरिक्त फायदे म्हणता येतील.

किचन गार्डनचे फायदे समजून घेतानाच ही संकल्पना, त्याची लागवड आणि संवर्धन आदी गोष्टी समजून घ्यायला हव्या.

किचन गार्डन किंवा पोषण बाग
कुटुंबासाठी ताज्या व स्वच्छ भाज्या नियमितपणे उपलब्ध होणे, हा किचन गार्डन / होम गार्डन / न्यूट्रिशन गार्डनचा हेतू आहे. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीतून विविध प्रकारच्या भाज्या या परसबागेत पिकविणे शक्य आहे. कुटुंबातील व्यक्तीच ही घरगुती शेती करू शकतात. जमिनीची उपलब्धता आणि प्रकार यावरून बागेचे किंवा वाफ्याचे क्षेत्रफळ, रचना, पिके यांची निवड करण्यात येते. ग्रामीण भागात जमीन ही समस्या नसते. त्यामुळे वैज्ञानिकदृष्ट्या रचना केलेला वाफा तयार करणे सहज शक्य असते. शहरी भागांमध्ये मात्र जमीन मर्यादित प्रमाणावर असते. त्यामुळे उपलब्ध जागेत किंवा इमारतीच्या गच्चीवर पिके घेण्यात येतात. घरातल्या घरात कुंड्यांमध्ये किंवा सिमेंटच्या पोत्यांमध्येही पिके घेणे शक्य आहे.

किचनमध्ये बाग तयार करून या बागेची चांगल्या प्रकारे निगा राखण्यासाठी खालील गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे :

१. जागेची निवड :
तुमच्याकडे आधीपासूनच किचन गार्डन असेल, तर तुम्हाला वेगळी जागा शोधायची गरज नाही. जुन्या जागेतच सुधारणा करता येऊ शकते. पण तुम्हाला नव्याने गार्डन तयार करायचे असेल, तर अनेक घटक विचारात घ्यावे लागतील. उदा., या जागेला पाणीपुरवठा कसा करणार? बागेपर्यंत पाणी वितरित कसे करणार?
* माती कशी आहे? मातीचा कस कसा राखता येईल?
* सूर्यप्रकाश कुठून येत आहे?
* घरातून त्या जागी किती सहज जाता येते?
हे मुद्दे लक्षात घेतल्यास उत्तम जागा निवडली जाते आणि बागेत काम करणे सोपे होते.

२. आवश्यक साहित्य :
* खुरपे
* झारी
* स्प्रे करायचा पंप
* स्प्रिंकलर असलेली नळी
* बांबूच्या पट्ट्या व तागाची सुतळी

  • कुंड्या आणि कंटेनर
  • दर्जेदार बियाणे
  • सुपीक माती
  • चांगले सेंद्रिय खत
  • नदीतील वाळू
  • कृषीरसायने (पोषक तत्त्वे, कीटकनाशके, बुरशीनाशके) आणि इतर सेंद्रिय घटक (कडुनिंबाचे तेल, कडुनिंबाच्या बियांचा अर्क, पंचगव्य)

३. गच्चीतील बागेत लावण्यासाठी सुयोग्य भाज्या
* प्रत्यारोपित करण्यायोग्य भाज्या : टोमॅटो, वांगी, मिरच्या.
* थेट पेरायच्या भाज्या : भेंडी, माठ, कारली, पडवळ, दोडका, दुधी भोपळा, मुळा, बीट.
* बारमाही भाज्या : शेंगा, कढीपत्ता, भाजीची केळी, चेक्कूरमणी, अगाथी.
* गच्चीवरील बागेसाठी सुयोग्य अशी मसाल्याची पिके : हळद, कोथिंबीर, मेथी.

४. सूर्यप्रकाश
* तुम्ही निवडलेल्या जागी किती व कशा प्रकारे सूर्यप्रकाश येतो त्यानुसार तुम्ही पिकाची निवड करू शकता. उदा. :
* शेड (थेट सूर्यप्रकाश नसणे):
लेट्यूस, सेलरी, कोबी, बीट, बटाटे अशा भाज्यांचे पीक शेड असलेल्या जागेत घेता येते.
* अंशतः सूर्यप्रकाश : पालेभाज्या
आणि औषधी वनस्पती यांची लागवड करता येईल.
* थेट सूर्यप्रकाश (४-६ तास) :
फळभाज्यांची लागवड करता येईल.

