आहारात भाज्यांचा कल्पक समावेश
आपल्या लहानपणी, रोज पोळीभाजी, वरणभात असाच स्वयंपाक बनायचा. रविवारी वेगळे काही व्हायचे. कधी संध्याकाळी खिचडी, वरणफळ असा थोडा वेगळा मेन्यू असायचा. कधीकधी अचानक एखाद्या दिवशी सुट्टीचा दिवस नसताना किंवा पाहुणे वगैरे आलेले नसतानाही चविष्ट थालीपीठ किंवा कटलेट असायचे. गरमागरम थालीपीठ किंवा कटलेट्स बघता बघता संपून जायची, पण गंमत म्हणजे एवढी मेहनत करूनही आई त्या दिवशी जास्तच खूश असायची. त्या खुशीचे रहस्य गृहिणी झाल्यावर लक्षात येते. अचानक केलेले थालीपीठ किंवा कटलेट्स म्हणजे मुलांना न आवडणारी भाजी खाऊ घालण्याची आईची एक युक्ती असायची.
सध्या अनेक कारणांमुळे आपले खाद्यविश्व प्रचंड विस्तारले आहे. ते कटलेट्स आणि थालीपीठाच्या खूप पुढे गेल्याने आज आपण अनेक पदार्थांमधून छुप्या पद्धतीने घरातील सगळ्यांच्या पोटात भाज्या कशा जातील हे बघू शकतो. पोळीभाजीशिवाय भाज्या पोटात जाण्यासाठी सँडविचेस, सूप्स, पराठे, ज्यूस, पावभाजी, पॅटिस, वेगवेगळे पुलाव, बिर्याणी, वडे, पॅनकेक्स, धिरडी, चिप्स यांसारखे अनेक पदार्थ बनवले जातात. बर्गर किंवा सँडविचेसमध्ये आतल्या सारणासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा उपयोग करता येतो. कच्च्या खाण्या-सारख्या भाज्या नुसत्या स्लाइस करून तर बाकी भाज्या किसून, हलक्या शिजवून, वेगवेगळे हिरवे मसाले वापरून, सारण करून सँडविचमध्ये भरता येतात. काही भाज्या वापरून त्याची टिक्की किंवा पॅटी करून बर्गरमध्येही घालता येते.
पालक, पडवळ, दोडके, बीट, दुधी यांसारख्या बऱ्याच जणांच्या नावडत्या भाज्या वेगवेगळ्या पदार्थांत बेमालूमपणे घालता येतात. या भाज्या किसून, हलक्या वाफवून घ्याव्यात. भाज्या वाफवण्यासाठी जाड बुडाच्या कढईत भाज्यांचा कीस घाला, त्यावर झाकण ठेवून त्यात थोडे पाणी घाला. अशा पद्धतीने भाजी वाफवल्यास भाज्यांमध्ये असलेल्या रसातच भाजी शिजते आणि त्याचे पोषणमूल्य कमी होत नाही. अशा शिजलेल्या भाज्यांमध्ये वेगवेगळी मिक्स पीठे घालून आवडीप्रमाणे त्याचे पॅनकेक्स, पराठे, धिरडी, वडे असे पदार्थ करता येतात.
भाज्या वापरून वेगवेगळे पुलाव, बिर्याणीसारखे पदार्थ करता येतात. आवडती भाजी ओळखू येईल अशा स्वरूपात, तर नावडती भाजी किसून वापरता येते. मात्र पदार्थात वेगवेगळे ताजे, उत्तम मसाले वापरून तो चविष्ट कसा बनेल याची काळजी घ्यायला हवी.