५. कंटेनरची निवड
तुम्हाला कोणत्या भाजीचे पीक घ्यायचे आहे, यावरून कंटेनरची किंवा कुंडीची निवड ठरत असते. घरी असलेले तेलाचे डबे, हॉटेलमधून येणारे डिलिव्हरीचे डबे, टेट्रा पॅक इत्यादींचा वापर यासाठी करता येऊ शकतो.
* मातीच्या कुंड्या :
भुसभुशीत माती भाजून विविध आकाराच्या कुंड्या तयार करण्यात येतात. या कुंड्यांमध्ये पिके घेण्यासाठी आवश्यक माती भरता येईल. या कुंड्या वरच्या बाजूला रुंद आणि खालच्या बाजूला निमुळत्या असतात, जेणेकरून कम्पोस्ट धरून ठेवता येईल आणि माती सहज काढता येऊ शकते, रोप लावताना किंवा एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लावताना मुळे व्यवस्थित राहतील. आपल्याकडे विविध आकाराच्या कुंड्या मिळतात. उभट कुंड्या, छोट्या, मध्यम व मोठ्या आकाराच्या कुंड्या सामान्यपणे वापरण्यात येतात.
* प्लास्टिकच्या कुंड्या :
इनडोअर वनस्पतींसाठी प्लास्टिकच्या गोलाकार आणि चौरसाकृती कुंड्या वापरता येऊ शकतात. विविध आकारांच्या या कुंड्या पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतात. या कुंड्या वजनाने हलक्या असतात, त्या सच्छिद्र नसतात आणि त्यांना खूप कमी जागा लागते.
* फायबरच्या कुंड्या :
या कुंड्या ५-१० सें.मी. रुंदीपासून उपलब्ध असतात. या कुंड्यांचे जैविक विघटन होऊ शकत नाही, आणि या दीर्घकाळ टिकतात.
* सीड पॅन व सीड बॉक्सेसः
सीड पॅन म्हणजे मातीच्या उथळ कुंड्या. या कुंड्यांची उंची १० सें.मी. तर व्यास ३५ सें.मी.असतो आणि त्यांच्या तळाशी एक भोक असते. सीड बॉक्सेस लाकूड, पोर्सेलिन आणि मातीच्या कुंड्यांपासून तयार करतात. या कुंड्यांची रुंदी ४० सें.मी. तर लांबी ६० सें.मी. आणि खोली १० सें.मी. असते. या कुंड्या सीड पॅन म्हणूनही वापरता येतात. यावर मातीचे मिश्रण टाकले जाते आणि भाज्या वाढविण्यासाठी या कुंड्या मोकळ्या सूर्यप्रकाशात ठेवण्यात येतात.

* पॉलिथिनच्या पिशव्या :

या लहान आकाराच्या पॉलिथिनच्या पिशव्या असतात. त्यांच्या तळाशी भोके पाडलेली असतात आणि त्यात मुळे धरून ठेवणारे सच्छिद्र माध्यम घातले जाते. चमेली, डुरान्ता, क्रोटोन इत्यादींच्या फांद्या लावण्यासाठी याचा वापर होतो. काही वेळा नर्सरीमध्ये वाढविण्यात आलेली रोपे या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये पुन्हा लावण्यात येतात. (उदा., पपई, कढीपत्ता इ.) मातीचे मिश्रण पॉलिथिनच्या पिशवीत भरण्यात येते आणि टोमॅटो, वांगी, मिरच्या, हळद, कोथिंबीर, चवळी यांसारख्या पिकांची लागवड करण्यासाठी यांचा वापर करण्यात येतो.

* पॅराफिन पेपर किंवा स्टायरोफोम कप :
हे आइस्क्रीमच्या कपसारखे दिसतात आणि यांच्या तळाशी भोक असते. कोवळी रोपे वाढविण्यासाठी या तात्पुरत्या कुंड्या असतात. या हलक्या आणि स्वस्त तर असतात, शिवाय
कमी जागा व्यापतात. अलीकडील काळात थर्माकोलच्या कुंड्या लोकप्रिय होत आहेत, कारण त्या हलक्या आणि आकर्षक असतात.

 


डॉ. क्षमा झैदी

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.