आपल्या किचन गार्डनमध्ये कढीपत्ता, पुदिना, शेवगा, अळू, हळद, पालक, मिरची, गवती चहा, तीळ, विड्याचा वेल, कांदा-लसूण पात अशा एक ना अनेक भाज्या लावता येतील. त्यामुळे या सगळ्या भाज्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये घालणे सहज शक्य आहे. विशेषतः कढीपत्ता आणि शेवग्याची पाने अनेक पदार्थांत वापरता येतात. ही दोन्ही पाने खूप पौष्टिक असून पदार्थांत त्यांचा केलेला वापर खाणाऱ्याच्या अजिबात लक्षातही येत नाही. जेवणात कढीपत्त्याचे पान आले की ते बाजूला काढून टाकण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे बऱ्याच पाककृतींमध्ये मसाला वाटताना त्यातच कढीपत्त्याची भरपूर पाने घालता येतील. याशिवाय, फोडणीत काही पाने हवी. त्यामुळे भरपूर कढीपत्ता आपल्या पोटात जातो. याशिवाय ऑम्लेट, पराठा, खिचडी अशा अनेक पदार्थांमध्ये शेवग्याची पाने घालता येतील. मसाल्यांच्या चवीत शेवग्याच्या पानांची चव तर लपते, शिवाय पदार्थांचे पोषणमूल्य अधिक पटीने वाढते. भाज्यांचा स्मार्ट वापर करून तयार केलेल्या या काही चविष्ट पाककृती पुढीलप्रमाणे :
१. यमी पिझ्झा
साहित्य : पाव किलो दोडके, प्रत्येकी अर्धी वाटी नाचणी आणि राजगिरा पीठ, १ वाटी कणीक, १ छोटा चमचा बेकिंग पावडर, आवश्यकतेनुसार बटर, मीठ.
टॉपिंगसाठी : १ सिमला मिरची, प्रत्येकी १ छोटी वाटी पनीर क्यूब्ज, बेबी कॉर्न, आलपिनो, ब्लॅक ऑलिव्हज, अननसाच्या फोडी,
१ कांदा, तयार पिझ्झा सॉस, पिझ्झा चीज, ओरिगॅनो.
कृती : दोडक्याचे साल काढून किसून घ्या. त्यात सगळी पिठे आणि मीठ घाला. बेकिंग पावडर घालून घट्ट गोळा मळून घ्या. थोडेसे बटर लावून परत नीट मळून घ्या. नेहमीच्या पोळीपेक्षा जाड आणि भाकरीपेक्षा पातळ बेस लाटून घ्या. फोर्क वापरून पोळीवर टोचे मारून घ्या. ही पोळी जाड कास्ट आयर्नच्या तव्यावर किंवा ओव्हनमध्ये डाग पडू न देता भाजून घ्या. या पोळीवर पिझ्झा सॉस लावा. त्यावर हलक्या वाफवलेल्या सर्व भाज्या पसरवून घ्या. त्यावर किसलेले चीज पसरवून ओरिगॅनो घालून झाकण ठेवा. चीज वितळेपर्यंत पिझ्झा बेक करून घ्या.
२. व्हेज नूडल्स
साहित्य : १ पाकीट नूडल्स, प्रत्येकी १ गाजर, झुकिनी, बीट, रताळे, प्रत्येकी १ वाटी लांब चिरलेल्या भाज्या (कोबी, सिमला मिरची, कांदा),प्रत्येकी १ छोटा चमचा बारीक चिरलेले आले-लसूण, सोया सॉस, चिली सॉस, टोमॅटो सॉस, पाव वाटी तेल, थोडी कांदा पात, चवीनुसार मीठ.
कृती : नूडल्सच्या दुप्पट पाणी गरम करा, त्यात तेल घाला. पाण्याला उकळी आल्यावर त्यात नूडल्स घाला. नूडल्स शिजून वर आल्यावर चाळणीत निथळून घ्या. भाज्यांचे नूडल्स करण्यासाठी व्हेजिटेबल नूडल्स मेकिंग मशीन मिळते. (भाज्या मऊ असतील तर मशिनमध्ये घालून डायरेक्ट त्याच्या नूडल्स करता येतात. भाज्या कडक असतील तर अख्ख्याच थोड्या शिजवून त्याच्या नूडल्स करून घ्या.) मशीन नसेल तर पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात आले, लसूण, कांदा पात घालून परता. त्यात लांब चिरलेला कांदा, कोबी, सिमला मिरची, सोया सॉस, टॉमेटो सॉस, चिली सॉस आणि मीठ घालून परता. भाज्या परतताना गॅस मोठाच राहू द्या. भाज्यांमध्ये शिजलेले साधे नूडल्स घालून परतून घ्या. नूडल्सवर कांदा पात घालून सर्व्ह करा.
३. तिरंगी पास्ता
साहित्य : प्रत्येकी अर्धी वाटी पालक प्युरी, बीट प्युरी, टोमॅटो प्युरी, दुधीची प्युरी, प्रत्येकी छोटी वाटी नाचणी पीठ, कणीक, ज्वारी पीठ, चवीनुसार मीठ आणि तेल.
कृती : पालक प्युरीमध्ये मावेल एवढे ज्वारीचे पीठ आणि मीठ घालून घट्ट कणीक मळा. याचप्रमाणे बीट-टोमॅटो प्युरीमध्ये मावेल एवढे नाचणी पीठ, मीठ तसेच दुधीच्या प्युरीत कणीक आणि मीठ घालून घट्ट कणीक मळून १५-२० मिनिटे झाकून ठेवा. मोठी पोळी लाटून, त्याचे चौकोन कापून घ्या. चिमटा घेऊन बो प्रमाणे आकार द्या.
एका पिठाची पातळ पोळी लाटून लांब कातून घ्या. तिसऱ्या पिठाचे अगदी छोटे गोळे करून फोर्कवर दाबून त्याचे छोटेछोटे रोल करा. यामुळे छान टेक्श्चर आणि आकार येतो. पास्ताचे हे प्रकार उकळत्या पाण्यात तेल आणि मीठ घालून शिजवून घ्या. त्यात आवडीचा सॉस घालून खा अथवा तयार पास्ता वाळवून पाहिजे तेव्हा वापरता येईल.
४. पालक पनीर पुलाव
साहित्य : २ वाट्या पालक प्युरी, दीड वाटी पनीर क्यूब्ज, अख्खे गोडे मसाले, २-३ छोटे चमचे तूप, २ चमचा आले-लसूण पेस्ट, १ वाटी बासमती तांदूळ, १ छोटा चमचा पुलाव किंवा बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ.
कृती : तांदूळ धुऊन निथळून घ्या. तूप गरम करून त्यात अख्खे मसाले घालून परता. त्यात आले-लसूण पेस्ट आणि तांदूळ घालून परता.२-३ मिनिटे परतल्यावर त्यात पालक प्युरी आणि अर्धी वाटी पाणी, मीठ, मसाला घालून ढवळून झाकण ठेवा. पनीर वेगळे तळून घेऊन तयार भातावर घाला. पुलावबरोबर कोणतेही दह्यातले रायते घ्या.
५. शेवगा डाळ वडा
साहित्य : १ वाटी हरभरा डाळ, दीड वाटी शेवग्याची पाने, पाव वाटी चिरलेला कढीपत्ता, १ छोटा चमचा आले-लसूण-मिरचीची पेस्ट, १ मिरची, १ छोटा चमचा भरडलेले धणे, चवीनुसार मीठ, तेल, कोथिंबीर, चिमूटभर सोडा.
कृती : हरभऱ्याची डाळ ४ ते ५ तास भिजवून जाडसर वाटून घ्या. शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्या. त्यामध्ये राहिलेले सगळे साहित्य घालून एकजीव करून घ्या. या मिश्रणाचे छोटे वडे करून तळून घ्या.
अजुन काही महत्त्वाचे लेख वाचण्यासाठी आमच्या ब्लॉग ला भेट द्या.
कांचन बापट
(लेखिका प्रसिद्ध शेफ आणि यू-ट्यूबर आहेत.)
